यूकावा, हीडेकी : (२३ जानेवारी १९०७ – ८ सप्टेंबर १९८१). जपानी भौतिकीविज्ञ. मूलकण भौतिकीतील [⟶ मूलकण] महत्त्वाच्या संशोधनाकरिता त्यांना १९४९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
यूकावा यांचा जन्म टोकिओ येथे झाला. क्योटो विद्यापीठातून १९२९ मध्ये पदवीधर झाल्यावर तेथेच त्यांनी काही काळ अध्यापन केले. त्यानंतर ते ओसाका विद्यापीठात प्रथम अध्यापक व १९३६ मध्ये भौतिकीचे साहाय्यक प्राध्यापक झाले. १९३८ मध्ये ओसाका विद्यापीठाची डी. एस्सी. पदवी संपादन केल्यावर क्योटो विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडी (१९४८ – ४९) आणि न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात (१९४९ – ५१) अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केल्यावर ते जपानला परतले व तेथे क्योटो येथील रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल फिजिक्स या संस्थेचे संचालक झाले (१९५३ – ७०).
ओसाका विद्यापीठात काम करीत असताना यूकावा यांनी अणुकेंद्रातील न्यूट्रॉन व प्रोटॉन यांना बद्ध करणाऱ्या प्रबल पण अत्यल्प कार्यकारी पल्ला असलेल्या प्रेरणेसंबंधी संशोधन केले. यामध्ये त्यांनी विद्युत् चुंबकीय प्रेरणेच्या साधर्म्याचा उपयोग केला. या बाबतीत दोन विद्युत् भारित कणांतील विद्युत् चुंबकीय परस्परक्रिया ही या कणांतील फोटॉनाच्या (पुंजाच्या वा ऊर्जेच्या एककाच्या) विनिमयाच्या रूपात होते. यावरून ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांची परस्परक्रिया फोटॉनाच्या विनिमयाच्या स्वरूपात होते, त्याचप्रमाणे अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांतील परस्परक्रिया योग्य कणाच्या (याला मेसॉन असे नाव नंतर देण्यात आले) विनिमयाद्वारे होते, असे त्यांनी गृहीत धरले. ⇨पुंज सिद्धांतानुसार कणाचे द्रव्यमान त्याच्या कार्यकारी पल्ल्याच्या व्यस्त प्रमाणात असल्याने द्रव्यमानरहित फोटॉनाचा कार्यकारी पल्ला अनंत असल्याचे मानले जाते यावरून प्रबल प्रेरणेच्या बाबतीत तिचा पल्ला १०– १२ सेंमी. पेक्षाही कमी असल्याने विनिमय होणाऱ्या संबंधित कणाचे द्रव्यमान इलेक्ट्रॉनाच्या २०० पट असावे, असे यूकावा यांनी १९३५ मध्ये भाकीत केले. १९३७ मध्ये कार्ल अँडरसन यांना विश्वकिरणांच्या (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या अतिशय भेदक किरणांच्या) नोंदलेल्या मार्गांत असा कण आढळल्याने भौतिकीविज्ञांनी यूकावा यांच्या गृहीतकाचा हा पुरावा मानून या कणाला म्यू मेसॉन असे नाव दिले. यालाच आता ‘म्यूऑन’ असे म्हणतात. या कणाचे द्रव्यमान योग्य असले, तरी त्याची अणुकेंद्रीय कणांशी क्वचितच परस्परक्रिया होते असे नंतर आढळून आल्याने हा कण यूकावा यांनी भाकीत केलेला व अणुकेंद्रीय ‘गोंद’ म्हणून कार्य करणारा कण नसावा, असे अनुमान काढण्यात आले. या त्रुटीचे स्पष्टीकरण करण्यासाठी वाय्. टानिकावा व एस्. साकाटा यांनी असे सुचविले की, प्रत्यक्षात दोन निरनिराळे पण परस्परसंबंध असलेले दोन मेसॉन कण असावेत. १९४७ मध्ये सी. एफ्. पॉवेल व इतर शास्त्रज्ञांना विश्वकिरणांत दुसऱ्या प्रकारचा मेसॉन आढळला. या कणाचे द्रव्यमान इलेक्ट्रॉनाच्या २६४ पट असून त्याच्या क्षयातून म्यूऑन तयार होतो, असे दिसून आले. या कणाला प्रथम पाय् मेसॉन व नंतर पायॉन असे नाव देण्यात आले आणि या कणाची अणुकेंद्रीय कणांशी प्रबल परस्परक्रिया होते असेही आढळले. प्रत्यक्षात यूकावा यांनी भाकीत केल्याप्रमाणे तीन निरनिराळे पायॉन (धन भारित, ऋण भारित व विद्युत् भाररहित) असून त्यांचे पुढे १९४९ पावेतो प्रायोगिक रीत्या अस्तित्वही सिद्ध झाले.
नोबेल पारितोषिकाखेरीज यूकावा यांना जपान ॲकॅडेमीचे इंपीरिअल पारितोषिकही (१९४०), रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लमनॉसॉव्ह सुवर्ण पदक (१९६४) वगैरे बहुमान मिळाले. ते जपान ॲकॅडेमी, रशियाची ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस इ. मान्यवर वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते. त्यांचे अनेक संशोधनपर निबंध, तसेच ⇨पुंजयामिकी व मूलकण सिद्धांत या विषयांवर अनुक्रमे १९४७ व १९४८ मध्ये जपानी भाषेतील दोन ग्रंथ प्रसिद्ध झाले. १९४६ पासून ते प्रोग्रेस ऑफ थिऑरेटिकल फिजिक्स या इंग्रजी नियतकालिकाचे संपादक होते. ते क्योटो येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..