करण वाघेला : (? – १३०४ ?) . वाघेल ह्या राजपूत वंशातील एक राजा. हा रामाचा मुलगा व सारंगदेवाचा पुतण्या. सारंगदेवाच्या मृत्यूनंतर तो अनहिलवाडच्या गादीवर आला. त्याच्या आधिपत्याखाली काठेवाड , कच्छ , अबूपर्यंतचा सर्व भाग होता. त्याने सु. १२९६ ते १२९९ च्या दरम्यान अनहिलवाड येथे राज्य केले. हा कर्ण , करण , कर्णराय , कर्णदेव किंवा करण वाघेला ह्या नावांनी गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. ह्याला घेला म्हणजे वेडाही म्हणत. त्याच्या कारकीर्दीत विशेष अशी काही घटना घडली नाही. त्याचा मुख्य मंत्री माधव ह्याने कर्णाच्या अनाचारास कंटाळून अलाउद्दीन खल्जीस गुजरातवर स्वारी करण्यास प्रवृत्त केले , असे म्हणतात. तेव्हा अलाउद्दीनने १२९९ मध्ये गुजरातवर स्वारी केली. त्यावेळी हा पळून नासिक जिल्ह्यातील बागलाण भागात गेला. तेथे त्याने १३०६ पर्यंत राज्य केले. गुजरातचा सुभेदार अलफखान याने बागलाणावर स्वारी केली. तेव्हा तो देवगिरीस गेला. देवगिरीच्या पतनानंतर तो काकतीय राजा प्रतातरुद्र ह्याच्या आश्रयास गेला. पुढे तो अज्ञातवासातच मरण पावला. त्याची राणी कमलादेवी ( कौलदेवी) व कन्या देवलदेवी ह्यांबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत.

पहा : वाघेल वंश.

देशपांडे , सु. र.