टॉमॉनागा, शिन-इचिरो :(३१ मार्च १९०६–   ). जपानी भौतिकीविज्ञ. १९६५ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक पुंज (क्कांटम) विद्युत् गतिकीतील (पुंज सिद्धांतावर आधारलेल्या, इलेक्ट्रॉन वगैरे विद्युत् भारित मूलकणांच्या गतीविषयक शास्त्रातील) संशोधनाबद्दल त्यांना अमेरिकन भौतिकीविज्ञ आर्. एफ्. फाइनमन व जे. एस्. श्विंगर यांच्या समवेत विभागून मिळाले.

त्यांचा जन्म टोकिओ येथे झाला. १९२९ साली क्योटो विद्यापीठातून आणवीय भौतिकी या विषयातील पदवी संपादन करून त्यांनी काजूरो टोमाकी प्रयोगशाळेत हीडकी यूकावा यांच्याबरोबर साहाय्यक म्हणून तीन वर्षे काम केले. १९३२ साली टोकिओ येथील सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत त्यांची बदली होऊन तेथे योशिओ निशिना यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. १९३७–३९ या काळात त्यांनी लाइपसिक विद्यापीठ (जर्मनी) येथे डब्ल्यू. के. हायझेनबेर्क यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. १९३९–४० मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल अँड केमिकल रिसर्च, टोकिओ येथे साहाय्यक टोकिओ बूनरिका विद्यापीठात १९४० साली व्याख्याते व १९४१ साली प्राध्यापक म्हणून त्यांच्या नेमणुका झाल्या. १९४९–५० या काळात त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडी, प्रिन्स्टन (अमेरिका) येथे अध्यापन केले. त्यांनी १९४९–६९ या काळात टोकिओ युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनमध्ये भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले व याच विद्यापीठाचे १९५६–६२ या काळात ते अध्यक्ष होते. १९६३–६९ मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टिकल रिसर्च या संस्थेचे संचालकपद भूषविले. १९६३–६९ मध्ये ते जपान सायन्स कौन्सिलचे अध्यक्ष होते.

जेम्स मॅक्सवेल यांच्या रूढ भौतिकीय सिद्धांतात सुधारणा करुन पी. एम्. एस्. डिरॅक वगैरे शास्त्रज्ञांनी पुंज विद्युत् गतिकीचे काही सिद्धांत मांडले होते पण ते प्रयोगाच्या कसोटीला उतरले नव्हते. टॉमॉनागा यांचे सुधारित सिद्धान्त ⇨सापेक्षता सिद्धांताशी सुसंगत असून प्रयोगाच्या कसोटीलाही ते उतरतात. मूलकणांमध्ये परस्परक्रिया झाल्यास त्यांचे द्रव्यमान व विद्युत् भार यांत होणाऱ्या बदलांचे गणित करण्यात येणाऱ्या अडचणी टॉमॉनागा यांच्या संशोधनामुळे दूर झाल्या. न्यूट्रॉनांसंबंधीच्या सिद्धांतावरील त्यांच्या निबंधामुळे पुंज गतिकीय आणि मासा व कोटानी यांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनामुळे विद्युत् चुंबकत्व या विषयांत त्यांनी मौलिक भर घातली. 

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना जपान ॲकॅडेमीचे पारितोषिक (१९४८), ऑर्डर ऑफ कल्चर (१९५२) व लमनॉसॉव्ह पदक (रशिया, १९६४) हे बहुमान मिळाले. इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलाक्कांटम मेकॅनिक्स  (भाग १, १९६२ भाग २, १९६६) हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे.

फरांदे, र. कृ.