बायो चित्रजवनिका : फ्रान्सच्या नॉर्मंडी भागातील बायो (बायू) गावच्या वस्तूसंग्रहालयात ठेवलेली इतिहासप्रसिद्ध ⇨ चित्रजवनिका. वस्तुतः ही विणलेली चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) नसून चित्र-भरतकाम आहे.

बायो

इ. स. १०६६ साली हेस्टिंग्जच्या लढाईत नॉर्मन सरदार विल्यमने इंग्लंडच्या हॅरल्ड राजाचा पराभव व वध केला. या प्रसंगाचे शब्दांतून व चित्रांतून केलेले वर्णन ७०.३४ × ०.५० मी. या आकाराच्या जाड्याभरड्या तागाच्या चित्रपट्टीवर आहे. मुख्य वर्ण्यविषयाबरोबर,वरखालच्या सु. ७.५० सेंमी. रुंदीच्या पट्ट्यांतून इसापच्या गोष्टी, तत्कालीन शेती, शिकार, वास्तवदर्शी तसेच काल्पनिक पशुपक्षी आणि इतर आलंकारिक आकृत्या भरलेल्या आहेत. निरनिराळ्या आठ रंगांच्या लोकरी धाग्यांचे, पट्टीचे (लेस) व रफूगारीच्या टाक्यांचे हे भरतकाम आहे.

विद्यमान स्थितीतील ही प्राचीन कलाकृती अपुरी असल्याचे दिसते. विल्यमच्या माटिल्डा राणीची ही कलाकृती असावी, असा प्रवाद आहे. तथापि विल्यमचा सावत्रभाऊ व बायोचा बिशप ओडो याने कुण्यातरी नॉर्मन कलाकाराकडून ती करवून घेतली असणेही शक्य आहे.

गोंधळेकर, ज. द.