भांडवल विनियोग : देशाच्या आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत भांडवल विनियोगाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या दृष्टीने भांडवल विनियोगाला संकुचित अर्थ आहे. या अर्थाच्या संदर्भात भांडवल विनियोग म्हणजे बचतीचा उपयोग टिकाऊ उपभोग्य वस्तू जसे घर, जमीन, मौल्यवान धातूंचे दागिने तसेच कंपन्यांचे भाग, ऋणपत्रे, सरकारी कर्जरोखे वगैरे खरेदी करण्यासाठी करणे होय. परंतु विस्तृत अर्थाने भांडवल विनियोग(कॅपिटल इन्व्हेस्टमेंट) म्हणजे देशांतर्गत बचतींचा त्याचप्रमाणे परदेशी मौद्रिक भांडवलाचा उपयोग करून उत्पादक भांडवली वस्तूंचे म्हणजे यंत्रसामग्रीचे उत्पादन वाढवून निरनिराळ्या उद्योगधंद्यांची उत्पादनशक्ती वाढविणे होय. म्हणूनच विनियोगाच्या दारत वाढ करण्यासाठी राष्टीय उत्पन्नाचा अधिकाधिक भाग बचत केला पाहिजे. विनियोगाच्या प्रमाणाची वाढ जशी बचतीच्या पुरवठ्यावर अवलंबून असते, तशीच बचतीच्या मागणीवरही अवलंबून असते. देशांतर्गत बचतीचे प्रमाण वाढले आणि अधिक मौद्रिक भांडवलाची सोय झाली, परंतु जर भांडवल विनियोगाला प्रोत्साहन नसेल, तर विनियोगाचे परिणाम आणि प्रमाण यांत वाढ होणार नाही. या दृष्टीकोणानुसार विनियोगाचे प्रमाण बचतीच्या प्रमाणावर अवलंबून असते. परंतु विनियोगासाठी चालू बचतीबरोबर संचित बचती, परदेशी मदत किंवा कर्जे आणि तुटीचा अर्थभरणा या मार्गांनासुद्धा मौद्रिक भांडवल प्राप्त होणे शक्य आहे.

पुराणमतवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते विनियोगासाठी संचित बचतींची जरूरी असून बचतीचे प्रमाण वाढविण्यासाठी चालू उपभोगाचे प्रमाण कमी केले पाहिजे. संचित बचत म्हणजेच विनियोग. कारण राष्ट्रीय उत्त्पन्नाचा जो भाग उपभोग्य वस्तूंवर खर्च होत नाही, तो लगेच किंवा अल्पकाळात भांडवली वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च केला जातो. म्हणून त्यांच्या मते बचतीचे ताबडतोब विनियोगात रूपांतर होते. बचत आणि विनियोग यांची नेहमीच बरोबरी (समानता) असते.

आधुनिक अर्थशास्त्रांच्या मते भांडवल विनियोगासाठी चालू उपभोगाचे प्रमाण कमी केलेच पाहिजे असे नाही. कारण चालू (वर्तमानकालीन) उपभोगाचे प्रमाण कमी झाल्याने विनियोगाला प्रोत्साहन राहत नाही. भांडवल विनियोगासाठी ज्याप्रमाणे अधिक बचतींची आवश्यकता असते, त्याप्रमाणे विनियोगाला उत्तेजन मिळाले पाहिजे. राष्ट्रीय उत्त्पन्नाचा बचत केलेला सर्व भाग ताबडतोब विनियोगासाठी उपयोगात आणला जाईलच असे नाही. बचतीचा काही भाग लोक आपली रोखता वाढविण्यासाठीसुद्धा उपयोगात आणतील. म्हणूच बचत आणि विनियोग यांची नेहमीच बरोबरी असू शकणार नाही. विनियोगाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. खाजगी उद्दोगधंद्याच्या क्षेत्रात विनियोगाचे प्रोत्साहन प्रचलित व्याजाचा दर आणि भांडवलाची सीमांत कार्यक्षमता यांच्या संबंधाने ठरविले जाते. भांडवलाची सिमांत कार्यक्षमता (म्हणजे अपेक्षित नफ्याचा दर) प्रचलित व्याजाच्या दरापेक्षा अधिक असणे शक्य असेल, तर विनियोगाला प्रोत्साहन मिळते परदेशी भांडवल आयातीला प्रोत्साहन मिळते. परदेशी भांडवल आयातीला प्रोत्साहन देऊन विनियोगाचे प्रमाण वाढविता येते. त्यासाठी देशामध्ये राजकीय आणि आर्थिक स्थैर्य पाहिजे. तसेच भांडवलावरील व्याज आणि परदेशी भांडवल विनियोगापासून प्राप्त झालेला नफा, परदेशी भांडवलदारांना त्यांच्या चलनामध्ये नियमितपणे मिळण्याची निश्चिती पाहिजे. परदेशी भांडवल आयातीसाठी करविषयक सवलतीही असाव्या लागतात. खाजगी क्षेत्रात विनियोगाच्या वाढीसाठी सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे वीज, पाणीपुरवठा, शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण, सार्वजणिक आरोग्य, वाहतुकीची साधने या क्षेत्रात विनियोगाची आवश्यक असते. अशा प्रकारच्या सामाजिक पूरक विनियोगाची (सोशल ओव्हरहेड इन्व्हेस्टमेंट) जबाबदारी बव्हंशी सरकारवर पडते कारण या क्षेत्रात नफ्याचे प्रमाण फार कमी असते. म्हणून खाजगी उद्योगपती सामाजिक क्षेत्रात विनियोग करण्यास तयार नसतात. खाजगी उद्योगधंद्यांच्या क्षेत्रातील विनियोगाचे प्रमाण हे कंपन्यावरील सरकारी करांचे ओझे, कंपन्यांच्या राखीव निधीचा विनियोगासाठी उपयोग, भांडवलाच्या घसाऱ्याचे प्रमाण यांवरही अवलंबून असते. निरनिराळ्या उत्पादन क्षेत्रात विनियोगाचे प्रमाण वाढल्याने उत्पादनशक्ती वाढते आणि तिचा पूर्णपणे उपयोग झाल्यास एकंदर राष्ट्रीय उत्पादन वाढते. राष्ट्रीय उत्पादन वाढल्याने जनतेच्या गरजा अधिकाधिक प्रमाणात भागविणे शक्य होते आणि सर्वसाधारण जीवनमानाची पातळी उंचावते. मात्र सर्व क्षेत्रात विनियोगाची वाढ योग्य प्रमाणात झाली पाहिजे, नाहीतर विकासकार्यामध्ये समतोल राहणार नाही.

संदर्भ : Keynes, J. M. The General Theory of Employment, Interest and Mony, London, 1936.

सुर्वे,गो.चिं.