दुराशय : (मेन्झरी). फौजदारी कायद्यामध्ये देण्यात येणारी शिक्षा. ही अपराधी व्यक्तीस नसून अपराध करण्याच्या हेतूला शासन करावयाचे असल्याने दिली जाते, असे मानले आहे. अपराध करण्याचा हेतू, आशय ह्यालाच दुराशय म्हणतात. कोणतेही कृत्य गुन्हा आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी कृत्याचा परिणाम न पहाता ते करणाऱ्याचा हेतू काय होता, हे पाहूनच ठरवावे लागते. एखाद्या व्यक्तीच्या हातून दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लगेच अशा व्यक्तीस दोषी धरले जात नाही. हा अपराध करण्यामागे जर त्याचा दुराशय असेल, तरच ते कृत्य गुन्ह्यास पात्र ठरते. अपघातामध्येसुद्धा असे कृत्य करणाऱ्याचा अत्यंत दोषार्ह असा निष्काळजीपणा अगर बेदरकारपणा असेल, तरच त्यास शिक्षा दिली जाते अन्यथा नाही. वेडा इसम, अज्ञानी, दुसऱ्याच्या जबरदस्तीने अंमली पदार्थ सेवन केलेल्या व्यक्तीने दडपणामुळे अगर स्वतःचा बचाव करण्यास जरूरी असल्यामुळे, वस्तुस्थितीच्या चुकीच्या माहितीने झालेल्या मृत्यामागे असे कृत्य करणाऱ्याचा दुराशय नसल्याने अपराधी धरले जात नाही.
सर्वच अपराधांमध्ये ह्या दुराशयाचा विचार केला जातोच असे नाही. उदा., प्राप्तिकरपत्र वेळेवर न भरणे, चुकीचे भरणे वा एखाद्या कृत्यास दिलेल्या मुदतीत कृत्य न केल्यास अथवा भेसळ प्रतिबंध कायद्यात दुराशयाचा विचार केला जात नाही.
नाईक, सु. व.