कापडिया, कन्हैयालालमोतीलाल : (१७ ऑक्टो. १९०८-३० ऑक्टो. १९६७). प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ. जन्म सुरत जिल्ह्यातील नवसारी येथे. मुंबई विद्यापीठातून संस्कृत घेऊन ते बी. ए. झाले (१९३०). याच विद्यापीठाची ‘हिंदुनातेपद्धती ’ या विषयावरील प्रबंधाला पी एच्‌. डी. (१९३८). नवसारी व मुंबई येथे काही दिवस संस्कृतचे शिक्षक. १९४३ पासून मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात अधिव्याख्याते. १९५९ मध्ये प्राध्यापक म्हणून स्वेच्छानिवृत्ती.

कापडियांचे हिंदु किन्‌शिप (१९४७) व मॅरेज अँड फॅमिली इन इंडिया (१९५५). हे गंथ महत्वाचे मानले जातात. भारतीय कुटुंबसंस्थेचे साधार व सूक्ष्म विश्लेषण त्यांत आढळते. नागरीकरणाच्या प्रक्रियेमुळे एकत्र कुटुंबाचा ऱ्हास होईलच असे नाही, असा त्यांचा अभिप्राय आहे. संस्कृत व्याकरणावर गुजराती भाषेत त्यांनी पाठ्यपुस्तक लिहिलेले आहे. ‘इंडियन सोशिऑलॉजिकल सोसायटी ’ या संस्थेचे तिच्या स्थापनेपासून (१९५२) ते कार्यवाह होते.  

कुलकर्णी, मा. गु.