झीमान, पीटर :(२५ मे १८६५–९ ऑक्टोबर १९४३). डच भौतिकीविज्ञ. १९०२ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक झीमान यांना हेंड्रिक आंटोन लोरेन्ट्स यांच्यासमवेत वर्णपटविज्ञानातील ‘झीमान परिणाम’ या आविष्काराच्या शोधाबद्दल मिळाले. त्यांचा जन्म झोन्नेमारी, झीलंड येथे झाला. त्यांचे शिक्षण लायडन विद्यापीठात झाले. त्याच विद्यापीठात त्यांनी १८९० ते १९०० पर्यंत अध्यापनाचे काम केले. १९०० साली त्यांची ॲम्स्टरडॅम विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०८ मध्ये ते ॲम्स्टरडॅम येथील फिजिकल इन्स्टिट्यूटचे संचालक झाले.

इ. स. १८९६ मध्ये झीमान यांनी तीव्र बाह्य चुंबकीय क्षेत्रामध्ये वर्णपट रेषांचे विभाजन होते, हा महत्त्वाचा शोध लावला. तसेच वर्णपट रेषांचे ते घटक ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावणारे तरंग असलेले) असतात, असे त्यांनी सिद्ध केले. हा शोध भौतिकीमध्ये ‘झीमान परिणाम’ म्हणून ओळखला जातो. या शोधाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण लोरेन्ट्स यांनी प्रथम दिले. या परिणामाच्या साहाय्याने ज्योतिर्विद सूर्याच्या किंवा इतर ताऱ्यांच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजू शकतात. झीमान यांनी पाणी, क्वॉर्ट्‌झ आणि फ्लिंट या माध्यमांतून होणाऱ्या प्रकाशाच्या प्रसारणासंबंधी संशोधन केले. त्यांनी निश्चित केलेला विविध माध्यमांतील प्रकाशाचा वेग लोरेन्ट्स यांच्या सूत्राशी मिळताजुळता होता. त्यांनी समस्थानिकांसंबंधी (तोच अणुक्रमांक परंतु भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांसंबंधी) सुद्धा संशोधन केले. उच्च विभेदनक्षमता (दोन निकटच्या वर्णपट रेषा वेगळ्या करण्याची क्षमता) असलेल्या उपकरणाच्या साहाय्याने त्यांनी १८९७ मध्ये इलेक्ट्रॉनाचा विद्युत् भार आणि वस्तुमान यांचे अचूक गुणोत्तर शोधून काढले. त्यांनी चुबंकत्व व प्रकाशकी या विषयांमध्ये पुष्कळ संशोधन कार्य केले. त्यांनी चुंबकीय प्रकाशकीविषयी बरीच पुस्तके लिहिली.

झीमान यांना ड्रेपर पदक, फ्रेंच इन्स्टिट्यूटचे पदक आणि रॉयल सोसायटीचे रम्फर्ड पदक हे बहुमान मिळाले. ते रॉयल सोसायटीचे आणि फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद होते. ते ॲम्स्टरडॅम येथे मृत्यू पावले.

सूर्यवंशी, वि. ल.