थोरियानाइट : खनिज. स्फटिक घनीय, घनाकार व युरॅनिनाइटाच्या स्फटिकांसारखा आकार व अंतर्रचना [⟶ स्फटिकविज्ञान]. ⇨ पाटन अस्पष्ट. कठिनता ६·५ वि. गु. ९·७ – ९·८ चमक काहीशी धातूसारखी वा राळेसारखी. जवळजवळ अपारदर्शक. रंग तांबूस उदी, करडा ते काळा. तीव्र किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे). रा. सं. (Th, U)O2 पुष्कळदा यात सिरियम वगैरे ⇨ विरल मृत्तिका धातू व किरणोत्सर्गामुळे उत्पन्न झालेले शिसे अल्प प्रमाणात असतात. हे पिचब्लेंडाचा एक प्रकार असून पेग्मटाइट खडकात वा वाहत्या पाण्यात साचविलेल्या पेग्मटाइटांच्या गोट्यांच्या ढिगाऱ्यात झिर्कॉन, ऑर्थाइट इत्यादींच्या जोडीने आढळते. तसेच थोराइट, मोनॅझाइट, इल्मेनाइट वगैरेंच्या जोडीने काळ्या वाळूतही हे आढळते. हे १९०४ साली नैर्ऋत्य श्रीलंकेत आढळले. हे मॅलॅगॅसी, सायबीरिया इ. प्रदेशांतही सापडते. भारतात हे केरळमध्ये त्रावणकोरजवळ आढळते. हे कमी आढळत असल्याने व उच्चतापसह (उच्च तापमानासही न वितळणारे) असल्याने त्यांचा थोरियमाचे गौण धातुक (कच्ची धातू) म्हणून उपयोग होतो. खडकांची वये निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
पहा : पिचब्लेड.
ठाकूर, अ. ना.