दिवस : स्वस्थ पदार्थाला, विशेषतः पृथ्वीला, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. म्हणजे पृथ्वीप्रमाणेच ग्रहादि इतर स्वस्थ पदार्थांचे दिवसही असतात. सूर्याचे उगवणे व मावळणे यांतील नियमितपणा लक्षात आल्याने त्यांचा काळाचे एकक म्हणून माणूस वापर करु लागला. सामान्यतः दिवस २४ तासांत विभागतात.
पृथ्वीला स्वतःभोवती एकदा फिरण्यास लागणारा काळ एखाद्या दूरच्या स्वस्थ पदार्थांच्या वा दिशेच्या संदर्भात मोजतात व त्यानुसार दिवसाचे दृश्य, माध्य नाक्षत्र व सांपातिक दिन असे प्रकार होतात.[→ कालमापन]. माध्य नाक्षत्र दिनामध्ये माध्य सौरदिनाचे २३ ता. ५६ मि. ४·०९०५४ से. येतात. याशिवाय इतरही प्रकारचे दिवस आहेत. चंद्राला याम्योत्तरवृत्त (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक–निरिक्षकाच्या डोक्यावरील खगोलावरील बिंदू यांतून जाणारे खगोलावरील वर्तुळ) लागोपाठ दोनदा ओलांडण्यासाठी लागणाऱ्या काळाला चांद्रदिन म्हणतात. सूर्योदय ते लगतचा सूर्योदय या काळाला सावन दिन म्हणतात. हा पूर्वी यज्ञयागासाठी वापरीत आणि सवन म्हणजे यज्ञ म्हणून सावन नाव पडले. भारतीय पंचांगानुसार धार्मिक कार्यांसाठी स्थानिक सूर्योदयापासूनचा सावन दिन मानण्यास परवानगी आहे मात्र संपूर्ण भारताचा दिवस ८२ पूर्णांक १/२° रेखावृत्त व २३° उं. ११′ उत्तर अक्षवृत्त या ठिकाणच्या मध्यरात्रीपासून सुरु होतो आणि नंतरच्या मध्यरात्री संपतो.
ग्रेगरियन पंचांगामधील महिन्याच्या कोणत्याही दिवसाला कॅलेंडर दिवस म्हणतात. काही ज्योतिषशास्त्रीय कामांसाठी पंचांगऐवजी नुसते दिवस मोजणे सोईचे असते. उदा., ज्यूलियन दिन [→ ज्युलीयन दिनसंख्या] हा दुपार ते लगतची दुपार असा असून इ. स. पू. ४७१३ च्या १ जानेवारीपासून मोजण्यात येतो. उदा., १ जानेवारी १९५८ म्हणजे २४,३६,२०५ ज्यूलियन दिन होय. दुपार ते दुपार असा दिवस ज्योतिषशास्त्राच्या वेधांना उपयुक्त असतो. वेध साधारणपणे रात्री घ्यावयाचे असतात. त्यामुळे रात्री घेतलेले वेध एकाच दिवशी घेतल्यासारखे वाटतात.
वेदांमध्ये सौरदिनाचा उल्लेख नाही, मात्र अष्टका (वद्य अष्टमीची रात्र) हा दिवसवाचक शब्द आलेला आहे. चिनी, प्राचीन, ग्रीक, ज्यू, आणि मुसलमान लोक हे सूर्योस्त ते सूर्यास्त तर बॅबिलोनियन, सिरियन, पर्शियन आणि आधुनिक ग्रीक सूर्योदय ते सूर्योदय असा दिवस मानतात.
लांबीतील बदल : पृथ्वीच्या तिच्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग, तसेच सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर आणि सूर्यमार्गाचा विषुववृत्ताच्या पातळीशी असणारा कोन हे बदलत असतात. परिणामी सर्वच प्रकारच्या दिवसांचा अवधी बदलतो. हे बदल तीन प्रकारचे आहेत.
हंगामी : भरती–ओहोटी व वारे यांच्या क्रियांमुळे हा बदल होतो. त्यामुळे मार्चमधील दिवस हा जुलैमधील दिवसापेक्षा ०·००१ सेकंदाने मोठा असतो. हा बदल पुनरावृत्त (पुनःपुन्हा होणारा) असतो.
अनियमित : पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तिचा गाभा व इतर आवरणे यांच्यातील आंतरक्रियांमुळे हा बदल होत असावा कारण अंतरांमध्ये आवरणांची पुन्हा जुळवाजुळव होत असावी. या बदलामुळे दिवसाची लांबी अचानकपणे. ०·००४ सेकंदापर्यंत कमीजास्त होते. हा बदल काही वर्षेच राहतो.
दीर्घकालीन : विशेषतः उथळ समुद्रातील भरती ओहाेटीमुळे होणाऱ्या पाण्याच्या हालचालींमुळे तळाशी पाण्याचे जे घर्षण होते त्या घर्षणामुळे हा बदल होत असावा, कारण पृथ्वीचा कक्षीय वेग बदलत असावा. या बदलामुळे १०० वर्षांमध्ये दिवसाची लांबी ०·००१ ते ०·००२ सेकंदाने वाढते. केवळ भरती–ओहोटीच्या संर्दभात ही वाढ कमी वाटत असल्याने इतर कोणत्या तरी कारणाने अक्षीय भ्रमण वाढत असते.
ठाकूर, अ. ना.
दिवस व रात्र : सामन्यत: चोवीस तासांच्या कालावधीला (मध्यम सौरदिनाला) ‘अहौरात्र’ किंवा पुष्कळदा ‘दिवस’ असेच म्हणतात. महिन्याचे किंवा अमुक दिवसांनी अमुक गोष्ट घडली असे म्हणताना चोवीस तासांचा दिवस अभिप्रेत असतो. दिवस या शब्दाच्या या दोन अर्थाचा घोटाळा टाळावयाचा असेल, तेव्हा सुर्योदय ते सुर्यास्त या काळाला दिनमान आणि सुर्यास्त ते सुर्योदय या काळाचा रात्रीमान व रात्र म्हणतात.
सुर्याच्या प्रकाशामुळे पुथ्वीच्या जो निम्मा भाग प्रकाशित असतो. त्याच्यावर दिवस आणि जो बाकीचा निम्मा भाग अप्रकाशित असतो त्याच्यावर रात्र असते. हे दोन एकमेकांनपासून वेगळे करणाऱ्या वर्तुळाला प्रकाशवृत म्हणतात. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे तिचा उजेडातील भाग क्रमश: अंधारात व अंधारातील भाग क्रमस: उजेडात येत असतो, पृथ्वीच्या परिवलनामुळेच सर्व ठिकाणी दिवसांमागून रात्र व रात्रीमागून दिवस अनुभवास येत असतात.
सूर्योदयापूर्वी थोडा वेळ व सूर्यास्तानंतर थोडा वेळ संधीप्रकाश असतो. सूर्य क्षितिजाखाली सु. १८° उं. असेर्यंपत संधिप्रकाश दिवस राहतो. विषुवृतापासुन जो जो दूर जावे, तो तो संधिप्रकाश अधिक काळापर्यंत मिळत राहतो. ४८ पूर्णांक १/२° उ.अक्षवृत्त ते उत्तर ध्रुववृत्त आणि ४८ पूर्णांक १/२° द .अक्षवृत्त ते दक्षिण ध्रुववृत्त या भागांत उन्हाळ्याच्या मध्याच्या सुमारास काही काळ रात्रभर संधिप्रकाश असतो. अशा संधिप्रकाशित रात्रींची संख्या ध्रुवांच्या बाजूस वाढत जाते [→ संधीप्रकाश] .
कोणत्याही ठिकाणी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्यां काळात सूर्य जेव्हा आकाशात जास्तीत जास्त उंचीवर येतो, तेव्हा मध्यान्ह होते. या वेळी त्या ठिकाणीतून जाणारे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर आलेले असते आणि त्या रेखावृत्तावर कोठेतरी (त्याच ठिकाणी असे नव्हे सूर्यकिरण भूपृष्टाशी काटकोन करून पडतात. सूर्यास्तापासून सूर्यादपर्यतच्या काळात ज्या वेळी त्या ठिकाणाच्या रेखावृत्ताच्या बरोबर विरूद्ध बाजूचे, म्हणजे त्या रेखावृत्तापासून १८०° अंतरावरील, रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर आलेले असते, त्या वेळी त्या ठिकाणी मध्यरात्र झालेली असते. कोणत्याही ठिकाणी सूर्यादय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र व पुन्हा सूर्योदय या वेळा एकामागोमाग क्रमाने येत असतात.
दिनमान व रात्रिमान यांची असमानता : पृथ्वीचा परिवलनाचा आसतिच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत पातळीशी ६६ पूर्णाक १/२ चा कोन करून केलेला असतो. आसाच्या या कलण्यामुळे कधी पृथ्वीचा उत्तर ध्रृव सूर्याकडे केलेला असतो, तर कधी दक्षिण ध्रृव.
मार्च २१ व सप्टेंबर २३ या तारखांना पृथ्वीचा कोणताच ध्रृव सूर्याकडे अधिक केलेला नसतो. या वेळी प्रकाशवृत्त दोन्ही ध्रृवांतून जाते आणि त्यामुळे प्रत्येक अक्षवृत्ताचे दोन सारखे भाग होतात. यांमुळे पृथ्वीवरील कोणतेही ठिकाण चोवीस तासांपैकी निम्मा वेळ सूर्यप्रकाशात आणि निम्मा वेळ अंधारात असते, म्हणून यां तारखांस पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रीमान सारखीच असतात. २१ मार्च ते २१ जूनपर्यंत उत्तर ध्रृव सूर्याकडे अधिकाधिक कलत जातो. २१ जून रोजी तो १ मार्च ते २३ सप्टेंबर या काळात सूर्याकडे जास्तीत जास्त कललेले असतो. २१ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत या काळात विषवृत्ताखेरीज कोणत्याही अक्ष वृत्ताचे प्रकाश वृत्तामुळे दोन असमान भाग होतात उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांचा मोठा भाग सूर्यप्रकाशात असतो. यामुळे या काळात उत्तर गोलार्धात रात्रीमानपेक्षा दिनमान मोठे असते व दक्षिण गोलार्धात दिनमानापेक्षा रात्रीमान मोठे असते. दिनमान व रात्रीमान यांतील फरक विषुववृत्तापासून ध्रृवाकडे वाढत जातो.
उत्तर गोलार्धातील कोणत्याही ठिकाणी २१ जुनला वर्षांतील मोठ्यात मोठे दिनमान असते व दक्षिण गोलार्धातील कोणत्याही ठिकाणी लहानात लहान दिनमान असते. या दिवशी उत्तर ध्रुवावर व त्यापलीकडील ध्रुवप्रदेश संपूर्णपणे सूर्यप्रकाशात असल्यामुळे तेथे २४ तास दिवसच असतो, रात्र अशी नसतेच. तसेच दक्षिण ध्रुववृत्त व त्यापलीकडील सर्व ध्रुवप्रदेशात सूर्यप्रकाश पोहचतच नसल्याने तेथे २४ तास रात्रच असते. २१ मार्च ते २१ जुन या काळात उत्तर गोलार्धातील सर्व ठिकाणी ते कमी होत जाते व नंतर २३ सप्टेंबरपर्यंत उत्तर गोलार्धातील दिनमान कमी होत जाते व दक्षिण गोलार्धातील दिनमान वाढत जाते. २३ सप्टेंबरला पुन्हा सर्वत्र दिनमान न रात्रिमान सारखे होते. त्यानंतर २२ डिसेंबरपर्यंत दक्षिण गोलार्धातील दिनमान वाढत जाते आणि उत्तर गोलार्धातील कमी होत जाते. २२ डिसेंबरला दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठे दिनमान व उत्तर गोलार्धातील दिनमान कमी होत जाते व उत्तर गोलार्धातील वाढत जाते व २१ मार्चला पुन्हा सर्वत्र दिनमान कमी होत जाते व उत्तर गोलार्धातील वाढत जाते व २१ मार्चला पुन्हा सर्वत्र दिनमान व रात्रिमान सारखे होते. विषुववृत्तामुळे नेहमीच दोन सारखे भाग झालेले असल्यामुळे तेथे दिनमान आणि रात्रिमान वर्षभर सारखेच असते. अशा प्रकारे पृथ्वीच्या आसाचा तिच्या भ्रमणकक्षेशी असलेला कल, त्याचा सतत एकाच दिशेकडे असलेला रोख व पृथ्वीचे परीभ्रमण यांमुळे पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी दिनमान व रात्रिमान यांची असमानता अनुभवास येते.
ध्रुवांपासूून ध्रुववृत्तांपर्यंत मात्र सूर्यप्रकाश मिळण्याचा कालावधी २१ मार्च ते २३ सप्टेंबर व २३ सप्टेंबर ते २१ मार्च या कालखंडात २४ तासांपेक्षा अधिक असतो व तो धृवांकडे वाढत जातो. उत्तर धृवावर २१ मार्च ते २३ सप्टेंबर व दक्षिण ध्रुवावर २३ सप्टेंबर ते २१ मार्च या काळात सूर्यप्रकाश असतो. २४ तास किंवा अधिक काळ सूर्यप्रकाश असणाऱ्या प्रदेशात इतर ठिकाणी म्हणजे ६६·१/२° उ. ते ६६· १/२ ° द. यांदरम्यानच्या प्रदेशात जेव्हा मध्यरात्र असते, तेव्हाही आकाशात सूर्य असतोच, अशा प्रदेशास ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश’ असे म्हणतात. ते दृश्य पाहण्यासाठी नॉर्वेसारख्या ज्या देशांचा काही भाग ध्रुवप्रदेशात आहे, त्या देशातील ठिकाणी हौशी प्रवासी’ मुद्दाम जातात.
पहा : ऋतु कालमापन
कुमठेकर, ज. ब.
“