जोशी, यशवंत गोपाळ : (१७ डिसेंबर १९०१–७ नोव्हेंबर १९६३). एक श्रेष्ठ मराठी कथाकार. पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर अनेक नोकऱ्या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा उद्योग केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशनव्यवसायास आरंभ केला.

‘एक रूपया दोन आणे ’ ही त्यांची पहिली कथा यशवंत  या मसिकात प्रसिद्ध झाली (१९२९). याच मासिकाच्या कथास्पर्धेत ‘शेवगाच्या शेंगा’ या त्यांच्या कथेस प्रथम पारितोषिक मिळाले. पुनर्भेट (१९३२) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. वाचकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. १९३२ ते १९४३ पर्यंत या कथासंग्रहाचे सात भाग प्रसिद्ध झाले. तुळशीपत्र आणि इतर गोष्टी (१९३७),रेघोट्यांचे दैवत (१९४७),मायेच्या सावल्या (१९४७), जाई-जुई (१९४९) आणि तरंग (१९५०) हे त्यांचे काही इतर उल्लेखनीय कथासंग्रह. जिवंत अनुभवातून प्रकटलेली त्यांची कथा पांढरपेशा मध्यम वर्गीय जीवनाचे व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता सहजसुंदर संवाद साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेलेले लोढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती. ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्‍निक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे.

कथासंग्रहांखेरीज त्यांनी पडसाद (१९३८) सारख्या काही कादंबऱ्याही लिहिल्या. वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा ह्या त्यांच्या कथांवर आधारीत चित्रपट काढण्यात आले. दुधाची घागर  हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक. त्यांच्या आईचे हृदयस्पर्शी शब्दचित्र त्यात त्यांनी रेखाटले आहे.

भारतीय संस्कृतीतील उदात्त मूल्यांवरील श्रद्धा आणि गतकाळातील वैभवाविषयी प्रेम त्यांच्या ललित लेखनातून प्रत्ययास येते. ‘लेखक हा मार्गदर्शक दिवा आहे’ ही त्यांच्या लेखनामागील भूमिका. त्यांच्या प्रसाद प्रकाशनातर्फे त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक दर्जेदार ग्रंथावरूनही हे जाणवते. शिवरामपंत परांजपे ह्यांचे काळातील निवडक निबंध, महाराष्ट्र , शब्दकोश, सोनोपंत दांडेकरसंपादित ज्ञानेश्वरी, प्रा. रानडेकृत इंग्रजी-मराठी शब्दकोश  ही त्यांची उल्लेखनीय प्रकाशने. संयुक्त महाराष्ट्र आणि महागुजरात ह्यांच्या समग्र माहितीचा ज्ञानकोशही त्यांनी प्रसिद्ध केला (१९६०). त्याच्या संपादकमंडळातही ते होते. प्रसाद  ह्या मासिकाचेही ते एक संपादक होते. पुणे येथे ते निधन पावले.                

फडके, भालचंद्र