लल-द्यद :(सु. १३३५-८४).गूढवादी काश्मीरी शैव परंपरेतील संत कवयित्री. लल्ला दिदी, लल्लयोगीश्वरी, लल्लेश्वरी, लल-द्यद वा लला-आरिफ( साक्षात्कारी लला) इ. नावांनीही ती प्रसिद्ध आहे. तिचा जन्म श्रीनगरच्या आग्नेयीस सु. ६ किमी. वर असलेल्या पांद्रेठन (पूर्वीचे पूरणाधिस्तान ) या गावी, तत्कालीन जातीयतेच्या प्रभावाखाली असलेल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच तिच्या अलौकिक बुद्धिमत्तेची चमक दिसून येत होती. पांपूर येथील एका जवळजवळ मंदबुद्धी असलेल्या ब्राह्मण मुलाशी तिचा बालपणीच विवाह झाला तिची सासूही खाष्ट, अडाणी व छळ करणारी होती. विवाहानंतर तिला खूपच छळ सोसावा लागला.सासरच्या ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे तिला विरक्ती आली आणि मनाने ती संसारात राहूनही त्यापासून अलिप्तपणे जीवन कंठू लागली. अखेरीस तिने सर्वसंगपरित्याग करून ‘त्रिक’ मताचे पुरस्कर्ते शैव आचार्य सिद्ध श्रीकंठ यांच्याकडून दीक्षा घेतली. तेथे तिने योगाचीही सखोल साधना करून आत्मसाक्षात्कार करून घेतला. नंतर ती आपल्या शैव त्रिक मताच्या तत्त्वज्ञानाचा इस्लामी सूफी धर्मप्रचारकांसमवेत वादविवाद करून प्रचार करीत सर्वत्र भटकू लागली. प्रख्यात सूफी संत हजरत शाह हमदानबरोबर ती वादविवाद करू लागली. सूफी व शैव ह्या दोन धार्मिक तत्त्वज्ञानांच्या वैचारिक मंथनातून शैव व इस्लाम यांच्या समन्वयाचे उदात्त नवनीत बाहेर आले आणि अशा प्रकारे ती धार्मिक मानवतावादाचा पुरस्कार करणारी आद्य संत कवयित्री ठरली.तिचा हा धार्मिक मानवतावाद काश्मीरी संस्कृतीचे मूलतत्त्व म्हणून तेव्हापासून ते आधुनिक काळापर्यंत टिकून होता. तिने सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेचा व उपासनांचा त्याग केला, तसेच अर्थशून्य कर्मकांड आणि नीतीशून्य धार्मिक समारंभ व उत्सव यांनाही कडवा विरोध केला. श्रीनगरजवळील विजबेहरा गावी तिचे निधन झाले.

तिच्या जीवनाबाबत अनेक आख्यायिका रूढ असून, त्यांतून तिच्या एक श्रेष्ठ संत म्हणून असलेल्या विशुद्ध चारित्र्यावर चांगला प्रकाश पडतो. आजही तिची गणना ईश्वरी शाक्षात्कार झालेली श्रेष्ठ संत कवयित्री व उच्च आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून काश्मीरातील सर्वच हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या आदराने करतात.

काश्मीरच्या संस्कृतीवर व साहित्यावर तिचा विलक्षण प्रभाव पडलेला आहे. तिने ज्या ‘वाख्’ ह्या काव्यप्रकारात आपली रचना केली, तो काव्यप्रकार आज जरी प्रचलित नसला, तरी तिच्या रचनेचा प्रभाव तत्कालिन व नंतरच्या काश्मीरी साहित्यावर खूपच पडला. ‘वाख्’ (संस्कृत वाक्य) ह्या कव्यप्रकारातील रचना चार ओळींचे कडवे अशी असून, सर्वसाधारणपणे त्यात ‘अबअब’,‘अबकब’, ‘अबअक’ अशा प्रकारे यमकयोजना केलेलली असते. संथ लय व लवचिकता त्यात पुरेपूर असते. तिच्या वाख् रचना प्रदीर्घ काळ विखुरलेल्या व असंपादित स्वरूपात होत्या व त्या मौखिक परंपरेने लोकांनीच जतन करून ठेवल्या होत्या. पंडीत भास्कर राझदान यांनी ‘काश्मीर रिसर्च डिपार्टमेंट’च्या वतीने तिच्या ६४ वाख् रचना परिश्रमपूर्वक संकलित करून व त्यांचे संस्कृतमध्ये भाषांतर करून ते संकलन सर्वप्रथम प्रसिद्ध केले ( १९१८). नंतर प्रा.ब्यूलर, सर जॉर्ज ग्रीअर्सन, सर रिचर्ड टेंपल, आनंद कौल, बमझाय, सर्वानंद चरघी, ए. के. वांचू प्रभृतींनी काश्मीर खोऱ्यात सर्वत्र फिरून लल्ला-वाख्‌चा शोध घेऊन त्या रचना संकलित केल्या. आजमितीस तिच्या शेकडो वाख् रचना उपलब्ध आहेत. अर्थातच आजवर प्रसिद्ध केल्या गेलेल्या संग्रहात इतर कवींनी रचलेल्या कडव्यांचीही सरमिसळ झाली असावी, अशी रास्त शंका घेण्यास बराच वावही आहे.‘लल्ल-वाख्’ची अगदी अलीकडील आवृती १९६१ ची असून ‘कल्चरल अकॅडेमी ’ने प्रकाशित केली आहे. प्रा. जे. एल्. कौल यांनी ती संपादित केली असून प्रा. एन्.एल्.तालिब यांनी केलेले उर्दू भाषांतरही तीत आहे.

लल-द्यदच्या वाख्‌रचनेला वैश्विक परिमाण लाभले आहे. आजही सर्वच स्तरांतील हिंदू-मुसलमानांच्या जिभेवर तिच्या पक्ती घोळताना दिसतात. तिच्या गूढानुभूतीतील प्रामाणिकपणा, तळमळ, रचनेतील अवीट गोडी, तरल संवेदनशीलता, समर्पक रूपक-उपमांच्या आश्रयाने अभिव्यक्त झालेली सखोल भावना, कोटोकोर प्रतिमा-प्रतीके, शब्दकळेतील ओजस्विता व सर्वांच्या ह्रदयाला जाऊन भिडण्याची त्यातील शक्तीआजवरच्या काश्मीरी काव्यात क्वचितच पहावयास मिळते. दांभिकता, बाह्य कर्मकांड व मूर्तिपूजा यांविरुद्ध तिने आवज उठवला. ती केवळ ईश्वरी साक्षात्कार झालेली गूढवादी संतच नव्हती तर काश्मीरी काव्याची आद्य व श्रेष्ठ शिल्पकारही होती.

तिच्या रचनेत शैव-त्रिक तत्वज्ञान, योग तत्वज्ञान व सूफी तत्वज्ञान यांतील अनेक संज्ञा आलेल्या आहेत.उच्चतर आध्यात्मिक सत्याची त्यातून अत्यंत समर्पक, काटेकोर व मधुर अभिव्यक्ती झालेली दिसते. सर्वच धर्माना समान असलेल्या तत्त्वांचा व विचारांचा त्यात प्रत्यय येतो. शैव मत, वैष्णव मत, योग मत व इस्लाममधील सूफी मत यांतील समन्वय दिसून येतो. गूढवादी भावीगीतात्मकतेची धारा तिच्या रचनेत सुरू झालेली दिसते. सर्वोच्च परमेश्वराविषयीच्या उक्तट भक्तिभावाने ती ओतप्रोत आहे. आत्मनिष्ठा व वस्तुनिष्ठा यांचा उच्च कलात्मक आविष्कार तीत आढळतो. काशीरी काव्यात लल-द्यदच्या रचनेने उक्तट भाव व्यक्त करणाऱ्या भावगीतांची जी परंपरा निर्माण केली, ती पुढे ⇨ दृब्बा खातून व अरणिमाल यांच्या भावोत्कट विहरगीतांत परिणत झाली. ह्या गूढवादी भावगीतपरंपरेचा आधुनिक काळातील परमोत्कर्ष ⇨ मास्टरजी ऊर्फ झिंदा कौल ( १८८४-१९६६) यांच्या आध्यात्मिक मानवतावादात झाल्याचे दिसते.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Barnett. I. D. Lalla-Vakyani, London, 1920.

           2. kaul, J. L. Lall-Dyed, Delhi, 1972.

हाजिनी, मोही-इद्यीन(इं.) सुर्वे, भा. ग. (म.)