समदाब परिवर्तन रेषा : निरनिराळ्या ठिकाणी आणि ठराविक कालावधीत हवेच्या दाबात होणाऱ्या परिवर्तनाचे नकाशे हवामान कार्यालयात रोज तयार केले जातात. हे परिवर्तन साधारणपणे निरीक्षण वेळेच्या आधीचे २४ किंवा ३ तास या कालावधीतील असते. दाब परिवर्तनाचे एखादे ठराविक मूल्य असलेल्या ठिकाणांस जोडणाऱ्या रेषेस त्या मूल्याची समदाब परिवर्तन रेषा असे संबोधिले जाते. निरनिराळ्या मूल्यांच्या समदाब परिवर्तन रेषा नकाशावर काढून दाब परिवर्तन नकाशाचे विश्र्लेषण केले जाते. या विश्र्लेषणावरून कोणत्या क्षेत्रावर दाब वाढत आहे किंवा कमी होत आहे हे आपणास कळते आणि दाब-व्यवस्था कोणत्या दिशेकडे सरकतील याचा अंदाज बांधता येतो. तसेच आधीच्या वेळेच्या नकाशाशी तुलना करून न्यूनदाबाची तीव्रता वाढली किंवा कमी झाली, हे कळते. दाबात होणारा बदल हा हवामानाचा एक महत्त्वाचा घटक आहे. समशीतोष्ण कटिबंधात पश्र्चीमेकडून पूर्वेकडे सरकणाऱ्या न्यूनदाबामुळे एखादया क्षेत्रावरील वायुराशीत तीव्र बदल होऊन हवेच्या दाबात बरेच परिवर्तन होते. त्याचप्रमाणे उष्ण कटिबंधात सरकत्या चक्री वादळामुळे एखादया क्षेत्रावर हवेच्या दाबात लहानशा कालावधीतही बरेच तीव्र बदल होतात. अशा परिस्थितीत दाब परिवर्तन नकाशाचे विश्लेषण करून या दाब-व्यवस्थेसंबंधी उपयुक्त माहिती मिळते. बदलत्या दाब ऱ्हासामुळे वाऱ्याचा एक घटक निर्माण होतो. यास समदाब परिवर्तन वारा असे म्हणतात. समदाब परिवर्तन वारा समदाब परिवर्तन रेषांना प्रलंब असून याची गती समदाब परिवर्तन ऱ्हासाशी प्रमाणात्मक असते. ह्या वाऱ्याची गती क्वचितच सेकंदाला ५ मी.पेक्षा जास्त असते पण त्यामुळे निर्माण होणारे अभिसरण आणि वर्षण यांमुळे हा वारा कधीकधी महत्त्वाचा असतो.
गद्रे, कृ. म. मुळे, दि. आ.