मोल्नार, फेरेन्टस्‌ : (१२ जानेवारी १८७८–१ एप्रिल १९५२). हंगेरियन नाटककार आणि कादंबरीकार, बूडापेस्ट येथे जन्मला. त्याने कायद्याचे शिक्षण घेतले पण पत्रकारिता व लेखन यांकडे तो वळला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षांपासूनच त्याने कथा लेखनास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धात त्याने उत्तम पत्रकार म्हणून नाव मिळविले. ज्यू वंशाच्या असल्यामुळे १९४० साली तो हंगेरीहून निसटून न्यूयार्कला आला व तेथेच स्थायिक झाला.

मोल्नारचे पहिले यशस्वी नाटक द डेव्हिल (१९०७, इं. भा. १९०८). यानंतर त्याने लिल्योम (१९०९, इं. भा. १९२७), द गार्डस्‌मन (१९१०, इं. भा. १९२४) वगैरे नाटके लिहिली.

मोल्नारची नाटके मख्यतः बूडापेस्टच्या श्रीमंत शहरी जीवनावरच्या सुखात्मिका आहेत. व्यामिश्र कथारचना, चमकदार संवाद, उपरोध तसेच भावुकता यांमुळे ही नाटके यूरोपभर लोकप्रिय झाली. विशेषतःलिल्योम हे नाटक व त्यावर आधारित ‘कराउझल’ (१९४६) ही संगीतिका फारच गाजली. फसलेल्या दरोडेखोरीनंतर आत्महत्या करणाऱ्या एका बदमाषाला मृत्यूनंतर पापक्षालनाची संधी मिळते, पण त्या नंतरही तो पुन्हा दुष्कृत्याकडेच कसा वळतो हे या नाटकात प्रभावीपणे रंगविले आहे. दुष्ट शक्ती, मीपणा आणि अनैतिकता यांचाच अखेर जय होतो हे आपल्या नाटकातून दाखविण्याचा मोल्नारचा प्रयत्न होता. त्याच्या हलक्याफुलक्या शैलीमुळे त्याच्या नाटकातला तुच्छतेचा सूर सौम्य होतो. मोल्नारच्या कादंबऱ्यांपैकी द पॉल स्ट्रीट बॉइस (१९०७, इं. भा. १९२८) हीच कादंबरी यशस्वी ठरली. कंपॅनियन्स इन एक्झाइल हे त्याचे आत्मचरित्र १९५० मध्ये प्रसिद्ध झाले.

आपले अखेरचे जीवन त्याने न्यूयॉर्क शहरातच घालविले व तेथेच तो निधन पावला.

कळमकर, य. शं.