देशमुख, पंजाबराव शामराव: (२७ डिसेंबर १८९८–१० एप्रिल १९६५). महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व भारताचे कृषिमंत्री. पंजाबरावांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव कदम पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. त्यांचे वडील शामराव आणि आई राधाबाई. पंजाबरावांचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले. अमरावतीला हिंदू हायस्कूलमध्ये मॅट्रिक होऊन (१९१८) ते पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले परंतु पदवी घेण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले (१९२०). इंग्लंडमध्ये त्यांनी एम्. ए.(एडिंबरो), डी. फिल्. (ऑक्सफर्ड) आणि बार अट लॉ या पदव्या मिळविल्या. ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणूनही काही दिवस काम करून ते भारतात परत आले (१९२६) व अमरावतीस त्यांनी वकिली सुरू केली.
पंजाबरावांनी १९२७ मध्ये मुंबईच्या सोनार जातीतील विमलाबाई वैद्य ह्या मुलीशी विवाह केला. त्यामुळे विदर्भात, विशेषतः मराठा समाजात खळबळ उडाली. विमलाबाई लग्नानंतर बी. ए. एल्एल्. बी. झाल्या. त्यांचा अनेक स्त्रीसंघटनांशी निकटचा संबंध होता. पुढे त्या राज्यसभेवरही निवडून आल्या. पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यांत त्या हिरिरीने भाग घेत असत. पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला. ते अमरावतीच्या जिल्हा बोर्डात अध्यक्ष झाले (१९२८). या वेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्याच वर्षी सत्याग्रह केला. १९३० मध्ये त्यांची प्रांतिक कायदेमंडळात निवड झाली व ते शिक्षण, कृषी, सहकार आणि लोककर्म खात्यांचे मंत्री झाले. तथापि १९३३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर अमरावती मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय (१९२६) व श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली (१९३२). त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली.
त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता ‘भारतीय प्राथमिक शिक्षक संघ’ स्थापन केला. हे शैक्षणिक प्रसाराचे कार्य करीत असतानाच त्यांनी जुन्यापुराण्या शेती पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. ते काँग्रेसचे सभासद होते व नेताजी सुभाषचंद्र बोसांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. राजकारणापासून अलिप्त होऊन देवास संस्थानात त्यांनी काही काळ ‘राजकीय मंत्री’ म्हणून काम केले. स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागी झाले. १९५२,१९५७ व १९६२ या तीनही वर्षांच्या लोकसभेच्या निवडणुकांत ते विजयी झाले. १९५२ ते १९६२ पर्यंत ते केंद्रीय कृषिमंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री होते. या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या आणि कापूसबाजार, शेती वगैरे क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जातिसंघ, कृषिउत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ, भारत कृषक समाज (१९५५), आफ्रो-आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना इ. संघटना त्यांनी यशस्वीपणे राबविल्या. जपानी भातशेतीचा प्रयोग देशभर व्हावा म्हणून त्यांनी देशव्यापी मोहिम सुरू केली. कृषक समाजाच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ’ आणि ‘कृषक सहकारी भारतीय अधिकोश’ त्यांनी स्थापन केला. भारताच्या कृषिविषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून त्यांच्याच प्रेरणेने दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरविण्यात आले (१९६०). त्यांनी कृषिमंत्री म्हणून विविध देशांना भेटीही दिल्या.
या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक श्रमांमुळे अखेरीस त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि दिल्ली येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आलेले आहे.
संदर्भ : १. नागपुरे, ना. पां. कदम, के. ब. मोहोड, पु. ब. संपा.डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख …विविध गुणदर्शन, अमरावती, १९६५.
२. सावरकर, सुदाम सूर्यकर, रा.ब. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख–जीवन व कार्य, अमरावती, १९६४.
देशपांडे, सु. र.
“