व्याज : स्थूलमानाने कर्जाऊ पैशाच्या वापराबद्दल विशिष्ट दराने नियमितपणे द्यावी लागणारी रक्कम म्हणजे व्याज. अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाच्या विनियोगाबद्दल द्यावयाचा मोबदला म्हणजे व्याज, अशा अर्थाची व्याख्या ⇨ ऍल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने केली आहे. कर्जाऊ रकमांच्या अथवा पैसारूपी भांडवालाच्या उत्पादक वापराबद्दल व्याज द्यावे लागते. प्राचीन काळात व मध्ययुगात कर्जाऊ दिलेल्या पैशावर व्याज घेणे अनैतिक मानले जाई. प्लेटोने व्याज घेऊन पैसे देणे निंद्य मानले, तर ऍरिस्टॉटलने पैसा हा वांझोटा असून पैसा पैशाला जन्म देऊ शकत नाही, असे प्रतिपादन करून व्याज घेणे चुकीचे ठरविले. भारतात मात्र व्याज घेण्यास प्रतिबंध केल्याचे व असल्याचे दिसत नाही. आता सर्वत्रच व्याज घेणे समर्थनीय मानले जाते.
स्थूल व निव्वळ व्याज असे व्याजाचे दोन प्रकार पडतात. भांडवलावर मिळालेले एकूण व्याज म्हणजे स्थूल किंवा ढोबळ (ग्रॉस) व्याज होय. कर्जाऊ रकमेचा जो मोबदला दिला जातो, त्यास निव्वळ किंवा नक्त (नेट) व्याज असे म्हटले जाते. स्थूल व्याजामध्ये निव्वळ व्याजाबरोबर इतरही मोबदल्यांचा समावेश होतो. धनको जेव्हा ऋणकोला कर्ज देतो, तेव्हा ती कर्जाची रक्कम परत न मिळण्याचा धोका असतो. ऋणको अप्रामाणिक असणे हा वैयक्तिक धोका, तर त्याने ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतले असेल, तो धंदा बुडणे वा त्यात खोट येणे, हा व्यावसायिक धोका होय. असा धोका पत्करण्याबद्दल धनको निव्वळ व्याज तर घेतोच आणि त्याशिवाय मोबदलाही मागतो. स्थूल व्याजात असा मोबदला अंतर्भूत असतो. स्थूल व्याजात कर्ज-व्यवस्थापनाच्या मोबदल्याचाही समावेश असतो. कर्जविषयक नोंदी ठेवणे, कर्जाचे हप्ते नोंदविणे, व्याजाची आकारणी व वसुली करणे इत्यादींसाठी होणारा व्यवस्थापनाचा खर्च ऋणकोकडून मिळावा अशी धनकोची अपेक्षा असते. धनको जेव्हा ऋणकोला कर्ज देतो, तेव्हा स्वत:च्या गैरसोयीबद्दल निव्वळ व्याजाव्यतिरिक्त काही मोबदला ऋणकोकडून धनको मिळवितो.
कर्जाची रक्कम, मुदत, ऋणको व धनको यांच्यातील भौगोलिक अंतर, देशाचे अर्थकारण, भांडवलबाजारातील परिस्थिती या सर्व कारणांमुळे विविध ठिकाणचे व्याजदर वेगवेगळे असतात. ऋणकोची बाजारातील पत, भांडवलाची सीमांत उत्पादकता, स्पर्धेची तीव्रता हेही घटक स्थूल व्याजदर ठरविण्यामध्ये महत्त्वाचे ठरतात. पूर्वी बाजारातील व्याजदर व वास्तव व्याजदर असाही फरक कधीकधी केला जात असे. वास्तव व्याजदर भांडवलाच्या उत्पादकतेवरून ठरत असे, तर बाजारातील व्याजदर प्रत्यक्ष कर्जाऊ व्यवहारावरून ठरत असे.
व्याजदर ठरविण्याचे सिद्धांत : व्याजदर कसा ठरतो, हे स्पष्ट करणारे अनेक सिद्धांत अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत.
व्याजाचा बचत-गुंतवणूक सिद्धांत : सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी व्याजाची विविध स्पष्टीकरणे दिलेली आहेत. या सिद्धांतानुसार व्याजाचा दर भांडवलाच्या मागणी-पुरवठ्याने निर्धारित होतो. भांडवलाची मागणी गुंतवणुकीसाठी केली जाते, तर भांडवलाचा पुरवठा बचतीतून केला जातो. त्यामुळे ज्या व्याजदरावर भांडवलाची मागणी म्हणजे गुंतवणूक व भांडवलाचा पुरवठा म्हणजे बचत समान होते, तो व्याजदर निश्चित होतो. या सिद्धांतात वास्तविक गुंतवणूक व बचत विचारात घेतली जाते. त्याचबरोबर व्याजाच्या संबंधात उत्पादकता, मितव्ययता इ. वास्तविक कारणेही विचारात घेतली जातात, म्हणून त्याला ‘व्याजाचा वास्तविक सिद्धांत’ असेही म्हणतात. उत्पादनकार्यात भांडवलाची मागणी उत्पादनासाठी केली जाते. ही मागणी भांडवलाच्या सीमांत उत्पादकतेवर अवलंबून असते. व्याज ही भांडवलाची किंमत असल्याने भांडवलासाठी द्यावी लागणारी किंमत व भांडवलाची सीमांत उत्पादकता यांची तुलना केली जाते. सीमां उत्पादकता व व्याजदर समान होईल, एवढी भांडवलाची सीमांत उत्पादकता जास्त आहे, अशाच उद्योगात भांडवल गुंतविले जाईल. याउलट व्याजदर कमी असतील, तर सीमांत उत्पादकता कमी असलेल्या उद्योगातही भांडवल गुंतविले जाईल. अशा रीतीने व्याजदर व गुंतवणुकीची मागणी यांच्यात परस्परविरुद्ध दिशेने बदल होत असल्यामुळे भांडवलाचा वा गुंतवणुकीचा मागणीवक्र उजवीकडे उतरत जाणारा राहील. सर्व पेढ्यांच्या मागणीवक्राच्या बेरजेने उद्योगाचा व सर्व उद्योगांच्या मागणीवक्राच्या बेरजेने संपूर्ण अर्थव्यवस्थेचा ऋणात्मक उताराचा गुंतवणूक मागणीवक्र प्राप्त होईल. बचत अथवा भांडवलाचा पुरवठा अन्य घटक स्थिर असताना व्याजदरावर अवलंबून राहतो. व्याजदर जितका जास्त, त्या प्रमाणात व्यक्तींना बचत करण्यास प्रोत्साहन मिळून भांडवलाचा पुरवठा वाढेल. भांडवलाचा पुरवठा व्याजदराच्या समदिशेने बदलतो व त्यामुळे भांडवलाचा पुरवठावक्र उजवीकडे वरती चढणारा किंवा धनात्मक उताराचा राहतो. बचत व गुंतवणुकीत असंतुलन निर्माण झाल्यास व्याजदरातील बदलामुळे बचत व गुंतवणूक संतुलित होतात. मागणी-पुरवठ्याचा संकुचित विचार, उत्पन्न पातळीकडे दुर्लक्ष, मौद्रिक घटकांची उपेक्षा, पूर्ण रोजगाराचे अवास्तव गृहीत या प्रकारची टीका या सिद्धांतावर केली जाते.
व्याजाचा ऋणयोग्य निधी सिद्धांत : व्याजाच्या परंपरागत किंवा वास्तविक सिद्धांतात सुधारणा करून हा सिद्धांत मांडण्यात आला. सर्वप्रथम ⇨ योहान गस्टाव्ह नट विकसेल या स्वीडिश अर्थशास्त्रज्ञाने तो मांडला व त्यानंतर ओहलिन, डी. एच्. रॉबर्टसन्, मिडील, जॅकोब व्हायनर अशा अनेक अर्थतज्ज्ञांनी त्यात सुधारणा केल्या. या सिद्धांतानुसार ऋणयोग्य रकमांची मागणी व ऋणयोग्य रकमांचा पुरवठा यांच्या संतुलनाने व्याजदर निश्चित होतो. गुंतवणूक, उपभोग व संग्रहण या तीन कारणांसाठी ऋणयोग्य निधीची मागणी केली जाते. अशा मागणीचा गुंतवणूक हा प्रमुख घटक मानला जातो. कारखान्याच्या इमारती, यंत्रे, कच्चे माल व अन्य भांडवली वस्तूंच्या खरेदीसाठी ऋणयोग्य निधीची मागणी केली जाते. निधीची मागणी उत्पादक कार्याबरोबरच उपभोगासाठीही केली जाते. व्याजदर जास्त असल्यास उपभोगासाठी ऋणयोग्य निधीची मागणी कमी होते. याशिवाय व्यक्ती आपली बचत रोख शिलकीच्या स्वरूपात स्वत:जवळ ठेवतात. जेव्हा व्याजदर कमी असतो, तेव्हा लोक स्वत:जवळ जास्त रोकड ठेवतात, म्हणजेच संग्रहणासाठी मागणी जास्त असते. बचत, अधिकोष प्रत्यय (बँक क्रेडिट), अपसंग्रहण (डिसहोअर्डिंग) व निर्गुंतवणूक (डिसइन्व्हेस्टमेंट) या चार गोष्टींवर ऋणयोग्य निधीचा पुरवठा अवलंबून असतो. व्यक्ती व व्यावसायिक पेढ्या यांच्याकडून बचत केली जाते. दोन्ही प्रकारच्या बचती व्याजाच्या समदिशेने बदलतात. अधिकोष (बँक) प्राथमिक बचतीच्या आधारावर कर्ज देणे, रोखे खरेदी करणे वगैरे व्यवहारांतून प्रत्यय (पत) निर्मिती करून ऋणयोग्य निधीचा पुरवठा करतात. व्याजदर जास्त असेल, तर बँका पतनिर्मिती जास्त करतात. अपसंग्रहण हा ऋणयोग्य निधीच्या पुरवठ्याचा आणखी एक स्रोत आहे. अनेक व्यक्ती पूर्वी संग्रहित केलेली राशी संग्रहातून काढून घेऊन कर्जाऊ देण्यासाठी उपलब्ध करून देतात. व्याजदर जास्त असल्यास अपसंग्रहण जास्त प्रमाणावर होते. लाभाचा (मिळकतीचा) दर कमी व व्याजदर जास्त असल्यास पुन्हा त्या प्रकारची गुंतवणूक करणे उत्पादकांना हानिकारक वाटते. त्यामुळे घसारा निधी पुन्हा गुंतवणुकीसाठी वापरण्यापेक्षा कर्जाऊ दिला जातो व अपगुंतवणुकीस चालना मिळते. ऋणात्मक उताराचा ऋणयोग्य मागणीवक्र व धनात्मक उताराचा ऋणयोग्य निधीचा पुरवठावक्र ज्या ठिकाणी परस्परांना छेदतात, त्या व्याजदरावर मागणी व पुरवठा समान झाल्याने तो व्याजदर निश्चित होतो. परंपरावादी सिद्धांतातील काही दोष या सिद्धांताने दूर केलेले असले, तरी अनेकदा बचत ही व्याजसापेक्ष नसल्याने, तसेच लोकांचे उत्पन्न स्थिर नसल्याने ऋणयोग्य निधी सिद्धांताच्या मर्यादा स्पष्ट होतात. ऋणयोग्य निधी व्यययोग्य उत्पन्नावर अवलंबून असतो. व्यययोग्य उत्पन्न गुंतवणुकीवर निर्भर असते व त्यामुळे गुंतवणुकीवरील व्याजदर अनिर्धारणीय बनतो. संग्रहण व अपसंग्रहणाची कल्पना क्रांतिकारक असली, तरी त्याद्वारे मुद्रेची मात्रा बदलू शकत नाही.
व्याजाचा रोखता प्राधान्य सिद्धांत : (लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी ऑफ इंटरेस्ट). सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड केन्स यांनी व्याजाचा रोखता (रोकड) प्राधान्य सिद्धांत १९६३ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या ‘द जनरल थिअरी’ या प्रसिद्ध पुस्तकात मांडलेला असून, त्यांच्या मते व्याज ही एक विशुद्ध मौद्रिक क्रिया आहे. एका विशिष्ट कालावधीसाठी रोखतेच्या अभिलाषेचा (प्रेफरन्स) त्याग करण्यासाठी देण्यात येणारा मोबदला म्हणजे व्याज होय. मुद्रेची मागणी रोखतेच्या अभिलाषेमुळे केली जाते. व्यक्ती आपले काही उत्पन्न उपभोगावर खर्च करतात, तर उर्वरित उत्पन्न ते स्वत:जवळ रोख स्वरूपात किंवा बँकेत चालू (बचत) खात्यात ठेवतात. चालू खात्यातील रक्कम केव्हाही काढता येत असल्याने ती रोख रकमेप्रमाणे असते. मुद्रा सर्वाधिक तरल संपत्ती असल्याने रोख रक्कम ठेवण्यात व्यक्तीची सोय व पसंती असते. भविष्याबद्दलची दक्षता, तरतूद व परिकल्पना (सेक्यूतलेशन) या प्रमुख उद्देशांनी मुद्रेची मागणी केली जाते. आपल्या गरजेप्रमाणे वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी रोख रक्कम जवळ बाळगणे आवश्यक असते. व्यक्तीची रोखतेची मागणी, त्याचे उत्पन्न व उत्पन्न मिळविण्याचा कालावधी यांवर अवलंबून असते. उत्पन्न जितके जास्त व उत्पन्न मिळविण्याचा कालावधी जितका दीर्घ, तितकी रोखतेची मागणी जास्त राहते. व्यावसायिक पेढ्यांच्या बाबतीतही उत्पन्न जरी अनियमित असले, तरी खर्च सारखा चालू असतो. व्यापाराच्या हेतूने त्यांची रोख रकमेची मागणी जास्त राहते. अनेकदा अनपेक्षित खर्च निघतात आणि ते भागविण्यासाठी काही रोख रक्कम स्वत:जवळ ठेवणे आवश्यक असते. तरतुदीच्या हेतूने होणारी रोख मुद्रेची मागणी व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून व उत्पन्नसापेक्ष असते. उत्पन्न जितके जास्त, तितकी तरतुदीच्या हेतूसाठी असलेली मुद्रेची मागणीही जास्त राहील. परिकल्पन उद्दिष्टानुसार कर्जरोखे प्रतिभूती यांच्या किमतीत होणार्या बदलाचा फायदा घेऊन नफा प्राप्त करण्यासाठी रोख रकमेची मागणी केली जाते. लॉर्ड केन्स यांच्या मते ‘बाजारपेठेत भविष्यकाळात काय घडेल, याचे अचूक अनुमान करून नफा मिळविण्याचा प्रयत्न करणे, हा रोखतेच्या अभिलाषेचा परिकल्पन (स्पेक्यु लेटिव्ह) हेतू असतो’. या हेतूसाठी होणारी रोख रकमेची मागणी व्याजदरावर अवलंबून असते. परिकल्पन हेतूसाठी होणारी मुद्रेची मागणी भविष्यकाळात व्याजदरात कोणत्या दिशेने परिवर्तन होईल, यासंबंधीच्या अंदाजावर व अपेक्षांवर अवलंबून असते. व्यवहार व सावधगिरीची उपाययोजना म्हणून केली जाणारी मुद्रेची मागणी सामान्यत: अल्पकाळात स्थिर असते. व्याजाचा त्यावर परिणाम होत नाही. परिकल्पन हेतूसाठी होणारी मुद्रेची मागणी मात्र व्याजदराप्रमाणे विरुद्ध दिशेने बदलते. या तिन्ही हेतूंसाठी रोख रक्कम जवळ ठेवण्याच्या लोकांच्या अभिलाषेवर मात करण्यासाठी व्याजाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. रोखतेची अभिलाषा जेवढी तीव्र, तितका तिच्या त्यागाचा मोबदला म्हणजे व्याज जास्त द्यावे लागते.
अर्थव्यवस्थेतील मुद्रेचा पुरवठा विधिग्राह्य मुद्रा आणि प्रत्यय मुद्रांनी निश्चित होतो. तो प्रामुख्याने सरकार आणि मध्यवर्ती अधिकोषाच्या मौद्रिक धोरणावर अवलंबून राहील. मुद्रेच्या पुरवठ्यावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण असते. अर्थव्यवस्थेच्या एकूण हिताच्या दृष्टीने मुद्रेची मात्रा ठरविली जाते. मुद्रेच्या पुरवठा कमीजास्त करून व्याजदरावर नियंत्रण ठेवता येते. रोखता प्राधान्य फलन स्थिर मानल्यास मुद्रेचा पुरवठा वाढला, तर व्याजदर घटतो आणि कमी झाला, तर व्याजदर वाढतो. ज्या व्याजदरावर मुद्रेचा दिलेला एकूण पुरवठा व मुद्रेची मागणी समान होईल, तो व्याजदर निश्चित होतो.
रोखता अभिलाषा सिद्धांतावर अनेक आक्षेप घेतले जातात. या सिद्धांतात केवळ मौद्रिक तत्त्वांचा विचार करून उत्पादकता वगैरे वास्तविक घटकांमुळे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. मुद्रेची मागणी केवळ वरील तीन हेतूनेच नव्हे, तर अन्य कारणांसाठीही केली जाते, याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. तसेच या सिद्धांतात केवळ अल्पकालीन व्याजदराचे स्पष्टीकरण केलेले असून व्याजनिर्धारणात मुद्रेचा पुरवठा स्थिर मानलेला आहे.
व्याजाचा ऋणयोग्य निधी सिद्धांत व रोखता प्राधान्य सिद्धांत या सिद्धांतांमधील दोष टाळून त्यांचा मेळ घालून ⇨ जॉन रिचर्ड हिक्स व ⇨ ॲलव्हिन हॅन्सेन या अर्थशास्त्रज्ञांनी व्याजदर ठरविण्याचा आधुनिक सिद्धांत मांडलेला आहे. व्याजदर हा मुद्रेसाठी असलेली मागणी व मुद्रेचा पुरवठा या घटकांबरोबरच देशातील एकूण रोजगार, उत्पन्न आणि खर्च या विविध घटकांवरही अवलंबून असतो.
व्याजाचा दर शून्य किंवा शून्यापेक्षा खाली येऊ शकतो, अशी शक्यता अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. ज्या समाजात कायदा व सुव्यवस्था यांचा अभाव असतो, अशा समाजात सामान्य लोक आपली बचत सुरक्षित तिजोर्या असलेल्या व्यक्तीजवळ किंवा बँकांच्याकडे ठेवतात. अशा परिस्थितीत बचत करणारांना व्याज तर मिळत नाहीच, उलट पैसे सुरक्षित ठेवल्याबद्दल मोबदला द्यावा लागतो या मोबदल्यालाच व्याजाचा उणे दर असे म्हणतात. ज्या समाजात लोकांचे सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च होते, तेथे व्याजाचा दर शून्य असतो. तसेच समाजात भांडवल प्रचंड प्रमाणात जेथे उपलब्ध असते, तेथे भांडवलाची सीमांत उत्पादनक्षमता शून्य असते आणि त्यामुळे व्याजदर शून्य होण्याची शक्यता गृहीत धरली जाते. परंतु आर्थिक प्रगतीमुळे भांडवलाची उत्पादनक्षमता ही वाढतच राहणार असल्याने व्याजाचा दर शून्य किंवा उणे होऊ शकणार नाही, असे निश्चितपणे म्हणता येईल.
संदर्भ : 1. Dewett, K. K. Modern Economic Theory, New Delhi, 1982. 2. Samuelson, Paul William, Nordhaus, Economics, New York, 1998.
चौधरी, जयवंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..