कँटर, गेओर्क : (३ मार्च १८४५ — ६ जानेवारी १९१८). जर्मन गणितज्ञ. ⇨संच सिद्धांत हाआधुनिक गणितातील महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांचा जन्म रशियातील सेंट पिट्सबर्ग (लेनिनग्राड) येथे झाला. त्यांचे शिक्षण फ्रँकफुर्ट, झुरिक, बर्लिन व गॉटिंगेन येथे झाले. १८७२ मध्येहॅले (विटेनबर्ग) विद्यापीठात त्यांची साहाय्यक प्राध्यापक पदावर व १८७९ साली प्राध्यापक पदावरनेमणूक झाली. बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा शेवटपर्यंत अपूरीच राहिली.त्यांच्या समकालीन गणितज्ञांनी (विशेषतः क्रोनेकर यांनी) त्यांच्या सिद्धांतांना विरोध केल्यामुळेआयुष्यभरात त्यांना फारशी मान्यता मिळाली नाही.

कँटर यांनी सुरुवातीला  ⇨फूर्ये श्रेढीसंबंधी संशोधन केले आणि त्यावरून अपरिमेय (पूर्णांकाच्याकिंवा दोन अपूर्णांकांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात मांडता येत नाहीत अशा) संख्यांसंबंधीचा एकमहत्त्वाचा सिद्धांत मांडला. पायथॅगोरस यांच्या काळानंतर जवळजवळ २,००० वर्षांपर्यंत अपरिमेयसंख्यांचे स्वरूप पूर्णपणे समजलेले नव्हते. झीनो यांच्या विरोधाभासांचे स्पष्टीकरण कँटर यांच्या संशोधनातून मिळाले [→ अनंत-१]. त्यांनी मांडलेल्या बिंदूंच्या संचांविषयीच्या सिद्धांतामुळे गणिताची एक नवीनच शाखा निर्माण झाली व ती आता आधुनिक गणितीय विश्लेषणाला आधारभूत ठरलेली आहे. त्यांनी संचांक (संचातील घटकांची संख्या) व सांतातील संख्या [→ अनंत-१] यांच्या संकल्पना मांडल्या. त्यांतूनच सहतती विषयक [→ संच सिद्धांत] प्रश्न उद्‍भवला व तो सोडविणे १९६३ पर्यंत शक्य झाले नाही. अनंत संख्यांविषयक त्यांनी केलेले संशोधन Beitrage zur Begrundung der transfiniten Megenlehr (१८९५-९७) (इं. भा. काँट्रिब्यूशन्स टू द फाऊंडिंग ऑफ द थिअरी ऑफ ट्रान्सफाइनाइट नंबर्स, पी. इ. बी. जोडेन, १९१५) या ग्रंथाद्वारे त्यांनी प्रसिद्ध केले. हा ग्रंथ अतिशय मौलिक आहे.तथापि त्यातील काही पद्धतींविषयी अद्यापही तज्ञांत मतभेद आहेत.

मान्यवर तज्ञ मूलभूत कल्पनांच्या विकासास वाव देत नाहीत असा अनुभव आल्यामुळे त्यांनी  १८९० मध्ये Deutsch Mathematiker – Vereinigung नावाची जर्मन गणितज्ञांची संस्था स्थापन केली  व ते तिचे पहिले अध्यक्ष झाले. गणितज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्याची कल्पनाही त्यांनी  मांडली व त्यांच्या प्रयत्नामुळे झुरिक येथे १८९७ मध्ये तशी परिषद भरलीही होती. आयुष्याच्या  शेवटच्या काही वर्षांत त्यांचे मनस्वास्थ्य बिघडले होते. ते हॅले येथील मनोरुग्णालयात मृत्यू पावले. 

भदे, व. ग.