शक्तिगुणक : (पॉवर फॅक्टर) एखाद्या मंडलास प्रत्यावर्ती (उलट-सुलट दिशेने बदलणारा) विद्युत् प्रवाह जोडलेला असल्यास त्यातून वाहणारा प्रवाह आणि त्याला दिलेला दाब यांमध्ये कलाभेद असल्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्यक्ष खर्च होणारी शक्ती ही दर्शनी शक्तीपेक्षा (अँपरंट पॉवरपेक्षा) कमी असू शकते. उपयुक्त शक्ती व दर्शनी शक्ती यांच्या प्रमाणाला ‘शक्तिगुणक’ असे म्हणतात. प्रत्यावर्ती प्रवाह एखाद्या गुंडाळीस जोडल्यास त्यातील प्रवाह दाबाच्या ९०० कलाभेदात असतो म्हणजे दाब जेव्हा जास्तीत जास्त असतो, तेव्हा प्रवाह शून्य असतो. अशा रीतीने दाब व प्रवाह यांच्यात एक कलाभेद निर्माण होतो. ह्यावरून एक गोष्ट निश्चित की, एकदिश प्रवाह पद्धतीत ज्याप्रमाणे दाब व प्रवाह यांच्या गुणाकारावरून शक्ती शोधून काढता येते, त्या सूत्रावरून प्रत्यावर्ती प्रवाहाची शक्ती शोधून काढणे शक्य नाही. कारण ज्या दोन प्रेरणांचा गुणाकार करावयाचा आहे, त्यांच्यामध्ये किती अंतराचा कोन (कलाभेद) आहे हे विचारात घेणे आवश्यक आहे. दाब व प्रवाह यांच्या गुणाकारास प्रत्यावर्ती प्रवाह पद्धतीत ‘दर्शनी शक्ती’ असे म्हणतात आणि दाब, प्रवाह व कलाकोनाची कोज्या यांच्या गुणाकारास ‘उपयुक्त शक्ती’ असे म्हणतात.
उपयुक्त शक्ती = दाब x प्रवाह x (कलाकोनाची कोज्या).
प्रत्यावर्ती प्रवाह पद्धतीत शक्तिगुणकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्तिगुणक हा नेहमी एकपेक्षा कमी असतो. प्रत्यावर्ती प्रवाहाची यंत्रे पुरवीत असलेली शक्ती सांगताना शक्तिगुणक विचारात घ्यावा लागतो परंतु शक्तिगुणक भाराप्रमाणे बदलतो. म्हणून प्रत्यावर्ती प्रवाहांची प्रदान शक्ती नेहमी किलोव्होल्ट-अँपिअर यामध्ये देतात. याचे किलोवॉटमध्ये रूपांतर करण्याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे.
किलोवॉट = (किलोव्होल्ट-अँपिअर) x शक्तिगुणक.
विद्युत् मंडलातील शक्तिगुणक कमी झाल्यास प्रवाह जास्त वाढेल व मापकावरील वेधांक जास्त येईल व ग्राहकाला पैसे जास्त भरावे लागतील. त्यामुळे शक्तिगुणक जास्तीत जास्त ठेवणे फायदेशीर आहे. अधिक प्रवाहामुळे संवाहक, वितळतारा, स्विचे यांचा आकारही वाढवावा लागेल म्हणून कोणत्याही मंडलाचा शक्तिगुणक उच्च ठेवणे आवश्यक असते.
शक्तिगुणक सुधारण्याचे उपाय : कमी शक्तिगुणकामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शक्तिगुणक सुधारणे आवश्यक असते. शक्तिगुणक सुधारण्यासाठी काही प्रवर्तन चलित्रांऐवजी समकालिक चलित्रांचा उपयोग करणे, प्रवर्तन चलित्रावरील भार वाढविणे, समकालिक चलित्रे जास्त उत्तेजित करणे व पुरवठ्याला समांतर धारित्र जोडणे या बाबींचा उपयोग करतात.
जेव्हा भार शुद्ध रोधात्मक असेल म्हणजे मंडलामध्ये फक्त उष्णता निर्माण करणारी साधने असतील, तेव्हा मंडलाचा शक्तिगुणक एक असतो व जेव्हा मंडलामध्ये प्रवर्तनी भार अधिक असेल म्हणजे प्रवर्तन चलित्रे, अनुस्फुरक नळ्या, वितळजोडकाम रोहित्रे या प्रकारचा भार असेल, तेव्हा प्रवाह दाबाच्या मागे पडतो, अशा वेळी मंडलाचा शक्तिगुणक अनुगामी (लॅगिंग) आहे असे म्हणतात. अशी अवस्था व्यवहारात नेहमी दिसते. जेव्हा मंडलामध्ये धारकता अधिक असेल, तेव्हा मंडलाचा शक्तिगुणक अग्रगामी (लिडिंग) असतो पण व्यवहारात अशी अवस्था नसते. शक्तिगुणक सुधारणाऱ्या साधनाचा आकार किलोव्होल्ट-अँपिसरमध्ये मोजतात. शकिगुणकावरून अनुगामी वा अग्रगामी शक्ती यांच्या किमती काढता येतात.
(१) उपयुक्त शक्ती (किलोवॉट) = (किलोव्होल्ट-अँपिअर) x
(कलाकोनाची कोज्या).
(२) अनुगामी/ अग्रगामी शक्ती = (किलोव्होल्ट-अँपिअर) x
(कलाकोनाची ज्या).
या सूत्रावरून साधनाचा आकार ठरविता येतो.
देशपांडे, मा.रा. देशपांडे, य.ना.