चंडवात : (स्क्वाल). अल्पावधीत एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटांत क्रमशः मंद होत जाणारा वारा. अशा वेळी वाऱ्याच्या दिशेतही अनेकदा बदल झालेला आढळतो. वाऱ्यांच्या वेगात नेहमीच एकसारखा चढउतार होत असतो, परंतु चंडवाताचा जोर मात्र काही मिनिटे राहतो. साधारणपणे चंडवातात वेग दर ताशी ५० ते १०० किमी. असतो. अधूनमधून एकाएकी पवनवेग वाढून त्यात क्रमशः दर ताशी १३० ते १७० किमी. चे आवेग निर्माण होतात. अशा जोराच्या वाऱ्यांबरोबर कडकडाट आणि तडित् प्रहार करणारे गर्जन्मेघ (ऊर्ध्व दिशेने राशीप्रमाणे वाढणारे व तसे करताना भिन्न प्रकारचे विद्युत् भार निर्माण होऊन विद्युत् विसर्जन झाल्यामुळे गर्जना करणारे मेघ) व कधीकधी जोराचा पाऊसही निगडित झालेला असतो. जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेने चंडवाताची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : वाऱ्याच्या वेगात एकाएकी दर सेकंदास ८ मी. (१५-१६ नॉट) याप्रमाणे वाढ होऊन तो एकदम दर सेकंदास ११ मी. २१-२२ नॉट) इतका किंवा त्यापेक्षा अधिक झाला व त्याचा महत्तम वेग कमीत कमी एक मिनिट टिकला, तर तो चंडवात समजावा. ॲडमिरल बोफर्ट यांनी वाऱ्याचा जोर सांगण्यासाठी जो मापक्रम तयार केला आहे, त्यानुसार चंडवातात वाऱ्याचा जोर कमीत कमी तीन क्रमांकांनी एकदम वाढून महत्तम वेग ६ किंवा त्यापेक्षा मोठ्या क्रमांकापर्यंत जोरावून तो वेग कमीत कमी एक मिनिट टिकला पाहिजे.

विराट राशिमेघांसारख्या संनयनी (ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्या) ढगांतून पडणाऱ्या जोरदार पावसाबरोबर किंवा पूर्ण विकसित गर्जन्मेघांबरोबर सर्वसामान्य प्रकारच्या चंडवातांचा प्रत्यय येतो. गडगडाटी वादळात वृष्टी होण्याच्या थोड्या अगोदर हे चंडवात निर्माण होतात. ते अल्पकालीन असतात आणि त्यांतून निघणारी हवा गर्जन्मेघाच्या आक्रमणदिशेच्या पुढच्या भागात पसरू लागते. गडगडाटी वाढळाच्या गाभ्यातील पर्जन्ययुक्त क्षेत्रातून पर्जन्यबिंदूंबरोबर थंड हवा ओढली जाते. ती जोराने खाली येऊ लागते. पृथ्वीपृष्ठावर पोहोचल्यानंतर ही वेगवान हवा क्षैतिज (क्षितिजाला समांतर ) दिशांनी पसरते आणि अशा रीतीने चंडवाताचा उद्‌भव होतो. वाळवंटी प्रदेशांवरही चंडवात निर्माण होतात. तेथे ढगांतून निघणाऱ्या पर्जन्यबिंदूंचे भूपृष्ठापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच अंशतः किंवा संपूर्णपणे बाष्पीभवन होत असले, तरी शुष्कतर झालेली हवा शेवटी खाली उतरते. ती भूपृष्ठवर पसरताना शुष्क चंडवात निर्माण करू शकते. अशा चंडवातांशी धूलिवादळे निगडीत झालेली असतात.

उंच पर्वतांच्या बिकट घसरणीवरून थंड हवा जोराने खाली आल्यामुळेही द्रुतप्रवेगी (अत्यल्प काळात वेगवान होणारे) चंडवात निर्माण होतात. त्याचे स्वरूप उपरिनिर्दिष्ट चंडवातांच्या स्वरूपापेक्षा निराळे असते. उंच पर्वतांच्या उच्च पातळीवरील समस्थलींवरून (पठारांवरून) उतरणाऱ्या शीत आणि घन हवेला केवळ गुरुत्वामुळे गती मिळते. चंडवाताच्या प्रेरणेचा उगम ह्या गुरुत्वाकर्षणात असतो. ही प्रेरणा उतारावरून घसरणाऱ्या हवेच्या गुणधर्मांवर अवलंबून असते. हवेच्या अधःपतनामुळे निर्माण होणारे चंडवात उच्च अक्षवृत्तांत किनारपट्टीजवळील पर्वतीय प्रदेशांतील दऱ्याखोऱ्यांत आढळतात. उंच समस्थलींवर जमलेली थंड हवा खोल दऱ्याखोऱ्यांत उतरताना गतिमान होते. अरुंद खोऱ्यांतून त्या हवेचे परिवाहन झाल्यास वाऱ्यांना अधिकच गती मिळते. हिवाळ्यात अर्क्टिक प्रदेशांतील शीत वायुराशी अधूनमधून रशियातून निघून यूगोस्लाव्हियातील पर्वतीय समस्थलींवरून खाली येऊन तौलनिक दृष्ट्या उष्णतर अशा एड्रिॲटिक प्रदेशात शिरतात तेव्हा साधारणपणे ताशी १६६ किमी.पेक्षा अधिक वेगाने वाहणारे चंडवात निर्माण होतात. त्यांना बोरा असे स्थानिक नाव दिले आहे. अशाच प्रकारे आल्प्स पर्वताच्या परिसरात निर्माण होणाऱ्या प्रबल चंडवातांना फॉन वारे असे म्हणतात. रॉकी पर्वताच्या पूर्वेच्या उतरणीमुळे निर्माण होणाऱ्या चंडवातांना चिनूक वारे असे नाव दिले आहे. अलास्कामधील याच प्रकारच्या वाऱ्यांना विलीवॉज असे म्हणतात. उत्तर अमेरिकेतील विस्तृत सखल प्रदेशांत उद्‌भवणाऱ्या चंडवातयुक्त वाऱ्यांना नॉर्दर, अर्जेंटिना-यूरग्वायमध्ये पँपेरो आणि ऑस्ट्रेलियात सदर्ली बर्स्टर अशी नावे दिली आहेत.

भिन्न तापमान आणि भिन्न आर्द्रता असलेले दोन वायुप्रवाह जेथे एकमेकांजवळ येतात तेथील सीमापृष्ठांवर (उष्णार्द्र हवा व शीत शुष्क हवा विभक्त करणाऱ्या पृष्ठांवर) गडगडाटी वादळे व द्रुतप्रवेगी चंडवातांचा उद्‌भव होण्यास परिस्थिती अनुकूल असते. उपोष्ण कटिबंधीय चक्रवातांतील शीत सीमापृष्ठे व नैर्ऋत्य मॉन्सूनच्या ऋतूतील मॉन्सून सीमापृष्ठ वा आंतर-उष्ण कटिबंधीय अभिसरण परिसर ही चंडावातांची निर्मितिस्थळे होत.

चंडवातात वाऱ्यांचा महत्तम वेग अनेकदा ताशी १५० ते २०० किमी. पर्यंत असतो. घरे, झाडे, छोट्या नौका, पूल, धरणे, विमानतळावरील विमाने इत्यादिकांस त्यापासून धोका असतो. क्वचित प्रसंगी चंडवाताबरोबर गारांचा वर्षावही होतो. त्यामुळे शेतातील पिके नष्ट होतात व वाहतूक यंत्रणा विस्कळित होते.

उत्तर भारतात गडगडाटी वादळांबरोबर चंडवातांचा उद्‌भव होतो. बंगाल, पूर्व बिहार, दक्षिण आसाम, मेघालय ह्या विभागांत मार्च-एप्रिल-मे महिन्यांत जे चंडवात निर्माण होतात ते अतिविध्वंसक स्वरूपाचे असतात. त्यामुळे त्यांना बंगालमध्ये कालबैशाखी असे म्हणतात. बांगला देशातही चंडवात मोठ्या संख्येने प्रत्ययास येतात. ह्या आविष्कारात प्रबल वारे बहुतेक वायव्येकडून येऊन आग्नेयीकडे वाहतात. त्यामुळे त्यांना नॉर्वेस्टर असे इंग्रजी नाव देण्यात आले आहे.


चंडवात-रेषा : विस्तृत सीमापृष्ठाच्या आक्रमणदिशेच्या पुढील बाजूला एकाच वेळी निर्माण होणाऱ्या चंडवातांशी संबंधित असलेल्या गडगडाटी वादळांना जोडणारी रेषा. अशा गडगडाटी वादळांचे क्षेत्र साधारणपणे २० – ५० किमी. रुंदीचे आणि १०० ते २,००० किमी. लांबीचे असते व त्या क्षेत्राचा चलनवेग सेकंदाला १५ मी. (किंवा ३० नॉट) असतो. ६ ते १२ तासांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत गडगडाटी वादळांचा व चंडवातांचा प्रभाव टिकतो आणि अशा रीतीने विस्तीर्ण क्षेत्र ह्या आविष्काराच्या आघाताखाली येते. चंडवातरेषा एखाद्या प्रदेशावरून निघून जाताना १०–१५ मिनिटांत १०–१५ से.नी तापमान कमी होते. वेगवान वारे वाहू लागून पर्जन्य, तडित् प्रहार, मेघगर्जना, करकापात (गारांचा वर्षाव) इ. आविष्कार अनुभवास येतात. साधारणपणे ३ ते ५ सेंमी. पर्जन्यवृष्टी होते त्यापैकी पहिल्या दहा मिनिटांतच दीड सेंमी.पेक्षा अधिक पाऊस पडलेला अनेकदा आढळलेला आहे. पाऊस साधारणपणे पाऊण ते एक तासापर्यंत पडतो. उत्तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या सुरुवातीला चंडवात – रेषांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेशांवर उष्ण कटिबंधीय सागरी हवेचे आकस्मिकपणे आगमन होऊन ती जेव्हा ध्रुवीय सीमापृष्ठावरील चक्रवातांच्या अभिसरणात शिरते तेव्हा तीव्र स्वरूपाच्या चंडवात-रेषा निर्माण होतात. काही ठिकाणी त्यामुळे पिकांना उपयुक्त असा पाऊस पडतो, तर इतर ठिकाणी अल्पावकाशात वारे प्रबल होऊन विस्तृत प्रमाणावर वित्तहानी आणि प्राणहानी होते. हानीच्या बाबतीत ⇨ हरिकेनसारख्या उग्र तुफानी उष्ण कटिबंधीय चक्रीय वादळानंतर चंडवात-रेषांचाच क्रमांक लागतो. भारतात चंडवात-रेषा मॉन्सून सीमापृष्ठावर निर्माण होतात. उत्तर भारतात विशेषेकरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या उपोष्ण कटिबंधीय चक्रवातांतील शीत सीमापृष्ठांच्या पुढे गडगडाटी वादळांतील शुष्कतर हवेचे अधःप्रवाह भूपृष्टावर पसरून उष्णार्द्र वायुराशींना मिळतात, त्या सीमारेषेवरच चंडवात-रेषा निर्माण झाल्याचे दिसते. भारतातील चंडवात-रेषेने प्रभावित झालेले क्षेत्र बरेच मर्यादित असते.

चंडवात-रेषेचे अस्तित्व संक्षोभित ढगांमुळे निर्माण झालेल्या अखंड व प्रचंड भिंतीच्या स्वरूपात दृग्गोचर होते. अग्रभागी उच्च स्तरीय घन तंतुमेघांनी (रेशमी धाग्यांसारख्या वा तंतूंसारख्या दिसणाऱ्या वातावरणाच्या उच्च थरांतील हिमकणयुक्त पांढऱ्या ढगांनी) गर्दी केलेली असते. अनेक क्रियाशील गर्जना करणाऱ्या वादळांच्या मार्गात आलेल्या कोशिकांत उग्रतम स्वरूपाची हवामान परिस्थिती नांदत असते. अशा वादळांचे आगमन होताच वारे प्रबल होतात, वाऱ्यांची दिशा सव्य दिशेने (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेने) एकदम बदलते, तापमानात त्वरेने घट होऊ लागते. तडित् प्रहार, गडगडाट व मुसळधार वृष्टी होऊ लागते, क्वचित प्रसंगी करकापात होतो. अशाच परिस्थितीतून घूर्णवाती वादळेही (टॉर्नेडोही) निर्माण होतात. संबंधित संनयनी संक्षोभित ढगांची उंची १० ते १५ किमी. पेक्षाही अधिक असते. विमानवाहतुकीला ही हवामानपरिस्थिती अत्यंत धोक्याची असते. रडार यंत्रांच्या साह्याने मार्ग बदलून ढगांच्या भिंतीला वळसा घालून हा धोका टाळता येतो.

आ. १ उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवाताच्या उष्ण क्षेत्रात शिरलेल्या उष्णार्द हवेतील उत्तरेकडील अस्थिर विभागात निर्माण झालेल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या चंडवात-रेषेची अनुवर्ती स्थाने. बारीक रेषांनी व बाणांनी खालच्या पातळीवरील वायुप्रवाह दाखविले आहेत. जाड अखंडित व तुटक रेषांनी १ किमी. व १०-१२ किमी. च्या उंचीवर वाहणाऱ्या प्रबलतम स्त्रोत प्रवाहांचे अक्ष दाखविले आहेत.

चंडवात-रेषेच्या निर्मितीकरिता भूपृष्ठालगतच्या १ ते ३ किमी. जाडीच्या वातावरणीय थरात मोठ्या प्रमाणावर जलबाष्प असावे लागते. ही आर्द्र हवा जसजशी वर जाते तसतशी संद्रवण उष्णता (तापमानात बदल न होता जलबाष्पाचे जलरूपात अवस्थांतर होताना बाहेर पडणारी उष्णता) मुक्त झाल्यामुळे तेथील परिसरातील हवेपेक्षा ती अधिक उष्ण होत जाते व तिच्यात अस्थिरता निर्माण होते. ह्याच वेळी वातावरणातील उच्च स्तरीय शीत अवदाब क्षेत्र किंवा न्यूनदाब द्रोणी (कमी वातावरणीय दाबाची क्षेत्रे) ऊर्ध्व दिशेने चढणाऱ्या हवेच्या माथ्यावर आली, तर तेथील उष्णतर हवा अधिकच अस्थिर होते आणि गर्जन्मेघ द्रुतगतीने वाढू लागतो. आ. १ मध्ये अशा परिस्थितीचे अक लाक्षणिक उदाहरण दाखविले आहे. 


बिहार, पश्चिम बंगाल व बांगला देश या प्रदेशांवरून आणि उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातांच्या (केंद्राकडे दाब कमी होत जातो अशा चक्रवातांच्या) उष्ण विभागात बंगालच्या उपसागरावरील उष्णार्द्र हवा शिरल्यास व त्याचवेळी १० ते १२ किमी. उंचीवर तरंगाकृती स्रोत प्रवाहाच्या अक्षाचा अपसारी भाग चक्रवाताच्या केंद्रीय क्षेत्रावर अध्यारोपित झाल्यास (चक्रवाताच्या माथ्यावर आल्यास) विस्तीर्ण क्षेत्रावर संनयनी क्रिया व ऊर्ध्व प्रवाह प्रबल होऊन अत्यंत विध्वंसक स्वरूपाची चंडवात-रेषा निर्माण होऊ शकते. अनेक क्रियाप्रक्रिया उष्णार्द्र हवेतील अस्थैर्य निमुक्त करतात [⟶  वातावरणीय अक्रमी प्रक्रिया] व प्रक्रमणशील (ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्या) मेघनिर्मितीस कारणीभूत होतात. उदा., शीत सीमापृष्ठाजवळील शीत व घन हवा उष्णार्द्र हवेच्या खाली शिरून तिला वर उचलू शकते. भूपृष्ठावरील आर्द्र हवा सूर्याच्या उष्णतेमुळे तापून वर जाऊ शकते. उच्चस्तरीय स्रोत प्रवाहाजवळील (उच्च पातळीवरील असाधारण वेगवान वाऱ्यांच्या अरुंद पट्ट्याजवळील) न्यूनदाब द्रोणीच्या अनुस्रोत प्रवाहात खालच्या भूपृष्ठावरील आर्द्र हवा मोठ्या प्रमाणावर कित्येक तासांपर्यंत उचलून वर नेण्याचे सामर्थ्य असते. यांपैकी कोणत्याही एक वा अनेक क्रियांच्या संयोगाने आर्द्र हवा मोठ्या प्रमाणात वर जाते. त्यामुळे सामर्थ्यशाली गर्जन्मेघ निर्माण होऊन चंडवातांचा उगम होतो. चंडवात-रेषा बहुधा दुपारच्या वेळी निर्माण होतात. अस्थिर हवेतून मार्ग आक्रमिताना ऊष्मागतिकीय (उष्णताजन्य गतीमुळे होणाऱ्या) आणि यांत्रिक प्रक्रियांच्या संयोगाने चंडवात-रेषा अनेक तास टिकतात व नवीन क्रमवर्ती (एकानंतर दुसरी अशा क्रमाने) चंडवात-रेषा निर्माण करीत शेवटी निष्क्रिय होतात. पश्चिम बंगालमध्ये दुपारी निर्माण झालेली चंडवात-रेषा पूर्व दिशेने मार्ग आक्रमीत रात्रीपर्यंत बांगला देशापर्यंत पोहोचते. हे घडून येताना मार्गात अनेक क्रमवर्ती चंडवात-रेषा निर्माण होतात.

आ. २. चंडवात - रेषेवर निर्माण झालेल्या गडगडाटी वादळाचा ऊर्ध्व छेद

चंडवात-रेषेवर निर्माण झालेल्या गडगडाटी वादळाचा ऊर्ध्व छेद आ. २ मध्ये दाखविला आहे. ह्या आकृतीत गर्जन्मेघांच्या परिसरातील निरनिराळ्या उंचीवरील वाऱ्यांच्या वेगभिन्नतेमुळे ऊर्ध्व प्रवाहांची व अधःप्रवाहांची वहनदिशा तिरपी झालेली दिसते. क्षैतिज संवेग (वस्तुमान व वेग यांचा गुणकार) अंशतः सुरक्षित ठेवून वर चढत असलेला आर्द्र हवेचा प्रवाह ऊर्ध्व प्रवाहाच्या निर्मितिस्थानापासून मागे रेटला जातो. अधःप्रवाहात मध्यपरिसरातील गतिमान हवा गर्जन्मेघाच्या मध्यवर्ती भागात शिरून ढगातून खाली येते. तिला अगोदरच अग्रदिशेने प्रबल संवेग प्राप्त झालेला असतो. भूपृष्ठाकडे येताना हा तिरपा वायुप्रवाह अविरतपणे आर्द्र हवेच्या खाली जाऊन तिला सारखा वर ढकलीत असतो. त्यामुळे ऊर्ध्वप्रवाहाचे पुनरुज्जीवन होऊन त्यात सातत्य टिकून राहते. संद्रवण उष्णता मुक्त झाल्यामुळे ऊर्ध्व प्रवाहाला अधिक उत्प्लावकता (वर रेटा देणारी प्रेरणा) प्राप्त होते व तो अधिकच प्रबळ बनतो. ऊर्ध्व प्रवाहाच्या गाभ्यात प्रतिसेकंदाला ३०—६० मी. (६०—१२० नॉट) सारखा वेग क्षोभसीमेच्या (वातावरणाच्या ज्या नीचतम थरात उंचीप्रमाणे तापमान कमी होते आणि हवामानाचे क्षोभजनक आविष्कार आढळतात त्या थराच्या उच्चतम सीमेच्या) पातळीच्या जवळपास आढळतो. ऊर्ध्व प्रवाहातून निसटणारे पर्जन्यबिंदू गर्जन्मेघाच्या मध्यवर्ती भागातून निघणाऱ्या शुष्कतर अधःप्रवाहात मिसळतात. त्यात त्यांचे बाष्पीभवन होऊन अधःप्रवाह अधिकच थंड व जड होतो. ही हवा भृपृष्ठालगतच्या एक-दोन किमी. जाडीच्या थरात पसरते. त्यामुळे शुष्क व जड हवेचे क्षेत्र वाढते. भूपृष्ठावर चंडवात-रेषेच्या मागे अनेकदा जे उच्च वायुदाबाचे क्षेत्र निर्माण झालेले दिसते ते याच कारणामुळे. चंडवात-रेषेवरील सु. २० किमी. व्यास असलेल्या एका गडगडाटी वादळात प्रतिसेकंदाला ५—१० किलोटन जलबाष्पाचे संद्रवण होऊ शकते. त्यापैकी अर्धा भाग गडगडाटी वादळात पुन्हा बाष्पीभूत होऊन परत वातावरणात जातो. बाकीचा अर्धा भाग पर्जन्य किंवा गारांच्या रूपाने भूपृष्ठावर येतो.

दीर्घ चंडवात-रेषेत अनेक ठिकाणी खंड पडलेला दिसतो. ३० किमी. अंतर असलेल्या दोन ठिकाणांतून एकच चंडवात-रेषा गेलेली दिसत असली, तरी त्या दोन्ही ठिकाणची हवामानपरिस्थिती सारख्याच तीव्रतेची असण्याचा संभव कमीच असतो. एका ठिकाणी मध्यमगती वारे वाहत असतील, तर दुसऱ्या ठिकाणी प्रबल झंझावाती वारे मुसळधार वृष्टी व गारांचा वर्षाव होत असण्याची शक्यता असते.

उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातातील शीत सीमापृष्ठाच्या आग्नेय दिशेला साधारणपणे ७५ ते २५० किमी. अंतरावर चंडवात-रेषा हवामान-नकाशावर दिसू शकते. शीत सीमापृष्ठ व चंडवात-रेषा यांच्यातील अंतर उपरिवाऱ्यांच्या (वातावरणातील विविध पातळ्यांवर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या) वेगावर अवलंबून असते. वारे अतिप्रबल असल्यास हे अंतर वाढलेले दिसते. १२ ते २४ तासांनंतर चंडात-रेषा शीत सीमापृष्ठापासून शेकडो किमी. पुढे गेलेली असते. काही चंडवात-रेषांचा प्रभाव ३६ तासांपर्यंत चालू असलेला आढळला आहे. उष्ण कटिबंधातून येणारी उष्णार्द्र हवा जेथे ध्रुवीय शीत आणि शुष्क हवेला मिळते अशा क्षेत्रांत चंडात-रेषा मोठ्या संख्येने निर्माण होतोत. उत्तर अमेरिकेतील विस्तीर्ण सखल प्रदेशात आणि मध्य पश्चिम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत शीत ध्रुवीय व उष्ण कटिबंधीय वायुराशींचे वारंवार आक्रमण होते. तेथे जगातील सर्वाधिक चंडवात-रेषा निर्माण झालेल्या दिसतात. एका चंडवात-रेषेवरील अनेक घूर्णवाती वादळांमुळे, गारांच्या वर्षावामुळे व द्रुतवेगी वाऱ्यांमुळे कोट्यवधी रुपयांची हानी होऊ शकते. दिनांक २-३ मे १९५६ रोजी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत एका चंडावात-रेषेवर ३० पेक्षा अधिक घूर्णवाती वादळे निर्माण झाल्याची नोंद आहे.

पहा : गडगडाटी वादळ घूर्णवाती वादळ चक्रवात.

संदर्भ : 1. Battan, L. J. The Thunderstorm, New York, 1964.

           2. Petterssen, S. Weather Analysis and Forecasting, Vol. 2. New York, 1956.

           3. Shaw, Sir W. N. Manual of Meteorology, Vol. 2. London, 1942.            

नेने, य. रा. चोरघडे, शं. ल.