चक्री कर्तन यंत्र : (मिलिंग यंत्र). अनेक तीक्ष्ण दाते असलेल्या फिरणाऱ्या चक्री कर्तकाने धातू कापण्याचे काम करणारे यंत्र. अशा यंत्राचे अनेक प्रकार असून त्यांतील दोन प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. आ. १ (अ) मधील यंत्रात आडव्या तर्कूवर (दांडीवर) चक्री कर्तक बसविलेला असतो व तो उभ्या पातळीत फिरतो. त्याच्या खालच्या बाजूने सरकणाऱ्या टेबलावर कापावयाची वस्तू बसविलेली असते. आ. १ (आ) मधील प्रकारच्या यंत्रातील तर्कू उभा ठेवलेला असतो व त्याला जोडलेला कर्तक आडव्या पातळीत फिरतो. चक्री कर्तन यंत्रावर दंतचक्राचे सरळ व मळसूत्री गाळे कापता येतात व वस्तूचा पृष्ठभाग कापून सपाट करता येतो. कसल्याही चक्राचे किंवा वस्तूचे सारखे भाग (ज्यांची संख्या अविभाज्य आहे असे सुद्धा) पाडण्यासाठी या यंत्राच्या टेबलाच्या पुढील बाजूला एक खास विभाजन प्रयुक्ती बसविलेली असते, हे या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आडव्या तर्कूवर फिरणारा कर्तक कसे काम करतो ते आ. २(अ) मध्ये आणि उभ्या तर्कूवर फिरणारा कर्तक पृष्ठभाग कापण्याचे काम कसे करतो ते आ. २ (आ) मध्ये दाखविले आहे.
भिडे, शं.गो.
“