चापेकर, नारायण गोविंद : (५ ऑगस्ट १८६९–५ मार्च १९६८). मराठी संशोधक. जन्म मुंबईस. शिक्षण रेवदंडा (कुलाबा जिल्हा), पुणे आणि मुंबई येथे. कायद्याचे पदवीधर झाल्यानंतर (१८९४) काही काळ वकिली करून त्यांनी न्यायखात्यात नोकरी पतकरली आणि १९२५ मध्ये पहिला वर्ग न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. नोकरीत असताना त्यांनी थोडे लेखन केले होतेच. तथापि त्यांचे बरेचसे लेखन निवृत्तीनंतरच झाले. त्यांचे सु. वीस ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांपैकी बदलापूरची सामाजिक दृष्ट्या संपूर्ण पाहणी करणारा बदलापूर (आमचा गांव)….. हा १९३३ मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ विशेष गाजला. चित्पावन (१९३८) आणि चापेकर (१९४०) हे ग्रंथही असेच सामाजिक संशोधनात्मक म्हणता येतील. पेशवाईच्या सावलींत (१९३७) हा ग्रंथ सामाजिक इतिहाससंशोधन म्हणून मान्यता पावला. वैदिक वाङ्मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय. वैदिक निबंध (१९२९) व तर्पण (१९४८) हे त्या विचाराचे फळ. ह्यांशिवाय एडमंड बर्कचे चरित्र, जीवनकथा (१९४३) हे आत्मचरित्र, हिमालयांत (१९४१) आणि काश्मीर (१९४६) सारखी प्रवासवर्णने, साहित्यसमीक्षात्मक लेख अशा विविध स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. गच्चीवरील गप्पा (१९२६) आणि रजःकण (१९४३) हे त्यांचे स्फुट लेखसंग्रह.
सेवानिवृत्तीनंतरच्या काळात ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’, ‘मराठी ग्रंथोत्तेजक सभा’, ‘राजवाडे संशोधन मंडळ’, ‘धर्मनिर्णय मंडळ’ आदी अनेक संस्थांतून त्यांनी कार्य केले. नवे चैतन्य ओतून आणि अनेक साहित्यिकांना एकत्र आणून ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ला आजचे महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात चापेकरांचा फार मोठा वाटा आहे. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. त्या विद्यापीठाकडून १९६६ साली त्यांना डी.लिट्. ही सन्मान-पदवी दिली गेली.
जोग, रा. श्री.