किव्ही, अलेक्सिस : (१० ऑक्टोबर १८३४ — ३१ डिसेंबर १८७२). फिनिश नाटककार, कवी आणि कादंबरीकार. खरे नाव अलेक्सिस स्टेन्व्हाल. त्याचा जन्म दक्षिण फिनलंडमधील एका गावी झाला. शिक्षण हेलसिंकी विद्यापीठात झाले. स्वीडिश भाषेचा आणि अभिजात यूरोपीय साहित्यकृतींचा त्याने चांगला अभ्यास केला होता.
Kullervo (१८५९) ही त्याची पहिली शोकात्म नाट्यकृती कालेवाला ह्या फिनिश लोकमहाकाव्यावर आधारलेली होती आणि शेक्सपिअरच्या तंत्राने त्याने ती लिहिलेली होती. त्यानंतरच्या Nummisuutarit (१८६४, इं. शी. शूमेकर्स ऑफ द मूर) आणि Kihlaus (१८६६, इं. शी. बिट्रोदल) आणि Kihlaus (१८६६, इ. शी. बिट्रदिल) ह्या सुखात्मिका विशेष यशस्वी ठरल्या. Karkurit (१८६७, इंं. शी. रेफ्यूजीज) व Lea (१८६९) ही त्याची इतर उल्लेखनीय नाटके. Lea हे रंगभूमीवर आलेले पहिले फिनिश नाटक. Seitseman veljesta (१८७०, इं. भा. सेव्हन ब्रदर्स, १९२९) ही फिनिश भाषेतली पहिली कादंबरी त्याचीच. ही कादंबरी बहुतांशी संवादात्मक आहे. Kanervala (१८६६) ह्या त्याच्या कवितासंग्रहातील कविता चाकोरीपलीकडच्या होत्या. त्यांचे यथायोग्य मूल्यमापन होण्यास एक शतक उलटावे लागले.
यूरोपीय कीर्ती प्राप्त झालेला किव्ही हा पहिलाच फिनिश साहित्यिक. अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्या दोन प्रवृत्तींचे हृद्य मिश्रण त्याच्या लेखनशैलीत आढळते. त्याच्या अनेक साहित्यकृतींचे अन्य यूरोपीय भाषांत अनुवाद झाले आहेत. वेडसर अवस्थेत हेलसिंकीजवळच्या टूसुला ह्या गावी तो निवर्तला.
जगताप, दिलीप