कस्तुरी मृग : स्तनिवर्गाच्या समखुरीय (ज्यांच्या पायांवरील बोटांची किंवा खुरांची संख्या सम असते) गणातील मृगकुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव मॉस्कस मॉस्किफेरस असे आहे. हा मध्य व ईशान्य आशिया, काश्मीर, नेपाळ व सिक्कीम येथे आढळतो. याची वस्ती २,६००—३,६०० मी. उंचीवरील भूर्ज वृक्षांच्या दाट जंगलात असते. कधीकधी हे खाली उतरतात पण नेहमी दाट झाडीत लपून बसतात.
डोक्यासकट शरीराची लांबी सु. एक मी. शेपटी ४–५ सेंमी. खांद्यापाशी उंची सु. ५० सेंमी. पण ढुंगणापाशी ती थोडी जास्त असते प्रौढ प्राण्याचे वजन जवळजवळ १० किग्रॅ. शरीरावर दाट, राठ व लांब केस असल्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून त्याचे रक्षण होते. रंग गडद तपकिरी असून त्यावर करड्या रंगाचे ठिपके असतात. मान, डोके आणि पोटाकडे रंग पांढुरका होत जातो. हनुवटीच्या व कानाच्या आतल्या कडा पांढऱ्या असतात. गळ्याच्या दोन्ही बाजूंवर कधीकधी एक एक पांढरा ठिपका असतो. शिंगे नसतात. नराचे वरचे सुळेदात ८ सेंमी. पर्यंत लांब पण मादीचे थोडे आखूड असतात. मुख-ग्रंथी नसतात. पित्ताशय असतो. पुच्छ-ग्रंथी आणि कस्तुरी-ग्रंथी असतात.
हे एक एकटे किंवा जोडीने असतात. गवत, शेवाळ आणि कोवळे कोंब हे यांचे भक्ष्य होय आणि ते मिळविण्यासाठी सकाळी व संध्याकाळी हे बाहेर पडतात. एरव्ही ते गवतात किंवा झुडपात पडून राहतात.
यांचा समागम जानेवारीत होतो आणि १६० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला एकच (क्वचित दोन) पिल्लू होते. त्याच्या अंगावर ठिपके असतात. पिल्लू वाढून एक वर्षानंतर जननक्षम होते. मादीला दोन सड असतात.
कस्तुरी मृगाचे महत्त्व त्याच्यापासून मिळणाऱ्या कस्तुरीमुळेचकस्तुरी मृगकस्तुरी मृग आहे. तीन वर्षांच्या वा त्यापेक्षा जास्त वयाच्या नराच्या बेंबीजवळ उदराच्या त्वचेखाली कस्तुरी-ग्रंथी असते. या ग्रंथीतून तपकिरी रंगाचा मेणासारखा स्राव एका पिशवीत जमा होतो. ताजेपणी त्याला मूत्राप्रमाणे उग्र दुर्गंधी असते पण तो वाळल्यावर त्याला सुगंध येतो. हीच कस्तुरी होय. एका नरापासून सु. २८ ग्रॅम कस्तुरी मिळते. सुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता कस्तुरीचा उपयोग करतात. कस्तुरी मिळविण्याकरिता या प्राण्यांची फार हत्त्या केली जाते.
कानिटकर, बा. मो.
“