टिंड्ल, जॉन : (२ ऑगस्ट १८२०–४ डिसेंबर १८९३). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. उष्णतेच्या प्रारणासंबंधीच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म आयर्लंडमधील लीलनब्रिज येथे झाला. काही काळ सर्वेक्षक व अभियंता म्हणून काम केल्यावर मारबर्ग व बर्लिन विद्यापीठांत त्यांनी शिक्षण घेतले. १८५० मध्ये त्यांनी मारबर्ग विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळविली. १८५२ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली व पुढील वर्षीच रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. तेथेच मायकेल फॅराडे यांच्याबरोबर त्यांचा घनिष्ट संबंध आला व फॅराडे यांच्यानंतर ते रॉयल इन्स्टिट्यूशनचे अधीक्षक झाले (१८६७–८७).
स्वित्झर्लंडमध्ये अनेक वेळा प्रवास करून त्यांनी आल्प्समधील हिमनद्यांसंबंधी एक ग्रंथ १८६० मध्ये लिहिला. १८५९–७१ या काळात त्यांनी वायू व बाष्प यांची उष्णतेच्या प्रारणाला असलेली पार्यता (पार जाण्याची क्षमता) व शोषणशक्ती यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. प्रकाशाच्या वातावरणातील मार्गक्रमणासंबंधी अभ्यास करून त्यांनी कलिले (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेली विशिष्ट मिश्रणे) व वायूंमधील सूक्ष्म कणांमुळे त्यांतून जाणाऱ्या प्रकाशकिरणांचे होणारे प्रकीर्णन (विखुरले जाणे) प्रायोगिक रीत्या दाखविले. या आविष्काराला टिंड्ल परिणाम असे म्हणतात. यावरून त्यांनी आकाशाच्या निळ्या रंगाचे समर्पक स्पष्टीकरण दिले. ध्वनिकंपनांतील सूक्ष्म फरक शोधून काढणाऱ्या सूक्ष्मग्रही ज्योतीचा टिंड्ल यांनीच विकास केला.
टिंड्ल उत्कृष्ट शिक्षक व लोकप्रिय शास्त्रीय लिखाण करण्यात पुरोगामी विचारसरणीचे होते. उष्णता, ध्वनी, चुंबकत्व व वातावरणीय प्रदूषण यांसंबंधी त्यांचे ग्रंथ व निबंध प्रसिद्ध आहेत. हिट कन्सिडर्ड ॲज मोड ऑफ मोशन (१८६३) व सायन्स ऑफ साउंड (पुनर्मुद्रण १९६४) हे त्यांचे ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. रॉयल सोसायटीने १८६४ मध्ये त्यांना रम्फर्ड पदकाचा बहुमान दिला. ते हाइंड हेड (सरे) येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.