डाळिंब : (हिं. अनार गु. दादाम क. डाळिंबद हण्णू सं. दाडिम, वल्क, रक्तबीजपुष्प इं. पोमग्रॅनेट लॅ. प्युनिका ग्रॅनॅटम कुल-प्युनिकेसी). याचे साधारण ३–५ मी. उंचीचे पानझडी झुडूप (अथवा लहान वृक्ष) असते. लहान फांद्यांच्या टोकास रूपांतरित काटे असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा झुबक्यांनी येतात ती लांबट, कोवळेपणी तांबडी, जून झाल्यावर गर्द हिरवी, गुळगुळीत, लाल शिरांची व तरंगित कडांची असतात. फुले एकाकी, जोडीने किंवा ३ ते ५ च्या झुबक्यांनी फांद्यांच्या टोकांस येतात ती मोठी व लालबुंद असतात. संवर्त दीर्घस्थायी (फळावरही आढळणारा) जाड, लालसर प्रदले ५–७, लाल व वलिवंत (घड्या पडलेला) केसरदले अनेक किंजदले एकावर एक अशा दोन किंवा तीन थरांत असतात [→ फूल]. मृदुफळात बियांभोवती रसाळ गराचे आवरण असते या फळाला ‘दाडिम फल’ (डाळिंबाचे फळ) म्हणतात. बिया अनेक असतात. ⇨प्युनिकेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे इतर शारीरिक लक्षणे असतात.
डाळिंबाचे मूलस्थान इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान आहे. स्पेन, मोरोक्को, ईजिप्त, इराण, अफगाणिस्तान, अरेबिया आणि बलुचिस्तान तसेच मेक्सिको, द. अमेरिका आणि उ. अमेरिकेतील फ्लॉरिडा
आणि कॅलिफोर्निया राज्यांत डाळिंबाची लागवड होते. हिमालयात १,८०० मी. उंचीपर्यंत डाळिंबाची झाडे आपोआप वाढलेली आढळून येतात. भारताच्या बहुतेक राज्यांत डाळिंबाची थोड्या फार प्रमाणावर लागवड केली जाते परंतु देशात या पिकाखाली लागवडीचे एकूण क्षेत्र सु. १,००० हे इतकेच आहे. महाराष्ट्रात सु. ४८० हे. क्षेत्र असून विशेषतः पुणे, सातारा, अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांत या पिकाखाली सर्वांत जास्त क्षेत्र आहे. त्याखालोखाल गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात धोलका तालुक्यात साबरमती नदीच्या काठाने या फळझाडाची लागवड केंद्रित झाली आहे. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत मिळून भारतातील एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र आहे. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतही डाळिंबाची लागवड होते.
प्रकार : बगदाद, पॅलेस्टाइन, स्पेन, कॅलिफोर्निया आणि सायप्रस भागातील डाळिंबाचे प्रकार प्रसिद्ध आहेत. वायव्येकडील भाग सोडल्यास भारतातील डाळिंबाचे प्रकार विशेष दर्जाचे नाहीत. भारतातील प्रकार दोन वर्गांत मोडतात : (१) बियांच्यावरील गर (मांसल आवरण) पांढरा असलेले व (२) गर गुलाबी रंगाचा असलेले. पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात ‘आळंदी ’ अगर ‘ वडकी ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक प्रकारांची लागवड बियांपासून तयार केलेली रोपे लावून करतात. या फळांचे आकारमान मध्यम असून गर लाल व बिया कठिण असतात. गुजरातेत ‘धोलका’ हा प्रकार लागवडीत आहे. या प्रकारात फळांचे आकारमान मोठे असून दाण्यांचा रंग पांढरा असतो. बिया नरम असतात व फळांच्या सालीचा रंग हिरवट पांढरा असतो. पुणे येथील फळ संशोधन केंद्रात स्थानिक जातींमधून निवड करून काढलेला जी. बी. जी. क्र. १ हा प्रकार पश्चिम व दक्षिण भारतात लागवडीसाठी उत्तम ठरला आहे. या प्रकाराच्या फळांतील बिया नरम असतात आणि गर फिक्कट गुलांबी रंगाचा असतो. दक्षिण भारतात पेपरशेल, स्पॅनिश रुबी, मस्कत रेड व वेलोदू हे प्रकार लागवडीत आहेत. मस्कती व कंदाहारी या परदेशी प्रकारांची फळे भारतात विक्रीसाठी येतात.
हवामान : कडक हिवाळा आणि तीव्र व कोरडा उन्हाळा असे हवामान असलेल्या प्रदेशांत उत्तम प्रतीच्या डाळिंबांची पैदास होते. हे झाड निरनिराळ्या प्रकारच्या हवामानांत वाढू शकते, परंतु फळे पोसण्याच्या सुमारास गरम व कोरडे हवामान असणे आवश्यक आहे. हे झाड अवर्षणामध्ये टिकून राहू शकते.
जमीन : डाळिंबाचे झाड काटक असून ते इतर अनेक फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य नसलेल्या जमिनीतही वाढू शकते परंतु मध्यम प्रकारच्या गाळाच्या जमिनीत हे पीक चांगले येते. हलकी चुनखडीची जमीन या पिकाला चालते. टेकड्यांच्या पायथ्याशी आणि ज्या ठिकाणी जमिनीत थोडी ओल टिकून राहते, अशा उंच पठारावर देखील ह्या झाडांची लागवड होऊ शकते.
अभिवृद्धी : बियांपासून रोपे तयार करून ती लावण्याचा प्रघात बराच रूढ आहे, परंतु या पद्धतीत सर्व झाडांची फळे सारख्या आकारमानाची आणि गुणधर्माची नसतात. यासाठी सतत चांगले उत्पन्न देणाऱ्या जातिवंत झाडांपासून शाकीय अभिवृद्धी पद्धतीने (एरवी फक्त पोषणाचे काम करणाऱ्या अवयवाचा लागवडीसाठी उपयोग करण्याच्या पद्धतीने) तयार केलेल्या छाट कलमापासून अगर दाब कलमापासून लागवड करणे फायदेशीर असते.
लागवड : जमीन चांगली भुसभुशीत करून ५ ते ६ मी. हमचौरस अंतरावर पाऊण मी. लांब, तेवढेच रुंद आणि खोल खड्डे खणून ते खतमातीने भरतात. त्यांत पावसाळ्याच्या सुमाराला मुळे फुटलेली छाट कलमे किंवा दाब कलमे अथवा बियांपासून तयार केलेली रोपे लावतात. लागण केल्यानंतर आठ दिवस नियमितपणे आणि त्यानंतर पाऊस नसेल त्या वेळी दहा दिवसांच्या अंतराने पाणी देतात. सहा महिन्यानंतर दीर्घ मुदतीने पाणी दिल्यास चालते.
खत : झाडे लहान असताना (सु. ४ वर्षांपर्यंत) पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि फळे येत असलेल्या झाडांना बहार धरण्याच्या वेळेस शेणखत आणि अमोनियम सल्फेट अगर दुसरे कोणतेही नाट्रोजनयुक्त खत देतात. एक वर्ष वयाच्या झाडांना प्रत्येकी १० किग्रॅ. शेणखत व २०० ग्रॅ. अमोनियम सल्फेट या प्रमाणात देतात. दर वर्षी हे प्रमाण वाढवीत ५ वर्षे वयाच्या झाडाला ५० किग्रॅ. शेणखत आणि १ ते १·२५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट देतात.
छाटणी : डाळिंबाच्या बुंध्यातून अनेक धुमारे फुटतात ते छाटून टाकावे लागतात, नाहीतर झाड अस्ताव्यस्त दिसते. त्याचप्रमाणे मुख्य खोडावर ३०–४५ सेमी. उंचीवर ३–४ चांगल्या जोमदार फांद्या ठेवतात व त्या दर ६ ते ९ महिन्यांनी छाटून झाडाला योग्य प्रकारचा आकार २–३ वर्षात देता येतो. मुख्य फांद्यांच्या वर निवडक फांद्याच वाढू देतात. डाळिंबाच्या झाडाला तोकड्या फांद्यांच्या टोकाला म्हणजेच पंज्यावर फळे येतात. हे पंजे जून झालेल्या फांद्यांवर येतात. त्यांच्यावर ३–४ वर्षे फळे येऊ शकतात, परंतु वय वाढत गेले म्हणजे पंज्यावर फळे कमी धरतात, म्हणून ते छाटून नवे पंजे फुटतील असे करावे लागते.
फलधारणा : छाट कलम अगर दाब कलम लावून वाढविलेल्या झाडांना तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षांपासून फळे येऊ लागतात. उत्तर भारतात मार्चमध्ये फुले येऊन फळे जुलै-ऑगस्टमध्ये तयार होतात. पश्चिम महाराष्ट्रात फळांचे मृग बहार व आंबे बहार असे दोन हंगाम असतात. मृग बहाराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत मिळतात. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्याची सोय असलेल्या ठिकाणी आंबे बहार धरण्याची पद्धत आहे. या बहारात फळे एप्रिल ते जुलैपर्यंत मिळतात. फूल आल्यापासून ५–७ महिन्यांनी फळ पक्व होते. गुजरात राज्यातील धोलका भागात आंबे बहार धरण्याची प्रथा आहे, तर दख्खनमध्ये बहुतेक मृग बहार धरतात.
उत्पन्न : प्रत्येक झाडापासून पहिल्या वर्षी २०–२५ फळे मिळतात. पुढे दर वर्षी फळे लागण्याचे प्रमाण क्रमाक्रमाने वाढत जाऊन दहाव्या वर्षी प्रत्येक झाडापासून १००–१५० फळे मिळतात. चांगली मेहनत व मशागत केलेल्या झाडांना २००–२५० फळे येतात. फळाला पिवळसर तपकिरी रंग आला की, फळ पक्व झाले असे समजतात. चांगले पक्व झालेले फळ बरेच दिवस टिकते व त्याची चव सुधारते, परंतु फळाचा रंग आणि तकाकी कमी होते. फळे तडकण्यामुळे होणारे नुकसान कमी व्हावे म्हणून बागायतदार अर्धवट पक्व फळे तोडतात, परंतु अशा फळांची प्रत कमी होते. साधारणतः फळे येऊ लागल्यापासून डाळिंबाचे २०–२५ वर्षांपर्यंत किफायतशीर उत्पन्न येऊ शकते.
फळे तडकणे : हा उपद्रव डाळिंबात सर्वत्र आढळतो. पक्व झालेले फळ तडकल्यामुळे त्यावर कीटक व कवकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा) प्रादुर्भाव होऊन फळ विक्रीयोग्य राहत नाही. झाडाच्या मुळाशी पाण्याचा पुरवठा नियमित नसल्यास हा उपद्रव वाढतो असा समज आहे. मृग बहारातील फळे आंबे बहारापेक्षा जास्त प्रमाणावर तडकतात. हा उपद्रव कमी करण्याचा एक इलाज म्हणजे पाऊस अनियमित असेल तेव्हा झाडांना पाणी देणे हा होय.
रोग : फळकूज हा डाळिंबावरील महत्त्वाचा रोग आहे. कीटकाने फळाला इजा केलेल्या जागी कवकाची वाढ होते आणि फळ गळून पडते. निरोगी फळांवर कागदी किंवा कापडी पिशव्या बांधतात.
कीड :सुरसा : ही डाळिंबावरील महत्त्वाची कीड आहे. या कीटकाचा पतंग फुलांवर व लहान फळांवर अंडी घालतो व ती उबून निघालेल्या अळ्या फळे पोखरतात. त्यामुळे फळे कुजतात. ५० टक्के डीडीटी भुकटी १ : २५० या प्रमाणात मिसळून ती ३ आठवड्यांच्या अंतराने २–३ वेळा झाडांना फुले असताना अगर फळे अगदी लहान असताना फवारतात अथवा १० टक्के बीएचसी भुकटी उडवितात. ०·०२ टक्के कार्बारिल किंवा ०·०२ टक्के एंड्रीन १५ दिवसांच्या अंतराने ४ वेळा फवारतात. फळांवर कागदी किंवा कापडी पिशव्या बांधणे हा जास्त परिणामकारक परंतु कष्टाचा आणि खर्चाचा इलाज आहे.
खोडकीडा : याच्या अळ्या झाडाच्या फांद्यांना भोके पाडून आत शिरतात व गाभ्यातील भाग खातात. उपाय म्हणून पेट्रोलचा बोळा भोकांत बसवून भोके मातीने बंद करतात.
उपयोग : फळात जलांश ७८%, प्रथिने १·६%, वसा (स्निग्ध पदार्थ) ०·१% , कार्बोहायड्रेटे १४·५% व क जीवनसत्त्व पुष्कळ प्रमाणात असते. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी या फळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फळाचा स्वादिष्ट रस टिकाऊ स्वरूपात विकला जातो आणि त्यापासून रुचकर पेये आणि मद्ये बनवितात. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीरमधील जंगलात वाढणाऱ्या डाळिंबाच्या बिया गरासह वाळवून त्या ‘अनारदाणा’ या नावाने विकल्या जातात. पदार्थांना आंबट चव आणण्यासाठी अनारदाण्याचा उत्तर भारतात वापर करतात. डाळिंबाच्या झाडाच्या सर्व भागांत विशेषतः फळांची, खोडाची व मुळांची साल आणि पाने यांत टॅनीन असते. फळांच्या व मुळांच्या सालीत ते विशेष प्रमाणात (२६%) असते. फळांच्या, खोडाच्या व मुळांच्या सालीचा वापर कच्ची कातडी कमावण्यासाठी भूमध्य समुद्राभोवतालच्या देशांत फार वर्षांपासून होत आहे. मोरोक्को हे प्रसिद्ध चामडे कमावण्यासाठी या सालीचा एके काळी उपयोग होत असे. जम्मू आणि काश्मीर भागात डाळिंबाच्या सालीचा कातडी कमाविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. फळांच्या सालीपासून लोकर आणि रेशीम रंगविण्यासाठी रंग तयार करतात. फुलांपासून फिकट तांबडा रंग काढतात व तो कापड रंगविण्यासाठी वापरतात. केसाचे कलप व दातांचे रोगण बनविण्यासाठी फळांच्या व मुळांच्या सालींचा उपयोग करतात. काळी शाई बनविण्यासाठी मुळांची साल वापरतात. जपानमध्ये सालीपासून कीटकनाशक तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत शोधून काढण्यात आली आहे. डाळिंबाच्या झाडाच्या निरनिराळ्या भागांत प्रतिजैव (सूक्ष्मजंतुरोधक) गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण फळाचा अर्क आतड्याचे विकार उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्मजंतूंची आणि इतर काही सूक्ष्मजंतूंची वाढ थांबवितो, असे दिसून आले आहे. मुळांच्या पाण्यातील अर्कामध्ये क्षयाच्या जंतूंची वाढ होत नाही.
मुळांची आणि खोडाची वाळलेली साल फीतकृमीवर गुणकारी असून तिचा वापर फार वर्षांपूर्वीपासून करण्यात येत आहे. फळांचा ताजा रस शीतल असून अपचनाच्या विकारांवरील औषधात त्याचा वापर करण्यात येतो. फळांची साल अतिसार आणि आमांश या विकारांवर गुणकारी आहे, आमांशावर पानांचा आणि कच्च्या फळांचा रस व झाडांच्या सालीचा काढाही वापरतात. डाळिंबाचे गोड प्रकार सौम्य सारक असून कमी गोड प्रकार हृदयवेदनांवर आणि जठराच्या सुजेवर गुणकारी आहेत असे म्हणतात. कळ्यांची पूड श्वसनलिकादाहावर वापरतात. बिया पाचक आणि भूक वाढविणाऱ्या असून बियांवरील गर हृदयाच्या व पचनाच्या तक्रारीवर गुणकारी आहे.
डाळिंबाच्या झाडाचा आकर्षक कुंपणासाठी वापर करण्यात येतो. बागेत शोभेसाठी डाळिंबाचे दुहेरी फुलांचे प्रकार लावतात व ते बहुधा वंध्य असतात.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.
2. I. C. A. R. Fruit Culture in India, New Delhi, 1963.
३. नागपाल, रघबीरलाल : अनु. पाटील, ह. चिं. फळझाडाच्या लागवडीची आणि फळे टिकवून ठेवण्याची तत्त्वे आणि पद्धती, मुंबई, १९६३.
कुलकर्णी, उ. के. पाटील, अ. व्यं. रुईकर, स. के.
“