दिब्रुगड विद्यापीठ : आसाम राज्यातील एक विद्यापीठ. दिब्रुगड येथे १९६५ मध्ये त्याची स्थापना झाली. विद्यापीठाने प्रारंभीच आपला भर भौतिकशास्त्रे आणि तंत्रविज्ञान या विषयांच्या अध्यापनावर राहील, असे जाहीर केले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक व अध्यापनात्मक असून त्याच्या कक्षेत लखिमपूर, दिब्रुगड व शिबसागर या महसुली जिल्ह्यांतील महाविद्यालये अंतर्भूत होतात. १९७४ मध्ये विद्यापीठास एकूण ४१ महाविद्यालये संलग्न होती व एक घटक महाविद्यालय होते. विद्यापीठात वाणिज्य, मानव्यविद्या, अभियांत्रिकी, वैद्यक, विज्ञाने, शिक्षण, विधी या विषयांच्या विद्याशाखा आहेत. विद्यापीठाचे संविधान हे इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,०५३ ग्रंथ असून गांधी कॉर्नर व बेझबरुआ कॉर्नर असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. त्यांत अनुक्रमे म. गांधी व लक्ष्मीनाथ बेझबरुआ यांचे व त्यांच्या संबंधीचे साहित्य ठेवण्यात आले आहे. १९७३–७४ मध्ये विद्यापीठाचा अर्थसंकल्प पुढीलप्रमाणे होता : खर्च १२५ लाख रु. व उत्पन्न ११२ लाख रुपये. विद्यापीठाच्या सर्व संलग्न महाविद्यालयांतून २७,२७५ विद्यार्थी शिकत होते (१९७४).
देशपांडे, सु. र.