टाउन्स, चार्ल्सहार्ड : (२८ जुलै १९१५ – ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९६४ सालचे भौतिकीतील नोबेल पारितोषिक पुंज (क्वांटम) इलेक्ट्रॉनिकीमधील मूलभूत कार्याबद्दल टाउन्स यांना अर्धे आणि एन्. जी. बासव्ह व ए. एम्. प्रॉचोरॉव्ह या रशियन शास्त्रज्ञांना अर्धे असे विभागून मिळाले. या कार्यातूनच ⇨लेसर व ⇨ मेसर यांच्या तत्त्वांवर आधारलेल्या आंदोलक व विवर्धक या उपकरणांचा विकास झाला. मेसरच्या शोधाकरिता टाउन्स हे विशेष प्रसिद्ध आहेत.
त्यांचा जन्म दक्षिण कॅरोलायनातील ग्रीनव्हिल येथे झाला. १९३५ मध्ये फर्मान विद्यापीठातून बी.ए. आणि बी.एस्. या पदव्या मिळविल्यानंतर १९३७ साली ते ड्यूक विद्यापीठातून भौतिकी विषय घेऊन एम्.ए. झाले. १९३७–३९ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिक विषयातील साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर त्याच संस्थेतून १९३९ साली त्यांनी भौतिकीतील पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर बेल टेलिफोन लॅबोरेटरीमध्ये भौतिकी सल्लागार (१९३९–४७), कोलंबिया विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक (१९४८–५०) व प्राध्यापक (१९५०–६१), मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मुख्य अधिकारी व भौतिकीचे प्राध्यापक (१९६१–६७) म्हणून त्यांनी काम केले. यांशिवाय कोलंबिया रेडिएशन लॅबोरेटरीचे कार्यकारी संचालक (१९५०–५२), कोलंबिया विद्यापीठाच्या भौतिकी विभागाचे प्रमुख (१९५२–५५), पॅरिस विद्यापीठात फुलब्राइट व्याख्याते (१९५५–५६) व इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स ॲनॅलायझेस या संस्थेचे उपाध्यक्ष आणि संशोधन संचालक (१९५९–६१) म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य (१९६६–६७) व अंतरिक्षातील मानवी उड्डाणाकरिता नेमलेल्या शास्त्रीय आणि तांत्रिक सल्लागार आयोगाचे अध्यक्ष (१९६४–६९) होते.
कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करीत असताना टाउन्स यांनी सूक्ष्मतरंग वर्णपटविज्ञान व उच्च तापमानास वर्णपट मिळविणे यासंबंधी संशोधन केले. १९५३ साली एच्.जे. झायगर व जे.पी. गॉर्डन यांच्या मदतीने अमोनिया वायूचा उपयोग करून त्यांनी पहिला मेसर तयार केला. स्थिर रेडिओ कंप्रतेच्या (रेडिओ संदेशवहनासाठी वापरण्यात येणाऱ्या दर सेकंदास होणाऱ्या कंपन संख्येच्या सु. १० (किलोहर्ट्झ किंवा त्यावरील) तरंगांचे उद्गम म्हणून तसेच रडार संदेशवहन आणि ज्योतिषशास्त्र यात क्षीण रेडिओ तरंगांचे विवर्धन करण्यासाठी मेसरचा उपयोग करण्यात आलेला आहे. अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य क्षेत्र), प्रकाशीय (दृश्य क्षेत्र) व जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य क्षेत्र) या विद्युत् चुंबकीय वर्णपटातील क्षेत्रांकरिताही उपयुक्त असणाऱ्या मेसरसंबंधी ए. एल्. श्वालो यांच्याबरोबर टाउन्स यांनी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांना मेसरसंबंधीचे मूलभूत एकस्व (पेटंट) तसेच श्वालो यांच्याबरोबर लेसरच्या (प्रकाशीय मेसरच्या) विकासात उपयुक्त ठरलेल्या सुधारणांसंबंधीचे एकस्व मिळाले.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना इंग्लंडच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड फिजिकल सोसायटीचे टॉमस यंग पदक व बक्षीस (१९६३), मायकेलसन-मोर्ले बहुमान पुरस्कार (१९७०) इ. मिळाले आहेत. त्यांनी सूक्ष्मतरंग वर्णपटविज्ञान, रेणवीय व आणवीय संरचना, खगोलीय भौतिकी व पुंज इलेक्ट्रॉनिकी या विषयांवर विविध नियतकालिकांत लेख लिहिलेले आहेत. श्वालो यांच्याबरोबर लिहिलेल्या मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रॉस्कोपी (१९५५) या ग्रंथाखेरीज त्यांनी क्वांटम इलेक्ट्रॉनिक्स (१९६०) व क्वांटम इलेक्ट्रॉनिक्स अँड कोहेरंट लाइट (१९६५) हे ग्रंथही संपादित केले आहेत. रिव्ह्यू ऑफ सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स (१९५०–५२), फिजिकल रिव्ह्यू (१९५१–५३) आणि जर्नल ऑफ मॉलिक्यूलर स्पेक्ट्रॉस्कोपी (१९५७–६०) या नियतकालिकांचे ते संपादक होते. १९५६ मध्ये त्यांची अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून निवड झाली.
फरांदे, र. कृ.