घोरी घराणे : दहाव्या शतकात घौरच्या अफगाणांनी घोर येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. घोरी व गझ्नी यांतील अनेक वर्षांच्या तंट्यातून घोरी घराणे इतिहासाला परिचित झाले. शन्सबानी वंशातील मलिक इझ्झुद्दीन अल् हुसैन याच्या कुत्बुद्दीन, सैफुद्दीन व अलाउद्दीन या तीन मुलांनी नावलौकिक मिळविला. १००९ मध्ये ⇨ मुहम्मद गझ्नीने घोर प्रांत काबीज केला. घोर व गझ्नी घराण्यांतील तंटे विकोपाला जाऊन बहराम गझ्नीने कुत्बुद्दीन व सैफुद्दीन घोर यांना ठार केले. त्यामुळे त्यांचा भाऊ अलाउद्दीन याने गझनीवर चाल करून, तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यास सेल्जूक लोकांशी सामना द्यावा लागला. अलाउद्दीनचा मुलगा सैफुद्दीन ११५६ मध्ये गादीवर आला. ११५७ मध्ये त्याचा खून झाल्यानंतर त्याचा चुलत भाऊ घियासुद्दीन हा गादीवर बसला. त्याने ११७३ मध्ये गझनी शहर काबीज करून तेथे आपला भाऊ शिहाबुद्दीन यास नेमले. हाच पुढे ⇨ मुहम्मद घोरी म्हणून प्रसिद्ध झाला. घियासुद्दीन १२०२ मध्ये मरण पावला. नंतर शिहाबुद्दीन सर्व राज्याचा मालक झाला. त्याच्या कारकीर्दीत घोरी राज्याचा विस्तार पंजाबपासून बॅबिलनपर्यंत व ऑक्सस नदीपासून हॉर्मझच्या सामुद्रधुनीपर्यंत झाला होता. माळवा व त्याजवळील काही प्रांतांखेरीज सबंध उत्तर हिंदुस्थानचा पश्चिम भाग त्याने जिंकला होता. मुहम्मद घोरीने हिंदुस्थानात मुसलमानी राज्याचा पाया घातला. त्याने हिंदुस्थानातील कारभार त्याचा गुलाम कुत्बुद्दीन ऐबक याच्याकडे सोपविला. मुहम्मदला मुलगा नसल्याने त्याचा पुतण्या गादीवर आला. त्याच्या मरणानंतर ख्वारिज्मच्या शाहांनी ते राज्य जिंकले. हिंदुस्थानात घोरी घराण्याचा शेवट १२०६ साली व गझनीत १२१५ मध्ये झाला.
त्या काळात फार्सी भाषेची व साहित्याची भरभराट झाली. ह्या घराण्याच्या काळातच हिंदुस्थानात इस्लामी वास्तुकलेच्या बांधणीस सुरुवात झाली.
गोखले, कमल
“