रँकिन, विल्यम जॉन माक्वॉर्न : (५ जुलै १८२०−२४ डिसेंबर १८७२). ब्रिटिश भौतिकीविज्ञ व अभियंते. ⇨ऊष्मागतिकी या विषयाचा पाया घालण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. वाफेच्या एंजिनाच्या सिद्धांताच्या संदर्भातील त्यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे.
रँकिन यांचा जन्म एडिंबरो येथे झाला. एडिंबरो विद्यापीठात नैसर्गिक विज्ञानाचे १८३८ पर्यंत शिक्षण घेतल्यावर चार वर्षे त्यांनी आयर्लंडमध्ये रेल्वे व इतर प्रकल्पांत सर जॉन मक्नील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियांत्रिकीचे शिकाऊ उमेदवार म्हणून काम केले. त्यानंतर काही काळ स्थापत्य अभियंते म्हणून त्यांनी व्यवसाय केला. १८५५ मध्ये ग्लासगो विद्यापीठात स्थापत्य अभियांत्रिकी व यामिकी (वस्तूंवर प्रेरणांची होणारी क्रिया व त्यामुळे उत्पन्न होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) या विषयांच्या क्वीन व्हिक्टोरिया अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली आणि पुढे याच पदावर त्यांनी मृत्यूपावेतो काम केले.
रेल्वेगाडीच्या आसांच्या धातूच्या शिणवट्यासंबंधी रँकिन यांनी १८४३ मध्ये निबंध लिहिला व त्यामुळे आसांच्या रचनेच्या नवीन पद्धती प्रचारात आल्या. त्यांनी संघननक्षम (द्रवरूप होऊ शकणारे) बाष्प कार्यकारी द्रायू (प्रवाही पदार्थ) म्हणून वापरणाऱ्या वाफ एंजिनांकरिता व टरबाइनांकरिता सैद्धांतिक दृष्ट्या आदर्श प्रक्रिया म्हणून वापरण्यात येणारे ऊष्मागतिकीय चक्र [रँकिन चक्र ⟶ऊष्मागतिकी] प्रतिपादन केले. हे चक्र त्यांनी मॅन्युअल ऑफ द स्टीम एंजि अँड अदर प्राइम मुव्हर्स (१८५९) या आपल्या ग्रंथात मांडले होते. वाफेच्या एंजिनाचा सिद्धांत पद्धतशीरपणे मांडणारा हा पहिलाच ग्रंथ होता. त्यांनी लिहिलेली ए मॅन्युअल ऑफ ॲप्लाइड मेकॅनिक्स (१८५८), ए मॅन्युल ऑफ सिव्हील एंजिनियरिंग (१९६२), ए मॅन्युअल ऑफ मशिनरी अँड मिलवर्क (१८६९) ही इतर पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना व अभियंत्यांनाही अतिशय उपयुक्त ठरली आणि त्यांच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध झाल्या. ⇨मृदायामिकीमध्ये रँकिन यांनी मातीचा दाब आणि भराव भिंतीचे स्थैर्य यांसंबंधी केलेले कार्य महत्त्वाचे ठरले आहे. नाविक वास्तुशिल्प, जहाजाचा प्रचालक (मळसूत्री पंखा), जलरेषा (जलपृष्ठ व जहाजाची बाजू यांचा आंतरछेद) वगैरे विषयांसंबंधीही त्यांनी संशोधन केले आणि जे. आर्. नेपिअर यांच्या समवेत शिपबिल्डिंग, थिऑरेटिकल अँड प्रॅक्टिकल (१८६६) हा जहाजबांधणीवरील ग्रंथ लिहिला. त्यांनी विविध विषयांवर एकूण १५४ संशोधनात्मक निबंध लिहिले.
रँकिन एडिंबरोच्या रॉयल सोसायटीचे (१८५०) व लंडनच्या रॉयल सोसायटीचे (१८५३) सदस्य होते. एडिंबरोच्या रॉयल सोसायटीचे कीथ पदक (१८५४) व डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजची एलएल्. डी. पदवी (१८५७) हे बहुमान त्यांना मिळाले. ते ग्लासगो येथे मृत्यू पावले.
दीक्षित, चं. ग. गोसावी, वि. पां.