काश्मीरी भाषा : काश्मीरी ही भारतातील सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी इंडो-यूरोपियन भाषा आहे. ती मुख्यतः नद्यांच्या खोऱ्यांत बोलली जाते. तिच्या पूर्वेला तिबेटी व पश्चिम पहाडी, दक्षिणेला पंजाबी, पश्चिमेला लहंदा आणि उत्तरेला शिना व तिबेटी या महत्त्वाच्या भाषा आहेत. काश्मीरी भाषिकांची एकंदर संख्या १९६१ च्या जनगणनेप्रमाणे १९,५६,११५ होती. परंतु पाकिस्तानव्याप्त प्रदेश अाणि भारताबाहेरील भाषिक लक्षात घेता हा आकडा दोन तीन लाखांनी तरी वाढवावा लागेल.
काश्मीरी ही इंडो-इराणीच्या दार्दिक शाखेची भाषा आहे. ‘कश्मीर’ हे नाव संस्कृत असून त्यावरून काश्मीर,काश्मीरिक, काश्मीरिका इ. विशेषणे बनतात. त्यांतील `काश्मीरिका’ या विशेषणावरून `काश्मीरी’ हे भाषेचे नाव आलेले आहे. पंरतु खुद्द काश्मीरात प्रदेशाचे नाव `कशीर’ असे असून त्यापासून `कःशुर ‘(पु.) व `कःशिर ‘ ही `काश्मीरी ‘ या अर्थाची रूपे बनतात. मूळ `कश्मीर’ या नावाची ही परिवर्तने आहेत असे मानले, तरी `श्म ‘ चे `श हे परिवर्तन ही भाषा इराणी किंवा भारतीय शाखेची नाही, हे दाखवायला पुरेसे आहे. दार्दिक किंवा पैशाच (पैशाची) भाषा या संस्कृत व इराणी यांच्यातला दुवा आहेत. त्यामुळे त्यांच्यात या दोन्ही भाषांतील वैशिष्ट्ये आढळतात. याशिवाय या भाषांना स्वतःची म्हणून जी काही वैशिष्ट्ये आढळतात. याशिवाय या भाषांना स्वतःची म्हणून जी काही वैशिष्टये आहेत, ती संस्कृतपेक्षा इराणीला अधिक जवळची आहेत.
हेमचंद्राच्या प्राकृतव्याकरण या ग्रंथात (४⋅२८८ – ३०९) पैशाची – प्राकृतची वैशिष्टये दिलेली आहेत. दार्दिकचे महत्त्वाचे वैशिष्टय हे, की तीत संस्कृत सघोष महाप्राण किंवा अल्पप्राण व्यंजनांच्या जागी अघोष व्यंजने आढळतात पुढे येणाऱ्या स्वराचा किंवा अर्धस्वराचा आधीच्या व्यंजनावर परिणाम होतो. शब्दान्ती येणारी अल्पप्राण अघोष व्यंजने काश्मीरीत महाप्राण झालेली आढळतात, तर काही संस्कृतोद्भव भाषांत महाप्राण अघोष व्यंजन शब्दाच्या शेवटी आल्यास अल्पप्राण बनते. म्हणजेच दार्दिकमध्ये आढळणारी कित्येक महत्त्वाची परिवर्तने संस्कृतोद्भव भाषांना अपरिचित आहेत. संयुक्त व्यंजनांच्या उत्क्रांतीचे नियमही भारतीय आर्यभाषांपेक्षा वेगळे आहेत. अनेक शतके काश्मीर हे संस्कृत विद्वत्तेचे एक महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे तिथल्या भाषेचा वेगळेपणा जाणवला नसावा.
ध्वनिविचार : काश्मीरीची ध्वनिरचना पुढीलप्रमाणे आहे :
स्वर१ : इ, अि२, उ,ए,अ,ओ,आ.
व्यंजने : स्फोटक : क, ख, ग, ट, ठ, ड ,त ,थ, द, प, फ, ब.
अर्धस्फोटक : च, छ, ज च३, छ३.
अनुनासिके : न,म.
घर्षक : स, झ४, श, ह.
पार्श्विक : ल
कंपक : र
अर्धस्वर : य, व.
खुलासा :१ सर्व स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ असू शकतात. अ,ए,ओ हे अनुनासिकही असू शकतात. ऱ्हस्वदीर्घत्व आणि अनुनासिकत्व अर्थनिर्णायक आहे. दीर्घत्व विसर्गचिन्हाने दाखविले आहे. उदा., बार (दार) – बाःर (भार), गोद (भोक) – गोंद (गुच्छ) इत्यादी.
२ अि हा इ च्या मागे उच्चारला जाणारा मध्य स्वर आहे.
३ च व छ मराठीतील दंत्य व्यंजनांप्रमाणे.
४ झ हा स चा सघोष घर्षक आहे.
लिपी :काश्मीरात शारदा व अरबी अशा दोन लिपी वापरल्या जातात. त्यांपैकी शारदा ही ब्राम्हीपासून निघालेली असून तिचा वापर मुख्यतः हिंदू लोक करतात. काश्मीरात बहुसंख्य असलेले मुसलमान लोक अरबी लिपी वापरतात [शारदा लिपि अरबी लिपि].
व्याकरण : काश्मीरी व्याकरणाची वैशिष्टये पुढीलप्रमणे आहे :
रूपविचार : यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद व अव्यय यांचा विचार होतो.
नाम : नाम पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी आणि एकवचनी किंवा अनेकवचनी असते. काही रूपे विभक्तिदर्शक असून इतर ठिकाणी विभक्तीचे कार्य नामाला शब्दयोगी अव्यय जोडून होते. अनेकवचन त्याचप्रमाणे काही पुल्लिंगी रूपांची स्त्रीलिंगी रूपे प्रत्यय लावून होतात.
उदा., ए. व. अ.व.
गर (घडयाळ) गारि
लर (घर) लारि
दःर (दाढी) दाःरि
मःज (आई) माःजि
लट (शेपटी) लाचि
खंड (तुकडा) खांजि इत्यादी.
पु. स्त्री.
दुकाःनदाःर दुकाःनदाःरेन
काःव (कावळा) कःविन इत्यादी.
प्रथमेला विभक्तीप्रत्यय नाही, चतुर्थीला – स व भूतकाळात कर्तृवाचक अन, इ हे प्रत्यय आहेत. उदा., क्रिशन छि चावाःन दोद (कृष्ण दूध पितो आहे) मोहनस दि थाःल (मोहनला थाळी दे) राःमान खव बात (रामाने भात खाल्ला) इत्यादी.
सर्वनाम : सर्वनामांचे नऊ प्रकार काश्मीरीत आढळतात : पुरुषवाचक, दर्शक, प्रश्नवाचक, संबंधवाचक,स्वामित्ववाचक, स्ववाचक, परस्परवाचक, अनिश्चित व व्यक्तिवाचक. पुरुषवाचक सर्वनामे पुढील प्रमाणे आहेतः ए.व अ.व.
प्र.पु. बि. अस
व्दि.पु. चि. तोह
तृ.पु. सु,हु,ति, हुम,तिम
स्त्री.द्ध सो,हो तिमि
तृतीय पुरुषत चेतन नाम दर्शविणारे ति हे रुप असून त्याचे अनेकवचन तिम आहे. ति हे अपरोक्षवाचक असून परोक्षवाचक रुप यि असे आहे. सर्वनामांची प्रथमा, तृतीया,चतुर्थी ,पंचमी आणि षष्ठी या विभक्तींची रुपे होतात.
विशेषण : विशेषणांचे दोन प्रकार आहेत : नामांचे लिंग, वचन व विभक्ती याप्रमाणे बदलणारी, म्हणजे ` विकारी ‘ आणि कोणताही बदल न होणारी, म्हणजे `अविकारी ‘ उदा.,
विकारी :
ए. व. अ.व.
पु. स्त्री. पु. स्त्री.
नूल (निळा) नीज नील नीजि
नुक (बारीक) निच निक निचि
अविकारी : चाःलाःख (हुशार) जाःन (चांगला) सोन्दार (सुंदर) इत्यादी.
क्रियापदः क्रियापदाच्या रुपावरुन काळ, लिंग, वचन, पुरुष व दर्जा ही समजतात. काळ तीन आहेतः वर्तमान, भूत व भविष्य. यात पोटभेद आहेत. `आहे ‘ या अर्थाची रुपे पुढीलप्रमाणे :
ए.व. अ.व.
प्र.पु. बि छुस, छास अस छि, छि
दि.पु. चि चुख, छाख तोह छिवि, छावि
तु.पु. सु छु, सो छि तिम छि, तिमि छा
पहिले रुप पुल्लिंगी व दुसरे स्त्रीलिंगी आहे. चालू वर्तमानकाळ या रुपांनंतर धातुसाधित जोडून होतो. बि छुस खावाःन ( मी खातो आहे ) इत्यादी आणखी काही प्रयोग पुढीलप्रमाणे :
मे खाव बाति (मी भात खाल्ला ) मे खेयेःयोःव (मी खाल्लं होतं ) बि ओःसुस खावाःन (मी खात होतो) बि पाकि (मी चालीन) बि छुस छालाः न (मी धुतो आहे) इत्यादी.
अव्यय : अव्यये दोन प्रकारची आहेत : `स्वतःसिद्ध ‘ व कार्यसिद्ध ‘. स्वतःसिद्ध अव्यये सर्वत्र अव्यये म्हणून वापरतात, तर कार्यसिद्ध अव्यये इतर वर्गाचीही असूशकतात. उदा. येति (इथे) ताति (तिथे) इत्यादी. ही अव्यये स्वतःसिद्ध आहेत, तर सु छु पाकाःन् होःशि साःन (तो काळजीपूर्वक चालतो) यातील होःशि साःन (काळजीपूर्वक) हे कार्यसिद्ध अव्यय आहे. यांशिवाय मराठीप्रमाणे उभयान्वयी अव्यये, शब्दयोगी अव्यये व उद्गारवाचकेही आहेत.
वाक्यविचार : वाक्यरचना बहुतांशी मराठीप्रमाणे आहे पण क्रियापद वाक्याच्या शेवटी न येता कर्त्यानंतर येते. उदा., राःमि छुडाःक्टार (राम डॉक्टर आहे) . याशिवाय वर आलेली इतर संदर्भातील वाक्येही पहावीत.
शब्दसंग्रह : काश्मीरातील बहुसंख्य लोक मुसलमान आहेत. हिंदूंत बहुतांश ब्राह्मण आहेत. इस्लामच्या प्रभावामुळे मुसलमानांची बोली फार्सीप्रचुर आहे, तर हिंदूंच्या बोलीत अशा शब्दांचे प्रमाण फार कमी आहे. सर जॉर्ज ग्रीअर्सन यांच्या काश्मीरी व्याकरणात हे नीट रीतीने दाखवून देण्यात आले आहे.
संदर्भ : 1. Grierson, G.A.A Manual of the Kashmiri Language, Oxford, 1911.
2.Kachru, B.B., A Reference Grammar of Kashmiri, Illinois, 1969.
कालेलकर,ना.गो.
“