जॉन्सन, विल्यम अर्नेस्ट : (१८५८–१९३१). प्रसिद्ध ब्रिटिश तर्कवेत्ता. १९०२ पासून तो केंब्रिजमधील किंग्ज महाविद्यालयाचा अधिछात्र आणि नंतर ‘सिज्विक अधिव्याख्याता’ होता. सुरुवातीस तर्कशास्त्राशिवाय अर्थशास्त्रातही त्याला रुची होती आणि त्याने उपयोगितेच्या वक्रावर एक शोधनिबंध लिहून तो प्रसिद्धही केला. १९२१–२४ या काळात त्याचा लॉजिक  हा ग्रंथ तीन खंडांत प्रसिद्ध झाला. मिल व बोझांकिट यांच्यानंतर इतक्या सर्वसमावेशक स्वरूपात तर्कशास्त्रीय समस्यांचा विचार अन्य विचारवंताने केलेला आढळत नाही. या ग्रंथाच्या पहिल्या खंडात तर्कशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती तसेच तार्किक विधानांची आकारिक रचना आणि प्रकार यांचे सूक्ष्म व सविस्तर विवेचन आले आहे दुसऱ्या खंडात निगामी आणि विगामी अनुमानप्रक्रियांचा विचार मांडला आहे आणि तिसऱ्या खंडात विज्ञान व तत्त्वज्ञान यांतील महत्त्वाच्या समस्यांची आणि तार्किक अधिष्ठानांची चिकित्सा आली आहे. लॉजिक  ह्या ग्रंथाशिवाय त्याचे माइंड  ह्या नियतकालिकात ‘ऑन प्रॉबेबिलिटी’ ह्या शीर्षकाने तीन महत्त्वपूर्ण लेख प्रसिद्ध झाले (१९३२).

जॉन्सनच्या मते तर्कशास्त्र हे विचारप्रक्रियेचे विश्लेषण व समीक्षण करणारे शास्त्र असून ज्ञानमीमांसा व पदार्थमीमांसा करणाऱ्या शास्त्रांना त्याची तत्त्वे मूलभूत आणि उपकारक ठरतात. म्हणूनच जॉन्सनच्या तर्कशास्त्रीय ग्रंथात नेहमीच्या तार्किक प्रक्रियांच्या विवेचनाबरोबरच वस्तुस्थिती, नियम, कार्यकारणभाव यांची सत्ताशास्त्रीय अधिष्ठाने, द्रव्यसंकल्पना, जड-चेतना संबंध, स्वयंसिद्ध ज्ञानतत्त्व इत्यादींचेही विवेचन आढळते.

जॉन्सनच्या मौलिक संशोधनापैकी काही विशेष मान्यता पावलेली पुढील संशोधने उल्लेखनीय आहेत: ‘निर्देशी व्याख्ये’ची (ऑस्टेन्सिव्ह डेफिनिशन) त्याची कल्पना ‘ज्ञानात्मक’ (एपिस्टेमिक) आणि ‘घटकात्मक’ (काँस्टिट्यूअन्ट) यांतील भेद तसेच ‘निर्धार्य’ (डिटरमिनेबल) आणि ‘निर्धारित’ (डिटरमिनेट) ‘प्रसक्त’ किंवा ‘संतत’ (कंटिन्यूअन्ट) आणि ‘वर्तमान’ (ऑकरन्ट) यांतील भेद. ह्या सर्व संकल्पना आता सर्वमान्य झाल्या असून त्यांची नावे तत्त्वज्ञानाच्या परिभाषेचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. यात केवळ नवीन परिभाषा बनविण्याचे कौशल्य होते असे नाही, तर नवीन कोटींचा, नवीन संकल्पनांचा शोधही त्यात व्यक्त झाला आहे. उदा., ‘लाल रंग आहे’ आणि ‘प्लेटो मनुष्य आहे’ ही विधाने एकाच जातीची आहेत, असे तर्कवेत्ते मानीत आले होते परंतु त्यात जॉन्सनने असा भेद दाखविला, की प्लेटो हा ‘मनुष्य’ या वर्गाचा सदस्य आहे परंतु ‘लाल’ हा काही ‘रंग’ या वर्गाचा सदस्य नव्हे, तर ‘रंग’ या निर्धार्य तत्त्वाचे ते एक निर्धारण आहे.असेच ‘त्रिकोणी’, ‘चौकोनी’, ‘गोल’ इत्यादीही ‘आकार’ या निर्धार्याची निर्धारणे होत.                                                                

देशपांडे, दि. य.