दत्तक : जन्माने तिऱ्हाईत असणाऱ्या व्यक्तीस समाजाने किंवा कायद्याने मान्य केलेल्या संलग्नीकरणाच्या पद्धतीने पुत्राचा किंवा कन्येचा दर्जा व अधिकार देण्यास संमती देणे म्हणजे दत्तक, अशी साधारणतः व्याख्या करण्यात येते.
दत्तक हे एक विधिकल्पित आहे. यायोगे एखाद्या अन्य नातेसंबंध गटातील व्यक्तीस अभिनव नाते प्राप्त होते व ते जन्माने प्राप्त होणाऱ्या नात्यासमान मानण्यात येते. पिता–पुत्राचे नाते नसतानाही दत्तकाने तसे कायदेशीर संबंध किंवा नाते प्रस्थापित करता येते. याचा अर्थ एका आईबापापोटी जन्मलेले मूल कायदेशीर रीत्या दुसऱ्याचे होते व त्यांना जनक पिता–पुत्रासारख्या नात्यातून निर्माण होणारी जबाबदारी व हक्क प्राप्त होतात.
भारतात व जपानमध्ये दत्तक ही संस्था फार पुरातन आहे. आदिम संस्कृतीतही दत्तकाची प्रथा दिसून येते. ग्रीकोरोमन कायद्यात ही दत्तकाची तरतूद होती परंतु इंग्लिश कॉमन लॉमध्ये मात्र ही तरतूद नाही. म्हणून इंग्लंडमध्ये दत्तकाची तरतूद करणारा संविधी १९२६ साली संमत करण्यात आला. तत्पूर्वी तेथे मुलाच्या संगोपनाची प्रथा होती व अशाच मुलास दत्तक म्हणत. अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स संस्थानात १८५१ साली असाच संविधी संमत करण्यात आला. स्वीडनमध्ये दत्तकास १९१७ साली मान्यता देण्यात आली.
दत्तक प्रथेचा उद्भव व विकास : दत्तक प्रथेची सुरुवात केव्हा झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही पण ही प्रथा स्वतःला अपत्य असावे आणि आपला वंश आपल्यानंतर संपुष्टात येऊ नये, या नैसर्गिक प्रेरणेतून उगम पावली असावी. बहुतेक जुन्या संस्कृतींत दत्तकाचा मुख्य उद्देश आध्यात्मिक व विशिष्ट कुटुंबातील पुरुषवंशाचे सातत्य टिकविणे हा होता.
राजकीय, धार्मिक व आर्थिक विचारांच्या प्रगतीबरोबर पुरुषवारसाचे महत्त्व कमी होत गेले. आध्यात्मिक प्रभावही कमी होत गेला. वर्तमान काळी पुरुष किंवा स्त्री कोणासही दत्तक घेता येते. पूर्वी दत्तकाच्या कल्याणापेक्षा दत्तक घेणाऱ्याच्या या व पुढच्या जगातील कल्याणावर भर देण्यात येत असे. बव्हंशी पश्चिमात्य देशांत सध्या कायदा व व्यवहार यांचा उद्देश दत्तक मुलाचे कल्याण हेच असल्याचे दिसून येते. कुटुंबाची वंशवेल चालू रहावी किंवा वारसाचा हक्क संरक्षित रहावा हा दत्तकाच्या वैयक्तिक हेतूंपैकी एक सध्या जरी असला, तरी समाजाचे उद्दिष्ट मात्र वैवाहिक जोडप्यात व दत्तकात जन्मदाते व मुलाचे संबंध किंवा नाते प्रस्थापित करण्याचे असते. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर या मनोवृत्तीत प्रामुख्याने वाढ झाली.
बहुतेक देशांत प्रौढांना दत्तक घेण्याची तरतूद असली, तरी लहान मुलांना दत्तक घेण्याच्या दृष्टीने आणि दत्तक घेणारा प्रौढ असण्याच्या दृष्टीने कायदे करण्यात आले आहेत. मोठ्या मुलांची (साधारणतः १२ किंवा १४) दत्तकास संमती, संविधीने ठरविलेल्या कसोटीप्रमाणे आवश्यक असणारी दत्तक कुटुंबाची योग्यता व दत्तक कुटुंबात राहण्याचा स्थायी किंवा तात्पुरता काळ या गोष्टींची तरतूद कायद्यात विशेषतः केलेली असते. सारांश, सख्ख्या आईबापांचा आणि मुलांचा संबंध तोडून त्याचसारखे संबंध जुळविण्याचा कायद्याने प्रयत्न होत असतो. मुलाचे कल्याण व प्रौढांच्या भावनिक गरजांचे समाधान यांवर सध्याच्या दत्तकाच्या कार्यवाहीत भर देण्यात आला आहे. इटलीमध्ये दत्तक घेणाऱ्या जोडप्याचे वय कमीत कमी ५० वर्षांचे असावयास पाहिजे (मूल होण्याच्या पलीकडचे). इटली, फ्रान्स, ग्रीस, भारत या देशांत स्वतःची संतती असल्यास दत्तक घेता येत नाही. मात्र दत्तकविधानानंतर जर दत्तक घेणाऱ्याला स्वतःचे मूल झाले, तर दत्तक पुत्राच्या अधिकारात कपात होत नाही. दत्तक घेणाऱ्याच्या मालमत्तेत नैसर्गिक पुत्राइतकाच त्याचाही वाटा असतो.
काही दत्तक प्रथा : पृथ्वीच्या काही भागांत बुद्धीला न पटणाऱ्या दत्तक प्रथा आहेत. ईस्टर्न टॉरिस सामुद्रधुनी गटातील बेटांत जन्मापूर्वीच मुलाला दत्तक घेण्याची आणि त्याला दत्तक कुटुंबात संपूर्णपणे वाढविण्याची प्रथा आहे. बहुशः त्यांना जनक आईबापांची माहितीही करून देण्यात येत नाही. बँक आयलंड (मेलानीशिया) मध्येही अशा प्रकारच्या प्रथेचे प्रभुत्व दिसून येते. इतकेच नव्हे, तर जन्माच्या वेळी मुख्य मदतनिसाचे अथवा दाईचे शुल्क देणे मुलावर दत्तकाचा अधिकार सांगण्यास पुरेसे आहे. शुल्क देणाऱ्याचे नवीन जन्मलेले मूल अपत्य होते. साधारणतः पित्याची बहीण दाईची निवड करीत असल्यामुळे पित्याला आपला हक्क प्रस्थापित करण्याची संधी मिळते. परंतु जर त्यास ठरलेले किंवा आवश्यक असलेले शुल्क देता आले नाही किंवा ताे त्या वेळी दूर असला, तर तिऱ्हाईत पितृत्वाचा अधिकार अयोग्यपणे का असेना हिरावून घेण्याची शक्यता असते व मग जनक आईबापांना कायदेशीर रीत्या मुलाला आपल्याकडे ठेवण्याचा अधिकार राहत नाही. तत्त्वतः खरा बाप आपल्या मुलास पुढे केव्हा तरी पैसे देऊन सोडवून घेऊ शकतो परंतु व्यवहारात ते देणे अशक्य होऊन जाते. ओशिॲनिया हे असामान्य दत्तकाचे प्रतिनिधित्व करते. पॉलिनीशियामध्ये तर ताहितिहीन लोक मूल झाले नाही तर दत्तक घेतच पण मुले झाली, तरी ते दत्तक घेत आणि असलेल्यांपैकी दत्तक देत. अशा ठिकाणी दोन संबंधित घराण्यांचे मैत्रीचे संबंध दृढ झाल्याचे दिसून येते.
आदिम दत्तकाचे रीतिरिवाज मानसिक प्रवृत्तींवर अवलंबून असलेले दिसून येतात आणि ते इतरांना समजणेही कठीण असतात. रानटी लोकांचे प्रेम रक्तसंबंधांच्या जाणिवेवर अवलंबून नसते. आपल्या बायकोस उघड उघड अनैतिक संबंधातून झालेल्या मुलावरही हक्क सांगणारी द. आफ्रिकेतील एक निग्रो जमात आहे. द. भारतातील तोडा रक्तसंबंधापेक्षा प्रस्थापित धार्मिक विधीने आपले पितृत्व प्रस्थापित करतो.
पाश्चात्त्य कायदे : आरंभीच्या दत्तकासंबंधीच्या कायद्यांनी संपत्तिसंक्रमणावरच लक्ष केंद्रित केले असले, तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस आणि पहिले जागतिक युद्ध झाल्यापासून पुष्कळशा पाश्चिमात्य देशांनी दत्तकासंबंधी आपले पहिले कायदे संमत केले किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांत सुधारणा केल्या. नवीन कायद्यांनी वस्तुस्थितिनिदर्शक परिस्थितीचा विचार करून दत्तक मुलाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कायद्यांचे विश्लेषण केल्यावर असे दिसून येते, की वारस पुरविणाऱ्या कार्यापेक्षा मुलाचे कल्याण करणाऱ्या कार्यावर त्यांत अधिकाधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पाश्चात्त्य दत्तक प्रथेत मुलांचे कल्याण हा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या संविधी विधीत ही गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते. १५ पाश्चिमात्य देशांच्या दत्तक संविधींचा अभ्यास केल्यानंतर तज्ञांना असे दिसून आले आहे, की सर्व विधींत दत्तकाच्या हिताच्या विरुद्ध असणारे दत्तक रोखण्याची काही ना काहीतरी तरतूद करण्यात आली आहे. मुलांचे कल्याण हाच अमेरिकेच्या कायद्यांचा मुख्य हेतू असल्याचे विटमर व इतर अभ्यासकांचे मत आहे. मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याची सोय करण्यास समर्थ व उत्सुक व्यक्तींनीच दत्तक घ्यावे, अशा आश्वासित तरतुदीही कायद्यात समाविष्ट करण्याचा तेथे प्रयत्न असतो. दोन मुख्य तऱ्हांनी ही मूल्ये कार्यान्वित होताना दिसतात: (१) राज्याने परवाना दिलेल्या मुलांना दत्तक देणाऱ्या मध्यस्थ संस्थांतर्फे दत्तक देण्याची व्यवस्था करण्यात येते. (२) स्वतंत्रपणे दत्तक घेण्याची व्यवस्था. दोन्हींतही मुलाच्या सामाजिक व मानसिक वाढीवर त्याचप्रमाणे दत्तक आईबापांची योग्यता व क्षमता यांची चौकशी करून निर्णय घेण्यात येतो.
भारतीय दत्तक कायदा : भारतात फार पुरातन काळापासून दत्तकाची प्रथा चालत आली आहे. दत्तकाचा उल्लेख वैदिक वाङ्मयात आढळतो. दत्तक मीमांसा, दत्तसिद्धांत मंजिरी, दत्तक चंद्रिका, व्यवहार मयुख, मिताक्षरा, दायभाग या ग्रंथांमध्ये सर्व तऱ्हांनी दत्तकाबद्दल सांगोपांग विचार केला आहे. श्रुति–स्मृती ग्रंथांत फक्त दत्तकाची व्याख्या सापडते. वसिष्ठ यांच्या धर्मसूत्रात दत्तकासंबंधी चर्चा केलेली दिसते. पूर्वी मृतात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून पिंडदानादी कृत्ये करण्याकरिता, वंशसातत्य टिकविण्याकरिता व संपत्तीच्या रक्षणाकरिता मुख्यतः दत्तक घेतला जाई. साधारणतः पुत्रच दत्तक घेतला जाई पण कन्याही दत्तक घेतल्याचा उल्लेख क्वचित सापडतो. उदा., दशरथकन्या शांता व पांडवमाता पृथा किंवा कुंती यांना अनुक्रमे लोमपाद व कुंतिभोज राजांनी दत्तक घेतले होते. संस्कार कौस्तुभ, धर्मसिद्ध आणि संस्कार कौमुदी या ग्रंथांतून मुलीच्या दत्तकास मान्यता दिसून येते. नंदा पंडिताने आपल्या दत्तक मीमांसेत मुलीच्या दत्तकास अनुकूलता दाखविली आहे. त्यायोगे दत्तक घेणाऱ्यास व त्याच्या पूर्वजांस आध्यात्मिक लाभ होतो, असे तो मानतो. विवाहात दिलेली मुलगी ज्यास कन्यादान म्हणतात व दत्तकात दिलेला मुलगा ज्यास पुत्रदान म्हणतात, ही दोन्ही धार्मिक व लौकिक लाभांकरिता केलेले दान असल्यामुळे दोघांचा तात्त्विक पाया एकच आहे. दत्तक घेतलेल्या मुलीच्या मुलांकडून दत्तक घेणाऱ्यास लाभ मिळवण्याच्या दृष्टीने दत्तकाच्या मुलीच्या दानासही तीच वैचारिक बाब लागू व्हावयास पाहिजे. दत्तकाची ‘द्वयामुषण’ नावाची आणखी एक पद्धत रूढ होती. या पद्धतीत दत्तक हा जनक व दत्तक या दोन्ही घराण्यांचा मुलगा समजण्यात येत असे. दत्तक धार्मिक विधीने घेतला जात असे. त्यात इतरांच्या समक्ष पुत्राच्या देण्याघेण्याला विशेष महत्त्व असे. १५ वर्षांवरील कोणाही पुरुषांस दत्तक घेता येत असे. बायकोखेरीज इतर कोणा स्त्री-नातेवाईकास दत्तक घेता येत नसे. बायकोलासुद्धा नवऱ्यासाठी दत्तक घेता येत असे. पण स्वतःकरिता तिला तो दत्तक घेता येत नसे. मात्र पूर्वी फ्रेंच हिंदुस्थानात राहणाऱ्या हिंदू स्त्रीला तेथील कायद्यानुसार स्वतःकरताही दत्तक घेता येत असे. विधवेने घ्यावयाच्या दत्तकाबद्दल अशा तऱ्हेने भिन्न मतप्रणाली अस्तित्वात होती. सध्या अस्तित्वात असणारा कायदा येण्यापूर्वी दत्तक कोणाला घ्यावयाचे, दत्तकाचे वय काय असावे इ. बाबतींत मतभिन्नता होती. म्हणून निरनिराळ्या राज्यांतील दत्तकासंबंधीच्या कायद्यांत एकसूत्रता आणण्याच्या दृष्टीने २१ डिसेंबर १९५६ रोजी हिंदू दत्तक वा पोटगी अधिनियम १९५६ संमत करण्यात आला. या कायद्यात पाश्चात्त्य कायद्याच्या तुलनेत पुष्कळसे दोष जरी असले, तरी पुत्राबरोबर पुत्रीच्या दत्तकास मान्यता देण्यासारखे काही क्रांतिकारक बदल केले आहेत. या कायद्यानुसार वैध दत्तकास खालील बाबी आवश्यक आहेत : (१) दत्तक घेणाऱ्यास व देणाऱ्यास मुलगा वा मुलगी दत्तक घेण्याचा आणि दत्तक देण्याचा अधिकार व क्षमता असली पाहिजे. (२) दत्तक घेतली जाणारी व्यक्ती कायदेशीर रीत्या दत्तक जाण्यास सक्षम असावयास पाहिजे. प्रत्यक्ष मुलाला देण्याघेण्याच्या अटीसह सर्व अटी जनक कुटुंबातून दत्तक कुटुंबात जाण्याच्या इच्छेने परिपूर्ण व्हावयास पाहिजेत.
अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व वेडा नसलेल्या प्रत्येक हिंदू पुरुषास किंवा स्त्रीस दत्तक घेण्याचा अधिकार आहे. मात्र पुरुष असल्यास त्यास हिंदू मुलगा नातू किंवा पणतू सख्खा किंवा दत्तक नसला पाहिजे. मुलगी दत्तक घ्यावयाची असल्यास त्यास मुलगी, नात किंवा पणती सख्खी अथवा दत्तक नसली पाहिजे आणि तिचे वय त्याच्यापेक्षा एकवीस वर्षांनी कमी असले पाहिजे. पत्नी जिवंत असल्यास व ती संमती देण्यास योग्य असल्यास तिची संमती आवश्यक आहे. १९५६ पूर्वीच्या कायद्याप्रमाणे पत्नीची संमती लागत नसे. १९५६ च्या कायद्याप्रमाणे विधवेला दत्तक घेता येते. पूर्वी फक्त मृत पतीच्या आदेशानुसारच दत्तक घेता येत असे. हे बदल रूढीच्या वाढत्या सामाजिक दर्जाचे निदर्शक आहेत. वरील बाबी जशाच्या तशा पत्नीलाही लागू आहेत. पत्नीलाही संमती देण्यास योग्य असणाऱ्या आपल्या पतीची संमती घ्यावी लागते. स्त्रीला हिंदू मुलगा दत्तक घ्यावयाचा असेल, तर त्याचे वय तिच्यापेक्षा एकवीस वर्षांनी कमी असले पाहिजे. अविवाहित हिंदू स्त्री किंवा विधवा वा घटस्फोटित स्त्रीलाही या नवीन कायद्याने स्वःतकरितासुद्धा दत्तक घेण्याचा अधिकार दिला आहे.
या कायद्याने एकुलता एक मुलगाही दत्तक दिला जाऊ शकतो. दत्तक देण्याचा अधिकार साधारणतः आईबापांपुरताच मर्यादित आहे. तथापि प्रस्तुतच्या कायद्यात आणखी एक क्रांतिकारी तरतूद करण्यात आली आहे. आईबाप वारले असतील किंवा मानसिक अक्षमतेतुळे किंवा संन्यस्त वृत्ती स्वीकारल्यामुळे ते अधिकार वापरण्यास असमर्थ झाले असतील, तर मृत्युपत्रीय पालक किंवा न्यायालयाने नेमलेला वा घोषित केलेला पालक न्यायालयाच्या पूर्वसंमतीने दत्तक देऊ शकतो. अज्ञानाच्या कल्याणाकरिता दत्तक आहे याबद्दल खात्री झाल्यानंतरच न्यायालय दत्तकास परवानगी देते.
प्रस्तुत कायद्यान्वये दत्तक पुरुष वा स्त्री असू शकते. अट फक्त दत्तक हिंदू असावयास पाहिजे. तो कोणत्याही हिंदू पोटजातींपैकी असला तरी चालतो. जातिजातींत सलोखा व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा बदलही क्रांतिकारकच आहे. दत्तक घेतला जाणारा अविवाहित असला पाहिजे आणि त्याचे वय पंधरा वर्षे पूर्ण झाले नसले पाहिजे पण या अटी निरपवाद नाहीत. कारण जर पक्षकारांत विवाहित किंवा पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना दत्तक घेण्याची प्रथा असेल, तर अशा लोकांनी विवाहित किंवा पंधरा वर्षे पूर्ण झालेल्यांना दत्तक घेणे वैध ठरते. त्याला कोणी दत्तक घेतले नसले पाहिजे.
दत्तक वैध होण्याच्या दृष्टीने दत्तकाची शारीरिक दृष्ट्या देवाणघेवाण होणे अपरिहार्य आहे. फक्त संमतीची वाच्यता किंवा दत्तकाला प्रत्यक्ष स्वाधीन न करिता केलेले रजिस्टर्ड दत्तकपत्र यामुळे दत्तक वैध होऊ शकत नाही. जनक कुटुंबातून दत्तक कुटुंबात देण्याची इच्छा दर्शविणारी प्रत्यक्ष देण्याची कृतीच फक्त दत्तकात मोडते. साधारणतः दत्तहोम करण्यात येतो परंतु या अधिनियमाने अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक विधीची किंवा समारंभाची आवश्यकता प्रतिपादली नाही. प्रत्यक्ष मुलाचे किंवा मुलीचे देवाणघेवाण होणे हीच एक आवश्यक व निरपवाद अट आहे. दत्तकाच्या अधिनियमाचे हे सार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. तथापि जर रजिस्टर्ड दत्तकपत्र असेल, तर असे गृहीत धरण्यात येते, की दत्तकाच्या बाबतीत सर्व वैध गोष्टी परिपूर्ण करण्यात आल्या आहेत. अशा वेळी दत्तकास आव्हान देणाऱ्या पक्षकारावर दत्तक वैध नसल्याचे सिद्ध करण्याचा भार असतो.
दत्तक अधिनियमाचा परिणाम : (१) या अधिनियमाने दत्तक घेतलेल्या तारखेपासून दत्तक हा सर्व गोष्टींकरिता दत्तक आईबापांचा मुलगा म्हणून समजण्यात येतो. जनक कुटुंबाशी त्याचे संबंध तुटले जातात. आपल्या जनक कुटुंबातील संपत्तीवर पित्याचा किंवा मातेचा वारस या नात्याने तो हक्क सांगू शकत नाही. तथापि दत्तकापूर्वी ज्या संपत्तीचा मालक तो झाला असेल, त्यापासून त्यास वंचित करता येत नाही. (२) लग्नाच्या दृष्टीने पूर्वीच्याच म्हणजे जनक कुटुंबातील बंधने चालू राहतात. निषिद्धश्रेणी संबंधात व सपिंड संबंधात लग्न न करण्याचे बंधन चालू राहते. (३) दत्तकापूर्वी दत्तक आईबापाच्या एखाद्या संपत्तीचा मालक कोणी झाला असेल, तर तो त्यास वंचित करू शकत नाही. त्याचप्रमाणे दत्तक आईबापांना आपली संपत्ती मृत्युपूर्वी किंवा नंतर कोणासही देता येते. (४) सर्व दृष्टींनी दत्तकाचा परिणाम दत्तकाच्या तारखेपासूनच होतो.
वैध दत्तक रद्द होऊ शकत नाही. दत्तक आईबाप ते करू शकत नाहीत किंवा दत्तक आपला दर्जा नाकारून जनक कुटुंबात जाऊ शकत नाही.
दत्तकाच्या उद्देशाबद्दल स्मृतिकारांनी, भाष्यकारांनी व कायदेपंडितांनी चर्चा केली आहे. हिंदू समाजात दत्तकाचे उद्देश दोन आहेत : पहिला धार्मिक असून दत्तक घेणाऱ्याच्या व त्याच्या पूर्वजांच्या मृतात्म्यांना पिंडदान आणि पाणी देऊन दत्तक घेणाऱ्याला व त्याच्या पूर्वजांना आध्यात्मिक लाभ प्राप्त करून देणे. दुसरा उद्देश लौकिक आहे दत्तक घेणाऱ्याला वारस मिळवून त्याचे नाव चालू ठेवणे. पाश्चात्त्य दत्तक कायद्यात मात्र दत्तकाच्या कल्याणावर भर आहे. भारतीय दत्तक अधिनियम त्या दृष्टीने उणा वाटतो. हिंदूखेरीज इतर धर्मीयांना दत्तक घ्यावयास मान्यता देणारे कायदे अस्तित्वात नाहीत. ह्या समाजातील लोकांना जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला दत्तक घ्यावयाचे असेल, तर ते त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकत्वाची मान्यता पालक आणि पाल्य (कस्टोडियन अँड वॉर्ड्स ॲक्ट, १८९१) अधिनियमानुसार मिळवितात परंतु ह्यामुळे दत्तकविधानात अंतर्भूत असलेले अधिकार प्राप्त होत नाहीत. सर्व जमातींना समान दत्तक कायदा असावा अशी जाणीव ह्या जमातींच्या लोकांमध्येही तीव्रपणे होऊ लागली आहे. ह्याकरिता एक विधेयक राज्यसभेत १९७२ मध्ये मांडण्यात आले होते परंतु मुसलमान समाजाकडून विरोध झाल्याने त्याचा पाठपुरावा झाला नाही.
दत्तकाचे समाजावर होणारे परिणाम अत्यंत तर्कसंगत आणि बलशाली असतात. दत्तकाने दोन विभिन्न रक्ताच्या वंशावळींचा मिलाफ होतो. कालांतराने त्यांच्यातील विभिन्नताही विसरली जाते.
रक्तसंबंधाने कुटुंब ठरविणाऱ्या समाजात दत्तक कुटुंब अल्पसंख्य असते. आपल्या कुटुंबात त्याचा जन्म झाला नाही ही माहिती करून देऊन दत्तक मुलास आपल्या कुटुंबाशी एकात्म करणे ही समस्या अशा कुटुंबापुढे असते. दत्तकाबद्दल मुलाला छोट्या वयातच सांगावयास पाहिजे, याबद्दल एकमत आहे. बऱ्याच काळपर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांचे काम दत्तक आईबापांची निवड करणे एवढ्यापुरतेच मर्यादित होते. समाजशास्त्रज्ञ एच्. डेव्हिड कर्क दत्तक कुटुंबातील मानवी संबंधांचा अभ्यास करून या निर्णयाप्रत आला, की सामाजिक कार्यकर्त्यांनी दत्तक कुटुंबातील समस्या समजून घेण्याच्या दृष्टीने व त्यांस तोंड देण्याच्या दृष्टीने दत्तक आईबापांना शिक्षण देण्यावर भर द्यावा.
आज दत्तकाच्या संकल्पनेतच बदल होत आहे. दत्तकाचा उपयोग निराधार मुलांना आधार मिळवून देऊन त्यांच्या संगोपनाची सामाजिक जबाबदारी पार पाडणे हा मुख्यतः दृष्टीपुढे आहे. हे उद्दिष्ट साध्य करून शिवाय दत्तकाचा उपयोग कुटुंबे मर्यादित ठेवण्याकरिताही करता येईल आणि त्यायोगे लोकसंख्यावाढीला आळा घालता येईल, असाही विचार चालू आहे. त्यानुरूप दत्तक कायद्यात योग्य त्या सुधारणा होणे आवश्यक आहे.
संदर्भ : 1. Kirt, H. D. Shared Fate : A Theory of Adoption and Mental Health, New York, 1964.
2. Kornitzer, M. Child Adoption in the Modern World, New York, 1952.
3. Smith, I. E. Ed. Readings in Adoption, New York, 1963.
4. United Nations, Department of Economic and Social Affairs, Comparative Analysis of Adoption Laws, New York, 1956.
खोडवे, अच्युत
“