कबजा : संपत्तीची नियंत्रणाधिकारपूर्वक वहिवाट. वस्तुनिष्ठ संपूर्ण स्वाधीनता व स्वतःच्या कामासाठी त्या स्वाधीनतेचा उपयोग करण्याची मानसिक धारणा या दोन गोष्टी कबजाकरिता कायद्याने आवश्यक आहेत. कबजाचा उपयोग आपल्यातर्फे करण्याचा अधिकार आपण आपला भाडेकरू, गहाणदार, गुमास्ता, कूळ, अधिकर्ता यांस देतो, तेव्हा आपलाच परंतु प्रलक्षित कबजा असतो.

विधीमध्ये कबजाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘शस्त्र अधिनियम’ किंवा ‘दारुबंदी अधिनियम’ इत्यादींखाली निषिद्ध वस्तू आरोपीच्या जाणीवपूर्वक कबजात असल्यास अपराधसिद्धी होते. त्याचप्रमाणे स्वामित्वसिद्ध करण्याकरिताही कबजाचा उपयोग होतो.

‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’ या न्यायाने ज्याचा कबजा तो मालक, असे गृहीतक आहे. मालक सोडून इतरांविरुद्ध कबजा हा चांगला बचाव असतो. जेव्हा आपल्या कबजात असलेली स्थावर मिळकत आपल्या मालकीची असते, तेव्हा आपला कबजा मालकी हक्काने असतो. परंतु आपल्या कबजातील मिळकत जेव्हा दुसऱ्या कोणाच्या मालकीची असते व आपण तिचा कबजा बळकावून बसलेले असतो, तेव्हा आपला कबजा खऱ्या मालकाच्या दृष्टीने प्रतिकूल कबजा असतो. असा प्रतिकूल कबजा बारा वर्षे राहिल्यास कबजाधारकास त्या मिळकतीचे स्वामित्व प्राप्त होते.

गमावलेला कबजा परत मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. फौजदारी व्यवहार संहितेच्या १४५ व्या कलमाप्रमाणे अर्ज केल्यास, प्रारंभिक आदेशाच्या दिवशी कोणत्या पक्षाचा कबजा होता, इतकाच विचार करून दंडाधिकारी शांतताभंग टाळण्यासाठी कबजा सोडून देण्याबद्दल किंवा ठेवण्याबद्दल आदेश देतात. त्याचप्रमाणे १९६३ च्या विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियमाच्या सहाव्या कलमाखाली, कबजा गेल्यापासून सहा महिन्यांत संक्षिप्त वाद लावल्यास हक्क वा मालकी यांचा विचार न करता केवळ वादपूर्व कबजाबद्दलच्या निष्कर्षावरच दिवाणी न्यायालये निर्णय देतात. त्यामुळे कबजा किंवा हक्क यांच्यावरून वाद लावण्याच्या अधिकाराला बाध येत नाही. रोमन विधिज्ञांनी कबजा या कल्पनेचे केलेले विश्लेषण आजही आधारभूत मानण्यात येते.

श्रीखंडे, ना. स. खोडवे, अच्युत