थाव, युआन–मींग: (३६५–४२७). एक श्रेष्ठ चिनी कवी. सध्याच्या जिआंगसी प्रांतातील शीनयांग जिल्ह्यामध्ये एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. सरकारी नोकरीत सुरुवातीस कनिष्ठ पदावर प्रारंभ करून पुढे त्याने काही काळ दंडाधिकारी म्हणून काम केले. तथापि नोकरीतील जाचक अतिरेकी तांत्रिकता व भ्रष्टाचार सहन न होऊन आणि वरिष्ठांचा विरोध पतकरून त्याने राजीनामा दिला (सु. ४०५). ‘पन्नास मण भातासाठी मी माझी मान झुकवणार नाही’, अशा आशयाचे त्याचे या प्रसंगीचे वचन सुप्रसिद्ध आहे. पुढे त्याने यांगत्से नदीच्या दक्षिणेकडील एक खेड्यात शेती केली. तो जसा पेशाने तसाच वृत्तीनेही शेतकरी होता आणि शेतकऱ्याच्या भावना त्याने आपल्या काव्यातून प्रमाणिकपणे व उत्कटपणे व्यक्त केल्या. ‘प्रातःकाळी मी कुदळ घेऊन शेतावर जातो आणि सायंकाळी चंद्र व कुदळ खांद्यावर टाकून परततो’, अशा अर्थाचे त्याचे एक काव्यवचन आहे. अखंड कार्यमग्नता, ग्रंथसाधना, मदिराभक्ती व निसर्गसहवास हीच त्याच्या आयुष्याची चतुःसूत्री होती. निसर्गाच्या सान्निध्याचा याला जसा आनंद लाभला होता, तसाच आनंद रसिकाला त्याच्या काव्यातूनही लाभतो. ‘वृक्ष आनंदाने बहरतात आणि झरा हळूहळू समृद्ध होत असतो’, अशी निसर्गाविषयीची भावना त्याने व्यक्त केली आहे. ‘उन्हाळ्याचे दिवस भुकेपोटी तळमळण्यात जातात तर हिवाळ्यातल्या रात्री रजईविना थंडीने गारठण्यात. संधिप्रकाशाच्या काळोखात पहाटेचा कोंबडा कधी आरवेल, असे होऊन जाते आणि पहाट होते ना होते तोच पक्षी घरट्यात परतावेत, अशी प्रार्थना आपण करू लागतो’, अशी एक विद्ध व्याकूळ जाणीवही त्याच्या काव्यातून प्रकटली आहे. त्याच्या सु. १५० कविता व काही गद्य लिखाण उपलब्ध आहे. आयुष्याच्या अखेरच्या वीस वर्षांतच त्याने विपुल काव्यलेखन केले. मद्याचे गोडवे गाणाऱ्या त्याच्या सु. २० कविता आहेत. पाच शब्दी चरणांच्या वृत्तामध्ये त्याने अनेक उत्कृष्ट कविता लिहिल्या. त्याची शैली उत्स्फूर्त, साधी सरळ व प्रभावी आहे. थाव हा कन्फ्यूशस पंथीय विद्वान मानला जातो. आत्मप्रतिष्ठा व स्वाभिमान जपण्यासाठी तो शासनापासून आणि सत्ताधाऱ्यांपासून कटाक्षाने दूर राहिला. त्याने एकांतवास पतकरला व त्याची ही एकांतप्रियता पुढे चीनमध्ये विशेष अनुकरणीय ठरली. ‘वसंत ऋतूमध्ये कोषामधून रेशमी धागे गोळा केले जातात. हिवाळ्यातले पीक राजाच्या कोषागारात जमा होते’, अशा उद्गारांवरून एकांतवासातही राजकर्त्यांच्या पाशाचे सावट त्याच्या विचारांवर पडले होते, हे दिसून येते. तथापि तो निराशावादी नव्हता. जिथे श्रमप्रतिष्ठा, वैभव, सुखशांती व सुसंवादित्व असेल, अशा एका आदर्श विश्वाचे स्वप्न त्याने ‘पुष्पबहराचा उगम’ (T’ao–hua Ch’uan chi) या लेखात रंगविले आहे. अस्थितादर्शाची (यूटोपियाची) ही आद्य चिनी कल्पना होय. त्याचे आत्मचरित्रपर गद्यलेखन (Wu–liu hsien–sheng chuan) चिनी गद्याचा उत्कृष्ट नमुना समजले जाते. या महान कवीचा मृत्यू जिआंगसी येथे झाला.