दिन अंशांक : (डिग्री डे). मानवी आरोग्याच्या आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने एखादी इमारत थंडीच्या काळात ऊबदार ठेवण्यासाठी (तापनासाठी) किंवा उष्णतेच्या दिवसांत थंड ठेवण्यासाठी (शीतलीकरणासाठी) लागणाऱ्या ऊर्जेचा अंदाज करताना वापरण्यात येणारे एकक. सर्व प्रकारच्या इंधनांच्या बाबतीत, विद्युत् ऊर्जेच्या बाबतीत वा सबंध क्षेत्राच्या तापन–शीतलीकरणाच्या बाबतीत हे एकक वापरण्यात येते. तप्त वायूच्या साह्याने राहती घरे ऊबदार ठेवण्यास किती ऊर्जा लागते, या प्रश्नाचा अभ्यास करताना दिन अंशांक हे एकक प्रथम वापरण्यात आले. या अभ्यासात दैनिक माध्य तापमान (२४ तासांतील उच्चतम व नीचतम तापमानांवरून काढलेले सरासरी तापमान) १८° से. (६५° फॅ.) पेक्षा किती खाली गेले व तापनक्रियेने ते १८° से. च्या वर आणण्यास किती वायू लागला, हे निश्चित करण्यात आले. या दोन राशींचा आलेख काढला असता त्यांच्यात रैखिक (एकघाती) संबंध असल्याचे वरील अभ्यासावरून दिसून आले. ह्या संबंधावरून एक दिवस, आठवडा, महिना, ऋतू किंवा वर्ष यासारख्या कालावधीत कोणत्याही इमारतीचे, क्षेत्राचे किंवा परिसराचे तापमान १८° से. च्या वर स्थिर ठेवायला किती ऊर्जा लागेल, किती वायुरूप इंधन आवश्यक असेल आणि त्यासाठी किती खर्च येईल याचे गणित मांडता येते. अनेक प्रकारच्या इमारतींच्या योजनांच्या कामी अशा गणिताचा उपयोग खासगी संस्था व विविध शासकीय विभाग करतात. तापमान १८° से. च्या वर गेल्यास शीतलीकरणासाठी ऊर्जा लागते. त्याचेही गणित वरील पद्धतीनेच मांडतात.
उद्योगक्षेत्रांत अनेक व्यवहारांसाठी १८° से. हे तापमान इष्टतम (Tb) असते, असे मानले जाते. निसर्गात असे तापमान दीर्घ काळपर्यंत क्वचितच आढळते. त्यामुळे कृत्रिम रीत्या हेच तापमान टिकविण्याचे प्रयत्न केले जातात. त्यासाठी होणारा ऊर्जाव्यय व त्यासाठी येणारा खर्च ठरविण्यासाठी दिवसाचे माध्य तापमान निश्चित करण्याची आवश्यकता भासते. दिवसात प्रत्येक तासाला तापमान मोजून त्याची सरासरी काढून दैनिक माध्य तापमान ठरविणे हे जरी शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असले, तरी २४ तासांत नोंदलेले फक्त उच्चतम व नीचतम तापमान घेऊन त्यांची सरासरी काढून ते दैनिक माध्य तापमान (Tm) धरल्यास फारशी चूक होत नाही. हीच साधी पद्धत अधिक व्यवहार्य ठरते. हे माध्य तापमान १८° से. मधून उणे केले जाते. तो मूल्यांक उरतो तोच त्या दिवसाचा दिन अंशांक होय. अशा रीतीने सर्व दिवसांचे माध्य तापमान निश्चित करून त्यावरून दिन अंशांक काढून त्यांच्या मासिक आणि वार्षिक बेरजा करतात. त्यांवरूनच कोणत्याही क्षेत्राच्या तापन व शीतलीकरणासाठी लागणाऱ्या वायुरूप इंधनाची मागणी ठरविता येते आणि त्याप्रमाणे इंधन संग्राहक टाक्या भरल्या जातात.
या सर्व अंदाजांसाठी आधारभूत तापमान (Tb) १८° से. हेच असले पाहिजे असे नाही. देशाच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे व वैयक्तिक अनुभवाप्रमाणे ते थोडे कमी किंवा जास्त असू शकते.
संपूर्ण वर्षाचे दिन अंशांक |
m = 365 |
(Tb – Tm ) |
अशा बेरजेने काढता येतात. |
m = 1 |
त्यासाठी लागणारे वर्षातील सर्व दिवसांचे माध्य तापमान (Tm) अथवा दैनिक तापमान यांची प्रसामान्य मूल्ये प्रादेशिक वेधशाळांतून मिळू शकतात. थंडीच्या दिवसांत घरातील तापमान १८° से. च्या जवळपास ठेवण्यास साधारणपणे ताशी १,२५० किकॅ. उष्णता लागते. कोणत्याही घराचे आधारभूत तापमान स्थिर ठेवण्यासाठी लागणारे इंधन दिन अंशांक संख्येशी प्रमाणित असते.एखाद्या इमारतीचे आतील तापमान आधारभूत तापमानस्थितीत ठेवण्यासाठी किती उष्णता लागेल ते पुढील समीकरणावरून ठरवितात.
इमारतीची औष्णिक मागणी =
दिन अंशांक X २४X इमारतीची उष्णतानिर्गमनत्वरा (दर ताशी) |
(आतील व बाहेरील अभिकल्पित तापमानांतील फरक) |
येथे अभिकल्पित तापमान म्हणजे बांधलेल्या इमारतीच्या रचनेनुसार ठरविलेले तापमान होय.
ह्या समीकरणाप्रमाणे इमारतीची औष्णिक मागणी व त्याप्रमाणे इंधन पुरवठ्याचे पूर्वानुमान करताना (१) तापनयंत्रणेत व तिच्या क्षमतेत ऋतूप्रमाणे होणारे बदल, (२) अनुभवजन्य आधारभूत तापमानाची पुनर्निश्चिती व (३) इमारतीत खूप विजेचे दिवे असल्यास त्यामुळे उपलब्ध होणारा उष्णता–लाभांश या तीन गोष्टींची दखल घेणे आवश्यक असते. तापनयंत्रणा संपूर्ण दिवस वापरावयाची असल्यास दिवसाचे व रात्रीचे तापमान आणि त्यांचा कालावधी वेगवेगळा असल्यामुळे आधारभूत तापमानात योग्य ते बदल करावे लागतात व पुन्हा दिन अंशांक निश्चित करावे लागतात. त्यांना समायोजित (जुळविलेले) दिन अंशांक म्हणतात.
मुळे, दि. आ.
“