त्साव त्साव : (इ. स. १५५–२२०). प्रख्यात चिनी लेखक व सेनापती. जिआंगसू प्रांतात जन्म. त्साव त्साव व त्याचे दोन पुत्र त्साव फै (१८८–२२७) व त्साव जृ (१९२–२३२) यांनी ‘च्यन्‌–आन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लेखकगटाचे नेतृत्व केले. शेवटच्या हान सम्राटाच्या कारकीर्दीला ‘च्यन्‌–आन’ युग असे म्हणतात. हे त्साव घराणे त्या काळात प्रसिद्धीला आले.

हान राजवंशातील शेवटचा बादशाहा स्यन याच्या हातून प्रत्यक्षात सर्व सत्ता त्साव त्साव याने बळकावली होती. तो एक चाणाक्ष राजकारणी, समर्थ सेनापती, चतुरस्र प्रतिभावंत व साहित्याचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारात सात प्रख्यात विद्वान होते आणि तो व त्याचे पुत्र त्यांच्याशी साहित्यिक चर्चा करीत आणि एकत्र बसून कविता रचीत. उदात्त ध्येय, वीररसात्मक आशय, उत्कट भावनाविष्कार व मानवतावादी दृष्टिकोन यांचे दर्शन त्याच्या काव्यातून घडते. साधेपणा, सुगमता आणि जोम ही त्याच्या काव्याची वैशिष्ट्ये. त्याचा लोयांग येथे मृत्यू झाला.

त्साव त्सावच्या मृत्यूनंतर त्साव फै या त्याच्या ज्येष्ठ पुत्राने हान सम्राटाला पदच्युत करून चिनी साम्राज्याच्या तीन तुकड्यांपैकी एकात स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि वै राज्याचा सम्राट असे नामाभिधान घेतले. आपल्या पित्याप्रमाणेच तोदेखील साहित्याचा एक मोठा आश्रयदाता आणि स्वतः उत्साही लेखक होता. परंतु त्याच्या वडिलांच्या काव्यात ज्याप्रमाणे तत्कालीन खळबळजनक घटनांचे चित्रण आढळते, तसे त्याच्या काव्यात आढळत नाही. ‘च्यन्‌–आन’ शैलीचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रवाहीपणा, तो त्याच्या काव्यात आहे. सात शब्दांच्या ओळीच्या वृत्तात रचना करणारा तो पहिला कवी. थांग वंशाच्या काळातील कवींनी सातव्या ते नवव्या शतकांत हे वृत्त परिपूर्णतेस नेले.

वै सम्राटाचा धाकटा बंधू त्साव जृ हा च्यन्‌–आन संप्रदायातील सर्वांत गुणी लेखक मानला जातो. पाचव्या शतकातील एका विद्वानाच्या मते देशात फारच थोडे चांगले साहित्य निर्माण झाले व त्यातील ऐंशी टक्के साहित्य एकट्या त्साव जृने निर्माण केले. त्याच्या काव्यातून वैफल्य व गाढ दुःखभाव यांचा प्रत्यय येतो. तत्कालीन प्रचलित अशा पाच शब्दांच्या ओळीच्या वृत्तात त्याने काव्यरचना केली. एक श्रेष्ठ भावकवी, अशी त्याची चिनी साहित्यामध्ये ख्याती आहे.

थान, जुंग (इं.) शिरोडकर, द. स. (म.)