डाल्मेशिया : पूर्व यूरोपातील यूगोस्लाव्हियाच्या एड्रिॲटिक समुद्रकिनारपट्टीचा चिंचोळा भाग. लोकवस्ती सु. ५,००,००० (१९७१). यात किनारपट्टीचा मध्यभाग व एड्रिॲटिक समुद्रातील ब्राच, क्व्हार, पाक, कॉर्चूला, राप, मल्येट, व्हीस, डूगी ऑटॉक वगैरे सु. ३०० बेटांचा समावेश होतो. किनाऱ्याला समांतर द्वीपमालिकेमुळे किनाऱ्यांचा ‘डाल्मेशियन किनारा’ हा एक विशिष्ट प्रकार मानला जातो. मुख्य भूमीवर डाल्मेशियाची जास्तीत जास्त रुंदी सु. ४५ किमी. व इस्त्रिया द्वीपकल्पापासून कॉटॉर आखातापर्यंत लांबी सु. ३७५ किमी. आहे. डाल्मेशियाच्या पाठीशी उघड्याबोडक्या दिनारिक आल्प्सची किनाऱ्याला समांतर पर्वतरांग असून त्यातून नेरेट्व्हा व कर्का नद्यांनी मार्ग काढले आहेत. त्याच्या आणि उत्तरेकडील जूलियन आल्प्सच्या खिंडीतून लोहमार्ग व सडका यांनी दळणवळण चालते. डाल्मेशियाच्या किनाऱ्यावर स्प्लिट, इब्रॉव्हनिक, शीबेनिक, झादार, ट्रॉगीर, कॉर्चूला, कॉटॉर इ. प्रमुख बंदरे आहेत. हा प्रदेश शेतीप्रधान असला, तरी अन्नधान्यांपेक्षा ऑलिव्ह, द्राक्षे, अंजीर, लिंबू जातीची फळे व भाजीपाला यांस अनुकूल आहे. यूगास्लाव्हियाच्या एकूण गरजेचा तिसरा हिस्सा मद्य पुरवठा येथून होतो. बॉक्साइटच्या मोठ्या साठ्यामुळे शीबेनिकजवळ ॲल्युमिनियमचा मोठा कारखाना आहे. चुनखडीमुळे देशाच्या सिमेंट उत्पादनाचा तृतीयांशापेक्षा अधिक भाग येथे होतो. रसायने, अन्नप्रक्रिया, जहाजबांधणी, मासेमारी हे उद्योगही महत्त्वाचे आहेत. नद्या वेगवान असल्यामुळे वाहतुकीस योग्य नसल्या, तरी जलविद्युत् उत्पादनास उपयुक्त आहेत. कोरडे, उबदार उन्हाळे व सौम्य हिवाळे, खडक आणि वाळूयुक्त किनाऱ्यात घुसलेले स्फटिक–स्वच्छ सागरजलाचे फाटे इत्यादींमुळे व अनेकविध प्राचीन अवशेष, वास्तू, वास्तुशिल्प इत्यादींमुळे पर्यटन व्यवसाय भरभराटीस येत आहे.
येथील मूळच्या इलिरियनांनंतर येथे ग्रीक व रोमन सत्ता आल्या. त्यानंतर कित्येक शतके या प्रांतावर सत्ता टिकविण्याकरिता अनेकांचे प्रयत्न झाले. त्यांत क्रोएशिया व व्हेनिस यांचा अंमल अधिक काळ टिकला. अठराव्या शतकाच्या अखेरीस डाल्मेशिया ऑस्ट्रियात गेला. पहिल्या महायुद्धानंतर तो इटली व यूगोस्लाव्हिया यांत विभागला गेला परंतु दुसऱ्या महायुद्धात इटलीने तो पुन्हा आपल्या प्रदेशास जोडला. नंतर १९४७ पासून हा प्रदेश यूगास्लाव्हिया संघराज्याच्या क्रोऐशिया प्रजासत्ताकात समाविष्ट झाला आहे.
लिमये, दि. ह.