अर्वाचीन मराठी साहित्य : काव्य: अर्वाचीन मराठी काव्याचा अभ्यास करताना साधारणतः पुढीलप्रमाणे कालखंड कल्पिता येतात:१८१८-८५, १८८५-१९२०, १९२०-४५, १९४५-६५ १९६५ नंतर.
पहिला कालखंड (१८१८-१८८५) : कवी ⇨केशवसुतांच्या (१८६६-१९०५) उदयाबाहेर मराठीतील अर्वाचीन कवितेचा कालखंड सुरू झाला, असे मानले जात असले, तरी ह्या कवितेची पूर्वतयारी १८१८ ते १८८५ पर्यंत होत होती. पूर्वतयारीच्या ह्या काळात संतकाव्य, शाहिरी काव्य आणि पंडिती काव्य अशा प्राचीन मराठी कवितेतील तिन्ही परंपरांशी नाते राखून असलेली काव्यरचना चालू होती, संतकाव्याची आणि शाहिरी काव्याची परंपरा क्षीण बनली होती. पंडिती वळणाची कविता विपुल निर्माण झाली. तथापि त्या परंपरेतही कोणी थोर कवी दिसत नव्हता.
भक्तिरसावर भर देणाऱ्याम संतकाव्यपरंपरेचा आदर्श विठोबा अण्णा दप्तरदार (१८१३-७३), भास्कर दामोदर पाळंदे (१८३२-७४), खंडो कृष्ण ऊर्फ बाबा गर्दे ह्यांच्यासारख्या कवींपुढे होता. दप्तरदारांच्या पदसंग्रहातील (आवृ. ४थी, १९०५) गीते भावमधुर आहेत. पाळंदे ह्यांनी श्रद्धापूर्ण स्तोत्रे लिहिली, तर बाबा गर्दे ह्यांनी श्रीगीतामृत-शतपदी (१८९०) आणि गीतापंचदशी ह्या पदसंग्रहांतून गीतेच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला. नारायण धोंडदेव खांडेकर ह्यांची स्तोत्रे पदलालित्यपूर्ण आणि उदात्त विचारांनी भारलेली आहेत.शाहीर प्रभाकर (मृ. १८४३) आणि शाहीर परशराम (मृ. १८४४) हे पेशवाईत बहरलेल्या शाहिरी कवितेचे प्रतिनिधी इंग्रजी सत्तेच्या काळातही काही वर्षे हयात होते. तथापि ह्या कवितेची परंपरा जोमाने पुढे सरकू शकली नाही. ह्या कवितेला पेशव्यांकडून, तसेच मराठी सरदार-दरकदारांकडून मिळणारा आश्रय नव्या राजवटीत नष्ट झाला. त्या कवितेला शिष्टमान्यताही राहिली नाही.
पंडिती परंपरा जपणाऱ्यारत ⇨ परशुरामपंततात्या गोडबोले (१७९९-१८७४) ⇨ कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-७८), ⇨ कृष्णशास्त्री राजवाडे (१८२०-१९०१), गणेशशास्त्री लेले (१८२५-९८), पांडुरंग गोविंद पारखी (१८४४-१९११) ह्यांसारख्या कवींचा समावेश होतो. त्यांनी मेघदूत (कृष्णशास्त्री चिपळूणकर), रघुवंश (गणेशशास्त्री लेले) ह्यांसारख्या अभिजात संस्कृत काव्यांचे मराठी पद्यानुवाद केले, किंवा ऋतुसंहारासारख्या संस्कृत काव्यांच्या मराठी पद्यानुवाद केले, किंवा ऋतुसंहारासारख्या संस्कृत काव्यांच्या धर्तीवर मराठी काव्ये रचिली (पारखी–षड्ऋतुवर्णन). मोरोपंती वळणाने कविता लिहिणे, हाही पंडिती काव्यपरंपरेचाच एक भाग. नामार्थदीपिका, कादंबरीसार, बालबोधामृत ही काव्ये लिहिताना मोरोपंती आर्येचाच आदर्श परशुराम पंततात्यांसमोर होता. राजा सर टी. माधवराव आणि कुरुंदवाडच्या छोट्या पातीचे अधिपती बापूसाहेब कुरुंदवाडकर ह्यांच्यावरही मोरोपंती काव्याचा प्रभाव होता.
ह्याच काळात इंग्रजी विद्येचे संस्कार झालेल्या नवशिक्षितांनी इंग्रजी कवितेच्या अनुकरणाने मराठी कविता लिहिण्यास प्रारंभ केला होता. इंग्रजीतील विविध काव्यप्रकार ते मराठीत आणू पाहत होते. इंग्रजी कवितांचे अनुवादही झाले. ⇨हरि केशवजी (१८०४-५८), ⇨महादेवशास्त्री कोल्हटकर (१८२२-६५), ⇨कान्होबा रणछोडदास कीर्तिकर (१८४९-१९१९), ⇨बजाबा रामचंद्र प्रधान (१८३८-८६), ⇨महादेव मोरेश्वर कुंटे (१८३५-८८), पांडुरंग व्यंकटेश चिंतामणी पेठकर ही त्या संदर्भांतील काही विशेष उल्लेखनीय नावे होत. हरि केशवजींनी आंग्ल कवी मिल्टन ह्याच्या पॅरडाइस लॉस्ट ह्या महाकाव्यातील काही भागाचे सुंदर भाषांतर केले आहे. महादेवशास्त्री कोल्हटकरांनी स्कॉट, लाँगफेलो, वर्डस्वर्थ ह्यांसारख्या इंग्रज-अमेरिकन कवींच्या कवितांना मराठी रूप दिले. बजाबा रामचंद्र प्रधान ह्यांनी इंग्रज कवी सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या लेडी ऑफ द लेक ह्या काव्याच्या आधारे दैवसेनी हे खंडकाव्य लिहिले. स्कॉटच्या काव्याचा अनुवाद आणि त्याचे अनुकरण, असे दोन्ही प्रकार दैवसेनीत आढळतात. नवीन मराठी कवितेची वैचारिक भूमिका तयार करण्याचे श्रेय मात्र महादेव मोरेश्वर कुंटे ह्यांना द्यावे लागेल. राजा शिवाजी (१८६९) ह्या त्यांच्या काव्याला त्यांनी जी इंग्रजी प्रस्तावना जोडली होती, ती ह्या दृष्टीने उल्लेखमीय आहे. कवितेत संस्कृत शब्दांच्या ऐवजी नित्याच्या व्यवहारातील सहज, साधी भाषा वापरावी, असा कुंटे ह्यांचा दृष्टिकोण होता व तो पुढील कवींच्या उपयोगी पडला. वामन आणि मोरोपंत हे र्हाटसाचे द्योतक (डिजनरेट) असे संस्कृत-मराठी कवी आहेत, असे कुंट्यांचे मत होते. आपल्या प्रस्तावनेत कुंटे ह्यांनी विविध पश्चिमी काव्यप्रकारांचा परिचयही करून दिलेला होता. स्वतःच्या काव्यशैलीचे वर्णन त्यांनी ‘रोमँटीक स्टाइल’ असे केलेले आहे. कुंट्यांचे कार्य महत्वाचे असले, तरी आत्मपर भावकविता मराठीत आणण्याचे श्रेय ⇨विष्णु मोरेश्वर महाजनी (१८५१-१९२३) ह्यांच्या कुसुमांजलीला द्यावे लागेल. विल्यम ब्लेक, वर्डस्वर्थ, कोलरिज, बायरन, शेली, कीटस, टेनिसन, ब्राउनिंग ह्यांसारख्या आंग्ल कवींच्या कवितांना मराठी रूप देण्याच्या प्रयत्न महाजनींनी ह्या काव्यसंग्रहात केलेला आहे. इंग्रजीतील ‘लिरिक’ किंवा भावकविता त्यांनी कुसुमांजलीच्या द्वारे मराठीत आणली. मराठी भावकवितेतील आत्मपरतेचा अग्रदूत म्हणून कुसुमांजली ह्या काव्यसंग्रहाकडे पाहात येईल. ह्या संदर्भात गोविंद वासुदेव कानिटकर ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. त्यांनीही इंग्रज कवींच्या कविता मराठीत आणल्या.महाजनींची भाषांतरे वृत्तबद्ध होती, तर कानिटकरांनी समकालीन लोकप्रिय मात्रारचना स्वीकारल्या होत्या. केशवसुतांच्या काव्यरचनेत हे दोन्ही प्रकार आपणास दिसतात. गंगावर्णना हे पांडुरंग व्यंकटेश चिंतामणी पेठकरांचे काव्य इंग्रजी वळण समोर ठेवून लिहिलेले आहे. उदात्त , वक्तृत्वपूर्ण शैली, विविध वृत्तांची योजना, मनोरम वर्णने ही ह्या काव्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. गंगेपासून मिळणाऱ्या ऐहिक सुखांचा विचार ह्यात विस्तृतपणे केलेला आहे.
दुसरा कालखंड (१८८५-१९२०) : केशवसुतांची अर्वाचीन, आत्मपर, अशी कविता ह्या कालखंडात प्रभावीपणे रसिकांपुढे आली मराठी कवितेला आत्मपरता सर्वस्वी नवी होती, असे नव्हे. नामदेव तुकारामांसारख्या संतकवीच्या कवितेत ती होतीच परंतु भक्ती हे त्या कवितेचे अधिष्ठान होते. लौकिक विषयासंबंधीच्या कवीच्या भावना कवितेत निबद्ध करण्याची प्रवृत्ती हे अर्वाचीन कवितेच निराळेपण होते तिची पूर्वचिन्हे महाजनी, कानिटकर ह्यांसारख्या कवींच्या कवितेतून दिसू लागली आणि पुढे केशवसुतांच्या कवितेत ती तीव्रतेने व्यक्त होऊ लागली. कवीचे वैयक्तिक जीवन, त्याची स्वतःची सुखदुःखे, समकालीन सामाजिक प्रश्नांबाबतची त्याची प्रतिक्रिया, त्याचे एकंदर जीवनविषयक तत्वज्ञान ह्यांना काव्यात स्थान मिळू लागले. काव्य हे आत्माविष्कारासाठी आहे, ही कल्पना मान्य होऊन काव्याचे प्रयोजन, विषय, दृष्टिकोण आणि बाह्य स्वरूप ह्यांत परिवर्तन घडून आले. व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्री-पुरुषांमधील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी, गूढानुभूती अशा विविध विषयांवरील भावाविष्कार केशवसुतांच्या कवितेत आढळतो. चिंतनशील आविष्कारास अनुकूल असा सुनीत (सॉनेट) हा पश्चिमी काव्यप्रकारही त्यांनीच मराठीत रूढ केला. कवितेला आपण नवा दृष्टिकोण देत आहोत आणि नवी काव्याभिरुची निर्माण करीत आहोत, ह्याची जाणीव केशवसुतांच्या ठायी होती. कवीची थोरवी, त्याच्या स्फूर्तीचे स्वरूप, कवितेचे प्रयोजन ह्यांसारख्या विषयावर त्यांनी केलेली काव्यरचना हे स्पष्टपणे दर्शविते.
केशवसुतांचा प्रभाव ज्यांच्यावर पडला, अशा कवींत ⇨ ना.वा. टिळक (१८६१-१९१९), ⇨राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज (१८८५-१९१९), ⇨ बालकवी (१८९०-१९१८), ⇨ बी (१८७२-१९४७), माधवानुज (१८७२-१९१६), ⇨एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (१८८७-१९२०), नरहर शंकर रहाळकर (१८८२-१९५७), नागेश गणेश नवरे, ह्यांचा समावेश होतो.
ना. वा. टिळक ह्यांनी केशवसुतांच्या आधी काव्यरचनेस प्रारंभ केला होता. त्या वेळी त्यांची काव्यरचना जुन्या पद्धतीची आणि दीर्घ कथनपर अशी होती. तथापि केशवसुतांची कविता अवतरल्यानंतर ते नव्या वळणाची कविता लिहू लागले. गोविंदाग्रज स्वतःला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवीत. केशवसुतांच्या ‘तुतारी’ च्या प्रभावातून त्यांची ‘दसरा’ ही कविता त्यांनी लिहिली. तथापि गोविंदाग्रजांचा पिंड केशवसुतांपेक्षा भिन्न होता. विलक्षण कल्पनाशक्ती, अत्युत्कट भावना आणि त्यांना पेलणारी समर्थ शब्दकळा ह्यांनी गोविंदाग्रजांच्या कवितेला तिचे एक खास रूप दिले आहे. गोविंदाग्रजांनी तात्विक गूढगुंजनात्मक, आध्यात्मिक, सामाजिक, अशा विविध विषयांवर कविता लिहिली असली, तरी प्रीतीचा–विशेषत: विफल प्रीतीचा–प्रभावी आविष्कार त्यांच्या अनेक कवितांतून त्यांनी घडविला आहे. बालकवींनी केशवसुतांच्या संस्कारांतून ‘धर्मवीर’ ही कविता लिहिली. तथापि त्यांची मूळ वृत्ती निसर्गकवीची असल्यामुळे ‘धर्मवीर ’ सारख्या त्यांच्या कविता यशस्वी झाल्या नाहीत. त्यांच्या निसर्गकवितेने मात्र एक वेगळी संवेदनशीलता आधुनिक मराठी कवितेत आणली. केशवसुतांच्या कवितेने गोविंदाग्रज आणि बालकवी हे दोघेही प्रभावित झालेले असले आणि केशवसुतांचे अनुकरण करण्याचा काही प्रयत्नही त्यांनी केला असला, तरी ते स्वतंत्रपणे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी होते. गोविंदाग्रजांची प्रेमकविता आणि बालकवींची निसर्गकविता मराठी कवितेला नवीन वळण लावणारी होती. कवी ‘बी’ ह्यांची कविता विचारपरिप्लुत असून तिला अध्यात्माचेही अंग आहे. डंका’ सारख्या त्यांच्या कवितांतून येणाऱ्या बंडखोर विचारांमुळे ते केशवसुतांच्या जवळ जातात. माधवानुजांनी केशवसुतांच्या अनुकरणाने सुनीतरचनेचा प्रयत्न केला. केशवसुतांचे स्मरण होईल, अशा ओळी काही वेळा ते लिहून जातात. तथापि त्यांच्या कवितेचे विषय मऱ्यादित आहे आणि त्यांच्या हाताळणीत फारशी सखोलता नाही. रेंदाळकरांनीही आपल्या परीने केशवसुतांची साथ केली तथापि त्यांचीही अनुभवकक्षा लहान होती आणि केशवसुती कवितेचा जोम त्यांच्या कवितेत नव्हता. संस्कृतप्रमाणेच मराठी कविताही निर्यमक लिहिण्याचा त्यांनी केलेला जोरदार पुरस्कार मात्र उल्लेखनीय होय. रहाळकरांनी केशवसुती कवितेचे विषय घेतले जातिवृत्ते स्वीकारली. तथापि अनुकरणाच्या पलीकडे ते जाऊ शकले नाहीत, असे त्यांची पुष्पांजली (१९२३) पाहिल्यावर दिसते. काव्यलेखनाच्या मूळच्या जुन्या वळणापलीकडे जाऊन नवे आत्मसात करण्याची धडपड नागेश गणेश नवरे ह्यांच्या कवितेत जाणवते. कवितेचे नवे वळण स्वीकारण्याची प्रवृत्ती ⇨दत्तांच्या (१८७५-९९) ठायी होती परंतु त्यांच्या कवितेने पूर्ण आकार घेण्याच्या आतच त्यांचे अकाली निधन झाले.
कवी सुमंत (१८८१-१९३९) ह्यांच्या कवितेत नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारांच्या कवितांची वळणे दिसून येतात. बळवंत जनार्दन करंदीकर ह्यांची कविता भावगीताकडे झुकलेली आहे.
केशवसुती कवितेने निर्माण केलेल्या वातावरणात राहूनही काही कवी जुन्या, पारंपारिक काव्यरचनेतच रमले होते.अशा कवींत ⇨विठ्ठल भगवंत लेंभे (१८५०-१९२०), गणेश जनार्दन आगाशे (१८५२-१९१९), ⇨कृ. ना. आठल्ये (१८५२-१९२३), मोरो गणेश लोंढे (१८५४-१९२०), पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी, (१८५६-१९३०), ⇨गंगाधर रामचंद्र मोगरे (१८५७-१९१५), वासुदेवशास्त्री खरे (१८५८-१९२४), विद्याधर वामन भिडे (१८६१-१९३६), एकनाथ गणेश भांडारे (१८६३-१९११), लक्ष्मण गणेश लेले (१८७०-१९३२,), ⇨बाळकृष्ण अनंत भिडे (१८७४-१९२९), अनंततनय (१८७९-१९२९), राधारमण (१८७७-१९२७), ⇨साधुदास (१८८४-१९४८) ह्यांचा समावेश होतो. बोधवादी प्रव-त्ती, भक्तीकडे आणि अध्यात्माकडे ओढ, ऐतिहासिक विभूतींचा गौरव, प्रासंगिक-तात्कालिक विषयांची हाताळणी ही ह्या कवींच्या काव्यरचनेची काही सर्वसाधारण वैशिष्ट्ये होत. ह्या कवींपैकी गंगाधर रामचंद्र मोगरे ह्यांनी मराठी कवितेत उपरोधप्रचुर कवितेचा प्रकार आणला, हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य होय. केशवसुतांनी मराठी कवितेत क्रांती केलेली नसून त्यांची कविता म्हणजे मराठी कवितेच्या उत्क्रांतीचा एक टप्पा होय, अशा आशयाचे विचार बाळकृष्ण अनंत भिडे यांनी व्यक्त केले होते.
कवी ⇨चंद्रशेखर (१८७१-१९३७) पंडिती कवितेचे अर्वाचीन काळातील एक श्रेष्ठ प्रतिनिधी होत. कवितेने ज्ञान आणि रस ह्यांचा एकात्म अनुभव द्यावा, ही त्यांची काव्यविषयक भूमिका होती. तसेच कवितेतील आत्मपरताही त्यांना मान्य नव्हती. ⇨ लक्ष्मीबाई टिळक (१८६८ ? – १९३६) ह्या या कालखंडातील एक उल्लेखनीय कवयित्री होत. संसारातील सुखदु:खांचा आविष्कार साध्यासुध्या पण प्रत्ययकारी भाषेत त्यांनी केला. त्यांचे पती नारायण वामन टिळक ह्यांच्या, ख्रिस्तायन ह्या अपुऱ्यान राहिलेल्या प्रदीर्घ काव्याचा बहुतांश भाग लक्ष्मीबाईंनी पूर्ण केला. दीर्घ आख्यानक कविता रचणाऱ्या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत. ⇨बहिणाबाई चौधरी (१८८०-१९५१) ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. माहेर, संसार, कृषिजीवनातील विविध प्रसंग असे विषय बहिणाबाईंच्या कवितेचे आहेत. सहजोद्गारांसारख्या साध्यासुध्या भाषेत रचिलेल्या ह्या कवितेतील अनेक ओळींना सुभाषितांची योग्यता प्राप्त झाली आहे.
जोग. रा.श्री. भोसले, एस्.एस्.
अर्वाचीन मराठीतील राष्ट्रीय कवितेचा ठळक प्रवाह कवी ⇨ विनायक (१८७३-१९०९) ह्यांच्यापासून सुरू झाला, अहल्या, संयोगिता, पद्मिनी इ. ऐतिहासिक स्त्रियांच्या जीवनांतील प्रसंगांवर सुंदर काव्ये त्यांनी लिहिली. हतभागिनी’, ‘मातृभक्तीचे लेणे’, ‘जन्मसार्थक्य’ ह्यांसारख्या त्यांच्या कविताही ह्या संदर्भात लक्षणीय ठरतात. ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल’ ह्यांसारख्या त्यांच्या ओळी सुभाषितत्व पावल्या आहेत. ⇨विनायक दामोदर सावरकर (१८८३-१९६६) ह्यांनी लिहिलेली राष्ट्रप्रेमाची कविता ज्वलन्त आणि क्रांतिकारक आहे. ‘स्वतंत्रता भगवती’ अशीच ही कविता आहे. उत्कट देशभक्ती, दुर्दम्य स्वातंत्र्याऱ्याऱ्याऱ्याकांक्षा आणि उत्तुंग कल्पकता ह्यांच्या संयोगातून फुलून आलेले सावरकरांचे कवित्व अनन्यसाधारण असे आहे. ⇨कवी गोविंद (१८७४-१९२६) ह्यांनी ऐतिहासिक पराक्रमी पुरुषांवर आणि संतांवर कविता लिहिल्या. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे त्यांचे स्फूर्तिदायक गीत सर्वपरिचित आहे. मृत्युचे स्वागत करणाऱ्या एका उदात्त मनाचा आविष्कार त्यांच्या ‘सुंदर मी होणार ’ ह्या कवितेत आढळतो. दु.आ. तिवारी ह्यांची मराठ्यांचा इतिहास गाणारी ओजस्वी संग्रामगीते, ‘कुंजविहारी’ (हरिहर गुरुनाथ सलगरकर) ह्यांची ओजोत्कट राष्ट्रगीते, ऐतिहासिक चित्रपटसंग्रहच वाटावा अशी कवी ‘अज्ञातवासी’ (दिनकर गंगाधर केळकर) ह्यांची कविता हे सर्व अर्वाचीन मराठीतील राष्ट्रीय कवितेचे महत्वाचे संचित होय. स्थूलमानाने पाहता पूर्वजांचे यशोगान राष्ट्रीय स्वातंत्र्याऱ्याऱ्याऱ्याचा उदघोष आणि राष्ट्रोन्नतीस पोषक अशा विधायक मूल्यांचा पुरस्कार ह्या त्रिसूत्रीवर ही कविता उभी असलेली दिसते.
ह्या कालखंडातील काही कवींच्या विलापिकांतून वैयक्तिक दु:खांचा आविष्कार झालेला आहे. विठ्ठल भगवंत लेंभे (‘शोकावर्त’) गणेश जनार्दन आगाशे (‘बाष्पांजली’), सुमंत (‘शोकतरंगिणी’), ना.के. बेहरे (‘स्मरणी’) हे ह्या विलापिकांचे कवी होत. निरनिराळ्या क्षेत्रांतील थोर व्यक्तींवरही विलापिका लिहिल्या गेल्या.
महाराष्ट्राबाहेर राहून मराठी कविता लिहिणारे ⇨भास्कर रामचंद्र तांबे (१८७३-१९४१) ह्यांची निखळ कलामूल्यांचा पाठपुरावा करणारी कविता ह्याच कालखंडातली. तांबे ह्यांच्या कवितेवरील संस्कार वैविध्यपूर्ण आहेत. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवी, टेनिसन-ब्राऊनिंग हे नंतरचे कवी, रवींद्रनाथ टागोर आणि संस्कृत कवी जयदेव अशा विविध कवींचा प्रभाव त्यांच्या कवितेवर जाणवतो. केशवसुतांच्या प्रभावापासून अलिप्त राहिलेले कवी म्हणूनही ते उल्लेखनीय ठरतात.
तिसरा कालखंड : (१९२०-१९४५): १९२० च्या आसपास गोविंदाग्रज, नारायण वामन टिळक, बालकवी ह्यांसारखे कवी निधन पावले होते. त्यामुळे मराठी कवितेचा बहर ओसरल्यासारखा वाटत असतानाच पुणे येथे ⇨रविकिरण मंडळाची स्थापना झाली.⇨ माधव जूलियन् (१८९४-१९३९), गिरीश (१८९३-१९७३), ⇨यशवंत (१८९९- ), ⇨श्रीधर बाळकृष्ण रानडे (१८९२-१९८४), मनोरमाबाई रानडे (१८९६-१९२६), ⇨ग.त्र्यं. माडखोलकर (१८९९-१९७६), ⇨दिवाकर (१८८९-१९३१) व द.ल. गोखले ही त्यामध्ये प्रमुख मंडळी होती. दिवाकर हे अल्पावधीतच मंडळातून बाहेर पडले व त्यांची जागा ⇨ विठ्ठल दत्तात्रय घाटे (१८९५-१९७८) ह्यांनी घेतली. संघटितपणे काव्यरचना करण्याचा हा एकमेवाद्वितीय असा मराठीतील प्रयोग होता. रविकिरण मंडळातील कवींनी नव्या व जुन्या विविध जातींचा व चालींचा अवलंब करून गेय भावगीते रचली व ती लोकप्रिय केली. मराठी कवितेला वृत्तदृष्ट्या चालना दिली. काव्यगायनाची प्रथा पाडून कविता सर्वदूर, सर्वजनसमाजात ऐकविली.
रविकिरण मंडळातील माधव जुलियन् यांनी छंदोरचना (आवृ. २री, १९३७) सारखा मौलिक ग्रंथ लिहिला . उमर खय्यामकृत रूबाया (१९२९) व द्राक्षकन्या (१९३१) लिहून रूबायांचा नवीन काव्यप्रकारही मराठीत आणला. स्फुटकाव्य खंडकाव्य अशी दोन्ही प्रकारची काव्यरचना माधव जूलियन यांनी केली. विरहतरंग (१९२६), सुधारक (१९२८) ही त्यांची गाजलेली खंडकाव्ये, तर गज्जलांजलि (१९३३) ही मराठीतली त्यांची अभिनव रचना आहे. गिरीशांनी स्फुट व खंडकाव्यात्मक कविता लिहिली. सफाईदारपणा हा तिचा विशेष. अभागी कमल (१९२३), कला (१९२६) आणि आंबराई (१९२८) ही त्यांची खंडकाव्ये. सर्वाधिक लोकप्रियता लाभलेल्या यशवंतांची कविता कमालीची आत्मपर आहे पण तीत कडवट निराशाही मिसळलेली आहे. जयमंगला (१९३१), बन्दीशाळा (१९३२) व काव्यकिरीट (१९४० ?) ही त्यांची उल्लेखनीय खंडकाव्ये छत्रपती शिवराय (१९६८) हे महाकाव्य. खेरीज श्री. बा. रानडे व त्यांच्या पत्नी मनोरमाबाई रानडे, वि.द. घाटे, द.ल. गोखले, ग.त्र्यं. माडखोलकर इ. रविकिरण मंडळातील कवींनी काही कविता लिहिली आहे.
रविकिरण मंडळाचा आदर्श पुढे ठेवून १९२०-३५ या काळात महाराष्ट्रात अनेक कविमंडळे निघाली. या मंडळ कवींनी एकत्र येऊन फुलोरा (१९२७), विदर्भ-वीणा (१९३०), माधवी (१९३०), गोदातटीचा गुंजारव (१९३०), ओहळ (१९३३), करभार (१९३४), भावलेखा (१९३४), मालविका (१९३५) असे सामुदायिक काव्यसंग्रह प्रकाशित केले. पण जीव बेताचा, कुवत तुटपुंजी असल्याने मंडळे आणि त्यांची कविता दोन्हीही गाजली नाहीत.विडंबनकाव्याची एक धाराही या काळी प्रवाहित झालेली दिसते. केशवकुमार म्हणजेच ⇨प्रल्हाद केशव अत्रे (१८९८-१९६९) यांनी झेंडूची फूले (१९२५) लिहून विडंबनाची लाट उसळून दिली. या लाटेत ना.गं.लिमये यांचे मेघदूतच्या धर्तीवर ‘बल्लवदूत ’ आले. ज.के. उपाध्ये यांनी ‘चालचलाऊ-भगवद्गीता’ मांडली. खेरीज अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, बाबुलनाथ, कबुलराय, गो.ल. आपटे इ. कवींनी विडंबनात्मक कवितांचे दालन समृद्ध केले. दि.वि. देव यांनी उपहासिनी (१९३६) हा विडंबन-गीतांचा संग्रह संपादित केला. ही विडंबन-धारा पुढे दमदारपणे वाढली मात्र नाही.
रविकिरण मंडळातील एक श्रेष्ठ कवी माधव जूलियन् ह्यांचे निधन १९३९ साली झाले. गिरीश, यशवंत ह्यांच्या कवितेतली नवलाई त्या वेळी संपुष्टात आली होती. मराठी कविता पुन्हा क्षीण झाल्यासारखे वाटत असतानाच ⇨अनिल (१९०१-८२), ⇨कुसुमाग्रज (१९१२- ), ⇨ बा.भ. बोरकर (१९१०-८४) यांच्या रूपाने तिला एक नवे जोमदार वळण लाभले. लागोपाठच्या दोन महायुद्धांनी माणुसकीचा केलेला संहार, औद्योगिक क्रांतीमुळे दैनंदिन जीवनास भिडलेली जीवघेणी यांत्रिकता, नकोसा वाटणारा कोरडा साचेबंदपणा, वृत्ते, रचनारीती, कल्पना, आविष्कारपद्धती, प्रतीकयोजना, संकेत, कल्पना इत्यादींचे तेच ते आवर्त यांमुळे मराठी कवितेला मरगळ आली होती. ती कोंडी फोडण्याचे काम अनिल-कुसुमाग्रज-बोरकर या समर्थ कवींनी केले. अनिलांच्या पेर्ते व्हा (१९४७),सांगाती (१९६१), दशपदी (१९७६) सारख्या कवितासंग्रहांतून नवनिर्मितीची प्रेरणा, प्रेमभावनेची गूढरम्य अनुभूती आणि सामिजिकतेचे एक भान इ. वैशिष्ट्ये दिसून येतात. अनिलांनी मुक्तछंदाचा प्रयोगही लोकप्रिय करून दाखविला. मुक्तछंदाच्या विकासात कवी वामन नारायण देशपांडे ह्यांचाही लक्षणीय वाटा आहे. रचनेत त्यांनी प्रयोगशीलता दाखविली. तरस व भव्य कल्पनाशक्ती, क्रांतिप्रवणता व विशाल सहानुभूती यांनी भारलेली कुसुमाग्रजांची कविता नव्या दमदार आशयाची साक्ष देते. विशाखा (१९४२) हा काव्यसंग्रह ह्याचा प्रत्यय येण्यासाठी पुरेसा आहे. जीवनलहरी (१९३३), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) आणि वादळवेल (१९७०) हे त्यांचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह. मानवतेबरोबरच स्वातंत्र्यप्रिय मानवाच्या सूक्ष्म मनोकामनांचा आलेख कुसुमाग्रजांच्या अलिकडच्या कवितेतून येत आहे. विचारांची मुक्त अभिव्यक्ती हे त्यांचे खास वैशिष्ट्य. निखळ सौंदऱ्याच्या मार्मिक आविष्कारात रमणाऱ्या बा.भ. बोरकरांचे जीवनसंगीत (१९३७), दूधसागर (१९४७) हे कवितासंग्रह ह्या कालखंडात प्रसिद्ध झाले. आनंदभैरवी (१९५०), चित्रवीणा (१९६०), गीतार (१९६६), चैत्रपुनव (१९७१) आणि कांचन संध्या (१९८१) हे त्यानंतरचे कवितासंग्रह होत. बालकवी आणि तांबे ह्यांचे संस्कार बोरकरांच्या कवितेवर झालेले असले, तरी निसर्ग, प्रेम आणि कला ह्यांबाबतच्या जाणिवांच्या त्यांच्या कवितेतून होणाऱ्यार आविष्कारात त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा प्रत्यय येतो. वा.रा कांतांच्या अभिजात कल्पकतेचा विलोभनीय आविष्कार रुद्रवीणेतून (१९४७) भेटला तो याच काळात. विश्वाची नवी रचना ही कांतांच्या रुद्रगीतांची भूमिका. याच सुमारास श्रीकृष्ण पोवळे, रा.अ. काळेले, कृ.व. निकुंब, ना.ग. जोशी, वि.म. कुलकर्णी, सुधांशु, स.अ. शुक्ल, शांताराम आठवले, संजीव, वसंत वैद्य, ⇨ शांता शेळके ⇨ संजीवनी मराठे ⇨पद्मा गोळे ⇨ इंदिरा संत इत्यादींनी काव्यरचना केली आपापल्या परीने लौकिक मिळविला. संजीवनी मराठे व पद्मा गोळे ह्या मूळ तांबे ह्यांच्याच काव्यपरंपरेतील. इंदिरा संत ह्यांच्या कवितेला नाजूक भावगर्भतेचे एक स्वतंत्र लेणे लाभलेले आहे. शांता शेळके ह्यांच्या आरंभीच्या कवितेवर रविकिरण मंडळाचा प्रभाव असला, तरी त्यातून बाहेर पडून तिला तिचे पृथगात्म असे रूप यथावकाश प्राप्त झाले.
वा.भा. पाठक यांनी प्रवासी (१९३४) व मानवता (१९३९) ही दीर्घकाव्ये लिहिली. शीळ कर्ते ना.घ.देशपांडे यांनी गेयपूर्ण रचना केली. वा.गो. मायदेव हे प्रसादपूर्ण शिशुगीतांचे कवी म्हणून सर्वश्रुत आहेत. ‘काव्यविहारी’ (धों. वा. गद्रे) यांनी सहज, सुबोध, निरलंकृत रचनेतील कवितेत स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वत्रयीचा जयजयकार केला आहे. भ. श्री. पंडित ह्यांच्या कवितेत नादमधुर शब्दयोजना व चित्रणातील रेखीवपणा हे गुण आढळतात. साने गुरुजींच्या पत्री (१९३५) मधील कवितेत ईश्वरविषयक श्रद्धा व मानवप्रेम दिसून येते. अन्तःकरणाची आर्तता, उत्कट भक्ती आणि अभिजात शालीनता हे त्यांच्या काव्याचे विशेष होत. ग.ह. पाटील यांच्या रानजाईत (१९३४) खेडूतांच्या जीवनातील काव्यात्मकता दिसून येते. – ‘निशिगंध’ (रां.श्री. जोग) यांनी ज्योत्स्नागीत (१९२६) व निशागीत (१९२८) मध्ये प्रेमिकांच्या मुग्धमधुर प्रीतीभावनेची चित्रे रेखाटली आहेत. या.मु.पाटकांचे शशिमोहन (१९२९) हे खंडकाव्य ह्याच काळात लिहिले गेले. ⇨ अनंत काणेकरांच्या (१९०५-८०) चांदरात व इतर कविता मध्ये प्रेमभावनेचे विलोभनीय रूप प्रत्ययास येते. तसेच त्यांची मिस्किल वृत्ती त्यांच्या विडंबनकाव्यांतून दिसून येते. अभिनव उपमा, नादमधुर शब्दयोजना आणि गोळीबंद रचना ग.ल. ठोकळ ह्यांच्या मीठभाकरीत (१९३८) आढळते. ‘गरिबीचा पाहुणचार’ ही त्यांची विख्यात कविता. भावमधुर आणि गेय रचना हे सोपनदेव चौधरी ह्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. काव्यकेतकी (१९३२), अनुपमा (१९५०) आणि सोपानदेवी हे त्यांचे संग्रह उल्लेखनीय आहेत. के. नारखेडे ह्यांची जानपदगीते उल्लेखनीय आहेत. लोककवी ⇨मनमोहन (१९११- ) यांना लाभलेले विलक्षण कल्पनाशक्तीचे देणे त्यांच्या हिंदु-मुस्लीम दंग्यावरील युगायुगांचे सहप्रवासी (१९४६) या दीर्घकाव्यातही आढळते. अशा विविध कवींनी आधुनिक मराठी कविता समृद्ध केली आहे.
अर्वाचीन मराठी कवितेत शाहिरी कवितेचा प्रवाहही प्रबळ आहे. ⇨पठ्ठे बापूराव, ⇨ अण्णाभाऊ साठे व ⇨ अमर शेख हे या प्रवाहाचे प्रतिनिध होत. पठ्ठे बापूरावांच्या शृंगारिक आणि अन्य प्रकारच्या रचना लोकप्रिय झालेल्या आहेत.
अण्णाभाऊंनी प्रभावी पोवाडे रचून जनजागृती केली. त्यांच्यावर असलेला साम्यवादाचा प्रभाव त्यांच्या रचनांतून प्रत्ययास येतो. स्टॅलिनग्राडचा पोवाडा (१९४३) त्या दृष्टीने उल्लेखनीय होय. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चळवळींमधील भरती-ओहोटीचे पडसाद अण्णाभाऊंच्या रचनेत तीव्रपणे उमटले.
अमर शेख या प्रतिभावंत कवीची वृत्ती क्रांतिकारकाची आणि कविता राष्ट्रीय बाण्याची आहे. तेही साम्यवादी होते. शाहीर द.ना. गव्हाणकर, रा.भ.जांभेकर, प्रभाकर डिग्गीकर ह्यांचा उल्लेखही येथे आवश्यक आहे. शाहीर अमर शेख ह्यांच्याबरोबरच ह्या शाहिरांची कविता क्रांति-गीते (आवृ. २री,. १९४७) ह्या नावाने संग्रहरूप झाली आहे.
चौथा कालखंड (१९४५-१९६५): १८८५ साल अर्वाचीन मराठी काव्याचे क्रांतिवर्ष म्हणून ओळखण्यात येते, तसे १९४६-४७ साल नवकाव्याचे ‘युगवर्ष’ म्हणून मानण्यास हरकत नाही. देशाच्या फाळणीतून घडलेल्या अमानुष कत्तली, सरहद्दीवरच्या कटकटी, काश्मीरसाठी झडलेली युद्धे, निर्वासितांच्या बेसुमार लोंढ्यांनी निर्माण केलेले अनाहूत गुंतागुंतीचे प्रश्न, बेकारी, महागाई, टंचाई इ. समस्या, त्यातच दुसऱ्याप महायुद्धामुळे माणसाची शून्यावर आलेली किंमक अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संकटपरंपरांनी माणसाच्या स्वप्नांचा संहार झाला. त्यातून जीवनाविषयी घृणा व किळस निर्माण झाली. जीवनाविषयीच्या श्रद्धा, निष्ठा, मूल्ये पार उद्ध्वस्त झाली. त्या जागी उबग, चीड, निराशा, वैताग, जळफळाट अधिष्ठित झाले. ह्या वस्तुस्थितीचा आविष्कार काव्यातून होऊ लागला. ⇨बाळ सीताराम मर्ढेकरांची (१९०९-५६) कविता ही ह्या परिस्थितीची प्रातिनिधिक कविता म्हणता येईल. म्हणूनच ते नवकाव्याचे जनक अथवा ‘दुसरे केशवसुत ’म्हणून ओळखले जातात.
‘बडवित टिऱ्यात ’ ‘पिंपात मेले ओल्या उंदिर’ ह्यांसारख्या त्यांच्या कविता ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरतात. ‘विवस्त्र पांचाली’ (य.द. भावे), ‘माझ्या मना बन दगड’ (विंदा करंदीकर), ‘झाड’ (पु,शि. रेगे), ‘एक डोळा …’ (वसंत बापट) यांसारख्या कवितांही ह्या संदर्भात निर्देशनीय. नवकाव्यातील दर्शन एकांगी असले, तरी असत्य नाही. जीवनाचे मांगल्य डावलून केवळ विकृतीवर भर दिला हे नवकाव्याच्या टीकाकारांचे म्हणणेही चुकीचे आहे. रसरशीत सौंदर्य व अभंग आशावाद यांचे ‘दणकट दंडस्नायू जैसे’ चित्रणही नवकवितेत झाले आहे. यांत्रिक जीवनाची पोलादी पकड पाहून नवकवी हताश होत असला, तरी पोलादी रुळाच्या राक्षसी मिठीत उगवलेले नाजूक तृणांकूर पाहून जीवनाच्या दुर्दम्य आशांचे त्याला दर्शनही होते. जीवनातील सत्याचे दर्शन घडविताना प्रकट मनावर उमटलेली प्रतिक्रिया वर्णन करूनच नवकवी थांबत नाही, तर त्याबरोबर अप्रकट मनातल्या कल्पनांचा मागोवाही तो घेतो. तंत्राची जुनी चौकट मोडून काढून संज्ञाप्रवाहाच्या प्रकटीकरणाची रचनापद्धतीही तो प्रसंगी अवलंबितो. प्रवाही निवेदनशैली, प्रतिमायोजना, अंतर्मुखता ही नवकवितेची अन्य काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. नवकवितेवर दुर्बोधतेचा आणि अश्लीलतेचाही आरोप केला गेला. परंतु नवकवितेच्या आगमनामुळे कविता ही आपल्या विशुद्ध रूपाच्या अधिक जवळ सरकली, कवितेसंबंधीचे अनेक मूलभूत प्रश्न तिने निर्माण केले, अशी तिची स्तुतीही नामवंत समीक्षकांकडून केली गेली आहे.
अर्थशून्यतेचा अनुभव देणारी मर्ढेकरी कविता ही नवकाव्याची एक बाजू झाली. त्याची दुसरी बाजू ⇨विंदा करंदीकर (१९१८- ), ⇨ वसंत बापट (१९२२- ), ⇨ मंगेश पाडगावकर (१९२९- ), ⇨दिलिप चित्रे (१९३८- ), ⇨ पु.शि. रेगे (१९१०-७८), ⇨सदानंद रेगे (१९२३-८२) इ. कवींत मुख्यत: आढळते. ⇨ शरच्चंद्र मुक्तिबोध (१९२१-८४), ⇨ नारायण सुर्वे (१९२६- ), ⇨ ना.धों.महानोर (१९४२- ), ⇨ ग्रेस (१९३७- ), अरुण कोलटकर यांच्या कवितेनेही आधुनिक मराठी कवितेला एक नवे वळण मिळवून दिले आहे.
मानवी दु:खाचा समूळ वेध घेणारी सखोल चिंतनशीलता, विविध प्रकारचे वैचारिक-सांस्कृतिक संदर्भ आणि जोमदार, रांगडी अभिव्यक्ती ही करंदीकरांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. अभंग, मुक्त सुनीते, सूक्ते, बालगीते, तालचित्रे, गझल असे विविध प्रकारचे काव्य लेखन करंदीकरांनी समर्थपणे केले. तालचित्रांसारख्या रचनांतून त्यांची प्रयोगशीलता विशेषत्वाने प्रत्ययास येते. त्यांच्या बालगीतांवरही त्यांच्या प्रतिभेचा एक स्वतंत्र, आगळा ठसा उमटलेला दिसतो. लयतालांचे सूक्ष्म भान, संस्कृतसंपन्न शब्दकळा, जातिवंत रसिकता व तिला साजेशी प्रतिमासृष्टी बापटांच्या कवितेत आढळते. सामाजिक प्रबोधनाचा आणि जनजागरणाचा स्पष्ट हेतू मनात ठेवून लिहिलेल्या कवितांपासून आरंभ करून अत्यंत अंतर्मुख मनोवृत्तीने खोलवर जाणाऱ्याय कविता बापटांनी लिहिल्या. पाडगावकरांच्या कवितेतून त्यांच्या हळव्या, निसर्गप्रेमी व स्वच्छंदतावादी वृत्तीबरोबरच सामाजिक अन्यायाबाबतची चीड दिसून येते. सलाम (१९७८) मधील त्यांच्या कवितांतून ही चीड तीव्र उपरोधाचे रूप घेऊन अवतरते. दिलीप चित्रे ह्यांची कविता त्यांच्या व्यक्तिगत अस्तित्वानुभवाचाच एक शोध होय. पु.शि. रेग्यांच्या कवितेचे नाते संस्कृत-प्राकृतांतील गूढ शृंगारिक काव्यपरंपरेशी आहे. अन्य अनेक आधुनिक कवींच्या कवितेत आढळतो, तसला अर्थशून्यतेला, भ्रमनिरासाचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येत नाही. प्रेमाच्या गहन सृष्टीत त्यांना एका उत्कट सुसंवादित्वाची प्रचीती येते. त्यांची आधुनिकता जाणवते ती त्यांच्या सूक्ष्म, मार्मिक काव्यतंत्रातून. साक्षात प्रतिमांतून उभ्या केलेल्या अमूर्त रूपकासारखी सदानंद रेग्यांची कविता वाटते. शरच्चंद्र मुक्तिबोध ह्यांच्या कवितेवरील मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव लक्षणीय आहे. तसाच तो नारायण सुर्वे ह्यांच्या कवितेवरही दिसून येतो. आरती प्रभू ⇨चिंतामण त्र्यंबक खानोलकर (१९३०-७६) ह्यांच्या कवितेत शब्दांचे अर्थ व ध्वनी ह्यांच्या भावाशयांचा उपयोग समर्थपणे करून घेतलेला आढळतो. ग्रेस ह्यांच्या कवितेतील नवता आणि आत्मपरता भावात्म नादलयींच्या अंगाने बहरत गेलेली आहे. अस्सल, रसरशीत निसर्गभान हे ना. धो. महानोरांच्या कवितेचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य होय. अरूण कोलटकरांत अस्तित्ववादी-अभिव्यक्तिवादी प्रवृत्ती आढळतात. ग.दि. माडगूळकरांचे गीत-रामायण ह्याच कालखंडातले.
पाचवा कालखंड (१९६५ नंतर):ह्या कालखंडात दलित कविता पुढे आली. दलिता साहित्याच्या पृथकत्वाच्या समर्थ वैशिष्ट्यांचा प्रभावी आढळ तीत होतो. नकार –विद्रोहाची पूर्वनिश्चित भूमिका स्वीकारून वेदनापूर्ण जीवनानुभव, विचारप्रधान दृष्टिकोणातून दलित कवितेने मांडला आहे. त्यामुळे जीवनानुभवाचे विविध पदर उकलून दाखविण्यापेक्षा पूर्वनिश्चित प्रतिक्रिया प्रकट करणे दलित कविता अधिक पसंत करते. साहजिकच मनुजवैरी समाजव्यवस्था, माणूसपण नाकारणारी जातिव्यवस्था, कर्मविपाकासारखे दुःस्थितीला नेणारे सिद्धान्त, दलितांना दुर्दशेच्या मातीत गाडणारी संस्कृती व परंपरा यांविषयीचा ज्वलज्जहाल संताप दलित कवितेने इरेसरीने व्यक्त केला आहे. नव्या जीवनाचे संकल्पक कार्ल मार्क्स, म.जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदृष्टीचा परिसस्पर्श दलित कवितेला झालेला असून भविष्यकाळाची अत्यंत ऊर्जस्वल स्वप्नेही तिने रंगवली आहेत. साहजिकच दलित कवींना ती समाजपरिवर्तनाचे शस्त्र, दलितांसाठी चाललेल्या लढ्यांचे प्रभावी साधन वाटते. विध्वंस, निर्मिती आणि रचना अशी तिची प्रक्रिया आहे. आत्मनिष्ठा व समूहनिष्ठा यांच्या संघर्षसंनिकर्षांचे ते विद्रोही रूप ठरते. परंपरागत मराठी कवितेपेक्षा स्वाभाविकच दलित कविता वेगळी दिसते.
गोलपिठा (११९७२), तूही इयत्ता कंची (१९८१) मधून निर्मनुष्य प्रदेशाचे, भडकलेल्या आगीतून उडणाऱ्याष ठिणग्यांसारख्या भाषेत दाहक चित्रण करणारे नामदेव ढसाळ, सामाजिक जाणिवा प्रकट करतानाही सौंदर्यगर्भ प्रतिमांच्याच भाषेत बोलणारे केशव मेश्राम, दलितांच्या वेदनेचे सर्वकष विद्रोहात वैचारिक रूपांतर करणारे यशवंत मनोहर, गळाभर दुःखात बुडूनही संयमाने जाणिवा प्रकट करणारे दया पवार, वामन निंबाळकर, अरूण कांबळे, प्रल्हाद चेंदवणकर, ज.वि. पवार, त्र्यंबक सपकाळे, बा.ह. कल्याणकर, मीना गजाभिये, अर्जुन डांगळे अशी लहानमोठी मंडळी दलिता कविता समृद्ध करीत आहेत. त्यायोगे मराठी कवितेच्या कक्षा रुंदावत आहेत क्षेत्र विस्तारत आहे. [⟶दलित साहित्य].
केशवसुतांनी अर्वाचीन कवितेला आत्माभिव्यक्तिचे नवे, क्रांतिकारक वळण दिले. तिची प्रतिष्ठा व कलापूर्णता जोपासली. गोविंदाग्रज, बालकवी, बी, तांबे ह्यांनीही तिच्या समृद्धीला हातभार लावला. रविकिरण मंडळाचा उदयास्त झाला, पुढे अनिल-कुसुमाग्रज-बोरकर यांच्या प्रतिभेचे तजेलदार उन्मेष फुलले, नंतर नवकाव्याचे भेदक दर्शन घडले. दलित कवितेचा विद्रोह उसळून उठला. तसेच गजमल माळी, वसंत आबाजी डहाके, फ.मु. शिंदे, विठ्ठल वाघ, वसंत सावंत, पद्मिनी बिनीवाले, अनुराधा पोतदार, सतीश काळसेकर, मनोहर ओक, गोविंद नारायण कुलकर्णी कवठेकर, अनुराधा पाटील, तुलसी परब, अरुणा ढेरे, उत्तम कोळगावकर, प्रभा गणोरकर, गझललेखनाचा नवा, जोमदार आविष्कार घडविणारे सुरेश भट यांसारख्या कवींचीही ओळख घडली. निरनिराळे काव्यप्रकार-सुनीत, गझल, रूबाया, कणिका, नाट्यगीत, विडंबनकाव्य इत्यादी- समर्थपणे हाताळले गेले. काव्यलेखन आणि काव्यप्रयोजन ह्यांबाबतचे संकेत बदलत गेले आणि अर्वाचीन मराठी कवितेला समृद्ध वैशिष्ट्यपूर्ण रूप मिळाले.
भोसले, एस्.एस्.
यापुढील भाग मराठी साहित्य (अर्वाचीन-२) मध्ये पहा.