कांट, मिन्ना : (१९ मार्च १८४४—१२ मे १८९७). फिनिश लेखिका. संपूर्ण नाव उल्ऱीका व्हिल्हेल्मीना कांट. जन्म फिनलंडमधील टांपेरे शहरी. शिक्षण क्वॉप्यॉ आणि यूव्हॅस्क्यूलॅ शहरी. १८६५ मध्ये जे. एफ्. कांट ह्या शिक्षकाशी विवाह. १८७९ मध्ये पती निवर्तल्यावर क्वॉप्यॉ येथे ती आपल्या मुलांसह आली आणि चरितार्थासाठी तिने व्यापारक्षेत्रात प्रवेश केला. ह्या काळात तिचे लेखनही चालू होते. तिने कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. तिचे आरंभीचे लेखन आदर्शवादी असून त्यात ग्रामीण चित्रणावर विशेष भर होता. ह्या काळात तिच्यावर ब्यर्न्सॉन ह्या नॉर्वेजियन साहित्यिकाचा प्रभाव होता. पुढे ती वास्तववादाकडे वळली तसेच शहरी जीवनाच्या समस्यांवर तिने आपले लक्ष केंद्रित केले. तिच्या Sylvi (१८९३) ह्या नाटकावर इब्सेनची आणि Anna-Liisa (१८९५) ह्या नाटकावर टॉलस्टॉयची छाप आढळते. ‘Kauppa-Lopo’ (१८८९) ही कथा आणि Tyomiehen Vaimo हे नाटक ह्या तिच्या विशेष उल्लेखनीय साहित्यकृती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फिनलंडमध्ये फिनिश भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी व वाङ्मयातील वास्तववादासाठी जी चळवळ झाली, तिचे कांटने नेतृत्व केले. फिनिश नाटककारांमध्ये ⇨ अलेक्सिस किव्हीनंतर तिचेच नाव घेण्यात येते. ती केवळ साहित्यिक नव्हती, तर एक स्त्रीस्वातंत्र्यवादी समाजसुधारकही होती. स्त्रियांच्या हक्कांसंबंधीची तीव्र जाणीव तिने नेहमीच व्यक्त केली. क्वॉप्यॉ येथे मती मरण पावली.
जगताप, दिलीप