डीरिक्ले, पेटर गुस्टाफ लअझन : (१३ फेब्रुवारी १८०५–५ मे १८५९). जर्मन गणितज्ञ. ⇨संख्या सिद्धांत, गणितीय विश्लेषण व यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यासंबंधीचे शास्त्र) या विषयांत विशेष कार्य. त्यांचा जन्म ड्यूरेन येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलोन व पॅरिस येथे झाले. १८२२–२५ मध्ये पॅरिस येथे फॅकल्टी डे सायन्समध्ये शिकत असताना त्यांनी आपला गणितातील पहिला निबंध डायोफँटस समीकरणांवर सादर केला. त्यांनी ब्रेस्लौ विद्यापीठात (१८२५–२८) व बर्लिन विद्यापीठात १८२८–५४) प्राध्यापक म्हणून काम केले. १८५५ मध्ये गौस यांच्या मृत्यूनंतर गटिंगेन विद्यापीठात त्यांना प्राध्यापक म्हणून बोलविण्यात आले.

 

डीरिक्ले यांना संख्या सिद्धांतामध्ये विशेष रस होता. गौस यांच्या Disquisitiones arithmeticae या ग्रंथाने ते फार प्रभावित झाले होते. द्विघाती रूपे, द्विघाती व चतुर्घाती परस्परतानियम, गौसीय पूर्णांक यांवर बरेच लेखन केले. अक्ष+क या पदावलीने (अ आणि क सापेक्षतः अविभाज्य) मिळणाऱ्या समांतर श्रेढीमध्ये अनंत अविभाज्य संख्या आहेत, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी व्यापक बैजिक संख्या सिद्धांत शोधण्याचा प्रयत्न केला, असे त्यांच्या लेखनावरून दिसून येते. बैजिक संख्या सिद्धांतामधील एकक सिद्धांताला त्यांनीच चालना दिली. फलनाचे रूपांतर ⇨फूर्ये श्रेढीमध्ये करण्याकरिता फलनाने पाळावयाच्या अटी त्यांनीच मांडून दाखवल्या व त्या त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहेत. फलन म्हणजे दोन संचांतील संगती ही आधुनिक मांडणी डीरिक्ले यांनीच सुरू केली. यामिकीमध्ये त्यांनी विशेषतः पुढील विषय हाताळले : (१) विवृत्तजाच्या (ज्याचे प्रतलाने घेतलेले सर्व छेद लंबवर्तुळाकार असतात अशा पृष्ठाच्या) आतील किंवा बाहेरील द्रव्य बिंदूवरील आकर्षण, (२) मर्यादामूल्य समस्या [⟶ अवकल समीकरणे], (३) असंकोचनीय द्रवातील गोलाची गती. Vorlesungen uber Zahlenthorie हा आर्. डेडेकिंट यांनी संपादित केलेला त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर १८६३ मध्ये प्रसिद्ध झाला व त्यानंतर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ते गटिंगेन येथे मृत्यू पावले.

 मिठारी, भू. चिं.