व्हर्शमॉर्ती, मिहालय : (१ डिसेंबर १८००-१९ नोव्हेंबर १८५५). हंगेरियन कवी आणि नाटककार. न्येक येथे जन्म. शिक्षण बूडापेस्ट येथे. तेथील तूदोमान्योश ग्युएतमेन्यी ह्या प्रतिष्ठित नियतकालिकाचा तो पुढे संपादक झाला. ऑ बुइदशोक (१८२३-२८) ह्या त्याच्या शोकात्मिकेला चांगला प्रतिसाद लाभला. परंतु त्याला खरी मान्यता मिळाली, ती त्याच्या झोलॉन फुताऽशा (१८२५) ह्या महाकाव्यामुळे. त्याच्या उत्कट देशभक्तीचा प्रत्यय ह्या महाकाव्यातून येतो. व्हर्शमॉर्ती हा स्वच्छंदतावादी होता. त्या दृष्टीने त्याच्या ‘देलसिजेत’ (१८२६), ‘त्युदेरव्ह्यलज्’ (१८२७) ह्या कविता आणि ऑ केत सोमशॅद व्हार (१८३१) हे कथाकाव्य निर्देशनीय आहे. ‘अबरांद’ (१८४०, अनु. फॅन्सी, १९५७) ही त्याची सर्वोत्कृष्ट प्रेमकविता. शोंगॉर एश त्युंदे (१८३१) हे त्याचे स्वच्छंदतावादी वळणाचे परंतु तत्त्वचिंतनात्मक स्वरूपाचे नाटक. ‘गोंदोलातोक ऑ क्यन्ह्वतारबॉन’ (१८४४) या कवितेत त्याने मानवजातीच्या अस्तित्वाची कारणे आणि तिच्या समस्या मांडल्या आहेत. ऑ व्हेन चिगानी (१८५४, अनु. द ओल्ड जिप्सी, १९३३) हे त्याचे सर्वश्रेष्ठ भावकाव्य. त्यात त्याने मृत्युपंथाला लागलेल्या एका वृद्ध जिप्सी संगीतकाराची भूमिका घेऊन मानवजातीवर संकट येणार असल्याची भीती व्यक्त केली आहे मात्र ह्या काव्याच्या शेवटी त्याने आशावादी सूर लावला आहे. ‘सोझॉत’ (१८३६, इं. अर्थ ‘द कॉल’) ह्या त्याच्या देशभक्तिपर कवितेला राष्ट्रगीताचा मान मिळाला आहे.
बूडापेस्ट येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.