ल्यूकाक्स, ड्यर्डी : (१३ एप्रिल १८८५- ४ जून १९७१). हंगेरियन साहित्यसमीक्षक, बूडापेस्ट येथे एका संपन्न ज्यू कुटुंबात जन्मला. १९१८ साली त्याने हंगेरियन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व घेतले. १९१९ साली हेंगेरियन कम्युनिस्ट पक्षाची अल्पकालीन राजवट संपुष्टात आल्यानंतर तो व्हिएन्ना येथे जाऊन दहा वर्षे राहिला.

‘हिस्टरी अँड क्लास कॉन्शसनेस’ (१९२३, इं. शी.) ह्या आपल्या ग्रंथात त्याने साहित्य आणि वर्गलढ्याचा इतिहास ह्यांच्यातील नाते दाखवून देण्याचा प्रयत्न केला. १९२९-३३ ह्या कालखंडात त्याचे वास्तव्य मुख्यतः बर्लिन येथे होते. १९४५ साली तो हंगेरीत परतला. हंगेरीतील संसदेचे सदस्यत्व त्याला मिळाले. तसेच बूडापेस्ट विद्यापीठात त्याने सौंदर्यशास्त्राचे अध्यापनही केले. १९५६ मध्ये हंगेरीत झालेल्या उठावात तो सहभागी होता. त्याला अटक करून रूमानियात हद्दपार करण्यात आले. १९५७ मध्ये बूडापेस्ट येथे परतण्याची परवानगी त्याला देण्यात आली. त्यानंतर त्याने समीक्षापर, तात्त्विक ग्रंथलेखनात आपला काळ व्यतीत केला. त्याने तिसाहून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. एक मार्क्सवादी सौंदर्यशास्त्र उभे करण्याचा प्रयत्न त्याने आपल्या लेखनातून केला. कलावंतांवर राजकीय नियंत्रण असावे, हे त्याला मान्य नव्हते बूडापेस्ट येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.