रिक्सिया : सामान्य भाषेत ही एक ⇨शेवाळीपैकी क्षुद्र वनस्पती म्हणून ओळखली जाते. शेवाळीपैकी मार्केन्शियेलीझ [⟶ यकृतका] या गणात (व रिक्सियेसी कुलात) हिचा अंतर्भाव होतो. ओलसर जमिनीवर लहान दाट ठिपक्याप्रमाणे ही सर्वत्र उगवते. पावसाळ्यात विशेषेकरून दमट भिंतीवर ही आढळते. काही जाती साचलेल्या पाण्यावर तरंगतात. रिक्सियेसी कुलात फक्त तीन प्रजाती व सु. १४० जाती आहेत. रिक्सिया हे प्रजातीचे नाव असून तीत सु. १२५ ते १३० जाती आहेत, पैकी भारतात सु. १८ जाती आढळतात. रिक्सिया प्लुइटॅन्स पाण्यात वाढते. भारतात रि. डिस्कलर सामान्यपणे जमिनीवर आढळते. उघड्या ठिकाणी हिवाळ्यात व उन्हाळ्यात ती क्वचितच दिसते. हिचे सपाट, द्विशाखाक्रमी कायकाम शरीर [अतिशय साधे व निरवयवी शरीर ⟶ कायक वनस्पति], गंतुके−प्रजोत्पादक पुं-व स्त्री कोशीका (पेशी)−निर्माण करणारे म्हणून गंतुकधारी, हिरवे व जाड असून सूक्ष्म खवल्यांनी आणि मूलकल्पांनी (मुळावरील केसासारखा उपांगांनी) ते जमिनिशी घट्ट चकटले असते व चक्राकृती पसरते, त्याच्या वरच्या बाजूस खोलगट मध्यशिरेसारखी खोबण असते. बहुधा अशा कायक प्रकारच्या शरीराचे गोलसर आणि सु. २·५ सेंमी. व्यासाचे पुंजके (गुच्छ) असतात. काही मूलकल्प मूलरोमाप्रमाणे (मुळांवरील केसांप्रमाणे) असून काहीत त्यात बाजूच्या आवरणावर आत वाढलेल्या सूक्ष्म खुंट्या असतात. या कायकाचा उभा छेद सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यास त्यातील भिन्न कोशिकांचे थर दिसतात. वरच्या पृष्ठभागात सर्वांत बाहेरचा थर (अपित्वचा) व त्याखाली हरितकणुयुक्त अलेक कोशिकांच्या उभ्या रांगा असलेला मोठा जाड थर असतो ह्या रांगांतून वायुकोटरे असतात. तसेच त्यांचा बाहेरील हवेशी संबंध अपित्वचेवरील अनेक छिद्रांद्वारे (वायुरंध्रांद्वारे) राहतो. कायकच्या खालच्या पृष्ठावर बाजूस अनेककोशिक खवले (शल्क) व मधल्या भागात मूलकल्प असतात. पृष्ठाखालच्या भागात अनेक साध्या जिवंत कोशीकांचा (मृदूतकाचा) भरणा असतो त्यामध्ये संचित अन्नद्रव्य असते त्यावरच्या हरितकणुयुक्त कोशिकांच्या थरांत अन्ननिर्मिती होते.
प्रजोत्पादन : (१) शाकीय पद्धतीने व (२) लैंगिक प्रकाराने प्रजोत्पादन घडून येते. (१) शाकीय पद्धतीत कायकाचा टोकाकडील भाग वाढत राहून मागील भाग नाश पावतो. त्यामुळे त्याच्या शाखा अलग होऊन प्रत्येक शाखेपासून नवीन वनस्पती वाढते. खालच्या पृष्ठभागापासून नवीन आगंतुक शाखा निर्माण होऊन त्यांच्यापासून नवीन वनस्पती बनतात. आधीच्या वर्षांतील शरीराची जिवंत टोके नवीन नवीन कायक उत्पन्न करतात. कायकांपासून सूक्ष्म गाठीसारखे अवयव बनतात व त्यांच्यापासून नवीन कायक बनतात. मूल कल्पांच्या टोकास सूक्ष्म मुकुलिका (कळ्यांसारख्या गाठी) बनतात आणि नवीन कायकांची उत्पत्ती करतात.
(२) लैंगिक प्रकारचे प्रजोत्पादन सर्वसाधारणपणे ⇨यकृतकांत वर्णन केल्याप्रमाणे असते. रिक्सियाच्या काही जाती विभक्तलिंगी व काही एकत्रलिंगी आहेत. गंतुकाशयांचे स्थान कायकात सामावलेले असून त्यांची छिद्रे पृष्ठभागावर मध्यशिरेजवळ असतात. त्यांचा विकास पृष्ठावरच्या एका कोशिकेपासून अग्रवर्धी क्रमाणे होतो (टोकाकडे सुरू होऊन तळापर्यंत चालू राहतो). रेतुकाशयातून द्विकेसली रेतुके बाहेर पडून अंदुककलशातील अंदुकाकडे बाहेरील पाण्यातून पोहत जाऊन अंदुकांशी एकरूप होतात व फलन होते आणि द्विगुणित रंदुक बनते. येथे बीजुकधारी अवस्था सुरू होते. त्यानंतर रंदुकाच्या समविभागणीने एक अनेककोशिक गोळा बनतो, त्याच्या बाह्यकोशापासून (बाहेरील वंध्य कोशिकांपासून) बीजुजनक कोशिका आणि पोषक कोशिका बनतात. अर्धसूत्रण विभाजनाने [⟶ कोशिका] बीजुजनक कोशिकांपासून बीजुकांच्या चौकड्या (चतुष्ट्ये एक पुंज बनतो, ती बीजुके एकगुणित असून त्यांच्याभोवती प्रथम थोडा वेळ बाहेरील आवरण असते. येथे गंतुकधारी (एकगुणित) अवस्था सुरू होते. बीजुके पुढे सुटी होतात, बीजुकांनी पुढे सुटी होतात, बीजुकांनी भरलेल्या (आणि मूळच्या गंतुकधारीतच शेवटपर्यंत स्थिर राहिलेल्या) बीजुकाशयाला ‘बीजुकधर’ म्हणतात. हा पूर्ण पक्व होते वेळी बाह्यकोशापासून बनलेले आवरण व अंदुककलशाच्या दोन आवरणांपैकी एक ही सर्व नाशाप्रत गेली असून फक्त अंदुककलशाचे बाहेरचे आवरण व गंतुकधारीची ऊतके बाकी राहतात. सर्व शेवाळींत हा अत्यंत साधा व अप्रभेदित म्हणता येईल परंतु संपूर्ण पक्वावस्थेत त्यात एकही द्विगुणित कोशिका नसते. सर्वच भागांचे विच्छेदन होऊन बीजुके वाऱ्याने विखुरली जातात. ओलावा व योग्य हवामान मिळाल्यास बीजुक रुजून त्यातून लहान तंतू बाहेर येतो व त्याचा विकास कायकात होतो. रिक्सियाच्या कुलातील बहुतेकांचे जीवनचक्र याप्रमाणेच असते. शरीर व त्याचे भाग यांसारख्या किरकोळ बाबतींत काही फरक असतात. मार्केन्शियेलीझ गणातील हे कुल ऱ्हासित असावे असे मानतात परंतु बहुसंख्य तज्ञांच्या मते याच्या उलट प्रकार असणे अधिक शक्य आहे. रिक्सियेसी सारख्या साध्या प्रारंभिक पूर्वजांपासून इतर यकृतका प्रजाती क्रमाने अप्रत्यक्षपणे विकास पावल्या असाव्यात [जातीविकास ⟶ शेवाळी] ह्या दृष्टीने या वनस्पतींना महत्त्व आहे.
पहा : यकृतका शेवाळी.
संदर्भ : 1. Bell, P. Coombe, D. Strasburger’s Text Book of Botany, London, 1965.
2. Mukherjj, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.
3. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.
महाजन, मु. का. परांडेकर, शं. आ.
“