कॉम्पटन, आर्थर हॉली : (१० सप्टेंबर १८९२—१५ मार्च १९६२). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९२७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म वूस्टर, ओहायओ येथे झाला. त्यांचे शिक्षण वूस्टर कॉलेजात आणि प्रिन्स्टन व केंब्रिज या विद्यापीठांत झाले. ते मिनेसोटा विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९१६–१७), वेस्टिंगहाऊस लँप कंपनीत भौतिकी संशोधक (१९१७–१९), केंब्रिज विद्यापीठात संशोधक फेलो (१९१९–२०), सेंट लूइस (१९२०–२३) व शिकागो (१९२३) या विद्यापीठांत भौतिकीचे प्राध्यापक होते. १९४५–५३ या काळात ते सेंट लूइस येथील वॉशिंग्टन विद्यापीठाचे कुलगुरू होते.
त्यांचे मुख्य शास्त्रीय कार्य क्ष-किरणे, फोटॉन (प्रकाशीय ऊर्जेची सर्वांत लहान राशी म्हणजे पुंज किंवा क्वांटम) व गॅमा किरणे (क्ष-किरणांपेक्षा कमी तरंगलांबीची किरणे) यासंबंधी आहे. क्ष-किरणांच्या प्रकीर्णनामुळे (विखुरण्यामुळे) त्यांच्या तरंगलांबीत फरक पडतो, असा त्यांनी शोध लावला. या शोधाला ⇨कॉम्पटन परिणाम असे म्हणतात. सी. टी. आर्. विल्सन यांच्या बरोबर कॉम्पटन यांना वरील शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. विश्वकिरणांसंबंधी (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या अतिशय भेदक किरणांसंबंधी) १९३१–३३ मध्ये झालेल्या जागतिक सर्वेक्षणाचे त्यांनी मार्गदर्शन केले. १९४२ मध्ये शिकागो विद्यापीठाच्या धातुवैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रमुख असताना त्यांनी अणुबाँबसाठी लागणाऱ्या प्लुटोनियमाच्या निर्मितीसाठी तसेच पहिल्या स्वनियंत्रित आणवीय साखळी विक्रियेच्या [→ अणुबाँब] संशोधनाकरिता मार्गदर्शन केले.
लंडनच्या रॉयल सोसायटीचे ह्यूझ पदक (१९४०), फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे फ्रँक्लिन पदक इ. अनेक बहुमान त्यांना मिळाले. ॲटॉमिक क्वेस्ट (१९५६) हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. कॅलिफोर्नियातील बर्कली येथे ते मृत्यू पावले.
भदे, व. ग.
“