तुंगूस : तुंगुझ. एक भटका आदिवासी समूह. याची वस्ती मुख्यत्वे पूर्व सायबीरियाच्या जंगलात (तैगा प्रदेश) आढळते. तथापि त्यातील जमातींचा संचार पश्चिमेस टाझ नदीपर्यंत, पूर्वेस सॅकालीन बेटापर्यंत, उत्तरेस आर्क्टिक किनाऱ्यापर्यंत व दक्षिणेस मँचुरियापर्यंत आढळतो. त्यांची लोकसंख्या ६२,००० (१९६०) होती. तुंगूस या शब्दाचा अर्थ चिनी भाषेत रानटी माणूस असा असून हे लोक स्वतःला अवंकी किंवा डोंकी म्हणवून घेतात. हे मंगोलियन वंशाचे असून रुंद, बसका चेहरा, बारीक काळे डोळे, काळे केस व पिवळा किंवा तपकिरी वर्ण ही ह्यांची शारीरिक वैशिष्ट्ये. यांचे दोन प्रमुख गट आहेत. एव्हेंकी किंवा मूळ तुंगूस आणि लॅमट. याशिवाय निगिडल, गोल्ड, डॉलगन वगैरे उपगटही आढळतात. उरल–अल्ताइक भाषासमूहातील तुंगूझ बोली ही यांची भाषा. हे मुख्यतः पशुपालनावर–रेनडियर–उपजीविका करणारे लोक असून शिकार व मच्छीमारी हे जोडव्यवसायही करतात. त्यांपैकी काहीजण शेती करू लागले आहेत, तथापि बहुसंख्य लोक भटकेच आहेत, केसाळ कातडी असलेली ससा, हरिण, अस्वल वगैरे जनावरे मारून त्यांची कातडी ते विकतात.
विवाह कुळीबाहेर करतात. विवाहात वधूमूल्य देण्याची प्रथा आहे. हे जरी जडप्राणवादी असले, तरी त्यांच्यापैकी काहींनी ख्रिस्ती व बौद्ध या धर्माचा अलीकडे स्वीकार केला आहे. धार्मिक बाबतीत शामान हाच त्यांचा मुख्य असून तो गायक, वैद्यक, प्रेषित या सर्व भूमिका पार पाडतो. भूताखेतांशिवाय प्राणिपूजा त्यांच्यात रूढ असून हावाकी हा त्यांचा सर्वश्रेष्ठ देव आहे. तुंगूस मृताला पुरतात. त्याच्या सोबत त्याच्या आवडीच्या वस्तू ठेवतात.
संदर्भ : Levin, M. G. Potapov, L. P. Ed. Peoples of Siberia, Chicago, 1964.
देशपांडे, सु. र.