कामा, श्रीमती भिकाजी रुस्तुम : (१८६१ – १९ ऑगस्ट १९३६). भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ. शिक्षण मुंबईस झाले. त्यांचे पती मुंबईतील एक नामवंत सॉलिसिटर होते. प्रकृतिस्वास्थासाठी कामाबाई १९०२ मध्ये इंग्लंडला गेल्या व तेथूनच त्यांच्या राजकीय जीवनास सुरुवात झाली.

श्री. दादाभाई नौरोजी ब्रिटिश संसदेमध्ये निवडून आले, त्यावेळी कामाबाईंनी त्यांना फार साहाय्य केले. परंतु क्रांतिकारकाचा पिंड असल्यामुळे त्या क्रांतिकारी चळवळीकडे आकर्षित झाल्या. स्वातंत्र्यवीर ⇨ सावरकर इंग्लंडमध्ये आल्यानंतर, त्यांच्या अलौकिक वक्तृत्वाने व व्यक्तिमत्त्वाने त्या प्रभावित झाल्या आणि तात्काळ ⇨ अभिनव भारत संस्थेच्या त्या सभासद झाल्या. त्यानंतर त्यांनी यूरोपात राहूनच तनमनधनाने स्वातंत्र्याच्या चळवळीस वाहून घेतले. क्रांतिकारक वाङ्मय प्रसिद्ध करणे, भारतविषयक व्याख्याने देणे व भारतीय क्रांतिकारकांना सर्व प्रकारचे सहाय्य देणे, हे त्यांचे दैनंदिन कार्य होते. १९०७ च्या ऑगस्टमध्ये जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत सरदारसिंग राणांच्याबरोबर कामाबाईंनी भाग घेतला आणि ब्रिटिश प्रतिनिधींच्या विरोधास न जुमानता, भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याचवेळी भारतीय स्वातंत्र्याचा प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम्‌’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकाविला. १९३५ मध्ये त्या भारतात परत आल्या. मुंबईत त्यांचे देहावसान झाले. भारतीय स्वातंत्र्यासाठी  सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या मालिकेत श्रीमती कामा ह्यांना मानाचे स्थान आहे, ह्यात शंका नाही.

नरवणे, द.ना.