योग : इंद्रियांचा संयम करून मन एकाग्र करणे म्हणजे योग होय. कठोपनिषद (२–६–१८) व श्वेताश्वतर-उपनिषद (२–८) या प्राचीन उपनिषदांमध्ये वरील अर्थी योग शब्द वापरला आहे. भगवदगीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भगवद्गीतेला ‘योगशास्त्र’ ही संज्ञा दिली आहे. जडवादी चार्वाक दर्शन सोडल्यास बाकीची भारतीय तत्त्वदर्शने योगविद्येला मान्यता देतात. योगाभ्यास पूर्णतेस प्राप्त झाल्याने म्हणजे योग सिद्ध झाल्याने, आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. आत्मसाक्षात्काराने मोक्ष प्राप्ती होते, असे आत्मवादी भारतीय दर्शने मानतात. आत्मसाक्षात्काराचे मुख्य साधन योग होय, असे सर्व आत्मवादी भारतीय दर्शने सांगतात शंकराचार्यांनी बह्मसूत्रभाष्यात तत्त्वदर्शनाचा उपाय म्हणजे योग अशी योगशास्त्रात सांगितलेली व्याख्या उद्घृत (२–१–३) केली आहे. तत्त्वदर्शनाने मोक्षप्राप्ती होते. मोक्ष म्हणजे जन्ममरणपरंपरारूपी संसारापासून मुक्ती होय. जीवात्मा आणि परमात्मा यांचा आनंदमय संयोग साक्षात्काराने, भक्तीने वा ध्यानाने घडून येतो. यासही योग असे उपनिषदे म्हणतात. योग म्हणजेच अध्यात्मयोग.
संस्कृतमधील ‘युज्’ धातूपासून ‘योग’ हा शब्द बनला आहे. गाडीला किंवा रथाला घोडा वा बैल हे वाहन जुंपतात. जुंपणे म्हणजे योग. इंद्रियांना घोड्यांची व शरीराला रथाची उपमा कठोपनिषदात दिली आहे. इंद्रियांना जुंपून व ताब्यात ठेवून विष्णुपदापर्यंत पोचता येते असे येथे म्हटले आहे. भारतीय षड्दर्शनांपैकी पतंजलिप्रणीत ⇨योगदर्शन उपलब्ध आहे. त्यात चित्तवृत्तींचा म्हणजे मनोवृत्तींचा निरोध म्हणजे योग होय, अशी व्याख्या दिली आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, हठयोग, लययोग, मंत्रयोग असे अनेक योगमार्ग अध्यात्मविद्येत सांगितलेले आहेत. त्या सर्वांमध्ये चित्ताची एकाग्रता हा योगाचा अर्थ गृहीत धरलेलाच असतो. कोणतेच महत्त्वाचे कार्य चित्ताच्या एकाग्रतेशिवाय साध्य होऊ शकत नाही. मनाच्या संपूर्ण एकाग्रतेस समाधी असे म्हणतात. भगवदगीतेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग अशा योगाच्या निरनिराळ्या प्रक्रिया वर्णिलेल्या आहेत. कर्मांचे कौशल योग होय किंवा सुखदुःखादी द्वंद्वांची समता म्हणजे योग होय, अशा योग शब्दाच्या दोन व्याख्या भगवदगीतेत सांगितल्या आहेत.
ज्ञानयोग : आत्मसाक्षात्कार म्हणजे ज्ञान. देहापेक्षा वेगळा, अमर, नित्य, निर्विकार, सर्वव्यापी, सर्वांचा अंतरात्मा, चित्त शुद्ध केल्याने अनुभवास येतो. या देहाच्या पलीकडे असलेला सर्व विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति-लयास कारण असलेला परंतु विश्वाच्या गुणदोषाशी अलिप्त असलेला, प्रकृतीचे नियंत्रण करणारा परंतु सत्त्व, रज आणि तम या प्रकृतीच्या गुणांचा स्पर्श नसलेला जो परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम त्याचा साक्षात्कार प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे ज्ञानयोग. भगवदगीतेतील स्थितप्रज्ञाची लक्षणे ही ज्ञानयोगाची लक्षणे होत.
आत्मसाक्षात्काराने निःश्रेयसाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते.⇨ मोक्ष हा पुरुषार्थ अंतिम ⇨पुरुषार्थ होय. बद्ध, मुमुक्षू व मुक्त अशा जीवात्म्याच्या तीन अवस्था असतात. तत्त्वज्ञानाने मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता काही व्यक्ती गृहस्थाश्रमाचा त्याग करतात. या त्यागास संन्यास असे म्हणतात. संन्यासी व्यक्तीचे मुमुक्षू आणि मुक्त असे दोन प्रकार होत. मोक्षाची इच्छा असलेली व्यक्ती म्हणजे मुमुक्षू आणि मोक्ष ज्याला प्राप्त झाला तो मुक्त होय. तोच जिवंत असताना स्थितप्रज्ञ बनलेला असतो. [⟶ ज्ञानमार्ग ].
कर्मयोग : निष्काम बुद्धीने कर्तव्याचरण म्हणजे कर्मयोग. जगणे म्हणजे कर्म करीत राहणे. जागृती, स्वप्न आणि निद्रा या तिन्ही अवस्थांत मनुष्याला कर्म करावेच लागते. कर्म कोणालाच सुटले नाही. प्रपंचातून बाहेर पडलेल्या संन्याशाला देहधारणार्थ भिक्षा मागणे इ. कर्मे करावीच लागतात. तत्त्वज्ञानाच्या योगाने मोक्ष प्राप्त करून घेणे हे अंतिम साध्य किंवा पुरुषार्थ होय यालाच परमार्थ म्हणतात. या परमार्थाची साधना करण्याकरिता प्रथम चित्त शुद्ध व्हावे लागते. चित्त शुद्ध झाल्याशिवाय तत्त्वज्ञान नीट होऊ शकत नाही. तत्त्वदर्शनाकरता चित्तशुद्धीची आवश्यकता असते. राग (विषयाकर्षण), द्वेष आणि मोह (भ्रम) हे चित्ताचे दोष होत. विषयांकडे इंद्रिये धावत असतात आणि विषयांबद्दलच्या आसक्तीने इंद्रिये मनाला बांधून टाकतात. राग म्हणजे आकर्षण अथवा प्रेम होय. मोह म्हणजे भ्रम होय. आत्मा वस्तुत: देहाहून वेगळा आहे परंतु प्रत्येक जीवाला देह हाच आत्मा असा भ्रम झालेला असतो. त्यामुळे इंद्रिये देहाबद्दलच्या अपेक्षांप्रमाणे वर्तन करीत असतात. राग, द्वेष आणि मोह यांच्यापासून मनाची मुक्ती म्हणजे चित्तशुद्धी होय.
चित्तशुद्धीकरिता नित्य कर्तव्य कर्मे करीत राहणे आणि निषिद्ध कर्मे वर्ज्य करणे आवश्यक असते. त्यामुळे मनाला आणि इंद्रियांना संयमाची शिकवण मिळते. देव, ऋषी आणि माता-पिता यांचे ऋण मनुष्याला असते. ते ऋण तीन कर्तव्यांच्या योगाने फेडता येते. देवयज्ञाने देवांचे, विद्याध्ययनाने ऋषींचे आणि गृहस्थाश्रमात प्रजोत्पादन आणि प्रजापालन करून माता-पित्यांचे ऋण फेडता येते [⟶ ऋणत्रय ]. तात्पर्य, प्रपंचातच राहून चित्तशुद्धी करणे आवश्यक ठरते. निषिद्ध कर्मे टाळल्याने मन व इंद्रिये ताब्यात ठेवण्याची शक्ती प्राप्त होते. हिंसा, चौर्य, परस्त्रीमगन इ. भ्रष्टाचारांपासून परावृत्त होण्याची शक्यता मन विवेकी असेल तरच प्राप्त होते. सर्वभूतहितार्थ कर्म करीत राहणे हे चित्तशुद्धीचे महत्त्वाचे साधन होय. सगळी नैतिक कर्तव्ये ही फळाची अपेक्षा न करता सतत करीत राहिल्याने खरीखुरी चित्तशुद्धी होते. दान परतफेडीची अपेक्षा न करता करणे, स्वर्गसुखाची अपेक्षा न बाळगता देवपूजादी कर्मे करणे, तात्पर्य सगळी कर्तव्ये फलाशा न ठेवता आणि आसक्ती न ठेवता करीत राहणे, हा अंतःकरणाचा मळ स्वच्छ धुवून काढण्याचा मार्ग होय.
चित्तशुद्धीने आत्मसाक्षात्कार वा तत्त्वसाक्षात्कार होतो. या ज्ञानी व्यक्ती संन्यास घेत असतात परंतु चित्त शुद्ध झाल्यानंतरही संन्यास न घेता समाजव्यवस्था चालण्याकरिता, लोकसंग्रहार्थ, भगवान कृष्णाप्रमाणे ज्ञानी माणसांनी कर्तव्य करीत रहावे. चित्तशुद्धीकरता किंवा समाजधारणार्थ कर्तव्यकर्म करीत राहणे आणि निषिद्ध कर्म टाळणे यास कर्मयोग म्हणतात. हा कर्मयोग भगवद्गीतेत विस्ताराने प्रतिपादिला आहे [⟶ कर्मयोग].
भक्तियोग : परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त व्हावा आणि अनुग्रहाने मोक्ष प्राप्त व्हावा याकरता परमेश्वरावर आत्यंतिक प्रेम करणे, त्याचा प्रेममय साक्षात्कार होणे हे भक्तियोगाचे स्वरूप होय. या भक्तीचे नऊ प्रकार आहेत. देवाच्या स्वरूपाचे आणि देवाच्या कृतींचे श्रवण, देवाचे स्वरूप आणि पराक्रम यांचे कीर्तन म्हणजे वर्णन करणे, देवाच्या स्वरूपाचे आणि कृतींचे नित्य स्मरण, त्याच्या पायांची सेवा, त्याची विविध स्वरूपांत पूजा, वंदन, देव हा स्वामी आणि आपण त्याचे दास अशी दास्याची भावना, त्याच्याशी सख्य जोडणे आणि त्याला सर्वस्व अर्पण करून स्वतः शरण जाणे म्हणजे आत्मनिवेदन असे हे भक्तीचे नऊ प्रकार आहेत. त्याच्या विस्मरणाबद्दल खेद होणे, त्याच्या दर्शनावाचून विरहवेदना होणे, त्याच्या अनुभवाने परमानंदाची प्राप्ती होणे अशा विविध भावना भक्तीची अंगे होत. ईश्वर हा स्वामी, माता, पिता, बंधू, गुरू, सखा आणि आत्मा अशा विविध नात्यांनी उत्पन्न होणाऱ्या प्रेमाने चित्त भरून जाणे हे भक्तीचे स्वरूप होय. सत्संग म्हणजे भक्तांची संगती हे भक्तियोगाचे एक अंग आहे. साहित्याच्या नवरसांमध्ये शांत हा रस श्रेष्ठ रस मानला आहे. शांत रस हे भक्तीचेच स्वरूप आहे. काहींच्या मते भक्ती हा दहावा रस होय. भगवद्गीतेच्या दृष्टीने राजयोग (राजगुह्य) म्हणजेच भक्तियोग आहे तो सर्वसामान्य जनांनाही सुलभ आहे. राजयोग म्हणजेच योगांचा राजा, योगातील श्रेष्ठ, असा अर्थ होतो. [⟶ भक्तिमार्ग ].
हठयोग : हठ म्हणजे आग्रह. परिश्रमाने एखादी दुःसाध्य गोष्ट साध्य करणे म्हणजे हठ. आसन व प्राणायाम यांच्या योगाने नाडीशुद्धी व शरीरशुद्धीकरून पातंजल योगदर्शनात सांगितलेली समाधी साधणे म्हणजेच हठयोग होय. कुंडलिनी नावाची तेजोवलयरूप शक्ती नाभीच्या खाली आणि मूलाधारचक्राच्या वर शरीरात असते. या कुंडलिनीला जागृत करून सुषुम्ना नाडीतून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत नेऊन पोचविणे म्हणजे हठयोग होय. ⇨प्राणायामाच्या प्रक्रियेने ही कुंडलिनी शक्ती जागृत होते व सुषुम्ना नाडीतून प्राणाचा प्रवाह सुरू होतो आणि त्याच्याबरोबर ही कुंडलिनी ब्रह्मरंध्रापर्यंत पोचते.इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा तीन मुख्य नाड्या प्राणायामाच्या संदर्भात निर्दिष्ट केलेल्या असतात. डाव्या उजव्या नाकपुड्यातून श्वासोच्छवास चालतो.डाव्या नाकपुडीमध्ये इडा नाडी असते तिला चंद्रनाडी म्हणतात आणि उजव्या नाकपुडीत पिंगला नाडी असते तिला सूर्यनाडी म्हणतात. या दोन नाड्यांच्यामध्यभागी सुषुम्ना नाडी असते. ती पाठीच्या कण्यातून मस्तकापर्यंत पोचलेली असते. सुषुम्ना नाडीतून जागृत कुंडलिनी ब्रह्मरंध्रापर्यंत पोचते तेव्हासमाधियोगाची प्राप्ती होते. केवल शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार होतो. प्राणायामाने कुंडलिनी जागृत करण्याची प्रक्रिया गूढ आहे ती केवळ गुरुगम्य असते आणित्याकरिता मुमुक्षूला अत्यंत परिश्रम घ्यावे लागतात. म्हणून या प्रकारच्या समाधियोगाला हठयोग म्हणतात [⟶ हठयोग ].
लययोग : ध्यानाभ्यासाने मन शांत होत जाते. इंद्रिये विषयांपासून आपोआप विमुख होतात. वारा पूर्ण थांबल्यावर दिव्याची ज्योत जशी तेवत असते त्याप्रमाणे ध्येयवस्तूमध्ये मन एकाग्र झालेले स्तिमित होते, निर्विचार बनते, संकल्प-विकल्प मावळतात. ही स्थिती सहज बनते. म्हणून याला ‘लययोग’ किंवा ‘सहजा’ वा ‘उन्मनी अवस्था’ म्हणतात.
मंत्रयोग : इष्ट देवतेचा निर्देश करणारा मंत्र किंवा ‘सोऽहं’ मंत्र प्राणायामाच्या वेळी आणि ध्यानाच्या वेळी जपणे आणि त्याच्या योगाने चित्ताची एकाग्रता साधणे याला मंत्रयोग म्हणतात. या मंत्रयोगाच्या मुळाशी एक तात्विक विचार आहे, की प्रत्येक श्वासोच्छवास करणारा प्राणी श्वासोच्छवास करतो म्हणजे हंस असाच मंत्र जपत असतो. तोच मंत्र मुमुक्षूने ‘सोऽहं’ या अक्षरांनी सतत जपावा ध्यानकाली मुख्यतः जपावा. हा मंत्र जपत असताना चित्ताची एकाग्रता प्राप्त होते यास मंत्रयोग म्हणतात [⟶ मंत्र ].
तंत्रमार्गात ऱ्हां, ऱ्हीं, ऱ्हुं, किंवा यम्, रम्, लम्, शम् असे वर्ण किंवा अशी अक्षरे मंत्र म्हणून जपायची असतात. त्याच्या योगाने देवतासाक्षात्कार प्राप्त होतो. यासही मंत्रयोग म्हणतात. [⟶ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म].
पहा : पतंजलि योगदर्शन.
संदर्भ : १. महादेवशास्त्री, संपा. योग-उपनिषद:, आड्यार, १९२०.
२. माधवाचार्य संपा. ऋषि, उमाशंकर शर्मा, सर्वदर्शनसंग्रह, वाराणसी, १९७८.
जोशी, लक्ष्मणशास्त्री