विषविज्ञान : विषांचे स्वरूप, परिणांम, वा परिणामाचे अभिज्ञान (ओळख पटविणे) व त्यांच्यावरील उपचार आणि या सर्वांशी निगडीत असलेले चिकित्साविषयक, औद्योगिक किंवा कायदेविषयक यांसारखे प्रश्न यांचा अभ्यास विषविज्ञानात केला जातो. थोडक्यात विषविज्ञान या ज्ञानशाखेमध्ये सजीवांवर रासायनिक पदार्थामुळे घडून येणाऱ्या घातक परिणामांचा सर्वांगीण अभ्यास समाविष्ट होतो. अशाच प्रकारचा, परंतु जास्त व्यापक असा अभ्यास ज्यात रासायनिक द्रव्ये आणि जैवद्रव्ये यांच्यातील आंतरक्रिया समाविष्ट आहे, त्या औषधीक्रियाविज्ञान या शास्त्राचीच विषविज्ञान ही एक शाखा आहे, असे एरियन्स यांसारख्या मूलगामी अभ्यासकांचे मत आहे. कारण ⇨ औषधिक्रियाविज्ञान केवळ ‘वद्यकीय उपयोगाची द्रव्ये आणि त्यांचे इष्ट परिणाम’ इतके मर्यादित क्षेत्र नसून त्यामध्ये कोणत्याही सजीवाच्या संदर्भात बाह्य (विजातीय) पदार्थ म्हणून असणारी सर्व जीवबाह्य रसायने (उदा., औषधे, पीडकनाशके, कर्कजनद्रव्ये), अतिरिक्त मात्रांमध्ये दिलेली जीवनसत्वे, खनिजे व ॲमिनो अम्लांसारखी प्राकृतिक शरीरक्रियावैज्ञानिक द्रव्ये आणि त्यांचे इष्टानिष्ट परिणाम यांचाही विचार केला जातो. साहजिकच औषधक्रियाविज्ञानाची सर्व मूलभूत तत्वे विषविज्ञानासही उपयोजनीय ठरतात.
जगात उपलब्ध असलेल्या, विविध क्षेत्रांतील मानवनिर्मित रसायनांची संख्या सु. ६५,००० असून दरसाल त्यांत ५०० ते १,००० पदार्थांची भर पडत असते. या रसायनांचा तसेच इतर शेकडो नैसर्गिक पदार्थांचा मानवाशी व त्याच्याशी निगडित प्राणी व वनस्पती यांच्याशी हानिकारक संपर्क होण्याची शक्यता लक्षात घेतल्यास विषविज्ञानाची व्याप्ती समजून येईल. औद्योगिकरणातून उद्भवणाऱ्या वाढत्या रासायनिक उपसर्गामुळे विषविज्ञानाच्या अनेक उपशाखा अस्तित्वात आल्या आहेत. त्यांना रसायनांच्या प्रकारानुसार धातुविषविज्ञान, सेंद्रिय (कार्बनी) विषविज्ञान, वायुविषविज्ञान, प्लॅस्टिक विषविज्ञान अशी नावे देता येतात. परंतु उपयुक्ततेच्या दृष्टीने, ज्या परिस्थितीत व ज्या विशिष्ट रसायनांशी सजीवाचा संपर्क घडून येण्याची शक्यता असते, त्यानुसार हा अभ्यास करणे इष्ट ठरते. म्हणूनच पुढील काही महत्वाच्या उपशाखा प्रस्थापित होत आहेत : औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे विषविज्ञान, अन्नविषविज्ञान, व्यसनकारी पदार्थांचे विषविज्ञान, औद्योगिक विषविज्ञान, परिसर विषविज्ञान, पीडकनाशक विषविज्ञान, न्यायवैद्यकीय विषविज्ञान, प्रारण विषविज्ञान इत्यादी.
इतिहास : ऐतिहासिक काळात विषांचा उपयोग मुख्यतः नको असलेल्या व्यक्तींना ठार मारण्यासाठी केला जाई [⟶ विषतंत्र]. आदिम मानवात आणि एकोणिसाव्या शतकापर्यंत आदिवासींमध्ये बाणांच्या टोकांना विषलेपन करून ते लढाईत वापरले जात. नंतरच्या काळात दरबारी राजकारणातील छुपी आयुधे म्हणून विषांचा वापर होत असे. खुनी आणि मारेकरी यांची एक उपयुक्त विधि एवढेच या विषप्रयोगांचे महत्त्व होते. परंतु इ. स. पू. १५०० पासूनच्या भारतीय, चिनी, ग्रीक आणि ईजिप्शियन ग्रंथांमध्ये मात्र विषांच्या परिणामांचे संकलन व विविध प्रकारच्या विषनिर्मितीस उपयुक्त माहिती मिळते. ग्रीक वैद्यकात इ. स. च्या प्रारंभाच्या सुमारास विषांवरील उताऱ्यांची जाण असावी, असे दिसते व मृत्युदंड दिलेल्या कैद्यांवर प्रयोग करून विषांवरील नवीन उतारे शोधून काढण्याची परवानगी राजवैद्यांना मिळालेली आढळते. ऋग्वेदामध्ये विष परिहारासाठी प्रार्थना आणि विषध्नोपनिषद आहे.
आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने विषारी पदार्थाकडे पाहण्यास सुरूवात सोळाव्या शतकात ⇨ फिलिपस ऑरिओलस पॅरासेल्सस या स्विस वैद्यांनी केली, असे म्हणता येईल. पदार्थाच्या उपयुक्त व घातक गुणधर्मातील फरक विशद करताना त्यांनी हे परिणाम मात्रेवर अवलंबून असतात, असे प्रतिपादन केले. त्यांच्या शब्दात ‘सर्व पदार्थ विषे असतात विष नाही असे काहीही नाही. विष आणि औषधोपचार यांतील फरक योग्य त्या मात्रेनेच स्पष्ट होतो.’
विषवैज्ञानिक क्रियेची सामान्य तत्वे : रासायनिक पदार्थाचा जैव (सजीवावरील) परिणाम त्या पदार्थाची औषधक्रियावैज्ञानिक क्षमता किंवा अंगभूत क्रियाशीलता, ऊतकाच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहाच्या म्हणजे पेशीसमूहाच्या) सान्निध्यातील त्याची मात्रा (संहती), संपर्काचा प्रकार व संपर्क-कालावधी यांवर अवलंबून असते. एखाद्या द्रव्याच्या विविध मात्रांमुळे प्रायोगिक प्राण्यांवर होणाऱ्या इष्ट, विषाक्त (विषारी) आणि मारक परिणामांचे आलेख काढले, तर ते आकृंतीमध्ये दाखविल्याप्रमाणे आढळतात. येथे क्ष – अक्षावर मात्रा मिग्रॅ. प्रती किग्रॅ. देहभार या प्रमाणानुसार दाखवली असून विस्तृत व्याप्तीसाठी लॉग प्रमाण वापरले आहे. य – अक्षावर प्रतिशत परिणामाची नोंद आहे. या आलेखावरून पुढील माहिती मिळू शकते : (अ) प्रायोगिक पदार्थाची काहीही परिणाम न घडवणारी कमाल मात्रा (परिणामहीन मात्रा = प. मा. = शून्य). (आ) कमीत कमी परिणामकारक मात्रा. फक्त एक प्रतिशत प्राण्यांवर परिणाम असल्याने हिला प. मा. एक म्हणतात. (इ) पन्नास प्रतिशत प्राण्यांवर परिणामकारक मात्रा ( म. मा. पन्नास). (ई) जवळजवळ सर्व प्राण्यांवर, परंतु सैद्धांतिक दृष्टीने ९९ प्रतिशत परिणामकारक मात्रा म्हणजे प. मा. ९९. (उ) याचप्रमाणे कमीत कमी विषाक्त, पन्नास प्रतिशत विषाक्त, कमाल विषाक्त मात्रा म्हणजेच वि. मा. १, वि. मा. ५० व वि. मा. ९९. (ऊ) एखादा विशिष्ट विषाक्त परिणाम न पाहता ठराविक काळानंतर (उदा., २४ तासांनी) मृतावस्थेत आढळलेल्या प्राण्यांच्या संख्येवरून मारक मात्रा ( मा. मा.) १, मा. मा. ५०, मा. मा. ९९.
या माहितीच्या आधारे, पदार्थाची उपयुक्तता व सुरक्षितता दर्शविणारे काही निर्देशांक किंवा घटक प्राप्त होतात. त्यांच्या आधारे दोन रसायनांची तुलना करून सापेक्ष विषाक्तता/सुरक्षितता काढणे शक्य होते. हे निर्देशांक अ
से : (१) अधःसीमा मात्रा (तलसीमा मात्रा). (२) निश्चित सुरक्षा गुणांक = वि. मा. १/प. मा. ९९. हीच माहिती निश्चित सुरक्षा सीमा = वि. मा. १ – प. मा. ९९ (मिग्रॅ.) या शब्दांतही सांगता येते. (३) औषधी उपयुक्ततेच्या दृष्टीने प्रारंभिक कल्पना येण्यासाठी चिकित्सा निर्देशांक उपयुक्त ठरतो आणि निरनिराळ्या रसायनांची तौलनिक सुरक्षितता व्यक्त करण्यासाठी तो वापरला जातो.
यावरून प्रत्येक प्रकारचा परिणाम (उपयुक्त, विषाक्त, मारक) मात्रा वाढवल्याने किती त्वरित वाढतो हे समजते. जास्त चढ दर्शविणारी द्रव्ये वापरताना त्यांच्या मात्रेबद्दल साहजिकच जास्त सावधगिरी घेणे जरूर असते.
विषाचा शरीराशी संपर्क जेव्हा अल्पकाळ टिकतो किंवा एकदाच विषाचा शरीरप्रवेश झाल्यामुळे विषाक्तता निर्माण होते, तेव्हा विषाक्त मात्रा तुलनेने मोठी असते. तिला तीव्र विषाक्त मात्रा असे म्हणता येईल. उलट दीर्घकाळ द्रव्याचा संपर्क होत राहिल्याने विषाक्तता निर्माण होण्यास लहान मात्राही पुरेशी होते. तेव्हा तिला दीर्घकालीन विषाक्त मात्रा म्हणतात. या मात्रांचे शरीरावरील परिणाम निराळे असू शकतात, त्यासाठी मानवातील अपेक्षित संपर्ककालानुसार प्राण्यांमध्ये तीव्र-, अल्पदीर्घ- व दीर्घकालिक विषाक्तता चाचण्या घ्याव्या लागतात.
दीर्घकाल अल्पमात्रेत विषद्राव्य घेतल्याने काही परिणामांना सह्यता निर्माण होते (उदा., अफू, गांजा, अल्कोहॉल) परंतु विषाक्त परिणामांचा सह्यता न होता सुप्तपणे ते चालूच राहून संचयी विषाक्ततेने व्यक्तीचा मृत्यू ओढावण्याची शक्यता असते.
संपर्काच्या मार्गानुसार विषाक्ततेची प्रमुख लक्षणे बदलतात. औद्योगिक आणि परिसर विषांचा संपर्क त्वचा व श्वसनमार्गाशी येतो. त्यामुळे त्वचाशोथ (त्वचेची दाहयुक्त सूज), विवर्णता, काळवंडणे, अधिहर्षता (ॲलर्जी), श्वसनीदाह, फुप्फुसाची तंत्वात्मकता यांसारखी लक्षणे आढळतात परंतु मुखावाटे आत जाणारी विषे मात्र जठरदाह, ओकारी, जुलाब यांसारख्या लक्षणांनी सुरूवात करून नंतर शोषणोत्तर सार्वदेहिक परिणाम घडवतात. प्राण्यांना विविध मार्गांनी विष देऊन काढलेल्या वि. मा. ५० चे मूल्य निराळे असू शकते. उदा., पेंटाबार्बिटोनाची वि. मा. ५० ही मुखावाटे २५०, स्नायूत अंतःक्षेपण करून १२५, तर शिरेत अंतःक्षेपणाद्वारे ८० (मिग्रॅ. प्रती किग्रॅ., उंदरात) अशी आहे.
विषाक्ततेची तीव्रता कमीजास्त करू शकणाऱ्या अन्य काही घटकांमध्ये विषाची भौतिकी अवस्था (द्रव, घन, विद्रावाची संहती इ.), बरोबर घेतलेली इतर औषधे, विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) अथवा अन्नपदार्थ, पेये, व्यक्तीचे वय व वजन, आरोग्याची स्थिती आणि निद्रा किंवा जागृतावस्था यांचाही समावेश होतो.
ज्या रसायनांचा मानवाशी आनुषंगिक संपर्क होण्याची शक्यता असते, अशा द्रव्यांची सुरक्षित पातळी ठरवणे इष्ट असते. उदा., खाद्यपदार्थ समावेशक पदार्थ, पीडकनाशके, पशुवैद्यकीय व औषधांचे प्राणिजन्य खाद्यपदार्थात (दूध, अंडी, मांस) राहणारे अवशेष इत्यादी. वर वर्णन केलेल्या आलेखातील जी परिणामहीन मात्रा किंवा दृश्यपरिणामहीन पातळी असते, तिच्या सु. १०० ते १,००० पटींनी कमी अशी ही सुरक्षित पातळी ठेवली जाते.
विषाक्ततेच्या स्वरूपानुसार हा विभाजक १,००० पर्यंत असू शकतो.
पॅरासेल्सस यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच पदार्थ विषे असतात हे जरी खरे असले, तरी प्रत्यक्षात जेव्हा एखाद्या पदार्थापासून बराच अपाय होण्याची शक्यता असते तेव्हाच आपण त्याला विष म्हणतोय. या शक्यतेत पदार्थाची विषाक्तताजनक शक्ती (क्षमता) आणि ती आवश्यक अशा संहतीत मानवी संपर्कात येण्याची शक्यता या दोन्ही घटकांचा विचार केला पाहिजे. आधुनिक काळात सर्वच व्यक्तींच्या शरीरात शिसे, पारा, डीडीटी या पदार्थाचे सूक्ष्म लेश आढळून येतात परंतु यामुळे सर्वाना विषबाधा झाली आहे असे म्हणता येत नाही. मात्र अशा विषाक्तताहीन संहतीचा आढळ अभिज्ञान होणे (लक्षात येणे) आवश्यक असते. कारण त्यामुळेच वाढता संपर्क टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजून विषाक्तता टाळता येते.
विषारी पदार्थाचे वर्गीकरण : रासायनिक संघटनानुसार विषांचे अकार्बनी व कार्बनी असे दोन स्थूल वर्ग करता येतात. प्रत्येक वर्गाचे उपवर्ग पाडताना संघटनाबरोबरच त्यांची विषाक्तताही लक्षात घेणे सोईचे ठरते.
अकार्बनी विषे : (१) क्षरणकारी (झिजवणारी) तीव्र अम्ले, अल्कली आणि काही लवणे उदा., नायट्रिक, सल्फ्यूरिक, हायड्रोक्लोरिक अम्ले तसेच दाहक (कॉस्टिक) सोडा व पोटॅश, धुण्याचा सोडा, अमोनियम कार्बोनेट वगैरे.
(२) आयनीभवनामुळे (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन निर्माण होण्याच्या क्रियेमुळे) ज्यांच्यातील विषाक्त आयन स्वतंत्र होऊन ऊतकांवर क्रिया करतात अशी लवणे उदा.,विषाक्त धातू किंवा धात्वाभ देणारे मोरचूद (तांबे), झिंक सल्फेट (जस्त), सिल्व्हर नायट्रेट (चांदी), मर्क्युरिक क्लोराइड (पारा), सोमल (आर्सेनिक) शिसे, बेरियम, बिस्मथ व अँटिमनी यांची काही लवणे, त्याचप्रमाणे विषाक्त ॲनायन (धनायन) असलेली सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादींची आयोडाइडे, ब्रोमाइडे, फ्ल्यूओराइडे, क्लोरेट लवणे. यांशिवाय थॅलियम, मँगॅनीज, आर्साइन वायू (AsH3) आणि त्वचाविरंजक सौंदर्यप्रसाधनांतील अमोनिएटेड मर्क्युरी (HgNH2Cl) किंवा स्फोटके आणि फटाके यांतील फॉस्फरस, गंधक, मर्क्युरी सल्फोसायनाइड इ. संयुगांचाही या वर्गात समावेश करता येईल. आयनीभवन न होताही रेणूतील विषाक्त मूलद्रव्य हळूहळू कार्य करत राहते.
(३) श्वसनमार्गाचा दाह करूनश्वासरोधी (गुदमरवून टाकणारे) परिणाम करणारे वायू. (उदा., क्लोरीन, ब्रोमीन, फ्ल्यूओरीन, अमोनिया, सल्फर डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड वगैरे.
(४) श्वसनमार्गातून शोषले जाऊन ऊतकांवर अथवा रक्तावर परिणाम करणारे वायू. उदा., कार्बन मोनॉक्साइड, सायनाइड, कार्बन डाय-ऑक्साइड वगैरे.
(५) त्वचेशी सतत संपर्क आल्याने प्रतिजन म्हणून कार्य करून अधिहर्षता (ॲलर्जी) निर्माण करणारे धातू. उदा., निकेल, क्रोमियम, कोबाल्ट, बेरिलियम. यांपैकी काहीची कर्कजन्यता व उत्परिवर्तकताही (उत्परिवर्तन-जननिक द्रव्यात सापेक्षतः कायम स्वरूपी होणारा बदल घडवून आणण्याची क्षमताही) त्यांच्या विषाक्ततेत अंतर्भूत आहे.
कार्बनी विषे : अकार्बनी पदार्थाच्या तुलनेने कार्बनी पदार्थाचा विषबाधेतील आढळ आता जास्त प्रमाणात होत आहे. औषधे व औद्योगिक रसायने या दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्बनी पदार्थांचा व धातुयुक्त कार्बनी संयुगांचा वापर वाढल्याने हा बदल घडत आहे. कार्बनी विषांचे पुढील प्रमुख वर्ग आहेत :
(१) ॲसिटिक, ऑक्झॅलिक, सॅलिसिलिक, कार्बॉलिक (फिनॉल) इ. क्षरणकारी अम्ले.
(२) बेंझीन, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म, ॲसिटोन, एथिलीन ग्लायकॉल, अल्कोहॉल (मिथिल, एथिल व इतर), एथिलीन ट्राय आणि टेट्राक्लोराइड इ. प्रयोगशाळेतील व औद्योगिक विद्रावक.
(३) मिथेन, एथेन इ. वायू, तसेच औद्योगिक उत्सर्गातून बाहेर पडणारा सूक्ष्म कार्बनकणयुक्त धूर, मिथिल आयसोसायनेट, फॉस्जीन (COCl2) भूमिगत गटारातील वायूंची मिश्रणे. लेविसाइट व मस्टर्ड वायू यांसारखे युद्धवायू, तंत्रिका (नर्व्ह) वायू, अश्रुधूर इत्यादी. या सर्व वायूंचे श्वासरोधी व शोषणोत्तर असे दोन्ही प्रकारचे परिणाम होऊ शकतात.
(४) डीडीटी, बीएचसी (गॅमेक्झीन), आल्ड्रीन, डायएल्ड्रीन, एंड्रीन इ. हॅलोजनीकृत हायड्रोकार्बन कीटकनाशके.
(५) कार्बनी फॉस्फरस वर्गातील, कोलीनएस्टरेज या विकारावर प्रतिकूल परिणाम घडवणारी कीटकनाशके. उदा., डायझीनॉन (टिक -२०), डायक्लोरव्हॉस, पॅराथिऑन (फॉलिडॉल), आयसोफ्ल्युओरफेट किंवा डीफसी (डायआयसोप्रोपिलफ्ल्युओरोफॉस्फेट), टीईपीपी (टेट्राएथिल पायरोफॉस्फेट), एचईटीपी (C12H20O13P4), ओएमपीए (ऑक्टॅमिथिल पायरोफॉस्फोरामाइड) वगैरे. असाच परिणाम करणारे कार्बामेट वर्गातील क्लोरप्रोफाम.
(६) फ्युओरिनेटेड मूषकनाशके व पॅराक्वीटासारखी तणनाशके.
(७) बेंझीन व नॅप्थॅलीन यांपासून निर्माण केलेली रसायने.
(८) सर्प, विंचू, गांधील माशी, कृष्ण कोळी यांच्या दंशातील द्रव्ये आणि कँथॅरिडीस कीटक, कोळी यांसारखे प्राणी चिरडले असता बाहेर पडणारी त्वचादाहके यांसारखी प्राणिज विषे.
(९) वनस्पतिज विषांमध्ये विविध प्रकारचे जैव परिणाम घडवणारी द्रव्ये येतात. मुख्यतः हे पदार्थ असे : (अ) अल्कलॉइडे : मॉर्फीन (अफू), ॲट्रोपीन (बेलाडोना) व तत्सम पदार्थ (धोतरा), ट्यूबोक्युरारीन (क्यूरारी), निकोटीन (तंबाखू), ॲकोनाइट (बचनाग), कोनिइन (हेमलॉक). (ब) ग्लायकोसाइडे : डिजिटॅलिस, कण्हेर, बिट्टी. (क) इतर पदार्थ : सायनोजेन द्रव्य ॲमिग्डॅलिन (कडू बदाम), ओलिओरेझीन कॅनाबिनॉल (गांजा, भांग), जिजांटीन (रूई) यांशिवाय गुंजा, बिब्बा, बाजरीवरील अरगट निर्माण करणारी बुरशी, केसरी डाळ (लॅथिरीझम रोग) आणि पिवळा धोतरा (सूज येण्याची साथ) यांसारख्या अनेक वनस्पतींमधून कार्बनी विषे आढळतात. [⟶ वनस्पति, विषारी].
(१०) सूक्ष्मजंतूंपासून निर्माण होणारी विषे : घटसर्प, धनुर्वात, बोट्युलिनम विष इ. प्रभावी विषाक्त पदार्थ जंतूंपासून निर्माण होऊ शकतात [⟶ विषरक्तता].
विषाक्त क्रियेचे स्वरूप : सजीवांच्या ऊतकांवर विषारी द्रव्यांचे परिणाम घडवून आणणाऱ्या काही मूलभूत प्रक्रिया औषधवैज्ञानिक परिणामांना कारणीभूत असणाऱ्या क्रियांप्रमाणेच असतात. उदा., पुढे दिलेल्यांपैकी क्र. १ ते ४ प्रक्रिया. एकच द्रव्य अनेक प्रकारच्या प्रक्रियांमध्ये सहभागी होऊ शकते.
(१) विषारी रेणू अथवा त्यांच्या चयापचयातून (शरीरात सतत चालणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून) निर्माण झालेले सक्रिय (विक्रियाशील) रेणू जीवरासायनिक प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात उदा., कार्बन मोनॉक्साइड : हीमोग्लोबिनाशी संयोग होऊन ऑक्सिजन वहनात अडथळा नाइट्राइट, ॲनिलिन इ. : हीमोग्लोबिनाचे मेट्हीमोग्लोबिनामध्ये रूपांतर होऊन तोच परिणाम पॅराक्वीट : चयापचयाच्या प्रक्रियेत ऑक्सिजनाचे सुपर ऑक्साइडामध्ये मोठ्या प्रमाणात रूपांतर होते. कोशिकांना ही मूलके अत्यंत घातक असतात. फ्ल्युओरोॲसिटेट मूषकनाशक : कोशिकेतील क्रेवच्या आवर्तनात हे रेणू समाविष्ट केले जातात व त्यांचे रूपांतर फ्ल्युओरोसायट्रेटामध्ये होते.यालाच मारक संश्लेषण म्हणतात. कार्बनी फॉस्फरस कीटकनाशके : कोलीनएस्टरेज एंझाइमाशी संयोग होऊन त्याच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी ॲसिटिल कोलिनाच्या संहतीत वाढ होऊन त्याचे परिणाम दिसू लागतात. आर्सेनिक, पारा इ. : अनेक एंजाइमांच्या सल्फाहायड्रिल गटांशी संयोग होऊन त्यांच्या कार्यात अडथळा येतो. कधीकधी हे जीवरासायनिक अडथळे (दोषस्थळे) अपरिवर्तनीय असतात व प्रक्रिया पूर्णपणे बंद पडते. उदा., सायनाइड किंवा हायड्रोसल्फाइड ॲनायनांमुळे कोशिकांतर्गत श्वसनशृंखलेचे सूत्रकणिकेत घडून येणारे दमन.
(२) वर वर्णन केलेल्या क्रियांपेक्षा जास्त स्थूल पातळीवर ज्या औषधवैज्ञानिक क्रिया घडून येतात, तेथे म्हणजे विशिष्ट आकलकाशी (ग्राहीशी) संयोग होऊन काही विषाक्त क्रिया संभवतात. विषारी रेणूंमध्ये ग्राहीचे सक्रियण (अधिक क्रियाशील) करण्याचा म्हणजेच प्रचालक गुणधर्म आहे अथवा प्रतिरोधक (विरोधी) गुणधर्म आहे, यावर दृश्य परिणाम अवलंबून असतो. उदा., निकोटिन, एफेड्रीन, पायलोकार्पीन ही द्रव्ये प्रचालक आहेत तर ॲट्रोपीन, धोतरा, क्यूरारी हे प्रतिरोधक आहेत. विषाच्या शरीरातील वितरणशीलतेनुसार प्राकृत शरीरक्रियेमधील बदल मर्यादित अथवा सार्वत्रिक (व्यापक) असतात.
(३) काही विषाक्त परिणाम रासायनिक संघटन किंवा विशिष्ट ग्राहींशी बंधन यांपासून पूर्ण निरवलंबी असतात व केवळ भौतिकीय गुणधर्मांवर [लिपीड विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता), ऊष्मागतिक क्रियाशीलता (⟶ ऊष्मागतिकी) यांवर] आधारित असतात, असे दिसते. उदा., टेट्राक्लोरोएथिलीन व तत्सम औद्योगिक विद्रावक, नायट्रस ऑक्साइड, ईथर, क्लोरोफॉर्म इत्यादींमुळे निर्माण होणारी भूल किंवा एथिलीन ग्लायकॉल व तत्सम रसायनांच्या चयापचयातून निर्माण होणारे ऑक्झॅलेट स्फटिक व त्यांचा मूत्रमार्गावरील दाहक परिणाम.
(४) विशिष्ट इंद्रियांवर अथवा तंत्रांवर (संस्थांवर) क्रिया करून त्यांचे उद्दीपन किंवा संदमन (अवसादन) करणे. उदा., अफूचा तंत्रिका तंत्रावरील अवसादक परिणाम डिजिटॅलिस, कण्हेर यांची हृदयावरील विषाक्त क्रिया अरगटाचा गर्भाशय आणि रक्तवाहिन्यांवरील परिणाम कुचल्याच्या बीमुळे (स्ट्रिक्नीन) मेरूरज्जूचे उद्दीपन वगैरे.
(५) ⇨प्रतिपिंडनिर्मितीस उत्तेजन देऊन अधिहर्षता निर्माण करणे. सतत सूक्ष्म मात्रेमध्ये संपर्कात येणारे अनेक पदार्थ असा परिणाम घडवतात. प्रतिजनाच्या संपर्कात आल्यावर त्वचा, डोळे, श्वसनमार्ग यांवर परिणाम होऊन दीर्घकाळ लक्षणे दिसून येणे औद्योगिक कामगारांमध्ये त्रासदायक होत राहते परंतु याहून जास्त धोका ज्या व्यक्तींमध्ये प्रतिजनसंपर्कामुळे तीव्र प्रतिक्रिया निर्माण होऊन ⇨अपायिताजन्य अवसाद (आघात) होतो त्यांना असतो. कारण ही प्रतिक्रिया अगदी अनपेक्षित व कधीकधी प्राणघातक असू शकते. उदा., पेनिसिलीन अधिहर्षता, लशींना अधिहर्षता. जेव्हा विषाक्त प्रतिक्रिया काही व्यक्तींमध्ये आढळते आणि तिचा मात्रेशी संबंध नसतो, तेव्हा तिच्या मुळाशी अधिहर्षता असण्याची शक्यता नेहमी लक्षात घ्यावी लागते.
(६) कोशिकांतर्गत घटकांचा संपूर्ण नाश करून त्यांचे विद्रावण किंवा अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) प्रथिनी अवक्षेपात (साक्यात) रूपांतर होणे. तीव्र अम्ले, अल्कली किंवा क्षरणकारी लवणे यांमुळे हा परिणाम घडतो. त्यामुळे त्वचा अथवा श्लेष्मपटलावर व्रण तयार होतो. ही क्रिया वेदनाकारक असल्याने कधीकधी वेदनाजन्य (तंत्रिकाजन्य) अवसादाची स्थिती निर्माण होऊन व्यक्ती बेशुद्ध पडते. नष्ट झालेल्या ऊतकाच्या सभोवती तीव्र दाह आणि द्रव पदार्थांचा पाझर आढळतो. औद्योगिक क्षेत्रात विषारी पदार्थांच्या वाफांनी असा प्रकार घडू शकतो.
(७) कर्कजन्यता, जननिक उत्परिवर्तन आणि भ्रूणामध्ये विकृती हे परिणाम काही काळानंतर दिसून येतात. कर्कार्बुद (कर्करोगाची गाठ) निर्मितीस अनेक रसायने कारणीभूत आहेत, असे सिद्ध झाले आहे. उदा., व्हिनिल क्लोराइडे, बेंझिडीन, नॅप्थिल अमाइन, बटर यलो हा रंग, ॲफ्लाटॉक्सीन बी-१. इतर अनेक रसायने याबाबतीत अजून संशयास्पद आहेत. भ्रूणविकृती करणारे थॅलिडोमाइड हे पहिले ज्ञात द्रव्य. जननिक उत्परिवर्तन आणि कर्कजनन यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे अनेक हायड्रोकार्बनन रसायने या दोन्ही विषाक्ततांसाठी अभ्यासली जात आहेत.
विषबाधा : हानिकारक मात्रेत विषारी पदार्थाचा मानवाशी किंवा इतर सजीवांशी संपर्क होऊन त्यापासून विषाक्त परिणाम घडून येण्याच्या प्रक्रियेस विषबाधा असे म्हणतात. मुख्यतः पुढील कारणांनी ही प्रक्रिया सुरू होते.
अपघाती : विषारी पदार्थांचा संपर्क आकस्मिकपणे मोठ्या प्रमाणात खाद्यपेये, हवा यांमधून घडून येतो. उदा., भोपाळ येथील मिथिल आयसोसायनेट वायू दुर्घटना, केरळमधील फॉलिडॉल कीटकनाशक दुर्घटना.योग्य ती काळजी घेतल्यास असे प्रसंग टाळता येतात. लहान प्रमाणात अशा घटना औषधे व विषारी फळे वगैरेंच्या बाबतीत घडतात. मुलांपासून सुरक्षित अशी औषधवेष्टणे न वापरणे, चुकीच्या लेबलांचा वापर, मानसिक गोंधळाच्या अवस्थेत स्वतःची औषधे स्वतः घेणे इ. प्रभावांमुळे हे अपघात घडतात.विविध प्रकारच्या पदार्थांचा आढळ अपघाती विषबाधेत होतो, त्यामुळे निदान करणे सुरूवातीस कठीण जाते.
हेतूपूर्वक अथवा अपराधी : (अ) आत्महत्येच्या उद्देशाने किंवा इतरांना तशी भीती दाखवण्याच्या उद्देशाने विष घेणे. (आ) मनुष्यवधाच्या, प्राणिहत्येच्या किंवा तात्पुरती इजा करण्याच्या हेतूने इतरांना विष देणे. हे दोन वर्ग अपराधी विषबाधेत मोडतात. समाजाचे विषांबद्दलचे ज्ञान आणि त्यांची उपलब्धता मर्यादित असल्याने काही ठराविक विषेच या कामी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. उदा., झोपेची औषधे, कीटकनाशके, धोतऱ्याचे बी, प्रुसिक (हायड्रोसायानिक) अम्ल इत्यादी.
आनुषंगिक : मोठ्या प्रमाणात किंवा अपघाती विषबाधा न होण्याची काळजी घेऊनही औद्योगिक परिसरातून किंवा अन्नातून सूक्ष्म प्रमाणात विषारी पदार्थ शरीरात जाऊ शकतात. कामगारांच्या त्वचेतून शोषली जाणारी कार्बनी संयुगे, शिसे, पारा, खाद्यपदार्थांतील रंग, परिरक्षक पदार्थ व इतर समावेशक पदार्थ [⟶ खाद्यपदार्थ उद्योग], पर्यावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड, वाहनांच्या धुरातील कार्बन मोनॉक्साइड इ. उदाहरणांवरून हे स्पष्ट होईल. औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण आरोग्यविषयक दक्षता, प्रत्येक कामगारांची वैयक्तिक आरोग्यविषयक असलेली जाणीव व समज प्रचलित नियमांनुसार अनुज्ञेय प्रदूषण मर्यादा व त्यांच्या पालनाबद्दल आग्रह इ. घटकांनी आनुषंगिक विषबाधेचे प्रमाण ठरत वा नियंत्रित होत असते. अशा विषबाधेने एकंदरीत कार्यक्षमता आणि समाजाची मानसिक व शारीरिक आरोग्याची स्थिती धोक्यात येत असल्याने विषबाधेच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे जरूर ठरते.
विषबाधेचे परिणाम : पदार्थाचे विषाक्त परिणाम प्रकट होण्यामध्ये तीन प्रावस्थांमधील विविध घटकांचा सहभाग असतो. औषधिक्रियावैज्ञानिक परिणामातील औषधि-प्रावस्था, औषधिकेवलगतिकीय प्रावस्था आणि औषधिबलगतिकीय प्रावस्था यांच्याशी समांतर अशा या तीन प्रावस्था असतात.
विषसंपर्क प्रावस्था: विषाची रासायनिक घडण, भौतिकीय गुणधर्म, सोबत घेतलेली अल्कोहॉल किंवा तेलकट पदार्थ यांसारखे विद्रावक, विषमात्रा, अन्न इ. घटकांमुळे शोषणाचा वेग व श्वसनमार्ग, त्वचा इ. स्थानिक ऊतकांशी संपर्क टिकून राहण्याची शक्यता ठरत असते.योग्य ते प्राथमिक उपचार करून या प्रारंभिक अवस्थेत विषबाधेची तीव्रता टाळता येते.
विषकेवलगतिकीय प्रावस्था : जैव द्रवांमध्ये विषाचे होणारे शोषण व वितरण, यकृत आणि आंत्रामधील (आतड्यातील) चयापचय आणि यकृत, वृक्क, त्वचा इ. मार्गांनी उत्सर्जन यांवर विषाक्त रेणूंची विषलक्ष्य ऊतकांमधील संहती आणि संपर्क कालावधी अवलंबून असतात. या प्रावस्थेशी संबंधित इंद्रियांच्या कार्यक्षमतेस जर काही रोगांमुळे अथवा पूर्वीच असलेल्या विषाक्ततेमुळे बाधा आली असेल, तर विषाक्त परिणाम जास्त गंभीर होऊ शकतात. तसेच उपचारांना प्रतिसादही असमाधानकारक असतो. कुपोषण, निर्जलीभवन, बाल्यावस्था, वृद्धावस्था, व्यसनासक्ती आणि औषधोपचार घेत असलेले रूग्ण यांमध्ये अशी विपरीत शरीरक्रियात्मक परिस्थिती संभवते. तिला अनुसरून योग्य ते पूरक उपचार करणे अत्यावश्यक ठरते.
विषबलगतिकीय प्रावस्था : लक्ष्य ऊतकांवरील विषाक्त क्रिया वरील सर्व घटकांबरोबरच ऊतकांची संवेदनशीलता, पूर्वी विषसंपर्क झाल्याने निर्माण होणारी सह्यता, विषारी रेणूबरोबरच तत्सम परिणाम घडवणारे किंवा विरोधी इतर रेणूंचे शरीरातील अस्तित्व यांवर अवलंबून असते. विषबाधेवरील उपचारात सुरूवातीपासून शेवटपर्यंत या प्रावस्थेवर केंद्रित औषधयोजना चालू ठेवणे इष्ट असते.
विषबाधेची लक्षणे : तीव्र विषबाधेची लक्षणे (अ) स्थानिक किंवा विषसंपर्काच्या मार्गावरील आणि (आ) सार्वदेहिक अशी दोन प्रकारची असतात.
स्थानिक लक्षणे : स्थानिक परिणामांमध्ये क्षारक द्रव्यांमुळे तोंडाचा व आसपासच्या भागाचा होणारा दाह, व्रण, गिळताना होणाऱ्या वेदना, जठरदाहामुळे पोटात तीव्र शूळ, उलट्या, जुलाब यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे क्लोरीन किंवा अमोनियासारख्या वायूंमुळे श्वसनमार्गाचा दाह, खोकला, श्वसनीसंकोचामुळे (फुप्फुसांकडे जाणाऱ्या श्वासनालाच्या प्रमुख विभागांच्या संकोचामुळे) श्वासोच्छ्वासास अडथळा, धाप लागणे, खोकल्याबरोबर श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) बाहेर पडणे, फुप्फुसाची सूज ही लक्षणे आढळतात. कार्बनी विद्रावक आणि कीटकनाशकांसारखी विषारी द्रव्ये अथवा युद्धवायू त्वचेतून शोषले जात असताना कातडीचा उघडा असलेला भाग लाल होतो, त्याची आग होते व पूरळ अथवा मोठे फोड दिसू लागतात. दाहक वायू किंवा वाफांमुळे डोळ्यांतून पाणी वाहते, पापण्या घट्ट मिटून घेतल्या जातात आणि दीर्घकाल लाली व सूज टिकते. त्वचेवर एखाद्या ठिकाणीच विवर्णता किंवा फोड असल्यास कीटकदंश अथवा अन्य प्राण्यांच्या विषाची शक्यता विचारात घ्यावी लागते. आत्महत्येची शंका असल्यास त्वचेवर, विशेषतः प्रमुख नीलांच्या मार्गावर, अंतःक्षेपणाच्या (इंजेक्शनाच्या) खुणा आढळणे शक्य असते.
सार्वदेहिक लक्षणे : विषाच्या सार्वदेहिक परिणामाचे स्वरूप खूपच विविध प्रकारचे असू शकते. सौम्य विषबाधेच्या र ग्णांमध्ये अस्वस्थता, एकाग्रतेचा अभाव, अनिश्चित स्वरूपाच्या वेदना आणि लहान मुलांमध्ये वर्तनातील अचानक होणारे बदल यांमुळे विषाक्ततेची शंका येऊ शकते परंतु तिचे निश्चित स्वरूप विस्तृत वैद्यकीय तपासणीशिवाय आणि परिसर, खाद्यपेये, औषधे, व्यवसाय इत्यादींबद्दल पूर्वेतिहास मिळवल्याशिवाय कळू शकत नाही.
थोड्या तीव्रतर विषबाधेत विशिष्ट लक्षणे लवकरच दिसू लागतात. या लक्षणांनुसार स्थूलमानाने विषांचे पुढील प्रकार पाडले आहेत. विशिष्ट लक्षणांशिवाय काही समान लक्षणेही निर्माण होतात. उदा., रक्तदाब कमी होऊन सर्व इंद्रियांचा रक्तपुरवठा कमी होणे, मूत्रनिर्मिती कमी होणे, दीर्घकाळ श्वसनक्रिया अकार्यक्षम झाल्याने जंतुसंक्रामणाची शक्यता, बेशुद्धावस्था, ऊतकांची ऑक्सिजनविरहीततेमुळे हानी इत्यादी. हे सर्व परिणाम विषबाधेच्या जास्त प्रगत प्रावस्थेत आढळतात.
विषाक्त लक्षणांनुसार विषांचे पुढील प्रकार होतात : क्षरणकारक विषे : वर दिल्याप्रमाणे दाहक परिणाम घडवणारी तीव्र द्रव्ये सहसा फारशी शोषली जात नाहीत. त्यांचा परिणाम जठर, आंत्र व श्वसनमार्गापुरता मर्यादित राहतो. उलटीवाटे जठरातील द्रव्य बाहेर पडताना ते श्वासनालात शिरण्याचा धोका असतो. स्वरयंत्राला आतून सूज येऊन श्वास कोंडतो. नंतरच्या काळात जठराला छिद्र पडून त्यामुळे पर्युदरशोथ [⟶ पर्युदर], फुप्फुसाची सूज व त्याची तंत्वात्मकता आणि अन्ननलिकेत व जठरात अनेक ठिकाणी तंतुमय संकोच होऊ शकतो. जळजळणाऱ्या असह्य वेदनांमुळे निर्माण झालेला तंत्रिकाजन्य अवसाद व श्वासरोध यांमुळे मृत्यू ओढवतो. क्षरणकारक पदार्थ सौम्य संहतीमध्ये केवळ क्षोभक परिणाम घडवतात.
क्षोभक विषे : जड धातू, धात्वाभ, अधातू आणि वनस्पतिजन्य क्षोभकांचे तीव्र परिणाम मुख्यतः पचनमार्गावर होतात. तोंडाला पाणी सुटणे, घशाची व पोटाची आग, गिळताना दुखणे यांसारख्या तक्रारींबरोबरच उलट्या व जुलाबही सुरू होतात. त्यांतून श्लेष्मा, पित्त आणि रक्त पडते. हातापायांत पेटके येतात. रक्तदाब कमी होतो. त्यानंतर आकडी किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे निर्माण होऊन रोगी दगावतो. जड धातू व धात्वाम हळूहळू उत्सर्जित होत असल्याने दीर्घकालीन विषाक्तता आढळते व हळूहळू खंगून मृत्यू येण्याची शक्यता असते. या वर्गातील काही प्रमुख विषांचे विशिष्ट परिणाम असे आहेत : फॉस्फरस : यकृताचा वसापकर्ष आणि नंतर तीव्र पीत अववृद्धी म्हणजेच ऊतकमृत्यू [⟶ यकृत] आयोडीन : श्वसनमार्गाचा श्लेष्मशोथ आणि मूत्रमार्गाची जळजळ करणारी गडद रंगाची लघवी ब्रोमीन: सुस्ती, विस्मरण,मानसिक गोंधळ आर्सेनिक: तंत्रिकाशोथ, त्वचेवर पुरळ पारा: कावीळ, अमूत्रता, रक्तमूत्रता शिसे: पोटशूळ, बद्धकोष्ठ,मस्तिष्कशोथ, हातापायांचा अंगघात बेरियम: रक्तदाब वाढणे, हृदयाचे अनियमित स्पंदन जस्त: स्नायूंचे अनियमित आकुंचन, ज्वर.
वनस्पतिजन्य क्षोभकांमध्ये एरंडीचे बी व जमालगोटा यांमुळे मुरडा, जुलाब, निर्जलीकरण व त्यांमुळे दुर्बलता निर्माण होते. गुंजांमुळे रक्तदाबात घट व नाडीची अनियमितता आढळते. बाजरी अथवा रायसारख्या धान्यांवरील रोगांमुळे निर्माण होणारे अरगट रक्तवाहीन्यांचा संकोच करून ऊतकमृत्यूस (कोथास) कारणीभूत ठरते. रूईच्या चिकामुळे धनुर्वातासारखी आकडी होऊ शकते, बिब्बा हृदयाचे त्वरण आणि बेशुद्धी निर्माण करतो.
श्वसनविषे : यांपैकी जी क्षोभक असतात त्यांचे परिणाम वर दिलेच आहेत. यात अमोनिया, फॉस्जीन, क्लोरीन, सल्फर डाय-ऑक्साइड आणि युद्धात वापरली जाणारी डायफिनिलक्लोरोआर्सीनासारखी सूक्ष्मधूळ यांचा समावेश होतो. तीव्र श्वसनदाहाने श्वसनीसंकोच व श्वासरोध यांमुळे ऑक्सिजन अल्परक्तता होऊन कधीकधी मृत्यू ओढवू शकतो. क्षोभकेतर विषे मात्र रक्तात शोषली जाऊन जास्त गंभीर व त्वरेने परिणाम करतात. त्यांपैकी कार्बन डाय-ऑक्साइड व नायट्रस ऑक्साइड हे वायू मोठ्या प्रमाणात हवेत असले, तरच ते ऑक्सिजनाची उपलब्धता कमी करून ऑक्सिजनन्यूनता करतात. छातीत आवळल्यासारखे वाटणे, गरगरणे, अंग निळे पडणे आणि स्नायूंची दुर्बलता जाणवते. हीच स्थिती दीर्घकाळ टिकल्यास कष्टदाई श्वसन, अडखळती हालचाल, रक्तदाबन्यूनता व बेशुद्धी निर्माण होते. थोड्या संहतीमध्येही रक्तात प्रवेश करून असा परिणाम घडवणारे कार्बन मोनॉक्साइड आणि सायनाइड वायू (हायड्रोसायनिक अम्ल) हे मात्र त्वरित मारक ठरू शकतात. बेशुद्धावस्था, श्वसनाची अनियमितता किंवा पूर्ण स्थगन आणि हीमोग्लोबिनाच्या रूपांतरणामुळे त्वचेचा लालभडक रंग हे परिणाम दिसतात. कार्बन मोनॉक्साइड वायूचे प्रमाण कमी असल्यास अस्वस्थता, डोकेदुखी, गोंधळून जाणे, दृष्टी मंदावणे अशा प्राथमिक परिणामानंतर अंगघात व बेशुद्धी निर्माण होऊन २-३ तासांनी रुग्ण दगावतो. सायनाइडच्या बाबतीत हे एका तासाच्या आत होऊ शकते. या वायूंशिवाय मिथेन व हायड्रोजन सल्फाइड हे वायूही दीर्घकाळ बंद असलेल्या जागेत (गटारे, जुन्या विहिरी) प्रवेश केल्याने अशी बेशुद्धावस्था व मृत्यू आणू शकतात परंतु त्यांची मारकता कमी असल्याने लवकर मोकळी हवा मिळाल्यास रुग्ण वाचू शकतो. श्वसनविषांचे जास्त गंभीर परिणाम व्यक्ती झोपेत असताना, वायूचा वास किंवा सौम्य दाहकता लक्षात न आल्याने घडून येतात.
हृदय व अभिसरण तंत्रावरील विषे : डिजिटॅलिस, बचनाग, कुडची, कण्हेर, बिट्टी, तंबाखू ही द्रव्ये हृदयाची आकुंचनशक्ती व नियमित स्पंदशीलता यांवर विपरीत परिणाम करून रक्तदाब घटणे, डोळ्यांपुढे अंधारी, अल्पमूत्रता, नाडीचे क्षीण व अनियमित ठोके अशी लक्षणे दाखवतात. बहुतेक सर्व पदार्थ तोंडात कडवट चव, मळमळणे,उलटी, डोकेदुखी, पोटदुखी इ. सुरूवातीची लक्षणे निर्माण करतात व त्यामुळे पूर्वसूचना मिळते. बचनागाने तोंडाला बधिरता जाणवते, मुंग्या येतात आणि खूप घाम सुटतो. शेवटच्या अवस्थेत स्नायूंचे स्फुरण (स्नायुतंतूंचे अल्पकालीन अंगग्रही होण्याची क्रिया) होऊन कधीकधी आकडीसारखे झटके येऊन नंतर मृत्यू ओढवतो.
तंत्रिकाविषे : ⇨तंत्रिका तंत्राच्या विविध मागांवर क्रिया करणारी ही अनेक द्रव्ये सामान्यतः सुस्ती येणे, डोकेदुखी, गरगरणे अशा सौम्य लक्षणांपासून सुरुवात करून नंतर उन्मादवायू, बेशुद्धी, अंगघात, झटके येणे आणि श्वसनादी महत्त्वाच्या नियंत्रक केंद्रांचे अवसाद असे गंभीर परिणाम घडवतात. प्रकटीकृत होणाऱ्या ठळक विषाक्ततेनुसार त्यांचे पुढील उपवर्ग पडतात.
(अ) निद्राकारक : अफू व पेथिडीन या निद्राकारकांचे वेदनाशमन व गुंगी आणणे हे मुख्य गुण असून त्यांचे गाढ निद्रा, वरचेवर व मंद श्वसन, रक्तदाबात घट इ. परिणाम होतात. अफूने डोळ्यांच्या बाहुल्या संकोचून सूच्यग्र (सूईच्या अग्राएवढ्या सूक्ष्म) होतात, पेथिडीनने त्या विस्फारतात.
(आ) झिंग आणणारी द्रव्ये : अल्कोहॉल, कीटकनाशके, केरोसीन, पेट्रोल व नॅप्था शुद्धिहारक (संमोहक) औषधे क्लोरोफॉर्म, ईथर इ. क्लोरल हायड्रेट व बार्बिच्युरेटासारखी झोपेची औषधे. या विषांनी सुरूवातीस उत्तेजना व नंतर गुंगी असे दोन्ही परिणाम दिसतात.असंगत हालचाली व विचारशक्ती, बुद्धीभ्रंश ही वैशिष्ट्ये बहुतेक प्रसंगी आढळतात. पदार्थाचा विशिष्ट वास निदानास मदत करतो. कीटकनाशकांचे कोलीनधर्मी परिणाम हृदयांचे मंद ठोके, बाहुल्यांचे संकोचन, उलट्या, जुलाब, विविध स्त्रावांची वाढ या स्वरूपात दिसतात.
(इ) उन्मादवायुजनक : तंत्रिका तंत्राचे, विशेषतः मेंदूचे, उद्दीपन करून सुखभ्रम निर्माण करणाऱ्या औषधांच्या या वर्गात धोतरा, बेलाडोना यांसारखे कोलीनरोधी पदार्थ, कोकेन, ॲम्फेटामीन यांसारखे ॲड्रीनॅलीनधर्मी पदार्थ आणि भांगेच्या रोपापासून मिळणारी भाग, गांजा, चरस (हशिश), कॅनाबिनॉल ही व्यसनकारी द्रव्ये यांचा समावेश होतो. बाहुल्यांचे विस्फारण, हृदयाची धडधड, तोंड कोरडे पडणे, रक्तदाबात वाढ, मानसिक उद्दीपनाने उन्माद, झोप न लागता औषधाच्या तारेत राहणे यांसारखे परिणामही दिसतात.
(ई) मेरुरज्जू विषे : कुचल्याच्या बीमधील स्ट्रिक्नीन या द्रव्याने अंग ताठ होते. दातखीळ बसते व धनुर्वाताप्रमाणे झटके येतात.
(उ) परिघीय तंत्रिकानुवर्तनी विषे : क्यूरारी, कोनियम (हेमलॉक) यांसारख्या द्रव्यांनी स्नायूंची दुर्बलता, अंगघात असे परिणाम होऊन शेवटी श्वसनाच्या स्नायूंची हालचाल बंद पडून मृत्यू येतो.
विषबाधेवरील उपचार : सर्व प्रकारच्या तीव्र विषबाधेमध्ये रूग्णालयीन उपचार आवश्यक ठरतात. सौम्य विषाक्ततेमध्येही हेतुपूर्वक विषयोजनेची शंका आल्यास व्यक्तीला रूग्णालयात प्रविष्ट करून पोलिसांना कळवणे उचित ठरते. अन्न किंवा औषधातून विषबाधा अपघाती स्वरूपात घडली असली, तर त्याच पदार्थापासून इतरांना बाधा होऊ नये म्हणून योग्य त्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यास पोलिसांना मदत करावी.
उपचार योजनेची सर्वसाधारण उद्दिष्टे व दिशा पुढीलप्रमाणे असतात.
(१) विषसंपर्काची व त्याच्या रक्तातील शोषणाची प्रक्रिया त्वरित थांबवितात. विषारी वायू, त्वचेवर सांडणारे द्रव यांपासून रुग्णाला स्वच्छ वातावरणात हलवून त्वचा, डोळे इ. भाग पाण्याने धुवून काढले जातात. अंतःक्षेपण किंवा दंशातून विष आत गेले असल्यास त्या जागेच्या थोडी वर घट्ट आवळून पट्टी बांधतात व जरूर तर एकदोन छेद घेऊन विषमय रक्त वाहू दिले जाते.
पोटात विष गेले असल्यास वामकाच्या साहाय्याने उलटी करवून किंवा जठरनळी घालून पिचकारीने विषारी द्रव्य ओढून घेतले जाते व नंतर स्वच्छ पाण्याने जठर धुवून काढतात. रासायनिक परीक्षणासाठी [⟶ न्याय रसायनशास्त्र न्यायवैद्यक] हा भाग बंद बाटलीत जपून ठेवतात. वमनामुळे विष श्वसनमार्गात जाऊ नये म्हणून रुग्णाचे डोके व मान इतर भागांपेक्षा खालच्या पातळीवर ठेवून झोपवले जाते. तसेच बेशुद्धावस्थेत किंवा पेट्रेलियम रसायनांच्या बाबतीत वामके देणे टाळतात. चेहऱ्यावर पडलेले डाग व तोंडातील दाहक परिणामावरून क्षरणकारी विषाची शंका आल्यास जठरनळीही टाळली जाते. तिने पचनमार्गास इजा होऊ शकते.
(२) विषाच्या राहिलेल्या भागाची विषाक्तता शोषणपूर्व अवस्थेत कमी करतात. यासाठी बहुसंख्य विषांना निष्क्रिय करू शकणारे अविशिष्ट असे भौतिकीय व रासयनिक उतारे उपयोगी पडतात. जठर धुतल्यानंतर त्यात पोटॅशियम परमँगॅनेटचा सौम्य (१ : १,०००) विद्राव सोडून त्याने जठरातील अवशेष पुन्हा धुवून काढले जातात. ऑक्सिडीकरणाने बरीच विषे यामुळे निष्प्रभ होतात उदा., अल्काभे, बार्बिच्युरेट औषधे. विषाची अम्ल अथवा अल्क गुणधर्मांबद्दल माहिती असल्यास ⇨ उदासिनीकरणासाठी अनुक्रमे चुना, मॅग्नेशियम ऑक्साइड (मॅग्नेशिया), दूध किंवा टॅनिक अम्ल, व्हिनेगर यांसारखे पदार्थ वापरता येतात. सर्व पदार्थांसाठी उपयुक्त व अपायहीन असा एक उतारा लोकप्रिय आहे. त्यात सक्रियित (अधिक क्रियाशील) कोळशाची भुकटी २ भाग, टॅनिक अम्ल १ भाग व मॅग्नेशिया १ भाग असे मिसळून ते मिश्रण पाण्यात हालवून दिले जाते.
(३) विषाक्ततेच्या लक्षणांची तीव्रता कमी करणारे आधारदायक उपचार करतात. यात लक्षणे तीव्र असतील किंवा विषबाधा होऊन काही तास झाले असतील, तर वर दिलेल्या उपचारांत वेळ न घालवता श्वसनाचा मार्ग नळीने मोकळा ठेवणे, कृत्रिम श्वासोच्छ्वास, ऑक्सिजन, वेदनाहारक औषधे, रक्तदाबाची पातळी टिकवून ठेवणारी औषधे, शिरेतून लवणद्राव (सलाइन) व ग्लुकोज विद्रावाची संतत धार, आकडीचे झटके थांबवण्यासाठी तंत्रिकाशामक द्रव्ये (उदा., डायझेपाम) आणि अम्लरक्तता किंवा अल्करक्तता यासाठी आवश्यक विद्युत् वैश्लेषिक विद्राव याचा वापर सुरू केला जातो. त्यांना मिळणारा प्रतिसाद अजमावण्यासाठी वरचेवर तापमान, श्वसन, रक्तदाब, प्रतिक्षेपी चाचण्या इत्यादींची नोंद ठेवली जाते.
(४) विशिष्ट उतारे वापरून विषाची संहती कमी करतात किंवा क्रियास्थळी विषाक्त परिणामास रोध निर्माण करतात. हे उतारे आवश्यकतेनुसार पोटात किंवा शिरेतील अंतःक्षेपणाने रक्तात अथवा अन्य मार्गाने दिले जातात. त्यांमध्ये ईडीटीए, बीएएल यांसारख्या रासायनिक संयुगे निर्माण करणाऱ्या नखरी किंवा ग्राभजनक पदार्थांचा तसेच ॲट्रोपीन, निओस्टिग्मीन यांसारख्या औषधवैज्ञानिक ग्राहींवर परिणाम घडवणाऱ्या द्रव्यांचाही समावेश आहे. (कोष्टक पहा).
विशिष्ट विषारी पदार्थांवरील विशिष्ट उतारे | |
विष |
उतारा |
अल्काभ द्रव्ये |
टॅनिक अम्ल पोटॅशियम परमँगॅनेट |
ऑक्झॅलिक अम्ल |
चुना शिरेतून कॅल्शियम इंजेक्शन |
इतर अम्ले |
चुना, मॅग्नेशियम ऑक्साइड, दूध, अंड्याचा बलक |
अल्कली क्षरणकारके |
व्हिनेगर, दूध, सौम्य अम्ले |
आयोडीन |
सोडियम थायोसल्फेट स्टार्च |
आर्सेनिक, पार इ. धातुसंयुगे |
डायमरकॅप्रॉल |
शिसे |
सोडियम कॅल्शियम एडेटेटचे लवण |
ताम्र, पारा, जस्त, शिसे |
पेनिसिलामाइन |
लोह |
डेस्फेरी ऑक्समाइन |
थॅलियम |
प्रशियन ब्ल्यू |
बेरियम |
सोडियम किंवा मॅग्नेशियम सल्फेट |
सर्पदंश |
विशिष्ट सर्पविषांवरील लस बहुवारिक बहुशक्तिक प्रतिविष |
अरगट |
सोडियम निकोटिनेट अमील नायट्राइट |
कार्बन मोनॉक्साइड |
ऑक्सिजन रक्त सायटोक्रोम सी. |
सायनाइड |
डायकोबाल्ट एडेटेट मिथिलीन ब्लू सोडियम नायट्राइट आणि त्यापाठोपाठ सोडियम थायोसल्फेट |
डिजिटॅलिस, कण्हेर, बिट्टी |
ॲट्रोपीन पोटॅशियम क्लोराइड ईडीटीए |
तंबाखू |
ॲट्रोपीन नायट्राइट द्रव्ये |
अफू |
नॅलोक्सोन |
एथिलीन ग्लायकॉल, मिथिल अल्कोहॉल |
एथिल अल्कोहॉल |
कीटकनाशके (सेंद्रिय फॉस्फरस) |
ॲट्रोपीन प्रॅलिडॉक्साइम |
कीटकनाशके (डीडीटीसारखी) |
ॲट्रोपीन डायझेपाम |
धोतरा, बेलाडोना |
डायझेपाम निओस्टिग्मीन इसरीन |
क्यूरारी |
निओस्टिग्मीन |
कुचला |
डायझेपाम |
(५) विषाच्या उत्सर्जनाचा वेग वाढवून रक्तातील संहती विषाक्त पातळीच्या खाली आणतात. याकरिता रक्तदाबातील अवसादजन्य घट कमी करून आणि पुरेसे द्रव पदार्थ शिरेतून देऊन मूत्रनिर्मिती वाढविली जाते. यासाठी मूत्रल औषधांचाही उपयोग करतात. याशिवाय विषरक्तता गंभीर असल्यास व प्रतिसाद समाधानकारक नसल्यास रक्त ⇨अपोहन म्हणजेच कृत्रिम मूत्रपिंड यंत्राचा वापर करता येतो. ते उपलब्ध नसल्यास जास्त प्रदीर्घ असा पर्युदर अपोहन हा उपचार करून पाहतात. कोळशाची अधिशोषकता [⟶ अधिशोषण] आणि अपोहनाचे परिणामकारक तत्व यांचा संयुक्तपणे वापर करणारे लोणारी कोळसा रक्तनिवेशन हे तंत्र विकसित झाले आहे. त्यात सक्रियित कोळशाच्या कणांवर मानवनिर्मित बहुवारिकांचे लेपन केलेले असल्याने रक्ताच्या विषेतर घटकांवर विपरीत परिणाम होत नाही. आतड्यातील विषाचा निचरा करण्यासाठी सौम्य लवण रेचके वापरली जातात.
(६) यांशिवाय विषाच्या चयापचयामध्ये व्यत्यय आणून जास्त विषाक्त रसायनाची निर्मिती कमी करता येते. उदा., एथिल अल्फोहॉल वापरून मिथिल अल्कोहॉल किंवा एथिलीन ग्लायकॉलापासून होणारी विषाक्त द्रव्ये टाळता येतात. तसेच थायोसल्फेटाच्या साहाय्याने सायनाइडाचे चयापचयी निर्विषीकरण व मिथिओनीन किंवा ॲसिटिल सिस्टिनाच्या साहाय्याने पॅरासिटॅमॉलाचे त्याच प्रकारचे निष्प्रभीकरण जास्त जलद घडवून आणता येते. अशा प्रकारच्या क्रियांचा समावेश विशिष्ट उताऱ्यांमध्ये होतो.
विषबाधा प्रतिबंधक कायदे आणि विनियम : औद्योगिक क्षेत्रे,औषधोपचार आणि गुन्हेगारी यांतून निर्माण होणाऱ्या विषबाधेच्या वाढत्या शक्यता लक्षात घेऊन वेळोवेळी नियंत्रक नियम केले जातात. ते पुढील तीन प्रकारचे असतात.
कायदे: भारतात विषारी पदार्थांची आयात, ताब्यात ठेवणे वा साठविणे आणि विक्रीसंबंधी १९१९ मध्ये विष अधिनियम तयार झाले. त्यांत दिलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र राज्याचे १९७२ चे विष नियम सध्या अंमलात आहेत. या नियमांच्या अनुसूचीत विषांचे औषधी दृष्टीने उपयुक्त व उपयोगी नसलेली असे दोन वर्ग करून त्यांसाठी स्वतंत्र नियम आहेत. यांशिवाय औषध अधिनियम १९४० खालील औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ या नियमावलीच्या अनुसूची ‘ई’ मध्ये विषांची यादी व ‘एच’ मध्ये वैद्यकीय निर्देशपत्राशिवाय न विकण्याच्या औषधांची यादी आहे. पूर्वीच्या अफू अधिनियम आणि धोकादायक औषधे अधिनियम या कायद्यांची जागा आता १९८५ च्या मादक पदार्थ व मनोअनुवर्तनी (मनावर परिणाम करणारे) पदार्थ अधिनियम या कायद्याने घेतली आहे. या सर्व कायद्यांनी विषांची उपलब्धता बरीच नियंत्रित झाली आहे. भारतीय दंडसंहितेत पदार्थांच्या विषाक्त गुणापेक्षा जास्त महत्त्व ते देण्याच्या उद्देशाला (इजा करणे अथवा मृत्यू घडवून आणणे) दिले असून तद्विषयक शिक्षा कलम २८४, २९९, ३००, ३०४ अ, ३२६ आणि ३२८ मध्ये सांगितल्या आहेत.
विषाक्तता चाचण्यांचे बंधन : औद्योगिकीकरण झालेल्या सर्व देशांमध्ये औषधे, खाद्यपदार्थ समावेशके, पीडकनाशके, रसायने इ. जे जे पदार्थ मानवाच्या किंवा प्राण्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते, त्या सर्वांच्या विषाक्तता चाचण्या घेणे आवश्यक असते. पदार्थांच्या अपेक्षित वापरानुसार या चाचण्यांचे स्वरूप निरनिराळे असू शकते. चाचणीतील प्राण्यांचे प्रकार, त्यांची संख्या, कालावधी, ऊतक तपासणी, रक्ताची रासायनिक परीक्षा, तपासण्यांची वारंवारता इत्यादींबद्दल नियमांमध्ये स्पष्ट उल्लेख असतो. उदा., मानवामध्ये जर औषध एका वेळी फक्त एकच दिवस वापरावयाचे असेल, तर उंदीर व घुशींमध्ये त्याची दोन आठवडे चाचणी घ्यावी लागेल तेच जर एक महिन्यापेक्षा जास्त काळ घ्यावयाचे असेल, तर चाचणी ६ ते १२ महिने चालू राहील. याशिवाय सुरक्षित ठरलेल्या औषधांच्या मानवी चाचण्या (चिकित्सीय चाचण्या) ४ किंवा ५ प्रावस्थांमध्ये घेतल्या जातात. त्यांची दीर्घकालीन आणि विविध जनसमूहांमध्ये सुरक्षितता सिद्ध व्हावी लागते. गर्भिणींना देण्याच्या औषधांच्या भ्रूणविकृती आणि जननिक उत्परिवर्तन या परिणामांसाठी चाचण्या घेतल्या जातात.
पीडकनाशके व औद्योगिक रसायनांच्या बाबतीत इतर चाचण्यांबरोबरच परिसरात त्यांचे अवशेष टिकून राहण्याची कालमर्यादा अभ्यासली जाते.
विषाक्त संपर्क टाळण्यासाठी नियम :विषारी पदार्थांची निर्मिती, साठवण, परिवहन वगैरे औद्योगिक क्षेत्रातील विविध कार्यांमध्ये संपर्काची तीव्रता कमी करण्याचे उपाय, अपघाती संपर्काची सूचना देणारी यंत्रणा, प्रथमोपचाराचे साहित्य, आवश्यक ते उतारे आणि त्यांच्या वापराचे प्रशिक्षण आवश्यक ठरते. कारखाने अधिनियमांमध्ये त्याची तरतूद केलेली असते. इतर क्षेत्रांमध्येही या प्रकारच्या सूचना छापील स्वरूपात देणे इष्ट असते. उदा., शेती, छोटे उद्योगधंदे, घरगुती वापरातील रसायने वगैरे.
विषविज्ञानातील काही महत्त्वाची क्षेत्रे : औद्योगिक विषसंपर्कामुळे होणाऱ्या काही दीर्घकालीन विकारांचा वाढता अभ्यास आता होत आहे. त्वचेची अधिहर्षता, विवर्णता, मुरूम आणि श्वसनी दमा, श्वसनमार्गाचा शोथ (दाहयुक्त सूज), फुप्फुसाची तंत्वात्मकता यांचा समावेश त्यांत होतो. परिसरास घातक अशी क्षेप्यद्रव्ये सुरक्षितपणे नष्ट करण्याची नवी तंत्रे आता विकसित होत आहेत. सायनाइडाच्या दहा हजारपट विषारी असे डायॉक्सीन नष्ट करण्याची १९८३ च्या सुमारास उद्भवलेली समस्या हे याचे ठळक उदाहरण आहे. विल्हेवाट लावण्यासाठी घातक रसायने समुद्रात सोडणे, जमिनीत पुरणे, सागरी नौकांवर उच्चतापमानाच्या भस्मीकारकांमध्ये जाळून टाकणे, रासायनिक प्रक्रिया करणे किंवा सूक्ष्मजैविक संस्करणांनी त्यांना निष्क्रिय करणे अशा अनेक पद्धती आहेत. त्या पद्धतींमधील धोके नियंत्रित करणे औद्योगिक विषविज्ञानातील संशोधनाने बऱ्याच अंशी शक्य झाले आहे.
खाद्यपदार्थांमधील विषाक्तता प्रक्रिया उद्योगातील समावेशकांमुळे होऊ शकते. ती कमी करत असतानाच खाद्यांची स्वीकारणीयता कमी होऊ न देण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. अमेरिकेत सायक्लेमेट आणि सॅकॅरीन यांसारख्या साखरेला पर्यायी द्रव्यांबद्दल बरेच वादंग होऊन गेले आहेत. समावेशक पदार्थ अत्यल्प प्रमाणात वापरले जात असले, तरी चयापचयात अथवा उत्सर्जनात दोष असलेल्या व्यक्तींमध्ये ती संचित विषाक्तता निर्माण करू शकतात. भेसळीमुळे होणारी अन्नविषबाधाही गंभीर समस्या ठरू शकते. उदा., मध्य भारतातील मोहरीच्या तेलात पिवळ्या धोतऱ्याचे तेल मिसळल्याने हृदयविषाक्तताजन्य सुजीच्या साथी, स्पेनमध्ये खाद्य तेल शुद्धीकरणाच्या प्रयत्नांतून उद्भवलेला लक्षणसमुच्चय. यांशिवाय काही अन्नपदार्थ मुळातच विषाक्त असूनही नाइलाजाने किंवा अनावधानाने प्रमाणाबाहेर खाल्ले जातात. उदा., केशरी डाळीमुळे होणारा लॅथिरिझम नावाचा पक्षाघात, सरकीमधील गॉसिपॉलाची विषाक्तता, सागरी अन्नातील शेलफिश आणि काही अळिंबे मस्कॅरीनयुक्त असल्याने त्यांचे दुष्परिणाम. या सर्वांच्या अभ्यासातून संशोधनात उपयुक्त अशी जैव द्रव्ये (संधोधन साधने) मिळाली आहेत.
पीडकनाशकांच्या अभ्यासातून त्यांची जैव आवर्तने व डीडीटीसारख्या कीटकनाशकांची जैवविवर्धनांमुळे होणारी संहतिवृद्धी याबद्दल माहिती मिळते. डीडीटीची संहती प्राण्यांच्या भक्षण (अन्न) शृंखलेमुळे सूक्ष्म एककोशिकीय जीव, कीटक, लहान मासा, मोठा मासा व मानव अशी चढत्या क्रमाने वाढते. वसा ऊतकात दीर्घकाळ अवशेष दाखवणाऱ्या व अतिमंद उत्सर्जनक्रिया असणाऱ्या (उत्सर्जनाचे अर्धायू ३.७ वर्षे) या द्रव्यासारख्या पदार्थांच्या बाबतीत वार्षिक स्वीकरणीय ग्रहण पातळी ठरवून (उदा., डीडीटी दरसाल २२५ मिग्रॅ.) ती ओलांडली जात नाही हे पाहणे कठीण असले, तरी दीर्घकालीन प्रतिबंधक उपाय म्हणून ते आवश्यक ठरते.
पशुवैद्यक : पशुवैद्यकीय विषविज्ञानात पूर्वी दिलेली सर्व तत्वे सामान्यतः लागू पडतात. प्राण्यांनी चुकून विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे किंवा पीडकनाशकांचे अथवा रंगाचे डबे चाटल्यामुळे अपघाती विषबाधा होते. तसेच पर्यावरणातील विषारी धूर व धूळ कुरणांवर बसल्यामुळे निष्काळजीपणे बुरसट किंवा कुजलेले धान्य आणि फवारा मारलेले गवत गुरांना चारल्यामुळे, अथवा कोंबड्यांच्या किंवा अन्य पक्षांच्या खुराड्यात स्तर म्हणून प्रदूषित भुसा पसरल्याने मानवनिर्मित अपघात होतात. यांशिवाय हेतुपूर्वक दुसऱ्याच्या कुत्र्यांना वा गुरांना खाण्यातून विष देऊन मारले जाते किंवा बांबूच्या तीक्ष्ण टोकाला विषारी पदार्थ माखून ते त्वचेतून किंवा गुदद्वारातून शरीरात भोसकून विषप्रयोग होऊ शकतो.
पोटात गेलेल्या विषाचा परिणाम रवंथ करणाऱ्या प्राण्यांत उशिरा व सौम्य होतो. घोड्यासारख्या प्राण्यांना उलटी होत नसल्याने विष बाहेर पडू शकत नाही. सर्व बाबतींत विषारी लक्षणे आणि त्यांवरील उपचार बव्हंशी मानवाप्रमाणेच असतात. दुधात किंवा मांसात विषाचे अवशेष येऊ शकतात. त्यांपासून मानवी विषबाधाही संभवते [⟶ जंतुविषरक्तता].
पहा : विषतंत्र विषरक्तता.
संदर्भ : 1. Ariens, E, J. Simonis, A. M. Offermeier, J. Introduction to GeneralToxicology, London, 1976.
2. Cooper, P. Poisons by Drugs and Chemicals, Plants and Animals, London, 1974.
3. Hathway, D. E. Molecular Aspects of Toxicology, London, 1984.
4. Parikh, C. K. Parikh’s Textbook of Medical Jurisprudence andToxicology, Bombay, 1990
5. Poole, A. Leslie, G. B. A Practical Approach to ToxicologicalInvestigations, Cambridge, 1989.
6. Proudfoot, A. T. Diagnosis and Management of Acute Poisoning Oxford, 1982.
7. Ready, K. S. N. Essentials of Forensic Medicine and Toxicology,Hyderabad, 1990.
8. Timbrell, J. A. Principles of Biochemical Toxicology,London, 1982.
9. Timbrell, J. A. Introduction to Toxicology, London, 1989.
10. Vale, J. A. Meredith, T. J., Eds., Poisoning-Diognosis andTreatment, London, 1981.
श्रोत्री, दि. शं.