टार्टारिक अम्ल : एक द्विक्षारकीय (ज्याच्या रेणूतील दोन विशिष्ट हायड्रोजन अणूंच्या जागी दुसरे अणू अथवा अणुगट रासायनिक क्रियांनी घालता येतात असे) कार्बनी अम्ल. याचे रेणूसूत्र (रेणूमध्ये असलेल्या अणूंचे प्रकार व संख्या दाखविणारे सूत्र) C4H6O6 आणि संरचना सूत्र (अणू एकमेकांस कसे जोडलेले आहेत ते दाखविणारे सूत्र) HOOC–CH(OH)–CH(OH)–COOH असे आहे. रासायनिक नामकरण पद्धतीनुसार याला २,३–डायहायड्रॉक्सी ब्युटेन डायॉयिक अम्ल अथवा २,३– डायहायड्रॉक्सी सक्सिनिक अम्ल असेही नाव आहे.
याच्या रेणूमधील दोन कार्बनी अणू सारखे असममित (कार्बन अणूला चार भिन्न अणू अथवा अणुगट जोडलेले असले म्हणजे तो असममित होतो सारखे असममित म्हणजे जे अणू अथवा अणुगट एका असममित अणूला तेच दुसऱ्यालाही जोडलेले आहेत असे) आहेत व त्यामुळे या अम्लाचे चार प्रकार आहेत [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र]. (१) दक्षिण वलनी, D(+), (ध्रुवित प्रकाशाची म्हणजे एकाच प्रतलात ज्यांची कंपने होतात अशा प्रकाशाचे प्रतल उजवीकडे वळविणारा) (२) वामवलनी, L (–), (ध्रुवित प्रकाशाची पातळी दक्षिण वलनी प्रकाराइतकीच पण डावीकडे वळविणारा) (३) अंतःपूरित अथवा मेसो (रेणूचा अर्धाभाग दक्षिण वलनी व अर्धाभाग तितकाच वामवलनी असल्यामुळे प्रकाशीय वलन नसलेला) व (४) बहिःपूरित (दक्षिण वलनी व वामवलनी प्रकारांचे रेणू समप्रमाणत असलेले मिश्रण.
या प्रकारांचे भौतिक गुणधर्म भिन्न परंतु रासायनिक गुणधर्म सारखे असतात.
दक्षिण वलनी D(+) टार्टारिक अम्ल : किण्वन क्रियेने (एक तऱ्हेच्या आंबविण्याच्या क्रियेने) द्राक्षरसापासून मद्य बनविताना पाटॅशियम हायड्रोजन टार्टारेट हे या अम्लाचे लवण अशुद्ध रूपांत (अर्गॉल)वेगळे होते व किण्वन पात्रात जमते. त्यापासून स्फटिकीकरणाने शुद्ध लवण शुभ्र स्फटिकांच्या रूपात मिळते. हे टार्टारिक अम्लाचे एक लवण आहे. हे के. डब्ल्यू. शेले यांनी १७६९ मध्ये सिद्ध केले. त्याला क्रीम ऑफ टार्टार असेही म्हणतात. पाण्यात विरघळून त्यात कॅल्शियम हायड्रॉक्साइड मिसळले म्हणजे कॅल्शियम टार्टारेटाचा अवक्षेप (न विरघळणारा असल्यामुळे तळाशी बसणारा पदार्थ) मिळतो. तो गाळून वेगळा काढला व त्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया केली म्हणजे हे अम्ल मिळते. ५–कीटो ग्लुकॉनिक अम्लाच्या जैव ऑक्सिडीकरणानेही (सजीव सृष्टीतील ऑक्सिजनाची रासायनिक विक्रिया) हे अम्ल बनते. चिंच, तुती व अननस या फळांतही हे लवणांच्या रूपाने असते. याचे स्फटिक १७०° से. तापमानास वितळतात. ते पाण्यात व अल्कोहॉलात विरघळतात परंतु ईथरामध्ये अविद्राव्य असतात. याच्या २० टक्के जलीय विद्रावाचे, २०° से. तापमानास, विशिष्ट वलन [α]D20 हे १२° असते [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र]. याचा विन्यास (रेणूतील अणूंची अथवा अणुगटांची अवकाशात असलेली त्रिमितीय मांडणी) पुढीलप्रमाणे दाखवितात :
या दक्षिण वलनी टार्टारिक अम्लाच्या विन्यासामध्ये २ व ३ हे अणू असममित आहेत. हायड्रिआयोडिक अम्लाने ⇨ क्षपण केल्यास याचे प्रथम मॅलिक अम्ल व नंतर सक्सिनिक अम्ल बनते.
क्रीम ऑफ टार्टारवर सोडियम बायकार्बोनेटाची विक्रिया केली म्हणजे सोडियम पोटॅशियम टार्टारेट हे लवण बनते, त्याला रॉशेल सॉल्ट म्हणतात. त्याचे स्फटिक Na·K·C4H4O6·4H2O या संघटनेचे असतात.
पोटॅशियम अँटिमॉनिल टार्टारेट K (SbO)C4H4O6·1/2H2O हे टार्टार एमेटिक म्हणूनही ओळखले जाते.
वामवलनी L (–) टार्टारिक अम्ल : हे निसर्गात आढळत नाही. बहिःपूरित अम्लापासून ते वेगळे करता येते. याच्या २० टक्के जलीय विद्रावाचे, २०° सें. तापमानास, विशिष्ट वलन [α]D20 हे –१२° असते. याचे इतर भौतिक व रासायनिक गुणधर्म दक्षिण वलनी टार्टारिक अम्लासारखेच असतात. याचा विन्यास पुढीलप्रमाणे दाखवितात :
अंतःपूरित टार्टारिक अम्ल किंवा मेसोटार्टारिक अम्ल : याच्या स्फटिकांची संघटना C4H6O6·H2O अशी असून त्याचा वितळबिंदू १४०° से. आहे.
क्षारीय पोटॅशियम परमँगॅनेटाने मॅलेइक अम्लाचे ऑक्सिडीकरण केल्यास हे बनते. टर्शरी ब्युटेनॉलात, ऑस्मियम टेट्रा-ऑक्साइडाच्या उपस्थितीत, हायड्रोजन पेरॉक्साइडाने बेंझिनाचे ऑक्सिडीकरण करूनही हे बनविता येते. याचा विन्यास पुढीलप्रमाणे आहे :
बहिःपूरित टार्टारिक अम्ल : घन स्थितीत याची संघटना C4H6O6·1/2H2O असून २०६° से. तापमानास वितळते. विद्रावात याचे दक्षिण वलनी व वामवलनी प्रकारांचे मिश्रण बनते. ग्लायॉक्झॅलिक अम्लाचे जस्ताच्या भुकटीने क्षपण केल्यास हे बनते. अंतःपूरित अम्लापासूनही हे तयार करता येते.
दक्षिण वलनी अम्ल सोडियम हायड्रॉक्साइडचा विद्राव अथवा पाणी यांच्याबरोबर तापविले, तर त्यापासून २९ ते ३३ टक्के बहिःपूरित व १३ ते १७ टक्के अंतःपूरित अम्ल बनते.
उपयोग : टार्टारिक अम्ल हे फसफसणारी पेये व औषधे यांमध्ये व छपाईमध्ये वापरतात. रॉशेल लवणाचा उपयोग फेलिंग विद्राव नावाच्या विक्रियाकारकासाठी, क्रीम ऑफ टार्टारचा बेकिंग चूर्णात व टार्टार एमेटिकाचा औषधात होतो. यांशिवाय छायाचित्रण, कातडी कमावणे इ. उद्योगातही हे अम्ल व त्याची लवणे वापरली जातात.
मिठारी, भू. चिं.
“