मोगलकाळ : हिंदुस्थानात तेराव्या शतकात मुस्लिम सत्तेचा उदय झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) तिला अवनत अवस्था प्राप्त झाली. दिल्लीच्या सुलतानशाहीचा मोगलपूर्व काळ हा भारतातील मुस्लिम सत्तेचा पहिला कालखंड ठरतो. [→ मुसलमानी अंमल, भारतातील]. सुलतानशाहीच्या ऱ्हासानंतर साधारणतः इ. स. १५२६ ते १७०७ दरम्यानच्या काळाला मोगलकाळ ही संज्ञा रूढ झाली आहे. काही इतिहासकार मोगलकाळाची सांगता दुसरा बहादुरशाह याच्या पदच्युतीने झाली (१८५७) असे मानतात. या काळात मोगलांचे राज्य वाढतवाढत जवळजवळ सर्व हिंदुस्थानावर पसरले होते. इतिहासाच्या इतर कालखंडांप्रमाणेच मोगलकाळाबद्दलसुद्धा इतिहासकारांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. राज्याची साधनसामग्री, साम्राज्यविस्तार, कला-वाङ्ममयीन क्षेत्रांतील निर्मिती, प्रशासन, लष्करी व्यवस्था, परराष्ट्रीय संबंध, व्यापार-उदीम आदी दालनांतील भरभराट यांमुळे मोगलकाळाने समृद्धीचा मोठा टप्पा गाठलेला होता.
ऐतिहासिक साधने : मोगलकाळाविषयीची ऐतिहासिक साधनसामग्री विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आहे. तीत विविध प्रकारची नाणी, पुरातत्त्वीय अवशेष यांबरोबरच तुर्की, फार्सी, अरबी इ. भाषांत लिहिलेली आत्मचरित्रे, तवारिखा, फर्माने, पत्रे, आज्ञा इत्यादींचा भरणा आहे. आत्मचारित्रात तूझुक-इ-बाबुरी (बाबर) आणि तूझुक-इ-जहांगिरी (जहांगीर) ही अत्यंत महत्त्वाची असून काही सम्राटांनी राजदरबारातील इतिहासकारांकडून वृत्तांत (दिवान) लिहून घेतले. याशिवाय गॅझेटीअरच्या धर्तींवर व विशेषतः महसूलाच्या संदर्भात तयार केलेले दस्तूर-उल्-अमल आणि अखबारात-इ-दरबार-इ-मुअल्ला नावाचे वृत्तांत प्रसिद्ध आहेत. यांपैकी अनेकांचे विविध भाषांत भाषांतर झालेले आहे. बाबराच्या आत्मचरित्राचे नाव बाबरनामा किंवा तूझुक-इ-बाबरी असून त्यात पुढील कालखंडांतील- १५०८–१९, १५२०–२५ आणि १५२९–३०-घटनांची नोंद नाही. याखेरीज काही ऐतिहासिक कालखंड यात वगळलेले आहेत.
हुमायूनच्या हयातीत लिहिलेला कानून-ई-हुमायूनी हा ग्रंथ उपलब्ध आहे. घियासुद्दीन मुहम्मद ऊर्फ ख्वांदअमीर हा त्याचा लेखक. हुमायूनची फर्माने, तसेच तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीचे त्यात वर्णन मिळते. मिर्झा हैदर याने तारीख-इ-रशीदी मध्ये कामरानचा कंदाहार विजय, हुमायून व शेरशाहामधील कनौजचे युद्ध, हुमायूनचे पलायन, लाहोर येथे सर्व भावंडांचा मिलाफ, कामरानचा विरोध, काश्मीर विजय इ. घडामोडींचे वर्णन केले आहे. मीर अब्दूल लतीफ कजवीनी याने नफायसुल मआसिरमध्ये हुमायून, मिर्झा अस्करी, हिन्दाल, उमराव शमसुद्दीन, मुहम्मद अतगाखान, बैराम खान, अली कुली सुल्तान व अनेक कर्वीच्या जीवनाचा वृत्तांत रेखाटला आहे. बाबरची मुलगी गुलबदन बेगम हिने अकबराच्या सल्लानुसार हुमायूननामाची रचना (१५८०–९०) केली. बाबराबद्दलची व्यक्तिगत माहिती याच ग्रंथातून मिळते. बायजीद बिएत याने रचलेले तजकिरात-इ-हुमायूं व अकबर आणि जौहर आफताबचीचा तजकिरात-उल्-वाकिआत हे ग्रंथ हुमायूनकालीन घटनांचा ऊहापोह करतात. अबुल फज्ललिखित अकबरनामा, ख्वाजा निजामुद्दीन अहमदचा तबकात-इ-अकबरी, इब्राहिम इब्ने जरीरलिखित तारीख-इ-इब्राहिमी, मुल्ला अहमदकृत तारीख-इ-अलफी इ. ग्रंथ हुमायूनच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकतात. यांव्यतिरिक्त शेख रिज्कुल्लाह मुश्ताकीकृत वाकिआत-इ-मुश्ताकी, अब्दुल कादिर बदाऊनीलिखित मुन्तखाब-अल्-तवारिख अथवा तारीख-इ-बदाऊनी, फिरिश्ताकृत, (मोहम्मद कासिम हिंदू शाह) तारीख-इ-फिरिश्ता इ. ग्रंथांतही हुमायूनविषयी माहिती आहे. यांपैकी बहुतेक ग्रंथ फार्सीत असून ख्वांदअमीरलिखित कानून-ई.हुमायूनी व्यतिरिक्त इतर ग्रंथांची रचना अकबर किंवा जहांगीरच्या कारर्कीदीत झाली.
अकबरकालीन प्रमुख साधनांमध्ये विशेषतः फार्सी ग्रंथांचा अंतर्भाव होतो. शेख अबुल फज्ललिखित आईन-इ-अकबरी व अकबरनामा हे ग्रंथ क्रमशः अकबराच्या प्रशासकीय व शासकीय पद्धतींविषयीचे आहेत. ख्वाजा निजामुद्दीन तबकात-इ-अकबरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अकबरनामा व्यतिरिक्त २८ ऐतिहासिक साधनांवर तो ग्रंथ आधारलेला आहे. अब्दुल कादिर बदाऊनी लिखित मुन्तखाब-अल्-तवारीख तीन खंडांत विभागला आहे. त्यात सबुक्तगीन ते हुमायून त्याचप्रमाणे अकबराचे समकालीन सूफी संत, कवी, विद्वान आणि वैद्य इत्यादींचा इतिहास समाविष्ट आहे. मुहम्मद अमीनचा अवाफौल-ए-अखबार, शेख अल्लादाद फैजी सरहिंदीचा अकबरनामा, शेख अबुल फज्लचा मक्तूबात-इ-अल्लामी व रुक्कात-इ-अबुल फज्ल, महम्मद शरीफ (मुतमिनखान) चा इकबाल-नामा-इ-जहांगिरी, ख्वाजा कामगारखानाचा मआसिर-इ-जहांगिरी, मुल्ला अब्दुल बाकी नहबन्दीचा मआसिर-इ-रहीमी, शाहनवाजखान औरंगाबादीचा मआसिर-उल्-उमरा, इनायत उल्लाचा तकमील-इ-अकबरनामा, हाजी मुहम्मद आरिफ कन्धारीचा तारीख-इ-अकबरशाही, मीर मुहम्मद मासूमचा तारीख-इ-मासूमी, अहमद यादगारचा तारीख-इ-सलातीन-इ-अफगाना, नुर-अल्-हकचा जुबदत-उत्-तवारीख इ.अनेक ग्रंथ अकबरकालीन इतिहासावर प्रकाश टाकतात.
जहांगीरलिखित तूझुक-इ-जहांगिरी या ग्रंथास वाकियात-इ-जहांगिरी वा जहांगीरनामा, तारीख-इ-सलीमशाही, इकबालनामा इ. नावांनी संबोधिले जाते. जहांगीरचा सुरुवातीचा १८ वर्षांचा वृत्तांत त्यात मिळतो. मुतमद खानलिखित इकबालनामा-इ-जहांगिरी तीन भागांत विभागला आहे. कामगारखानरचित मआसिर-इ-जहांगिरी हा ग्रंथ अधिक विश्वसनीय असून अनेक प्रकरणांमध्ये तो विभागला आहे. शेख अब्दुल वहाबचा इन्तिखाब-इ-जहांगिरी, असद बेग (आजाद बेग) लिखित विकाया-इ-आजादबेग इ. इतर ग्रंथ जहांगीरचा इतिहास स्पष्ट करतात.
शाहजहानचा इतिहास स्पष्ट करणारा प्रमुख ग्रंथ, दरबारी इतिहासकार मुहम्मह अमीन कजवीनीलिखित पादशाहनामा होय. यास शाहजहाननामा किंवा तारीख-इ-शाहजहानी दहसाल असे म्हणतात. अब्दुल-लाहुरी हमीद हा शाहजहानच्या दुसरा दरबारी इतिहासकार. त्याने पादशाहनाम्यात कजवीनीच्याच विचारांची पुनरावृत्ती केली आहे. त्याचा शिष्य मुहम्मद वारिस याने आपल्या शाहजहाननाम्यात उरलेली माहिती पूर्ण केली. इनायतखानाने (मुहम्मद ताहिर) व सादिकखानानेसुद्धा शाहजहाननाम्याची रचना केली. जलालुद्दीन तबातबाईकृत पादशाहानामा, मुहम्मद सालिहलिखित अमल-इ-सालिह, ईश्वर दास नागरांचा फुतूहात-इ-आलमगिरी, भीमसेनचा नुस्ख-इ-दिलकूशा, युसूफ मीरचा मजहर-इ-शाहजहानी, बख्तावर खानाचा मिरत-उल्-आलम, सुजानराय खत्रीचा खुलकस-तुल-तवारीख इ. ग्रंथ शाहजहानकालीन इतिहासाची मीमांसा करतात.
मीर्झा मुहम्मद काझिमलिखित आलमगीरनामा हा औरंगजेबकालीन प्रथम दशकाचा दीर्घ इतिहास होय. हातीमखानाच्या आलमगीरनाम्यात औरंगजेबकालीन शासकीय घडामोडींचे वर्णन आहे. मुहम्मद साकी मुस्तैदखानलिखित मआसिर-आलम-इ-गीरी हा औरंगजेबाचे संपूर्ण चरित्र संक्षिप्तपणे वर्णन करणारा ग्रंथ आहे. आकिलखान राझीचा वाकिआत, अबुल फज्ल मामूरीचा तारीख-इ-औरंगजेब, शिहाबुद्दीन अहमद तालीशचा फथिया-इ-अब्रिया, भीमसेनचा नुस्ख-इ-दिलकूशा, ईश्वर दासांचा फुतूहात-इ-आलमगिरी इ. ग्रंथ औरंगजेबाच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकतात. मुहम्मद हाशिम खाफीखान हा औरंगजेबकालीन आणखी एक प्रसिद्ध इतिहासकार. त्याचा मुन्तखाब-उल्-लुबाब हा प्रमुख ऐतिहासिक ग्रंथ. यांव्यतिरिक्त अलाहयार बल्खीचा औसफनामा-इ-आलमगिरी, हाकीरीचा खुलासत-उत्-तवारीख (औरंगजेबनामा). शेख मुहम्मद बाकाचा मिरात-इ-जहाँनामा, गुलाम हुसेनचा रियाझ-उस्-सलातीन, शाहनवाझ खानाचा मआसिर-उल्-उमदा, मिर्झा इब्राहिम झुबैरीचा बसातीन-उस्-सलातीन, सईद मुहम्मद मीर अबू तुराबचा कुतुबनामा-इ-अलम इ. ग्रंथ महत्त्वपूर्ण आहेत.
सोळाव्या शतकापासून भारतात यूरोपियन प्रवासी व्यापाराच्या निमित्ताने येऊ लागले. त्यात काही ख्रिस्ती धर्मोपदेशक, वैद्यकीय व्यवसाय करणारे, तसेच धाडसी प्रवासी व सामान्यतः व्यापारी असत. व्यापाराबरोबरच या यूरोपियनांनी तत्कालीन राज्यकर्त्याशी मैत्रीचे संबंध दृढतर केले. काही यूरोपियन मोगल दरबारात नोकरीस राहिले. त्यांनी लिहिलेले वृत्तांत (प्रवासवर्णने) तत्कालीन इतिहासावर प्रकाश टाकतात. अशा वृत्तांतांत फ्रान्स्वा बर्निअर, झां ताव्हेर्न्ये, निकोलाव मनुची, जॉन फ्रायर, टॉमस रो, माँसिरेट, विल्यम हॉकिन्स, मोरलँड, निकोलाव डाउटन, जोसेफ सालबांके, पीटर मंडी, टॉमस बौवरी, विल्यम हेजिस इत्यादींची प्रवासवर्णने, पत्रे, दिनदर्शिका व वृतांत प्रसिद्ध आहेत. याशिवाय यूरोपियनांनी स्थापन केलेल्या व्यापारी वखारींतून त्या वेळच्या राजकीय घडामोडींचे वृत्तांत लिहून ठेवण्याची पद्धत होती. त्यांचाही मोगल काळाच्या इतिहासलेखनास एक महत्त्वाचे व विश्वासार्ह साधन म्हणून उपयोग होतो.
राजकीय इतिहास : सोळाव्या शतकाच्या प्रारंभी भारताची राजकीय घडी काहीशी विस्कळित झालेली होती. मुहम्मद तुघलकानंतर सुलतानशाहीस उतरती कळा लागली होती. इब्राहीम लोदीचे राज्य फक्त दिल्ली, आग्रा, दुआब, जौनपूर, बिहार, बयाना व चंदेरीपुरते मर्यादित होते. त्याच्याविरूद्ध लोहानी, लोदी, नियाझी, अफगाण इत्यादींनी उठाव सुरू केला होता. पंजाबचा दौलतखान लोदी, बिहारचा बहादुरखान, जौनपूरचा नासिर खान लोहानी इ. स्वतंत्रपणे वागू लागले होते. बंगालवर हुसैनी घराण्याचे राज्य होते व नुसरतशाहाशी पुढे बाबरास तडजोड करावी लागली.
त्यावेळी माळवा, गुजरात व मेवाड ही तीन शक्तिशाली राज्ये होती. माळव्यात मुहम्मद खल्जी होता. त्याच्या कमकुवतपणाचा फायदा मेदिनी रायने घेतला. स्वतःचा दरारा निर्माण केला. गुजरात बहादुरशाहाच्या अधिकारात होते. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. मेवाडचे राज्य सर्वश्रेष्ठ मानले जात असे. बाबराचा समकालीन राणा संग्रामसिंह (राणासंग) याची राजधानी चितोड येथे होती. सिंध, काश्मीर, ओरिसा इ. राज्यांतही स्वतंत्र राज्यकर्ते होते. दक्षिणेतील बहमनी राज्याची पाच शकले पडलेली होती आणि दक्षिणेकडील विजयानगरचे राज्य उत्कर्षाच्या शिखरावर होते. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागात आपले बस्तान बसविण्यास प्रारंभ केला होता. दिल्लीची सुलतानशाही मोडकळीस येऊन उत्तर, मध्य व दक्षिण भारतात सर्वत्र अनेक स्वतंत्र सवतेसुभे निर्माण झाले. काळाची गरज ओळखून हिंदू-मुसलमानांमध्ये सलोखा साधण्याचा प्रयत्न कबीर-नानकादींच्या भक्तिसंप्रदायांनी सुरू केला. सूफी संतांनी हिंदू-मुसलमानांच्या वैगुण्यावर बोट ठेवून राष्ट्रीय एकात्मता फलद्रुप करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यादृष्टीने तत्कालीन समाज संघटित होऊ शकला नाही मध्ययुगीन परंपरागत लष्करी व्यवस्था तशीच राहिली. अद्ययावत शास्त्रास्त्रांचा वापर भारतीय करू शकले नाहीत. याचा फायदा घेऊनच मोगलांनी भारतावर अधिसत्ता स्थापन केली.
बाबर : (कार. १५२६–३०). भारताच्या मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा जहीरूद्दीन या नावाने भारतात आला. मूलतः तो चगताई तुर्क वंशाचा. वडील उमरशेख मिर्झा फरगान्याचे सरदार होते. चंगीझखान व तैमूरलंग या साम्राज्यनिर्मात्यांकडून त्यास अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वारसा मिळाला. ख्वाजा उबैदुल्ला खान या गुरूने बाबर असे त्याचे नामकरण केले. बाबरावर मोठी बहीण खानझादा बेगम, आजी अैश दौलत बेगम व आजोबा युनूस खान यांच्या विचारांचा पगडा होता. पराक्रम व महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर त्याने भारतावर अधिसत्ता स्थापन केली.
भारतावर चालून येण्यापूर्वी त्याने प्रथमतः खैबर खोरे (१५०४) व अदीनापूर (जलालाबाद–१५०७) हस्तगत केले. दुसऱ्या चढाईत त्याने खैबर खोऱ्यातील युसूफजाई अफगाणांवर वर्चस्व मिळविले. तिसऱ्या स्वारीच्या वेळी त्याने (१५२०) बाजौर व भेडा यांवर ताबा मिळविला. पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदीच्या निमंत्रणावरून (१५२४) त्याने भारतावर चौथी स्वारी केली. लाहोर व दीपालपूर घेतल्यावर तो भारतावर राज्य करण्याचा संकल्प करू लागला. हुमायून सैन्यासह बाबराला येऊन मिळाल्यावर (नोव्हेंबर १५२५) त्यांनी भारतावर पाचवी स्वारी केली. पानिपतच्या रणांगणावर (२१ एप्रिल १५२६) झालेल्या युद्धात बाबराच्या शिस्तबद्ध लष्कराच्या ’तुलगमा’ रणनीतीसमोर इब्राहीम लोदीचे विशाल सैन्य टिकू शकले नाही. इब्राहीम लोदी लढताना मारला गेला. बाबराची उपयुक्त व्यूहरचना, शक्तिशाळी तोफखाना, हेरखाने आणि खंबीर नेतृत्व यांमुळे चगताई तुर्क भारतात मोगल साम्राज्याची स्थापना करू शकले. नंतर राजपूत राणासंगाला पराभूत करून बाबराने राजपूत संघ नेस्तनाबूत केला (१७ मार्च १५२७). मेवाड, चांदवा, इटावा इत्यादींवर अधिकार मिळविल्यावर बाबराने मेदिनी रायकडून चंदेरीचा किल्ला हस्तगत केला (१५२८). महमूद लोदी व इतर अफगाण विरोधकांना बंगालच्या नुसरतशाहाने आश्रय दिला होता. म्हणून बाबराने त्यांच्या संयुक्त शक्तीचा बीमोड केला (६ मे १५२९). राजपुतांबद्दल त्याने सहिष्णू धोरण स्वीकारले. बाबर मद्यपानाच्या अतिरेकी व्यसनामुळे रोगग्रस्त होऊन मरण पावला (२६ डिसेंबर १५३०). त्यानंतर हुमायून दिल्लीच्या गादीवर आला [→ बाबर].
हुमायून : (कार.१५३०–४० आणि १५५५–१५५६). बाबर व त्याची पट्टराणी माहमबेगम यांचा नासिरउद्दीन मुहम्मद हुमायून हा ज्येष्ठ मुलगा. आग्रा येथे हुमायून सिंहासनारूढ झाला (२९ डिसेंबर १५३०). तत्पूर्वी त्याने आपला मेहूणा मेहदीख्वाजा याचा कट मोडून काढला. वडिलांच्या इच्छेनुसार त्याने भावांना राज्ये दिला परंतु कामरानने पेशावर, लमघान व पंजाब घेऊन सु. २० वर्षे त्याच्याशी संघर्ष केला. हुमायून हतबल झाल्यावर लाहोरला गेला तथापि कामरानशी तो सलोखा साधू शकला नाही. कालमानपरत्वे हुमायूनने शिया धर्म स्वीकारला. बैरामखानकडून त्याला मोलाचे सहाय्य मिळाले. हुमायूनने कामरानचा सशस्त्र उठाव अखेरीस मोडून काढून त्याचे डोळे फोडले (१५४७–४८). दुसरा भाऊ अस्करीला निर्वासित केले. हे दोघेही हद्दपार केलेले भाऊ मक्का-मदीनेकडे मरण पावले. हिंदाल या भावाने मात्र हुमायूनला बहुतांशी साथ दिली.
हुमायूनने आग्र्यावरून माळवामार्ग सारंगपूरकडे वाटचाल केली. मंदसोरला वेढले परंतु ⇨ शेरखान व इतर शत्रूंच्या हालचालींमुळे त्याला अनेक वेळा माघार घ्यावी लागली. पुढे गुजरातलाही त्यास मुकावे लागले. शेरखानाने बंगालवर स्वारी करताच हुमायूनने अस्करी, हिंदालसोबत आग्र्यावरून आगेकूच करून (१५३७) पुन्हा चुनारला वेढले (ऑक्टोबर १५३७ ते मार्च १५३८). तिकडे शेरखानाने रोहतास किल्ला आणि बंगाल-बिहारचा बहुतेक भाग घेतला. आग्र्याकडे परतताना शेरखानाने मोगलांचा चउसा (१५३९) व कनौज (१७ मे १५४०) या लढायांत पराभव केला व दिल्लीवर पुन्हा सत्ता कायम केली.
शेरखानाने हुमायूनचा पाठलाग केला. हुमायून दिल्ली, लाहोर, सिंधकडे भटकत राहिला व संधी मिळताच त्याने पुन्हा भारतावर आक्रमण केले पंजाब (१५५४) व सरहिंद (१५५५) यांवर अधिकार मिळविला आणि दिल्ली व आग्र्यावर वर्चस्व मिळविले. सुमारे १५ वर्षांनंतर (२३ जुलै १५५५) तो पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसला. जिन्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला (२७ जानेवारी १५५६). [→ हुमायून].
अकबर : (कार. १५५६–१६०५). हुमायूनवर सातत्याने कोसळलेल्या संकटांमुळे अकबरास पित्याचा विशेष सहवास लाभला नाही परंतु बुद्धिमत्ता, साहिष्णुता, खंबीरपणा, धडाडी व स्वामिभक्त सरदार बैरामखानाकडून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यांमुळे तो सर्वश्रेष्ठ मोगल सम्राट ठरला. हुमायूनच्या मृत्युप्रसंगी अकबर बैरामखानासोबत पंजाबचा सुभेदार अबु-अल्-मआली याचा निःपात करण्यास गेला होता. राज्यभिषेकाच्या वेळी तो फक्त १३ वर्षांचा होता. १५५६ ते १५३० या कालखंडात अकबरास बैरामखानाच्या सल्ल्यानुसार राज्य करावे लागले. याच सुमारास पानिपतच्या दुसऱ्या युद्धात (१५५६) त्याने हेमूचा पराभव केला. १५६० ते १५६२ च्या सुमारास त्याने दाई माहम अनघा आणि अंतःपुरातील वर्चस्व यांपासून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर अनेक बंडाळ्यांचा बीमोड करून त्याने राज्याची घडी सुस्थिर केली. तथापि शेवटपर्यंत अकबर राणा प्रतापसिंहावर वर्चस्व प्रस्थापित करू शकला नाही. त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक सुधारणा झाल्या आणि देश एकछत्री अंमलाखाली आला. [→ अकबर].
जहांगीर : (कार. १६०५–२७). अकबराला सलीम, मुराद व दानियल असे तीन मुलगे होते. मुराद व दानियल यांच्या अकाली मृत्यूमुळे अकबरास बंडखोर सलीमची राजपुत्र निवड करावी लागली. सलीम हा राजपूत पत्नीपासून अकबराला झालेला मुलगा होता. काही इतिहासकार त्यास जोधाबाईपासून झालेला मुलगा मानतात. सलीमने वडिलांच्या मृत्यूपूर्वीच (१५९९–१६०४) सत्ता काबीज करण्यासाठी बंड पुकारले. अकबराने अबुल फज्ल याच्याद्वारे सलोखा करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. शेवटी सावत्र आई सलमा बेगमच्या मध्यस्थीने सलीमलाच युवराज घोषित करण्यात आले. राज्यारोहण प्रसंगी त्याने बारा आदेशांचा (दस्तूर-उल्-अमल) जाहीरनामा काढला. त्याच्या कारकीर्दीत राजपुत्र खुसरौने बंड केले. खुसरौला शिखांचे पाचवे गुरू अर्जुनदेव तसेच राजा मानसिंग इत्यादींनी सहकार्य दिले. तेव्हा जहांगीरने अर्जुनदेवास मृत्युदंडाची शिक्षा दिली (१६०६). खुसरौचे बंड मोडण्यात आले. पुढे खुसरौ काही वर्षांनी बऱ्हाणपूर येथे मरण पावला. (१६२२). याशिवाय त्याने मेवाडवर तीन स्वाऱ्या केल्या. मध्य आशियाई धोरणात तो अपयशी ठरला आणि अफगाण टोळ्यांचे तो दमन करू शकळा नाही.
जहांगीरच्या कालखंडात महत्त्वाकांक्षी नूरजहानने दरबारात आपले वर्चस्व प्रस्थापित करून वडील इतमाद-उद्दौला, भाऊ आसफखान आणि राजपुत्र खुर्रम यांच्या साहाय्याने शासनाची सूत्रे सांभाळली. आपल्या स्वार्थी हितसंबंधांच्या रक्षणासाठी तिने केलेल्या प्रयत्नांमुळे जहांगीरच्या कारकीर्दीत बंडाळ्या माजून अराजक निर्माण झाले. जहांगीर लाहोर येथे ऑक्टोबर १६२७ रोजी मरण पावला. [→ जहांगीर].
शाहजहान : (कार. १६२८–५८). जहांगीरला खुसरौ, पर्विझ, शहर्रयार व खुर्रम हे चार मुलगे झाले. खुर्रम म्हणजे आनंदी. अकबराची पत्नी रूकय्या बेगम, विद्वान शिक्षक मुल्ला कासिम बेग व हकिम अली गिलानी इ. व्यक्तींचा खुर्रमवर प्रभाव होता. राजपुत्र खुसरौ व पर्विझ यांच्या मृत्यूमुळे (अनुक्रमे १६२२ व १६२६) खुर्रम व शहर्रयार यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष झाला. आसफखानाने खुर्रमचा तर नूरजहानने शहर्रयारचा पक्ष उचलून धरला. अकार्यक्षम शहर्रयारला वारस नियुक्त करण्याचा नूरजहानचा बेत बघून खुर्रमने जहांगीरविरुद्ध अयशस्वी बंड केले (१६२६). शेवटी त्यास शरण जावे लागले. जहांगीरचे निधन झाले, तेव्हा खुर्रम दक्षिणेत होता. दक्षिणेतून खुर्रमला तातडीने आग्र्याला पोहोचण्याचा संदेश मिळाला. यावेळी शहर्रयारचा लढाईत निःपात करून आसफखानाने त्यास आंधळे केले. आग्रा येथे खुर्रम शाहजहान या नावाने गादीवर बसला (४ फेब्रुवारी १६२८). दोन लक्ष रु. वार्षिक निवृत्तिवेतन स्वीकारून नूरजहानला लाहोर येथे उर्वरित जीवन व्यतीत करावे लागले. शाहजहानचे वायव्य प्रांतविषयक आणि दक्षिणेकडील धोरण विशेष उल्लेखनीय आहे. दुष्काळ व साथीच्या रोगांमुळे (१६३०–३२) शाहजहानसमोर अडचणी निर्माण झाल्या. मुमताजमहलच्या आकस्मिक निधनामुळे (बऱ्हाणपूर-७ जून १६३१) तो खचला. मनोबळ सावरून त्याने पोर्तुगीजांवर वर्चस्व मिळविले (१६३२). तिबेटवर चढाई केली (१६३७–३८). मेवाडच्या सिसोदिया घराण्याचा राणा कर्णसिंह, अमेरच्या कच्छवाह घराण्याचा जगतसिंह तसेच बिकानेर, कोटा, मारवाड येथील राजपूत राजांचे शाहजहानला सक्रिय सहकार्य मिळाले. अखेरच्या दिवसांत शाहजहानला वारसायुद्धास तोंड द्यावे लागले. या युद्धात दारा शुकोव्हचा औरंगजेबाने पराभव व नंतर वध केला आणि शाहजहानला आग्र्याच्या तुरुंगात ठेवले (२१ जुलै १६५८). पुढे तिथेच तो मरण पावला (१६६६). शाहजहानची राजवट ऐश्वर्यशाली ठरली. म्हणून काही विद्वानांनी तिला मोगल सत्तेचे सुवर्णयुग संबोधिले आहे. [→ शाहजहान].
औरंगजेब : (कार. १६५८–१७०७). शाहजहानला एकूण १४ अपत्ये झाली. त्यांपैकी दारा शुकोव्ह. शाहशुजा, औरंगजेब आणि मुरादबक्ष हे इतिहासप्रसिद्ध आहेत. दक्षिणेचा सुभेदार औरंगजेब याने वारसाहक्काच्या संघर्षात बहादुरपूरच्या लढाईत शाहशुजास आणि धरमत, समूहगढ व देवराईच्या युद्धामध्ये दारा शुकोव्हला पराभूत केले व त्याचा पुढे निर्घृणपणे वध केला. शाहशुजा आराकानच्या जंगलात भटकत असता स्थानिक आदिवासींकडून मारला गेला (१६५८). मुरादला प्रथमतः अर्ध्या राज्याचे आमिष दाखविलेः पण नंतर ग्वाल्हेरच्या किल्ल्यात डांबून त्यास ठार केले. आग्र्याच्या किल्ल्यात शाहजहानास बंदिस्त केले. शाहजहान तुरुंगात असतानाच औरंगजेब गादीवर आला. त्याने असहिष्णू सनातनी धार्मिक धोरणाचा पुरस्कार केला. साम्राज्यविस्तारानिमित्त त्याने मीर जुम्लाकरवी कुचविहार घेतले. शाहिस्तेखानास बंगालचा सुभेदार नेमले. त्याने चितगाँग-आराकान घेतले. पोर्तुगीजांचे दमन केले. याच सुमारास दाऊदखानाने (पाटण्याचा सुभेदार) पालामाऊ जिंकले (१६६१). लडाखवर मोगलांनी अधिकार बसविला. त्याच्या कारकीर्दीत चंपतराय (बुदेलखंड), रायसिंग (काठेवाड-नवानगर), रावकरणसिंग (बिकानेर) इत्यादींचे उठाव चिरडून टाकण्यात आले. हिंदूंवर जझिया व यात्राकर लादण्यात आले. मथूरा-आग्र्याच्या परिसरातील जाट, सतनामी व शीख यांचा बंदोबस्त करण्यात आला. त्याचा प्रदीर्घ कालखंड सरहद्द प्रांतातील युद्धे, उत्तर व दक्षिण भारतविषयक घोरण, सनातनी धार्मिक घोरण, मराठा-मोगल संघर्ष इत्यादींसाठी उल्लेखनीय आहे. औरंगजेबाची शेवटची सु. २५ वर्षे दक्षिण हिंदुस्थानात मराठ्यांचा बंदोबस्त करण्यात खर्ची पडली. दक्षिण हिंदुस्थानात, विशेषतः महाराष्ट्रात रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, परशुराम त्र्यंबक, प्रल्हाद निराजी यांसारख्या मराठा सरदार व मुत्सद्यांकडून त्याला प्रतिकार झाला. धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांनी गनिमी काव्याने मोगलांना हैराण केले. मराठ्यांनी प्रतापगड, रायगड, तोरणा इ. किल्ले पुन्हा मिळविले. राजारामाच्या मृत्यूनंतर (१७००) महाराणी ताराबाईने हा लढा चालू ठेवला. सातारा, परळी, पन्हाळा, विशाळगढ, सिंहगड, रायगड, तोरणा, वाकिणखेडा इ. व इतर पाच किल्ले हस्तगत करण्यासाठी औरंगजेबास साडेपाच वर्षांचा कालावधी लागला. अविश्रांत परिश्रमानंतर वृद्धापकाळाने त्याला मरण आले (३ मार्च १७०७). [→ औरंगजेब].
नंतरचे मोगल राज्यकर्ते : औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर इराणकडे पळाला व तिकडेच मरण पावला (१७०७). मुअज्जम, अझम व कामबक्ष या तीन मुलांमध्ये वारसाहक्कासाठी झालेल्या युद्धांत मुअज्जम विजयी ठरला. बहादुरशाह हा किताब धारण करून त्याने (कार. १७०७–१२) राज्याची सूत्रे सांभाळली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांदरशाह (कार. १७१२–१३) तीन भावंडांना ठार करून सिंहासनारूढ झाला तथापि त्याचा नातू फर्रूख सियार (कार. १७१३–१९) याने अब्दुल्लाखान व सैय्यद हुसैन या दोन मुत्सद्यांच्या [→ सैय्यद बंधू] मदतीने राज्य हस्तगत केले. तथापि फर्रूख सियारने सैय्यद बंधूंची उचलबांगडी करण्यासाठी कट रचताच त्यांनी त्यास पदच्युत करून त्याची कत्तल केली. रफी-उद्-दरजत नीकू सियार व रफी-उद्दौला या राजपुत्रांना (१७१९) तत्पश्चात गादीवर बसविले. त्यांपैकी नीकू सियारची निवड होऊनही त्यास गादी मिळाली नाही. ते अकार्यक्षम असल्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. सैय्यद बंधूच्या पाठबळाने बहादुरशाहाचा नातू रोशन अख्तर हा मुहम्मदशाह हा किताब धारण तख्तनशीन झाला (१७१९–४८). त्याने हिकमतीने सैय्यद बंधूंचा नायनाट केला. यासाठी त्याने निजामुल्मुल्कचे आणि त्यांचा चुलत चुलता मुहंमद अमीन यांचे साहाय्य मिळविले. नंतर मुहंमद अमीन व पुढे निजामुल्मुल्क हे मुख्यप्रधान झाले. मुहम्मदशाहाच्या राजवटीतच दिल्लीवर इराणचा सम्राट ⇨ नादिरशाहने स्वारी केली (१७३७–३८). त्याच्या आक्रमणामुळे मोगल साम्राज्याचा डोलारा कोलमडून पडला. मलिक काफूरने दक्षिणेतील मोहिमेत मिळविलेला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा नादिरशाहने इराणला नेला. त्यानंतर बंडखोर प्रांतिक सुभेदारांनी आपापली स्वतंत्र राज्ये प्रस्थापित केली.
मुहम्मदशाहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अहमदशाह (कार. १७४८–५४) गादीवर बसला. त्याच्या कारकीर्दीत बंडाळ्यांना उधाण आले. रोहिला अफगाणांनी उठाव केले. दिल्लीच्या राजकीय घडामोडींमध्ये मराठ्यांचा हस्तक्षेप सुरू झाला. पंजाबपर्यंतचा मुलूख अफगाणिस्तानच्या अहमदशाह अबदालीने ताब्यात घेतला. सफदरजंगाने अवधमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केले. हैदरबादच्या निजामुल्मुल्कचा मुलगा गाजीउद्दीन फिरोजजंग याने वजीरपद प्राप्त केल्यावर अहमदशाहास पदच्युत करून आंधळे केले आणि दुसरा आलमगीर (कार, १७५४–५८) यास गादीवर बसविले. याच्याच काळात दिल्लीवर अहमदशाह अबदालीने चौथी स्वारी (१७५७) करून नजीबुद्दौलास वजीर नेमले.
दुसरा आलमगीर याने गाजीउद्दीनच्या विनाशाचे प्रयत्न करताच गाजीउद्दीनने त्याचा वध करून त्याचा मुलगा अली गौहर (दुसरा शाहआलम) यास बादशाही मिळवून दिली. शाहआलमच्या राजवटीत कटकारस्थानांना ऊत आला. त्याच्या काळातच अहमदशाह अबदालीने तिसऱ्या पानिपतच्या युद्धात (१४ जानेवारी १७६१) मराठ्यांचा दारूण पराभव केला. शाहआलम यास मोगल सम्राट, शुजाउद्दौलास पंतप्रधान आणि नजीबुद्दौलास सेनापती नियुक्त करून तो परतला. ⇨ बक्सारच्या लढाईनंतर बंगाल-बिहार आणि ओरिसाचे दिवाणी आधिकार शाहआलमने इंग्रजांना बहाल केले. तदनंतर तो मराठ्यांच्या हातातील बाहूले बनला. या दुबळ्या सम्राटास गुलाम कादिर नामक पठाणाने आंधळे करून पदच्युत केले (१ ऑगस्ट १७८८). तथापि महादजी शिंद्यांनी दिल्ली पादाक्रांत केल्यानंतर पुन्हा त्यास तख्तनशीन केले (१६ ऑक्टोबर १७८८). जनरल लेक याने त्याच्यावर प्रभुत्व गाजविले (१८०३). त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा अकबर (कार. १८०६–३७) हा गादीवर आला. त्यानंतर दुसरा बहादुरशाह (कार. १८३७–१८५८) हा मोगलांचा शेवटचा सम्राट होय. त्याने १८५८ च्या उठावात पुढाकार घेतला. हा उठाव इंग्रजांनी चिरडून टाकल्यावर बहादुरशाहास रंगूनच्या किल्ल्यातील अंधारकोठडीत डांबून ठेवले. तेथेच तो मरण पावला. त्याच्या मृत्यूबरोबरच औरंगजेबानंतरच्या नामधारी मोगल सम्राटाचा कालखंड इतिहास जमा झाला.
राजकीय स्थिती : मोगल सम्राटाच्या कारकीर्दींचा साक्षेपी आढावा घेतला असता, सम्राटांच्या राजकीय धोरणात एकवाक्यता आढळत नाही. गादी व वारसासाठी तंटेबखेडे, खून ही नित्याची बाब होती. तद्वतच गादीवर येणारा प्रत्येक सम्राट राज्यविस्ताराचे तत्त्व आचरणात आणत असे. याच वेळी पाश्चात्त्य प्रवाशांनी व्यापारानिमित्त आपले पाय रोवण्यात प्रारंभ केला.
अकबराने यूरोपियन व्यापाऱ्यांना सवलती दिल्या. जहांगीरच्या राजवटीत पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत (गोवा) वखारी स्थापन केल्या. सुरतजवळ चार शाही जहाजांना त्यांनी लुटले (१६१३). म्हणून इंग्रजांच्या साहाय्याने मुकर्रबखानाने (सुरतचा सुभेदार) नौदलामार्फत पोर्तुगीजांचा धुव्वा उडविला. जेझुईटांनी त्यांच्यात सलोखा निर्माण केला. फादर आर्. कोर्सी हा जेझुइट जहांगीरचा मित्र होता. पहिला जेम्स (इंग्लंडचा सम्राट) याने विल्यम हॉकिन्सला मोगल दरबारात राजदूत नेमले. सुरत येथे पोर्तुगीजांचा पराभव करून इंग्रज फॅक्टरीची स्थापना (१६१२) झाली. सर टॉमस रो याच्या प्रयत्नामुळे अहमदाबाद, बऱ्हाणपूर, आग्रा व सुरत येथील चार इंग्रज वखारींनी बरीच प्रगती केली (१६१६). वसाहतवाल्यांने पुढे मुंबई येथे वसाहत (१६६५) व सुरतला मुख्य कार्यालय (१६८७) स्थापन केले. पॉलकॅनिंग, सर टॉमस रो हे जहांगीरच्या दरबारातील राजदूत होत. शाहजहानने हुगळी येथील पोर्तुगीजांची वसाहत नष्ट केली (१६३२). शाहिस्तेखानाने चितगाँग जिंकून पोर्तुगीजांना पिटाळले (१६६३). हजारो बंगाली शेतकऱ्यांना त्यांच्या तावडीतून मुक्त केले. शाहिस्तेखानाने ३०० बोटींचे आरमार संघटित केले. हुगळी आणि चितगाँगमधून इंग्रजांची हकालपट्टी केल्यामुळे ते कलकत्त्याकडे वळले.
शाहजहानचे अनुदार धोरण, वायव्य सरहद धोरण व वास्तुनिर्मितीवरील अवाढव्य खर्च यांमुळे मोगल साम्राटज्याचे दिवाळे निघू लागले. राजदूत दुखावले गेले. औरंगजेबाच्या धर्मांध धोरणाने कहर केला. मराठ्यांनी स्वातंत्र्यसंग्रामास सुरुवात केली. शिखांनी सैनिकीबाणा अंगीकारला. वारसाहक्काचे सुनिश्चित नियम नव्हते, राजपुत्रांमध्ये युद्धे होत. उमराव व लष्करी अधिकाऱ्यांचे नैतिक पतन घडून आले. सर्वत्र उठावांचे सत्र सुरू झाले. मोगल दरबार कपटकारस्थानांचे माहेरघर बनले. प्रशासकीय भ्रष्टाचार बोकाळला. मोगलांनी नाविक दलाकडे दुर्लक्ष केले. सतत होणारी बंडे, युद्धे इत्यादींमुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. समृद्धीचा डोलारा कोलमडून पडला. अनेक राज्यकर्त्यांनी प्रजेच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केले. औरंगजेबानंतरचे मोगल सम्राट नामधारी होते. म्हणून सम्राटनिर्माते उदयास आले. त्यांच्या इशाऱ्यावर मोगल राज्यकर्ते नाचू लागले. हिंदू-मुसलमानातील दरी रुंदावत गेली आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली नाही. मोगल राज्यकर्ते भारतीय संस्कृतीशी कधीच एकरूप होऊ शकले नाहीत. मोगलांचे विदेशीपण घातक ठरले. मुसलमानांमधील देशी-विदेशी, शिया-सुन्नी यांतील वैमनस्य विकोपास पोहोचले. निजामुल्मुल्कने हैदराबाद येथे, सादत खान याने अवधमध्ये आणि बुऱ्हानुलमुल्कने बुऱ्हाणपूर येथे स्वतंत्र गाद्या स्थापन केल्या. बंगाल, बिहार व ओरिसामध्ये अलीवर्दीखानाने स्वातंत्र्य घोषित केले. राजपूत, बुंदेले, रोहिले, मराठे इत्यादींनी वेगळी सत्ता कायम केली. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी संघामार्फत प्रादेशिक प्रभुत्वाकडे वाटचाल केली. माळवा, बुंदेलखंड इ. प्रदेशांवर मराठ्यांनी अधिसत्ता कायम केली. नादिरशाह व अहमदशाह अबदाली यांच्या भारतावरील स्वाऱ्यांमुळे मोगल सत्तेस ओहोटी लागली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर नामधारी मोगल सम्राटांवर पेशव्यांनी व त्यांच्या सरदारांनी वर्चस्व गाजविले.
शासनव्यवस्था : बाबर स्वतःस ईश्वराचा प्रतिनिधी व त्याची छाया मानत असे. वंशानुगत अधिकार मान्य असल्यामुळे त्याने पादशाह हा किताब घेतला. खलीफाची वैधानिक सत्ता त्यास अमान्य होती. हुमायूनने राजत्वाच्या सिद्धांतात अर्ध-दैवी तत्त्व मान्य केले. राजसत्तेस खाजगी मालमत्ता मानले. इस्लामी सत्तेच्या मूळ सिद्धांतांचा वारस अकबरासही मिळाला-उदा., कुराणाच्या नियमांना अपौरुषेय मानणे, इस्लामव्यतिरिक्त इतर धर्म अमान्य करणे, मुस्लिमेतरांना हीन लेखणे इत्यादी. परंतु अकबराने त्यात क्रमशः विकास घडविला. सुरुवातीस अकबर मुस्लिम जनतेच्या (मिल्लत) स्वाधीन होता. त्याचा सेनानायक – अमीरुल मोमीनीन –धर्मरक्षक व प्रचारक होता. पुढे उलेमांचे वर्चस्व झुगारून त्याने धर्मनिरपेक्ष राजसत्तेचा पुरस्कार केला. जहांगीरने त्यात नगण्य फरक केला. शाहजहानने अकबराच्या राजत्व सिद्धांतास बदलून टाकले. सनातनी औरंगजेबाने इस्लामनुसार पुन्हा सर्व सिद्धांतांचे पुनरूज्जीवन घडविले. त्यानुसार मोगल सम्राट हा सर्वशक्तिमान, सरसेनापती, न्यायाधीश, निरंकुश सत्ताधारी व इस्लामचा संरक्षक होता. अकबर, जहांगीर व शाहजहान यांचे धोरण उदार होते. अकबराचे झरोखा दर्शन, दीवान-इ-खास, जहांगीरचा न्यायी बादशाह (हकीम-इ-आदील) बनण्याचा प्रयत्न इ. बाबींचा संबंध त्याचा राजसत्तेशीच होता.
बाबर ते अकबरापर्यंत असलेल्या चार प्रशासकीय विभागांची संख्या औरंगजेबापर्यंत सहा झाली : (१) वकील (पंतप्रधान) – केंद्रीय सरकारचा सर्वोच्च अधिकारी आणि शाही कुटुंब प्रबंधक, (२) दीवान (अर्थमंत्री), (३) मीरबक्षी (युद्धमंत्री), (४) सद्र काजी-दिवाणी व फौजदारी कायदेप्रमुख, (५) सद्र-ए-सुदूर-धर्म विभाग प्रमुख व (६) मुहतसिब-सार्वजनिक नीतिमत्ता विभाग प्रमुख, जझिया एकत्र करणारा इत्यादी. यांव्यतिरिक्त मीर अतीश (दारोगा-ए-तोफखाना), दारोगा-ए-डाकचौकी (हेर व टपाल), दारोगा-ए-गुसलखाना, दारोगा-ए-किताबखाना, कोतवाल (पोलीस प्रमुख) इ. अधिकारी असत. प्रादेशिक शासन सुभेदारांकडे होते. अकबराच्या वेळी १५, तर औरंगजेबाच्या काळात २० सुभे होते. सुभ्यांसाठी दिवाणाची नियुक्ती होत असे. सुबे सरकारमध्ये (जिल्ह्ये) व जिल्ह्ये परगणे किंवा महलांमध्ये विभागले जात. खेड्यासाठी पंचायत असे . मोगलांच्या लष्करी संघटनेचा आधार मनूसबदारी व्यवस्था होय. शाही सेवकांना दर्जाप्रमाणे मन्सब मिळत असे. शक्तिशाली मन्सबदारांना उम्रा (५००–२,५००) व उम्रा-ए-आझम (३,००० च्या वर) म्हटले जाई. पायदळ, घोडदळ, गजदळ, आरमार व तोफखाना हे स्थायी लष्कराचे विभाग होते. दाखिली सैन्य अंतर्गत शांततेसाठी वापरत व अहदी सैन्य सम्राटाचे विश्वसनीय लष्कर होते. इतर मांडलिक राजे व मन्सबदारांचे वेगळे लष्कर असे.
प्रशासक शेतसारा, जझिया, यात्राकर इ. वसूल करत. अकबराने जझिया व यात्राकर माफ केले. बाबर, हुमायून व औरंगजेब यांनी ते वसूल केले. अकबरकालीन तोडरमलची महसूलपद्धती व बंदोबस्त व्यवस्था हितावह ठरली. खेडोपाडी मुकद्दम महसूल गोळा करत. शाहजहान व औरंगजेबाने मक्त्यावर शेती देण्याची प्रथा सुरू केली. बाबर, हुमायूनची नाणी जुन्या प्रकारची होती. अकबराने शेरशाहप्रमाणे त्यात सुधारणा घडविली (१५७७). औरंगजेबाने चांदीची नाणी वाढविली. अकबराने हिंदूंसाठी हिंदू न्यायाधीशांची नियुक्ती केली. धर्मनिरपेक्ष व राजकीय कायद्यानुसार न्यायालयांची विभागणी केली.
प्रचलित मुस्लिम कायदेसंहितेचा (शराए ’अ’) आधार (कुराण), हादिस, इजमाल (संकलन) आणि कियास (कुराण व हादिसच्या शिकवणुकीतील साधर्म्य) मोगलकाळातही होता. न्यायदानविषयक हनफी, मलीकी, हानबली व शफी या चार संप्रदायांपैकी मोगलकाळात हनफी संप्रदायाचे प्रमुत्व होते. मुस्लिमेतरांना जिम्मी (बिगर मुस्लिम नागरिक) म्हणत. त्यांच्यावर जझिया कर लादला जाई. त्यांना मुसलमानांपेक्षा दुप्पट कर व महसूल द्यावा लागे.
मुख्य सद्र हा धर्म व न्यायविभागाचा अघ्यक्ष असे. उलेमा कायद्याची व्याख्या करत. सम्राट विधिसंहितेविषयक सल्लागार नियुक्त करत. त्यांना शेख उल्-इस्लाम, काजी उल्-कजात, सद्र-ए-जहाँ, सद्र-उस-सुदूर असे संबोधिले जाई. तो सम्राटाचा धार्मिक व न्यायदानविषयक सल्लागार असे. शरीअतच्या विसंगत निष्कर्षाबद्दल तो आदेश देत असे. शिक्षण, धार्मिक स्थळे, धमार्थ भूमी इत्यादींची व्यवस्था तो लावत असे.
अकबराने मुस्लिमेतरांच्या बाबतीत रूढ असलेल्या जाचक कायद्यात फेरबदल घडविले. सर्वांसाठी समान न्यायव्यवस्था निर्माण केली. त्याने कैद्यांना मुसलमान किंवा गुलाम बनविण्यावर बंदी घातली (१५६२), हिंदूवरील यात्राकर (१५६३) व जझिया (१५६४) रद्द केले. सर्वधर्मप्रसारासाठी त्याने मुभा दिली. मंदिरे, चर्चवास्तू इ. बांधण्याची परवानगी दिली. बळजबरीने मुसलमान केलेल्यास परत हिंदू होण्याची परवानगी दिली. इच्छेविरुद्ध मुसलमानांशी विवाहबद्ध झालेल्या हिंदू स्त्रियांना त्यांच्या पैतृक कुटुंबात परतण्याची मुभा दिली. त्याने मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यात विवाह व घटस्फोटविषयक बदल केले. सर्वसाधारणपणे एकपत्नीत्वाचा पुरस्कार करून पहिल्या पत्नीपासून संतती न झाल्यास दुसऱ्या विवाहास मान्यता दिली. वांझ स्त्री, सावत्र बहीणभावांतील विवाह आणि अनुक्रमे १६ व १४ वर्षांखालील मुलामुलींच्या विवाहांस त्याने निषिद्ध ठरविले. १२ वर्षांखालील वयाच्या मुलाची सुंता न करण्याचा आदेश दिला. हिंदू विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देऊन सती जाण्यास सक्ती न करण्याचा आदेश दिला. विशिष्ट दिवशी पशुहत्याबंदी आदेश जारी केला. मद्यपान निषेध लागू केला. शाही घराण्यातील राजपूत स्त्रियांना धर्मस्वातंत्र्य दिले. सर्वांसाठी व्यापार-उदीमविषयक समान कायदे बनविले. राज्यव्यवहारात एकवाक्यता आणली.
जहांगीरने शासनव्यवस्थेत अपवादात्मक बदल केले. मुस्लिम मुलींचा हिंदू पुरुषांशी विवाह निषिद्ध ठरविला. सक्तीच्या धर्मांतरास प्रतिबंध केला. शाहजहानने यात्राकर लादला. मंदिरांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले परंतु दारा शुकोव्हच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीमुळे त्यात पुढे फेरबदल झाले. सनातनी औरंगजेबाने अकबराच्या सर्व उदारमतवादी कायद्यांमध्ये फेरबदल केले. पुन्हा इस्लामप्रमाणे कायदेसंहिता बनविली आणि हिंदूंवर जझिया कर लादला.
न्यायव्यवस्था : मोगलकालीन न्यायव्यवस्था बगदाद आणि ईजिप्त येथील न्यायव्यवस्थेसारखी होती. सुभेदार, फौजदार, कोतवाल, शिकदार हे त्यांत सहभागी होत. जिल्हा व परगण्यांमध्ये अमिल न्यायदान करत. खेडोपाडी जाती पंचायती हे कार्य करत. योग्य न्याय सर्वांच्या पदरी टाकण्याचा मोगल सम्राटांनी प्रयत्न केला.
धार्मिक धोरण : बाबरास मुल्ला-मौलवी, शेख व मुजतहिद यांच्याबद्दल विशेष आस्था होती. जिहाद (धर्मयुद्ध) प्रसंगी स्वीकृत नियमनांचे त्याने पालन केले. तो कट्टर सुन्नी असला, तरी मुस्लिमेतरांना छळत नसे. हुमायुनने अशाच धोरणाचा अवलंब केला. इराणमधील शिया संप्रदायाबद्दल त्याला आदर होता. बनारसमधील जंगमवाडी मठासाठी मिर्झापूर जिल्ह्यातील सु. १२० हे. भूमी त्याने देणगी म्हणून दिली.
अकबराने समन्वयवादी धार्मिक धोरण स्वीकारले. सहिष्णू धार्मिक धोरणाचा तो प्रवर्तक ठरला. ⇨ दीन-ए इलाही हा त्याने प्रवर्तित केलेला संप्रदाय त्याचा निदर्शक ठरतो. त्याचे हे धार्मिक धोरण तैमूरवंशीय उदार धार्मिक परंपरा, उदार शिक्षक, भक्ती व सूफी विचारधारा, हिंदू बेगमांचा, अधिकाऱ्यांचा व इतर धर्मगुरूंचा प्रभाव इत्यादींमुळे उदयास आले. विभिन्न धर्माचे सखोल परिशीलन करून महजर जारी केला (१५७९). बादहीन-ए-इलाहीची स्थापना केली (१५८२). जझिया, यात्राकर रद्द केले. सामाजिक पूजाअर्चा मान्य केली. फार्सी भाषेत हिंदूंच्या शास्त्रीय ग्रंथांची भाषांतरे केली. हिंदू रूढी व परंपरा, सण व उत्सव यांबद्दल त्याने आदरभाव दर्शाविला. त्याने आपला धर्म बळजबरीने लोकांवर कधीच लादला नाही.
उलेमांचा प्रभाव असूनही जहांगीराने वडिलांच्या धार्मिक धोरणाचा त्याग केला नाही. तथापि मुस्लिम जनतेच्या हितसंबंधाकडे त्याने विशेष लक्ष दिले. शाहजहानच्या काळात उदार धार्मिक विचारप्रवाह लुप्त होऊ लागला. इस्लामचा प्रभाव वृद्धिंगत झाला आणि अकबराच्या सिजदा (दंडवत प्रणाम) पद्धतीऐवजी चहार तस्लीमची पद्धत सुरू झाली. सुन्नी मतप्रणालीचा शाहजहान संरक्षक बनला. तीर्थयात्राकर त्याने पुन्हा लादला. ईश्वराबद्दल अपशब्द काढणे दखलपात्र गुन्हा ठरविला तथापि अकबर व जहांगीराप्रमाणे त्याने अनेक संस्कृत ग्रंथांचा फार्सीत अनुवाद केला. या कार्यात दारा शुकोव्हची भूमिका उल्लेखनीय आहे. औरंगजेबाचे कट्टर असहिष्णुतेचे धोरण सर्वश्रुत आहे. त्याने नाण्यांवर कलमा मुद्रांकित करणे, शियांचा सण नवरोज, अफूची शेती इत्यादींवर प्रतिबंध घातला. मुहतसिब या अधिकाऱ्याची नियुक्ती करून पाचदा नमाज, रमजानचे उपवास इ. सक्तीचे केले. सूफी संतांना वेळप्रसंगी शिक्षासुद्धा दिली.
सामाजिक स्थिती : या काळातील सामाजिक स्थिती सरंजामशाही पद्धतीवर आधारलेली असून बादशाहाला सर्वश्रेष्ठ स्थान होते. समाजात प्रामुख्याने तीन वर्ग असत : एक राजा, त्याचे नातेवाईक आणि सरदार-सरंजामदार, दुसऱ्या वर्गात मांडलिक जहागीरदार, त्यांचे सरदार आणि लष्करातील उच्च पदावरील मन्सबदार असत. तिसरा वर्ग सामान्य जनतेचा, शेतकरी-कारागिरांचा होता. बहुसंख्य समाज हिंदू असून त्यात अनेक जाती होत्या. मुसलमान समाजात दोन वर्ग होते. त्यात बाहेरून आलेले विशेषतः अरबस्तान, इराण येथून आलेले व्यापारी असून सुन्नी, शिया, बोहरी इ. पोटजाती अस्तित्वात होत्या. युद्धकैद्यांना गुलाम व हिजडे बनविले जाई. अंतःपुराच्या परिसरात हिजड्यांची आगळीच सत्ता असे. अनेक भारतीय घराणी बाह्यतः तरी मुसलमानसदृश झाली होती. पोशाख, शास्त्रास्त्रे, शिक्षण, भाषा, चालीरीती इत्यादींवर मोगली छाप स्पष्ट दिसे.
मोगल राज्यकर्त्यांनी काही मुसलमानेतर परंपरा स्वीकारल्या. हुमायूनने तुलादान प्रथा सुरू केली. होळी, दसरा, वसंतपंचमी, रक्षाबंधन इ. सण-उत्सव अकबर दरबारात साजरे करीत असे. जहांगीर व शाहजहान यांनी या प्रथा चालू ठेवल्या. औरंजेबाने मात्र हिंदू-इराणी रूढी-परंपरांवर प्रतिबंध घातला.
सार्वजनिक जत्रा आणि सण हे प्रमुख करमणुकीचे समारंभ होत. शिवरात्र, कृष्णाष्टमी, दिवाळी हे हिंदूंचे, तर मोहरम, ईद-उल्-मीलाद, शब-ए-बर ’अत, ईद-उल्-अदहाँ इ. मुसलमानांचे ठळक सण होत. मीनाबाजार, नवरोज, अब-इ-पाशान (होळी सदृश सण) इ. उत्सव होते. मोगल काळात साधारणतः स्त्रियांना विशेष मान नव्हता तथापि मोगल सम्राटांच्या जनानखान्यात काही स्त्रियांचे वर्चस्व होते. माहम अनघा, नूरजहान, जहाँआरा, झिबुन्निसा, झिनत्-अन्-निसा अशा काही स्त्रियांनी तत्कालीन बादशाहांवर वर्चस्व गाजविले. मुलींचा विवाह बालवयातच होई आणि उच्च कुलीन स्त्रियांत पडदापद्धती प्रचलित होती. मुसलमानात चार लग्ने होत परंतु हिंदू समाजात श्रीमंत वर्ग वगळता एकपत्नीकत्व होते. मुसलमान स्त्रियांना घटस्फोट घेता येई व पुनर्विवाहही करता येई. मात्र हिंदू स्त्रियांना ही मुभा नव्हती. जनानखान्यातील स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था होई पण सर्वसामान्य स्त्रियांना फारसे शिक्षण मिळत नसे. राजपूत स्त्रियांचा मोगली जनानखान्यात प्रवेश झाल्यानंतर मोगल स्त्रियांनी हिंदू पद्धतींचे अनुकरण करण्यास प्रारंभ केला नूरजहानच्या वेळी इराणी बाणा अधिक होता.
अकबराने सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले तरी सरकारमान्य विद्यालये थोडी होती आणि शिक्षणासाठी नंतरच्या सम्राटांनी विधायक प्रयत्नही केले नाहीत. ग्रामीण भागातून मंदिरे वा मशिदीतून शाळा वा मक्तब असत. त्यांतून मुख्यत्वे धार्मिक शिक्षणावर भर असे. मक्तब व मद्रसा ही मुसलमानांची शैक्षणिक केंद्रे होती. अकबर, शाहजहान व जहाँआरा यांनी आग्र्यात मद्रसे स्थापन केले. आग्रा, दिल्ली, जौनपूर, सियालकोट, अहमदाबाद ही इस्लामची अध्ययनाची केंद्रे होती. हिंदूंची बनारस (काशी), नासिक, मदुरा, कांची इ. प्रमुख विद्याक्षेत्रे होती. तेथे अनेक ग्रंथालये व पाठशाळा असत. अकबराने ग्रंथालयीन व्यवस्थेत सुधारणा घडविल्या. राजकुमारी सलीमा सुलतान, झिबुन्निसा इत्यादींची खाजगी ग्रंथालये प्रसिद्ध होती. दारा शुकोव्हने वाङ्मयीन क्षेत्रात नावलौकिक मिळविला. त्याचेही ग्रंथालय समूद्ध होते. अजितसिंहाच्या मुलीस (फर्रुख सियारची विधवा पत्नी) पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याची परवानगी मोगल बादशाहाकडून मिळणे (१७१९), ही घटना तत्कालीन परिस्थितीत उल्लेखनीय आहे.
आर्थिक स्थिती : मोगलकालीन अर्थकारण कृषिव्यवस्थेवर अवलंबून होते. गावास मौझा म्हणत. असली-दाखिली, रयती-तालुका इ. खेड्यांचे प्रकार होते. रयती खेडी खालसा भूमीशी व तालूका खेडी जमीनदारांशी संलग्न होती. असामी राया किंवा माझरा सामान्य शेतकऱ्यांना म्हणत. ते जमीनदार नसत. पाणी-पुरवठ्याची विशेष व्यवस्था नव्हती. फिरोजशाह तुघलककालीन कालव्यांची दुरूस्ती अकबराने केली. शाहजहानने नवीन कालवे काढले. तांदूळ, गहू, ज्वारी, कापूस, ऊस, इ. पिके घेतली जात. कृषी व उद्योगासाठी मुबलक श्रमिक उपलब्ध होते. पूर, युद्धे, अवर्षण इत्यादींमुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती अनुक्रमे १६३०, १६८३ व १६८६ या साली दक्षिणेत उद्भवली आणि भयंकर दुष्काळ पडला.
व्यापार, टाकसाळ, नजराणे, जकात, भूमिकर ही राष्ट्रीय उत्पन्नाची प्रमुख साधने होती. जकात व भूमिकर हे राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. जकात फक्त मुसलमानांपासून (उत्पन्नाचा ४० वा भाग) वसूल केली जाई. मुसलमान व्यापाऱ्यांपासून आयात-निर्यात कर २·५% तर हिंदूंपासून ५·५% घेतला जाई. खाजगी कारखाने व व्यापारापासून उत्पन्न मिळे. खनिज पदार्थांच्या खाणी राज्याच्या मालकीच्या होत्या. खम्स (शिपायांची लूट) हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन होते. बेवारस संपत्ती सरकारची होत असे. या उत्पन्नाचा बराच भाग लष्करी मोहिम, युद्धे, शिबिरे इत्यादींवर, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्याचे वेतन, राजवाडे, दरबार, शासकीय इमारती, मशिदी, विश्रामगृहे, मकबरे, किल्ले, उद्याने, राजमार्ग, सडका, पूल, कालवे, तलाव, कारखाने इत्यादींवर खर्च होत असे.
गुजरात मोहिमेनंतर (१५७३) तोडरमलने जमीन मोजून क्षेत्रफळ व पिकांच्या आधारे भूमिकर निश्चित केला आणि बंगाल व बिहार वगळता संपूर्ण राज्यात ही व्यवस्था (१५७५–७६) अंमलात आणली. संपूर्ण राज्याचे १८२ परगण्यांत विभाजन करून प्रत्येकी एक कोटी दाम नगदी महसूल कारोडीनामक अधिकारी गोळा करीत. कारकून व पोतदार त्यास मदत करत. दिवाण बनल्यावर तोडरमलने (१५८२) भूमिप्रबंध व राजस्व व्यवस्थेत सुधारणा केल्या. मालगुजारीच्या गल्लाबख्शी, नस्क व जबुती या तीन पद्धती प्रचारात होत्या. दाह-सालह (दहा-वर्षीय) पद्धतीनुसार महसूल गोळा केला जाई. शेतकऱ्याला निर्धारित शेतसारा द्यावा लागत असे. त्यामुळे त्यातील अस्थिरता दूर झाली.
सामान्यतः मोगलांच्या जकात (चुंगी) व करपद्धतींत सुत्रबद्धता नव्हती. व्यापार मुक्त नव्हता. धर्मान्धता, कार्यालयीन अडचणी, एकाधिकार, तसेच सम्राट कोतवाल यांचे हुकूमशाही, अंतःपुरातील अधिकाऱ्यांचा स्त्रियांचा हस्तक्षेप इत्यादींमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. कालमानपरत्वे अकबराने सु. ४० अनावश्यक कर रद्द केले व हेच धोरण पुढे जहांगीर व औरंगजेबाने अंमलात आणले.
कला व साहित्य : मोगल काळात कला व वाङ्मयीन क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती झाली. बाबराने समरकंदच्या उद्यानकलेचे द्योतक आग्र्यात उभारले. त्यांपैकी बाग-ए-गुल अपशाँ (रामबाग) अद्यापही आहे. हुमायूनने दीन पनाह (धर्मरक्षक) नामक नगर दिल्लीत निर्माण केले. त्यापैकी अद्यापही पुराण्या किल्ल्यातील खुनी दरवाजा, बाह्य भिंत व भग्नावशेष दृष्टोत्पत्तीस पडतात. आग्र्यात त्याच्या काळातील एक मशीद (१५३०) आहे. दिल्लीतील हुमायूनचा मकबरा (१५६४), आग्र्याचा लाल किल्ला, त्यातील अकबरी महाल, जहांगीर महाल इ. वास्तू लक्षणीय आहेत. ⇨ फतेपुर सीक्रीच्या वास्तू भव्य आहेत. तेथील बुलंद दरवाजा-आग्राद्वार, जोधाबाईचा महाल (चहार दीवारी) हवाखाना, बीरबल महाल, दीवान ए-खास, जामा-मशीद इ. वास्तू आकर्षक आहेत. अकबर संगीत व चित्रकलेचाही व्यासंगी होता. इराणी उस्ताद ख्वाजा अब्दुस्समद आणि मीर सैय्यिद अलींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय चित्रकारांना प्रशिक्षिक करून त्याने मोगल चित्रकलेची नवीन शैली निर्माण केली. त्याच्या आश्रयास दसवंत, बसावन, केसवदास, लाल मुकुंद, फर्रुख (कलामाक),मधुजगन, महेश, खेमकरण, तारा, सांवला, हरवंश, राम इ. चित्रकार होते. अकबराने फार्सी व भारतीय गद्य व पद्य यांना चित्रित केले. व्यक्ती चित्रकला, इतिहासवृत्त कला, लोककला इत्यादींची प्रगती झाली. त्याच्या दरबारात हिंदू, इराणी, तुरानी, काश्मीरी संगीतज्ञ होते. त्यांपैकी तानसेन, रामदास कलावंत, सुभानखान, मिया लाल खान इ. प्रमुख होत.
श्रीनगर येथील शालीमार बाग, अकबराचे स्मारक (आग्रा), एनमादुद्दौलाचा मकबरा (आग्रा) इ. वास्तूंचे श्रेय जहांगीरास आहे. जहांगीराच्या काळात व्यक्ती चित्रकला परमोच्च बिंदूस पोहचली. बिशनदास हा त्याचा प्रसिद्ध चित्रकार. शाहजहान लाल दगडाच्या इमारतीचा वारसदार होता परंतु त्याने काही वास्तू (ताजमहाल) संगमरवरी दगडांत रूपांतरीत केल्या? अणकुचीदार महिराप बनवून वास्तुकलेत नवीन शैली प्रस्तुत केली. आग्र्यातील दीवान-ए-आम, दीवान-ए-खास, मोती मशीद इ. मनमोहक वास्तू निर्माण केल्या. दिल्लीच्या किल्ल्यातील तिन्ही प्रवेशद्वारे तसेच निवासकक्ष, दरबार हॉल, शाही कोठार, पाकगृह, अश्वशाळा, उद्याने, फवारे मनमोहक आहेत. जामा मशिदी (आग्रा व दिल्ली), ताजमहाल इ. कलाकृती प्रसिद्ध आहेत. शाहजहानच्या दरबारात लालखान (तानसेनचा जावई), जगन्नाथ, सहाकविराय इ. प्रसिद्ध गायनाचार्य होते. सुखसैन, सुरसैन हे संगीतज्ञ होते. औरंगजेबाच्या राजवटीत वास्तुकलेस ओहोटी लागली. लाहोरची बादशाही मशीद, औरंगबादचा बिबीचा मकबरा आणि औरंगजेबाची राणी राबिअ-उद्-दौरानी हिची कबर हे त्याचे द्योतक होत.
अकबर, शाहजहान, दारा शुकोह यांनी विद्वानांना आश्रय दिला. गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस (१५७४), सूरदास व मीराबाईचे काव्य, मलिक मुहम्मद जायसीरचित पद्मावत (१५२०–४०), दादूदयालच्या कबीरपंथी रचना (१५४४–१६०३) या हिंदीच्या मोगलकालीन ठळक कलाकृती होत. अब्दुररहीम खानखन्नान, तोडरमल, बिरबल, केशवदास इ. प्रसिद्ध साहित्यिक होत. याच कालखंडात महाराष्ट्रात ज्ञानेश्वर-नामदेवांची वाङ्मयीन परंपरा व भक्तीसंप्रदाय संत एकनाथ, दोसोपंत, संत तुकाराम, श्रीगोंद्याचे शेख महंमद, समर्थ रामदास, वामन पंडित, श्रीधर इत्यादींनी पुढे चालू ठेवला. मोगलकालीन अरबी साहित्याचा संबंध प्रामुख्याने कुराण, हदीस, फिक (कायदेसंहिता), सुफी मतप्रणाली व व्याकरणाशी होता. मखदूम अल्-मुल्क अबदुल्ला सुल्तानपूरी, शेख अब्द् अल्-नबी शद्र शुदूर हे अकबरकालीन, मुल्ला अब्दूल हकिम, सीयालकूटी, मुल्ला महमूद जौनपूरी हे शाहजहानकालीन, मुल्ला जीवान, मीर मुहम्मद जाहीद, सैय्यिद अली खान इब्न मसूम इ. औरंगजेबकालीन सुप्रसिद्ध अरबी साहित्यिक होत. फार्सी भाषेत तर असंख्य रचना लिहिल्या गेल्या. अबुल फज्ल, फैजी, गझाली मशहदी, अब्दुररहीम खानखन्नान, अब्दुल कादिर बदाऊनी, जहांगीर, गुलबदन बेगम, अली कुली सलीम, अबु तालिब कलीम, अब्दुल हमिद लहउरी, दारा शुकोह, जहाँआरा बेगम, झिबुन्निसा, मुहम्मद हाशीम खाफीखान, मुहम्मद काझीम इ. असंख्य साहित्यिकांनी फार्सी वाङ्मय, सुलेखनकला व ऐतिहासिक दालनात मोलाची भर घातली. दारा शुकोहने योगवासिष्ठ, भगवद्गीता, उपनिषद यांचा फार्सीमध्ये अनुवाद केला. त्याचा मज-माल बहरैन हा ग्रंथ सूफी व हिंदू अध्यात्मवादाचे बोलके चित्र होय.
मूल्यमापन : मोगल साम्राज भारताचा अनेक आशियाई व आफ्रिकी देशांशी संबंध जोडणारा दुवा ठरला. उत्तर व दक्षिण भारतात त्या काळात राजकीय बांधीलकी निर्माण झाली. दोन शतकांच्या प्रदीर्घ कालखंडात कृषी, व्यापारउदीम, कला-वाङ्मय इ. दालनात मोठी प्रगती घडून आली. उर्दू विकास झाला. दैनंदिन व्यवहार त्याचप्रमाणे संस्कृती यांच्यावर हिंदू-मुस्लिमांच्या विचारसरणीचा परस्पर प्रभाव जाणवू लागला. मोगलांची अद्ययावत शस्त्रास्त्रे, युद्धकला इत्यादींचा प्रभाव भारतीयांवर पडला. त्यांच्या दीर्घकालीन प्रशासनामुळे एकवाक्यता निर्माण झाली.
काही विद्वान मोगलकाळास भारतीय राष्ट्रीयत्वाचे युग संबोधितात. ब्रिटिशांबद्दलचा तिरस्कार, सुलतानशाहीपेक्षा वरचढ राज्यव्यवस्था, अकबराचे सहिष्णू धोरण ही मोगलकाळास राष्ट्रवादाचे प्रेरक तत्त्वे मानणाऱ्यांना हे विसरून चालायचे नाही, की हे साम्राज्य विदेशी व परिपूर्ण होते. त्यांच्या सु. अडीचशे वर्षांच्या कालखंडात जेमतेम एका शतकापेक्षाह कमी काळासाठी भारतीयांना त्यांच्या उदारवादी धोरणाची प्रचिती झाली. अन्यथा हिंदूंसोबत दमनकारी धोरणच राबविले गेले. त्यांचे प्रशासन इराणी-अरबी व्यवस्थेचे संमिश्र रूप होते. अधिसत्तेचा मूळ गाभा लष्करी राजवटीवर अवलंबून होता. बहुंताश उच्च पदे विदेशी मुसलमानांकडेच होती. म्हणून मोगलकाळास राष्ट्रवादाचे प्रतीक मानणे तितकेसे संयुक्तिक वाटत नाही.
पहा : अकबर; औरंगजेब; जहांगीर; बाबर; शाहजहान; मोगल कला.
संदर्भ : 1. Brown, Percy, Indian Architecture, (Islamic Period), Bombay, 1964.
2. Burn, Richard, Ed. Cambridge History of India: The Mughul Period, Vol. IV, Delhi, 1957.
3. Chitnis. K. N. Socio-economic Aspects of Medival India, Poona, 1979.
4. De Laet, Joannes; Trans. Hoyland, J. S. The Empire of the Great Mogol, Bombay, 1928.
5. De, U. N. some Aspects of Medieval Indian History, New Delhi, 1971.
6. Edwardes, S.; Garret H.O. Mughal Rule in India, Delhi, 1979.
7. Gacoigne, Bamber, The Great Moghuls, London, 1976.
8. Ghauri, Iftikar Ahmad, War of Succession between the Son’s of Shah Jehan, 1657-58, Lahore, 1964.
9. Grewal J. S. Muslim Rule in India, Calcutta, 1970.
10. Habib, Irfan,The Agrarian System of Mughal India, Aligarh, 1963.
11. Holden, E. S. Ed. Moghul Emperors of Hindustan, Delhi, 1975.
12. Keene, H. G. The Fall of the Mughal Empire, Delhi 1971.
13. Kennedy Pringle, History of the Great Moghuls, Calcutta, 1968.
14. Lal, K. S. Studies in Medieval Indian History, Delhi, 1966.
15. Majumdar, R. C. Ed., The Mughal Empire, Bombay, 1974.
16. Nizami, K. A. Studies in Medieval History and culture, Allahabad, 1966.
17. Rizvi, S. A. A. Muslim Revivalist Movements in Northern India in the Sixteenth and Seventeenth Centuries, Agra, 1965.
18. Sarkar, J. N. Fall of the Mughal Empire, 4 Vols., Calcutta, 1949.
19. Sarkar, J. N. Mughal Empire in India, Agra, 1966.
20. Siddigi, N. A. Land Revenue Administration under the Mughals: 1700- 1750, Delhi, 1971.
21. Srivastava, A. L. The Mughal Empire, Agra, 1966.
22. Varma, R. C. Foregin Policy of the Great Mughals, Agra, 1967.
शेख, शब्बीर